नमस्कार !
आसामचे राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी जी, केंद्रीय शिक्षण मंत्री,श्री रमेश पोखरियाल जी आसामचे मुख्यमंत्री, श्री सर्वानंद सोनोवाल जी, तेजपूर विद्यापीठाचे कुलगुरू वी के जैन जी, इतर व्याख्याते, आणि तेजपूर विद्यापीठाचे तेजस्वी, गुणवान आणि माझे प्रिय विद्यार्थी,
आज 1200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कायम समरणात राहील असा क्षण आला आहे. आपले शिक्षक-प्राध्यापक, आपले माता-पिता या सर्वांसाठी देखील आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की आजपासून तुमच्या पुढच्या कारकिर्दीसोबत तेजपूर विद्यापीठाचे नाव कायमचे जोडले गेले आहे.आज तुम्हाला जेवढं आनंद झाला आहे, तेवढाच आनंद मलाही झाला आहे.तुमच्या भविष्याबाबत जितक्या आशा आकांक्षा तुमच्या मनात आहेत,तेवढाच विश्वास माझ्या मनात तुम्हा सर्वांविषयी आहे. मला विश्वास आहे की तेजपूरमध्ये राहत असतांना या विद्यापीठात तुम्ही जे काही शिकले आहात, ते ज्ञान आसामची प्रगती, देशाच्या प्रगतीला नवी गती देईल, नवी उंची देईल.
मित्रांनो,
या विश्वासामागे अनेक कारणे आहेत.पहिले कारण- तेजपूरचे हे ऐतिहासिक स्थळ.इथल्या पौराणिक इतिहासापासून मिळणारी प्रेरणा. दुसरे कारण म्हणजे, तेजपूर विद्यापीठात तुम्ही जे काम करत आहात,त्याची माहिती मला कळल्याने माझा उत्साह अधिकच वाढला आहे. आणि तिसरे कारण- पूर्व भारताच्या सामर्थ्यावर, इथल्या युवकांच्या क्षमतांवर आणि राष्ट्रउभारणीच्या त्यांच्या प्रयत्नांवर माझाच नाही, तर संपूर्ण देशाचा पूर्ण विश्वास आहे.
मित्रांनो,
आता पुरस्कार आणि पदक देण्यापूर्वी या विद्यापीठाचे जे गीत गायले गेले, त्यात अध्याहृत असलेल्या भावना तेजपूरच्या महान इतिहासाला वंदन करणाऱ्या आहेत.
त्यातल्या काही ओळी इथे पुन्हा सांगायला मला आवडेल. यासाठी पुन्हा सांगायला आवडेल कारण, त्या आसामच्या गौरवासाठी भारतरत्न भूपेन हजारिका यांनी लिहिलेले काव्य आहे. त्यांनी लिहिले आहे--.
अग्निगड़र स्थापत्य, कलियाभोमोरार सेतु निर्माण,
ज्ञान ज्योतिर्मय, सेहि स्थानते बिराजिसे तेजपुर विश्वविद्यालय,
म्हणजेच, जिथे अग्निगढ सारखे स्थापत्य आहे, जिथे कलिया-भोमोरा सेतू आहे, जिथे ज्ञानज्योती आहे, अशा ठिकाणी तेजपूर विद्यापीठ वसले आहे.या तीन ओळींमध्ये भूपेनदा यांनी किती सुंदर वर्णन केले आहे. अग्निगढचे राजकुमार अनिरुद्ध आणि राजकुमारी उषा-भगवान श्रीकृष्ण त्यांच्याशी संबंधित इतिहास, महान आहोम शूरवीर कलिया-भोमेरा फुकन यांची दूरदृष्टी, ज्ञानाचे भांडार हे सगळे तेजपूरसाठी प्रेरणादायी आहे. भूपेनदा यांच्यासोबतच, ज्योती प्रसाद अगरवाल, विष्णू प्रसाद राभा यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांनी तेजपूरला नवी ओळख दिली आहे. आपणही त्यांच्याच कर्मभूमीत, जन्मभूमीत शिक्षण घेतले आहे, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असणे आणि या अभिमानातून आपले आयुष्यही आत्मविश्वासाने भारलेले आहे, हे अत्यंत साहाजिक आहे.
मित्रांनो,
आपला देश यंदा आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करत आहे. शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून देशाला मुक्त करण्यासाठी आसामच्या अगणित लोकांनी योगदान दिले आहे. जे त्यावेळी होते, त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचले, आपले तारुण्य खर्ची घातले. आता आपल्या सर्वांना नव्या भारतासाठी, आत्मनिर्भर भारतसाठी आयुष्य जगायचे आहे, आयुष्याचे सार्थक करायचे आहे. आतापासून ते भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होईपर्यंतचा काळ, ही 25-26 वर्षे तुमच्या आयुष्याचा देखील सुवर्णकाळ असेल.कल्पना करा, की 1920-21 मध्ये जे युवक, ज्या युवती आपल्या वयाचे असतील, ज्या वयाचे आपण आज आहात, ते सगळे युवा 1920-21 साली कुठली स्वप्ने बघत असतील? आपल्या कोणत्या गोष्टींना त्यांनी आयुष्यात महत्व दिले असेल, कुठल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले असेल? आपण जर आपल्या स्मरणशक्तीला थोडा जोर दिला, आणि 100 वर्षांपूर्वीची युवा पिढी काय करत होती, याची कल्पना केली, तर आज यापुढे आपल्याला काय करायचे याचा हे समजून घ्यायला आपल्याला वेळ लागणार नाही.
आपल्यासाठी हा सुवर्णकाळ आहे. तेजपूरचे तेज संपूर्ण भारतात, संपूर्ण जगात पसरू द्या. केवळ आसामच नाही,तर ईशान्य भारताच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जा.आज आमचे सरकार ज्याप्रकारे ईशान्य भारताच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे, ज्याप्रकारे दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि प्रत्येक क्षेत्रात काम सुरु आहे, त्यातून तुम्हा सर्वांसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा पूर्ण लाभ घ्या. आपल्यात नवा विचार करण्याची क्षमता आहे, नवे काही करण्याचे सामर्थ्य आहे, हेच तुमच्या प्रयत्नांतून दिसते आहे.
मित्रांनो,
तेजपूर विद्यापीठाची आणखी एक ओळख आहे,ती म्हणजे तुमच्याकडे स्वतःची नवोन्मेष-संशोधन केंद्रे आहेत. आपल्या स्थानिक संशोधनांमुळे, ‘व्होकल फॉर लोकल’ ला गती मिळाली आहे. नवी ताकद मिळाली आहे. ही संशोधने स्थानिक समस्या सोडवण्याचे काम करण्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहेत, ज्यातून विकासाची नवी दारे उघडली जात आहेत. जसे आता मला सांगण्यात आले आहे, की आपल्या रसायनविज्ञान विभागाने अत्यंत माफक दरात पाणी शुद्ध करण्याच्या एका सुलभ तंत्रज्ञानावर काम केले आहे. याचा लाभ आसामच्या अनेक गावांना होत आहे. किंबहुना, मला तर असेही सांगण्यात आले, की आता हे नवे तंत्रज्ञान छत्तीसगड, ओडिशा, बिहार,कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांपर्यंत देखील पोचते आहे. म्हणजेच, तुमची कीर्तीपताका आता सगळीकडे झळकते आहे. भारतात या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचे, जल जीवन अभियानाचे जे स्वप्न आहे, त्याचे अधिक सशक्तीकरण होणार आहे.
मित्रांनो,
पाण्यासोबतच,गावांमध्ये कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करण्याचा विडा तुम्ही सर्वांनी उचलला आहे, त्याचाही खूप मोठा प्रभाव आहे.पिकांचे अवशेष आपले शेतकरी आणि पर्यावरण या सर्वांसाठी खूप मोठे आव्हान आहे.बायोगॅस आणि सेंद्रिय खतांशी संबंधित स्वस्त आणि प्रभावी तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत आपण आपल्या विद्यापीठात जे काम करत आहात, त्यातून देशातली खूप मोठी समस्या दूर होऊ शकते.
मित्रांनो,
मला हे ही सांगण्यात आले आहे की तेजपूर विद्यापीठ, ईशान्य भारतातील जैव-विविधता आणि समृद्ध परंपरेचे संरक्षण करण्यासाठी देखील अभियान चालवत आहे. ईशान्य भारतातील आदिवासी समाजाच्या लुप्त होत असलेल्या भाषांचे दस्तऐवजीकरण हे देखील अत्यंत कौतुकास्पद काम आहे.त्याचप्रमाणे, संत श्रीमंत शंकरदेव यांची जन्मभूमी असलेल्या नगांव च्या बाताद्रव थान येथे कित्येक वर्षे जुन्या लाकडावर केलेल्या कोरीव कामाचे संवर्धन व्हावे किंवा पारतंत्र्याच्या काळात लिहिली गेलेली आसामची पुस्तके आणि कागदपत्रांचे डिजिटलीकरण असो, तुम्ही खरोखर इतकी विविध कामे करत आहात. कोणीही याबद्दल ऐकले तर त्यांना नक्कीच अभिमान वाटेल की भारताच्या एका कोपऱ्यात,इतक्या दूर असलेल्या या तेजपूर गावात तपस्या सुरु आहे, साधना सुरु आहे. आपण खरोखरच लोकविलक्षण काम करत आहात.
मित्रांनो,
मी जेव्हा इतक्या सगळ्या विषयांवर माहिती घेतली, तेव्हा माझ्या मनात हा ही प्रश्न आला की स्थानिक विषयांवर, स्थानिक गरजांवर इतके संशोधन आणि काम करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळते? तर या प्रश्नाचे उत्तरही तेजपूर विद्यापीठातच आहे. आता जसे तुमचे वसतिगृह. चराईदेव, नीलाचल, कंचनजंगा, पटकाई, धानसिरी, सुबनसिरी, कोपिली, ही सगळी पर्वत, शिखरे आणि नद्यांची नावे आहेत.आणि ही केवळ नावे नाहीत तर, ही सगळी जीवनाची जिवंत प्रतीके आहेत, प्रेरणा आहेत. जीवनप्रवाहात आपल्याला अनेकदा खूप अडचणी आणि संकटांच्या पर्वतांचा सामना करावा लागतो, नद्या पार कराव्या लागतात.हे काम एक वेळेचे नसते, आपण एक पर्वत चढतो आणि त्यानंतर दुसऱ्याकडे वळतो. प्रत्येक पर्वतारोहणासोबत आपल्या अनुभवात, ज्ञानात भर पडते. यातूनच, नव्या संकटांविषयी आपला दृष्टिकोन तयार होतो. याचप्रमाणे नद्या देखील आपल्याला बरेच काही शिकवत असतात.नद्या, अनेक छोट्या-मोठ्या नद्या/प्रवाह एकत्र येऊन तयार झाल्या असतात आणि मग तो एक प्रवाह समुद्राला जाऊन मिळतो. आपणही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लोकांकडून ज्ञान मिळवले पाहिजे , शिकले पाहिजे आणि ती शिकवण घेऊन पुढे जात आपले उद्दिष्ट प्राप्त केले पाहिजे.
मित्रांनो,
जेव्हा आपण हाच दृष्टिकोन घेऊन पुढे जाऊ, तेव्हा आसाम, ईशान्य भारत आणि देशाच्या विकासात आपण आपले योगदान देऊ शकतो. आपण पाहिले असेल, कोरोनाच्या या काळात, ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ संकल्पनेने आपल्या शब्दसंपदेत महत्वाचे स्थान मिळवले आहे. आता ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना आपल्या स्वप्नांमध्ये मिसळली आहे. आपला पुरुषार्थ, आपले संकल्प, आपली सिद्धी, आपले प्रयत्न, सर्व काही याच संकल्पनेच्या अवती-भवती असल्याचा अनुभव आपण घेत आहोत. पण हे अभियान नेमके काय आहे? बदल काय होत आहे? आणि हे बदल केवळ संसाधनांचा आहे का? हा बदल केवळ भौतिक पायाभूत सुविधांचा आहे का?
मित्रांनो,
हे परिवर्तन केवळ तंत्रज्ञानात होणार आहे का? केवळ वाढती आर्थिक आणि राजनैतिक शक्ती यात या बदल प्रतिबिंबित होणार आहे का? अशा प्रत्येक बदलाविषयीच्या प्रश्नाचे उत्तर तर होकारार्थी आहे. मात्र, या सगळ्याच्या पलीकडे जे मोठे परिवर्तन होणार आहे, ते आहे, अंतःप्रेरणा, कृती आणि प्रत्येक गोष्टीला दिल्या जाणाऱ्या प्रतिसादात होणारे परिवर्तन! बदल होणार आहे दृष्टीकोनात. प्रत्येक आव्हान, प्रत्येक समस्येचा सामना करण्याची आमच्या युवकांची कार्यशैली देशाचे वातावरण आता बदलले आहे. याचे एक ताजे उदाहरण आपण आत्ताच क्रिकेट जगतात पाहिले. आपल्यापैकी अनेकांनी भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामने बघितले असतील. या दौऱ्यात काय काय अडचणी-आव्हाने आपल्या संघापुढे नाही आल्या ? आपला इतका वाईट पराभव झाला. मात्र, त्यातूनही आपण बाहेर निघालो आणि पुढच्या सामन्यात विजय मिळवला. इतक्या गंभीर दुखापती होऊनही आपले खेळाडू सामना वाचवण्यासाठी मैदानावर पाय रोवून उभे राहिले. अत्यंत विपरीत आणि आव्हानात्मक परिस्थितीत देखील निराश होण्याऐवजी आमच्या युवा खेळाडूंनी आव्हानांचा सामना केला, नवे उपाय शोधले. काही खेळाडू अगदी अननुभवी होते. मात्र त्यांची हिंमत मजबूत होती. त्यांना संधी मिळाल्याबरोबर त्यांनी इतिहास रचला. एका उत्तम संघामध्ये ती गुणवत्ता आणि जिंकण्याची जिद्द होती, ज्यामुळे इतक्या अनुभवी संघाला आणि इतक्या जुन्या-जाणत्या खेळाडूंच्या संघाचा त्यांनी पराभव केला.
युवा मित्रांनो,
क्रिकेटच्या मैदानावरची आपल्या खेळाडूंची ही कामगिरी केवळ खेळाच्या दृष्टीनेच महत्वाची नाही, तर हा त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा धडा आहे. पहिला धडा हा की आपला आपल्या क्षमतेवर विश्वास असायला हवा. आत्मविश्वास असायला हवा. दुसरा धडा आपल्या मानसिकतेविषयी आहे. जर आपण सकारात्मक मानसिकता घेऊन पुढे गेलो, तर परिणामही निश्चितच सकारात्मक असतील. तिसरा आणि सर्वात महत्वाचा धडा म्हणजे, जर आपल्यासमोर एकीकडे सुरक्षित निघून जाण्याचा पर्याय असेल आणि दुसरीकडे कठीण विजयाचा पर्याय असेल, तर आपण विजयाच्या पर्यायाला निश्चितच संधी द्यायला हवी. जर जिंकण्याच्या प्रयत्नात कधी कधी अपयश जरी आले, तरी त्यात काहीही नुकसान नाही. धोका पत्करायला, प्रयोग करायला घाबरायचे नाही.आपल्याला क्रियाशील आणि धाडसी व्हावेच लागेल. आपल्या आत जी अपयशाची भीती असते, त्यामुळे आपण स्वतःवर विनाकारणच दबाव तयार करत असतो, जेव्हा या दबावातून आपण बाहेर पडू, तेव्हाच आपण धाडसी, निर्भय होऊ शकू.
मित्रांनो,
हिमतीने उभा असलेला, आपल्या उद्दिष्टांप्रती समर्पित भारत केवळ क्रिकेटच्या मैदानावर दिसतो असे नाही. तुम्ही सगळेही त्याच भारताची प्रतिमा आहात. आपल्या सर्वांमध्ये पुरेपूर आत्मविश्वास भरलेला आहे. आपण वेगळा मार्ग चोखाळायला, वेगळी वाट निवडायला घाबरत नाही. आपल्यासारख्या याच युवा उर्जेने कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताला अत्यंत भक्कम केले आहे. मोठी ताकद दिली आहे. आपल्याला आठवत असेल, या लढाईच्या सुरुवातीला अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या की इतक्या मोठ्या लोकसंख्येचा भारत देश, संसाधनाच्या कमतरतेतून कोरोनामुळे उध्वस्त होऊन जाईल. मात्र भारताने जगाला दाखवून दिले की जर तुमच्याकडे दृढनिश्चय आणि लवचिकता असेल, तर संसाधने निर्माण व्हायला वेळ लागत नाही. भारताने हेच केले. भारताने परिस्थितीशी तडजोड करण्यापेक्षा, संकट वाढेल याची वाट बघत बघण्यापेक्षा आधीच तत्पर होऊन सक्रीय पावले उचललीत. याचाच परिणाम म्हणून भारत या विषाणूसमोर टिकून राहू शकला, प्रभावीपाने लढा देऊ शकला . भारतात तयार झालेल्या उपाययोजनांच्या मदतीने आपण विषाणूच्या संक्रमणाला आळा घातला, सोबतच आपल्या आरोग्य पायाभूत सुविधा देखील अधिक उत्तम केल्या. आता आमची लसीशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता देखील भारतासोबतच जगातील अनेक देशांना सुरक्षा कवचाचा विश्वास देत आहे.
जर आपण आपले शास्त्रज्ञ,आपले संशोधक,आपले वैज्ञानिक,आपल्या उद्योगांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नसता, तर हे यश मिळू शकले असते का? आणि मित्रांनो, केवळ आरोग्य क्षेत्रच का? आपल्या डिजिटल पायाभूत सुविधाच बघा ना. जर आपण असे समजून चाललो असतो की भारतात साक्षरतेच्या अभावामुळे डिजिटल व्यवहार, थेट लाभ हस्तांतरण होऊ शकणार नाही, तर मग कोरोनासारख्या संकटात सरकार गरीबातल्या गरीबापर्यंत इतक्या प्रभावीपणे पोहचू शकले असते? आज ज्या वित्त-तंत्रज्ञानात, ज्या डिजिटल सामावेशनात आपण जगातल्या अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवले आहे, ते कधी शक्य झाले असते का?आजचा भारत समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयोग करायला कचरत नाही आणि व्यापक स्तरावर काम करायलाही मागे हटत नाही. जगातील सर्वात मोठे बँकिंग समावेशन भारतात होत आहे, शौचालये तयार करण्यचे सर्वात मोठे अभियान भारतात, घराघरापर्यंत नळाने पाणीपुरवठा करण्याचे सर्वात मोठे अभियान आपल्याच देशात, सर्वात मोठी आरोग्य विमा योजना भारतात आणि आता सर्वात मोठी लसीकरण मोहीम देखील भारतात होत आहे. या सगळ्याचा खूप मोठा लाभ ईशान्य भारताला मिळाला आहे. आसामच्या लोकांना झाला आहे.असे कार्यक्रम तेव्हाच सुरु होतात जेव्हा देश आणि समाजात पुरेपूर आत्मविश्वास असतो. देशातील सद्यपरिस्थिती बदलण्यासाठी, नवनवे शोध लावण्यासाठी जेव्हा संपूर्ण देश आपली पूर्ण ताकद लावतो, तेव्हाच हे शक्य होते.
मित्रांनो,
आज जगात, भारतात ज्याप्रकारे नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार होतो आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. आज आपण शाखा नसतांनाही बँक, शोरूम नसतांनाही किरकोळ व्यवसाय, बिना-डायनिंग हॉलचे क्लाऊड किचन, असे अनेक अभिनव प्रयोग यशस्वी होत असल्याचे आपल्या दैनंदिन आयुष्यात बघतो आहोत. अशा स्थितीत, भविष्यात हे ही शक्य आहे की पुढची विद्यापीठे पूर्णपणे व्हर्चूअल म्हणजे आभासी स्वरूपाची असतील आणि जगभरातील विद्यार्थी आणि व्याख्याते कधीही कोणत्याही विद्यापीठाचा भाग बनू शकतील. मात्र, अशाप्रकारच्या परीवर्तनासाठी आपल्याकडे एक आवश्यक नियामक आराखडा असणे अत्यंत महत्वाचे आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सातत्याने हाच प्रयत्न केला जात आहे. या धोरणात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, बहुशाखीय शिक्षण आणि लवचिकतेला प्रोत्साहन दिले जात आहे. नवे शैक्षणिक धोरण, डेटा आणि डेटा विश्लेषणासाठी आपली शिक्षणप्रणाली सज्ज असावी, यावर भर देत आहे. डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून प्रवेशापासून ते शिक्षण आणि मूल्यांकनाची पूर्ण प्रक्रिया अधिक उत्तम होऊ शकेल.
मला पूर्ण विश्वास आहे की तेजपूर विद्यापीठ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ही उद्दिष्टे साध्य करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल.तेजपूर विद्यापीठाची आजवरची पत आणि त्याच्या सामर्थ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी माझ्या विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की जेव्हा आपले औपचारिक शिक्षण पूर्ण होते, त्यावेळी आपण आपल्या भविष्यासाठी नाही, तर देशाच्या भविष्यासाठी काम करता. आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपले उद्दिष्ट उच्च असेल तर आयुष्यात येणाऱ्या चढउतारांमुळे एवढा परिणाम होणार नाही. आपल्या आयुष्यातील पुढची 25-26 वर्षे आपल्या कारकिर्दीसोबतच देशाचे भाग्यही निश्चित करणार आहे.
मला विश्वास आहे की आपण सगळे देशाला नव्या उंचीवर पोहोचवू या. 2047साली जेव्हा आपला देश स्वातंत्र्यांचा शतकमहोत्सव साजरा करेल, तेव्हा हाच 25-30 वर्षांचा कालखंड आपल्या योगदानामुळे, आपल्या पुरुषार्थाने, आपल्या स्वप्नांनी भरलेला असेल. कल्पना करा, स्वातंत्र्याच्या या शतकात आपली ही 25 वर्षे किती महत्वाचे योगदान देणारी ठरणार आहेत. चला मित्रांनो, स्वतःला आपल्या भविष्यातील स्वप्नांसाठी सजग करा, त्या दिशेने वाटचाल करा, संकल्प मनात घेऊन वाटचाल करा, सिद्धी म्हणजेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चालू लागा. बघा, आयुष्याच्या यशाची एकेक उंच शिखरे आपण पादाक्रांत करत जाल. आजच्या या पवित्र प्रसंगी, आपल्या कुटुंबियांना, आपल्या शिक्षकांना,आपल्या सर्व व्याख्यात्यांना, आपल्या स्वप्नांना, सर्वांना खूप खूप शुभेच्छा, अनंत शुभेच्छा देतो!
खूप खूप धन्यवाद!!