जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कॉप 14 परिषदेत आपण सर्वांचे मी भारतात स्वागत करतो. जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी भारतात हे संमेलन आयोजित केल्याबद्दल कार्यकारी सचिव इब्राहिम जियाओ यांना धन्यवाद देतो. जमिनीची धूप थांबवून त्या जमीनीला पुन्हा सुपीक करण्यासाठी हे संमेलन कटीबद्धता दर्शवते.
भारतही यात मोलाचे योगदान देऊ इच्छितो कारण दोन वर्षासाठी याचेसह अध्यक्षपद आपण स्वीकारले आहे.
मित्रहो,
भारतात पूर्वापार, जमिनीला विशेष महत्व देण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत पृथ्वीला पवित्र मानले जाते, तिला माता मानून पुजले जाते.
सकाळी उठल्यावर आपण धरतीवर पाय ठेवतो तेव्हा प्रार्थना करून आपण तिची क्षमा मागतो.
समुद्र-वसने देवी पर्वत-स्तन-मण्डले।
विष्णु-पत्नी नमस्तुभ्यं पाद-स्पर्शम् क्षमश्वमे।
मित्रहो,
जैव विविधता आणि भूमी या दोन्हीवर,हवामान आणि पर्यावरणाचा प्रभाव पडतो.
जमिनीची धूप आणि पशु तसेच झाडांवरही याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसून येत आहेत, काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ आणि उंचच उंच लाटा उसळणे असो, अनियमित पाऊस, वादळ, वाळूची वादळे, अशा विविध प्रकारांनी जमीन नापिकी होण्याचे हे कारणही ठरत आहे.
बंधू- भगिनींनो,
भारताने तिन्ही संमेलनासाठी कॉप च्या माध्यमातून जागतिक संमेलनाचे यजमानपद भूषवले आहे.रियो संमेलनातल्या तीन मुख्य चिंता दूर करण्याप्रति आमची कटीबद्धता यातून प्रतीत होत आहे.
हवामान बदल, जैव विविधता आणि जमिनीची धूप यावर तोडगा काढण्यासाठी व्यापक दक्षिण- दक्षिण सहकार्यासाठी ठोस तोडग्याकरिता प्रस्ताव देण्यात भारताला आनंद आहे.
मित्रहो,
जगातल्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त देशांना वाळवंटी करणाचे परिणाम झेलावे लागत आहेत. म्हणूनच वाळवंटीकरणाबरोबरच पाणी टंचाई बाबतही विशेष उपाय हाती घेणे आवश्यक आहे. कारण जमिनीच्या नापिकीबाबत आपण उपाय करतो त्यावेळी आपण पाणी टंचाईच्या समस्येवरही तोडगा काढत असतो.
पाण्याची उपलब्धता वाढवणे, पाण्याचे पुनर्भरण अधिक उत्तम करणे, जमिनीची आर्द्रता कायम राखणे हे भू आणि जल धोरणाचे महत्वाचे भाग आहेत. यूएन सीसीडी च्या नेतृत्वाखाली जागतिक जल कृती कार्यक्रम तयार करण्याचे आवाहन मी करतो.
मित्रहो,
सातत्यपूर्ण विकासासाठी जमिनीची सुपीकता पुन्हा आणणे आवश्यक आहे. यूएनएफसीसीसीच्या पॅरिस कॉपमध्ये, भारताने सादर केलेल्या निर्देशांकांचे स्मरण मला झाले.
यामध्ये, जमीन, पाणी, वायू, वृक्ष आणि सर्व प्राणिमात्रात समतोल राखण्याला, भारतीय संस्कृतीत दिलेले महत्व विषद करण्यात आले आहे. मित्रहो, आपल्याला ऐकून आनंद होईल की वन क्षेत्र वाढवण्यात भारत यशस्वी झाला आहे. 2015 ते 2017 या काळात, भारताच्या वृक्ष आणि वन क्षेत्रात 0.8 दशलक्ष हेक्टरची वाढ झाली. भारतात विकास कामांसाठी, वनभूमीचा वापर केला जाणार असेल तर तेवढीच जमीन दुसऱ्या कोणत्याही भागात वनीकरणासाठी उपलब्ध झाली पाहिजे. या जंगलातून मिळणाऱ्या लाकडाच्या किंमती इतके मूल्य देणेही आवश्यक आहे.
गेल्या आठवड्यातच, विकासासाठी वनभूमीचा उपयोग करण्याच्या बदल्यात सुमारे 6 अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे 40 ते 50,000 कोटी रुपये प्रांतीय सरकारांना जारी करण्यात आले आहेत.
आमच्या सरकारने, वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे, पीक उत्पादकता वाढवून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. यामधे जमिनीची सुपीकता पुन्हा आणणे आणि सूक्ष्म सिंचनाचा समावेश आहे. प्रत्येक थेंबागणिक जास्त पीक, हे ब्रीद घेऊन काम करत आहोत. या बरोबरच, शून्य खर्च, नैसर्गिक शेतीवरही आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. प्रत्येक शेतातल्या मातीचा कस ठरवण्यासाठीही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही मृदा आरोग्य कार्ड देत आहोत. योग्य पिकाचे उत्पादन घेणे,खत पाणी यांचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरते. आतापर्यंत सुमारे 217 दशलक्ष मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात आली आहेत. जैव खतांचा वापर आम्ही वाढवत आहोत आणि रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करत आहोत.
जल व्यवस्थापन हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. जल विषयक सर्व महत्वाच्या मुद्द्यांचे समग्र निराकरण करण्यासाठी आम्ही जल शक्ती मंत्रालय निर्माण केले आहे. पाण्याच्या सर्व प्रकारच्या रूपाचे महत्व जाणून अनेक औद्योगिक प्रक्रियेतुन बाहेर पडणारा द्रव शून्य राहील अशी व्यवस्था अंमलात आणली आहे. सांड पाण्यावर अशी प्रक्रिया करण्याची तरतूद नियामक धोरणात करण्यात आली आहे की जलचरांना कोणतीही हानी न पोहोचवता हे पाणी नदीत परत सोडता येईल.
मित्रहो, जमीन नापीक होण्याच्या आणखी एक कारणाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो, ज्याला रोखले नाही तर स्थिती पूर्ववत होणे अशक्य होऊ शकते. हा प्रश्न आहे प्लास्टिक कचऱ्याचा. यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच जमिन अनुत्पादक ठरून पीक घेण्यासाठी अयोग्य होऊ शकते.
येत्या काळात, एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याची घोषणा माझ्या सरकारने केली आहे. पर्यावरण स्नेही पर्याय विकसीत करण्यासाठी आणि हे प्लास्टिक नष्ट करण्याची पद्धत विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
संपूर्ण जगानेही, एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.
मित्रहो, मानव सशक्तीकरण आणि पर्यावरणाची स्थिती यांचा घनिष्ट संबंध आहे. मग जल स्रोताबाबतचा मुद्दा असो किंवा एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर कमी करणे असो यासाठी जनतेच्या मानसिकतेत बदल आवश्यक आहे. समाजातले सर्वच घटक लक्ष्य प्राप्त करण्याचा निर्णय घेतात तेव्हाच अपेक्षित परिणाम साध्य होतो.
आम्ही अनेक आराखडे सादर करू शकतो मात्र जेव्हा वास्तविक स्तरावर संघटित प्रयत्न होतो तेव्हाच खरा बदल घडू शकतो. स्वच्छ भारत अभियानात याचा प्रत्यय आला. सर्वच क्षेत्रातल्या लोकांनी यात सहभागी होऊन 2014 मध्ये 38 टक्के असलेली स्वच्छतेची व्यापकता आज 99 टक्के झाली आहे.
एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी असाच प्रतिसाद अपेक्षित आहे. यात युवकांकडून अधिक अपेक्षा आहे, सकारात्मक बदल घडवण्यासाठी युवक पुढाकार घेत आहेत. प्रसार माध्यमेही अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.
मित्रहो, जागतिक भू कार्यक्रमासाठी मी अधिक कटीबद्धता व्यक्त करू इच्छितो. भारतात यशस्वी ठरलेले एलडीएन धोरण जाणून त्याचा स्वीकार करू इच्छिणाऱ्या देशांना भारत मदत देऊ इच्छितो. नापीक झालेली जमीन पुन्हा सुपीक करण्याच्या आपल्या 21 दशलक्ष हेक्टरच्या उद्दिष्टात भारताने वाढ केली असून 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टरचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे, अशी घोषणा मी या मंचावरून करतो.
वृक्षांच्या माध्यमातून 2.5 ते 3 अब्ज मेट्रिक टन अतिरिक्त कार्बन शोषण्यासाठीच्या भारताच्या कटीबद्धतेला यामुळे बळ मिळणार आहे.
आपल्या प्राचीन शास्त्रात असलेली एका लोकप्रिय प्रार्थनेने मी भाषणाचा समारोप करतो.
ओम् द्यौः शान्तिः, अन्तरिक्षं शान्तिः
शांती या शब्दाचा अर्थ केवळ शांतता अथवा हिंसेला विरोध असा नाही.इथे शांतीचा अर्थ समृद्धी असा अभिप्रेत आहे. प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वाचा एक उद्देश असतो आणि प्रत्येकाला तो उद्देश पूर्ण करावा लागतो.
या उद्देशाची पूर्तता म्हणजेच समृद्धी आहे.
ओम् द्यौः शान्तिः, अन्तरिक्षं शान्तिः
आकाश,स्वर्ग आणि अंतराळ समृद्धी ही प्राप्त व्हावी.
पृथिवी शान्तिः,
आपः शान्तिः,
ओषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिः, विश्वेदेवाः शान्तिः,
ब्रह्म शान्तिः
भू माता समृद्ध व्हावी.
यामध्ये वनस्पती आणि प्राणिमात्र यांचा समावेश आहे, जे आपल्यासमवेत या धरतीवर राहतात.
ते समृद्ध व्हावेत.
पाण्याचा प्रत्येक थेंब समृद्ध रहावा.
दिव्य देवता समृद्ध व्हाव्यात.
सर्वं शान्तिः,
शान्तिरेव शान्तिः,
सा मे शान्तिरेधि।।
सर्वांचे कल्याण व्हावे.
आम्हालाही समृद्धी लाभावी.
ओम् शान्तिः शान्तिः शान्तिः।।
ओम समृद्धि। समृद्धि।
समृद्धि।
आपल्या पूर्वजांचे विचार महान आणि परिपूर्ण होते. मी आणि आपण यातले खरे नाते त्यांनी जाणले होते. माझी समृद्धी केवळ आपल्या समृद्धीच्या माध्यमातूनच होऊ शकते याचे त्यांना ज्ञान होते.
आपले पूर्वज जेव्हा आम्ही असा उल्लेख करत तेव्हा त्यांना केवळ त्यांचे कुटुंब, समुदाय किंवा केवळ मनुष्य प्राणी असा सीमित अर्थ अभिप्रेत नव्हता तर त्यात आकाश, पाणी, झाडे, या सर्वांचा समावेश असे.
शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करताना त्यांचा क्रमही जाणून घेण्यासारखा आहे.
ते आकाश, पृथ्वी, पाणी आणि वृक्षांसाठी प्रार्थना करत असत, या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपले अस्तित्व टिकून आहे. या गोष्टी समृद्ध असतील तर मी समृद्ध राहीन हा त्यांचा मंत्र होता. आजच्या काळासाठी हा विचार समर्पक आहे.
हीच भावना घेऊन, या शिखर संमेलनात सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन
धन्यवाद आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद.