माझ्या प्रिय परिवार सदस्यांनो, सर्व दिव्यांगांनो, बंधु भगिनींनो
आताच विजयभाई, आपले मुख्यमंत्रीजी सांगत होते की एखाद्या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने ४० वर्षांनंतर राजकोटला एक पंतप्रधान आला आहे. मला हे सांगण्यात आले की पंतप्रधान म्हणून यापूर्वी फक्त मोरारजी देसाई येथे आले होते. माझे हे सौभाग्य आहे की मला आज राजकोटच्या जनता-जनार्दनाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. माझ्या जीवनात राजकोटचे विशेष महत्व आहे. राजकोटने मला निवडून गांधीनगर पाठवले नसते तर आज देशाने मला दिल्लीला पोहचवले नसते.
माझ्या राजकीय प्रवासाचा प्रारंभ राजकोटच्या आशीर्वादानेच झाला असून राजकोटने दिलेल्या भरपूर प्रेमाने झाला आहे आणि मी राजकोटचे हे प्रेम कधी विसरू शकत नाही. मी पुन्हा एकदा राजकोटच्या जनता-जनार्दनाला मस्तक झुकवून नमन करतो, प्रणाम करतो, वंदन करतो आणि आपण नेहमीच आशीर्वाद द्याल अशी इच्छा करतो.
ज्या वेळेस एनडीएच्या सर्व खासदारांनी मला नेता म्हणून निवडले, पंतप्रधान पदाची जबाबदारी निश्चित केली आणि त्याच दिवशी मी आपल्या भाषणात म्हटले होते की माझे सरकार या देशांतील गरिबांना समर्पित आहे. हे माझे दिव्यांगजन, देशात कोट्यावधी दिव्यांग आहेत. आणि दुर्दैवाने ज्या कुटुंबात अशी संतान जन्म घेते त्या कुटुंबावरच बहुतांशी वेळा त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी पडते. मी अनेक अशी कुटुंबे पाहिली आहेत, अनेक अशा माता पाहिल्या आहेत. २५ वर्ष, २७ वर्ष, ३० वर्षे वय आहे, जीवनातील सारी स्वप्ने साकार करायची बाकी आहेत, लग्नानंतर पहिले अपत्य झाले आणि तेही दिव्यांग झाले. आणि मी हे पाहिले आहे की त्या पती पत्नीने, त्या आई वडीलांनी आपली स्वप्ने त्या बालकासाठी त्यागली आहेत. जीवनात एकाच स्वप्न राहते की हे दिव्यांग अपत्य, ईश्वराने आमच्यावर जबाबदारी दिली आहे आणि आम्हाला ही जबाबदारी ईश्वरभक्तीप्रमाणे पार पाडायची आहे. अशी लाखो कुटुंबे देशात आहेत.
पण माझ्या प्रिय देशवासीयांनी, ईश्वराने कदाचित एक असे कुटुंब निवडले असेल, त्या घरी एखाद्या दिव्यांगाचे आगमन झाले असेल. परमात्म्याला कदाचित असा विश्वास असेल की हे कुटुंब आहे, त्याची संवेदनशीलता आहे, त्याचे संस्कार आहेत, हेच कदाचित दिव्यांग मुलाचे पालन करतील. म्हणून कदाचित परमात्म्याने त्या कुटुंबाला निवडले असावे. पण दिव्यांग कोणत्याही कुटुंबात जन्माला आला असेल तरीही दिव्यांग आज सर्व समाजाची जबाबदारी आहे, पूर्ण देशाची जबाबदारी असते आणि ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आमच्यात ती संवेदनशीलता असली पाहिजे.
जेव्हा मी गुजरातेत होतो तेव्हाही या कामांवर जोर देत होतो. राजकोटमध्येच आमचे डॉक्टर पी. व्ही. दोशी अशा प्रकारच्या एका शाळेशी संबंधित होते. त्यामुळे मला सतत त्या मुलांना भेटण्याची संधी मिळत असे, त्यांच्या बरोबर जाण्याची संधी मिळत असे. आणि डॉक्टर दोशी अत्यंत भक्तिभावाने त्या शाळेत दिव्यांग बालकांशी प्रेमाचे नाते जोडून होते. त्यांची एक मुलगीही या कार्याला समर्पित होती. या गोष्टी मी तेथे पाहिल्या होत्या, तेव्हा तर मी राजकारणातही नव्हतो. खूप लहान वय होतं. डॉ. दोशीजींच्या घरी कधी जात असे. आणि त्यांच्यासमवेत कधी जात असे, तेव्हा मनावर एक संस्कार होत होते, एक संवेदना, जाणीव जागृत होत होती. आणि जेव्हा सरकारात आलो, तेव्हा जबाबदारी मिळाली. आपल्याला लक्षात असेल आम्ही एक मोठा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. सामान्यपणे तंदुरुस्त बालकास परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी १०० पैकी ३५ गुणांची आवश्यकता असते. आम्ही असा निर्णय घेतला होता की दिव्यांग बालकास किमान २५ गुण असले तरी त्याला उत्तीर्ण मानले जावे, कारण एका तंदुरुस्त बालकास आपल्या जागेवरून उठून पुस्तके घेण्यासाठी जितका वेळ लागतो, दिव्यांग बालकास त्याच्या तिप्पट वेळ लागतो, तिप्पट शक्ती लागते, अशा बालकास विशेष व्यवस्था मिळाली पाहिजे. आणि मी जेव्हा येथे काम करत होतो तेव्हा गुजरातेत आमचे सरकार होते, त्या वेळी मला असे कैक निर्णय घेण्याची संधी मिळाली होती.
जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा अखेर या विषयांची परिस्थिती काय आहे यावर बारकाईने पाहू लागलो. दिव्यांगजनांसाठी दिव्यांग शब्द शोधणे एवढ्यावर आमचे हे काम पूर्ण झालेले नाही. आपण येथे पाहत आहात, एक भगिनी, जे ऐकू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत त्यांना खाणाखुणा करून माझे भाषण ऐकवत आहेत. मी काय बोलतो ते त्यांना समजावत आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे झाली तरीही या ज्या भाषा समजण्यासाठी खाणाखुणा केल्या जातात, वेगवेगळ्या भाषा समजण्यासाठी सायनिंग केले जाते, ते प्रत्येक राज्यात वेगवेगळे होते. भाषा भिन्न आहेत हे मी समजू शकत होतो, पण दिव्यांगांसाठी जी कृती होती तीही निरनिराळी होती. त्यामुळे तमिळनाडूचा दिव्यांग असेल आणि गुजरातची एखादी शिक्षिका असेल तर त्या दोघांत संवाद शक्य नव्हता. हिलाही माहित होते की दिव्यांगाशी कशा प्रकारे संवाद साधायचा, त्यालाही माहित होते की या खुणा कसल्या आहेत. परंतु तमिळ भाषेत जे शिकवलेल्या खुणा वेगळ्या होत्या आणि गुजराती भाषेत शिकवलेल्या खुणा निराळ्या होत्या आणि त्यामुळे माझा दिव्यांग विद्यार्थी पूर्ण देशात जिथे कुठे जाईल, आणि काही म्हणत असेल तर समजण्यासाठी इंटरप्रीटर मिळत नसे. आम्ही सरकारमध्ये आल्यावर काम मोठे असो अथवा छोटे तो नंतरचा विषय आहे, परंतु सरकार जर संवेदनशील असेल तर ते कसा विचार करते हे महत्वाचे आहे. आम्ही असा कायदा केला की देशातील सर्व बालकांना एकही प्रकारच्या खुणा शिकवल्या जाव्यात, एकाच प्रकारचे शिक्षक तयार केले जावेत. भारताच्या कोणत्याही भागात, इतकेच नव्हे तर देशातील बालक जगातील कोणत्याही देशात गेला तरीही खुणांवरून त्याला शिकायचे असेल तर त्याला ती भाषा उपलब्ध असेल अशी सायनिंग पद्धत आम्ही स्वीकार केली आहे. काम कदाचित छोटे वाटत असेल, परंतु संवेदनशील सरकार कशा प्रकारे काम करते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
१९९२ मध्ये, लक्षात ठेवा, १९९२ मध्ये सामाजिक सबलीकरण विभागाकडून दिव्यांगांना साधने देण्याबाबत विचार करण्यात आला, अर्थसंकल्पात तरतूद करण्यास सुरुवात, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी हे घडले. आपल्याला हे जाणून हैराण व्हाल की १९९२ पासून २०१३ पर्यंत, जेव्हा आमचे सरकार बनले नव्हते, तोपर्यंत इतक्या वर्षांत फक्त ५५ असे कार्यक्रम झाले ज्यात दिव्यांगाना बोलावून साधने देण्यात आली. ५५ बंधु-भगिनीनो. २०१४ मध्ये आम्ही आलो. आज २०१७ आहे. तीन वर्षांत आम्ही ५,५०० कार्यक्रम केले, पाच हजार पाचशे. २५-३० वर्षांत ५५ कार्यक्रम आणि तीन वर्षांत ५,५०० कार्यक्रम याचे निदर्शक आहे की हे सरकार किती संवेदनशील आहे. सबका साथ सबका विकास, हा मंत्र प्रत्यक्षात आणण्याचा आमचा मार्ग हा आहे.
आणि बंधु-भगिनीनो, एकाहून एक जागतिक विक्रम प्रस्थापित करत आहोत. आम्ही दिव्यांग बालकांना मदत करण्यावर जोर देत आहोत. आजही राजकोटने साडे अठरा हजार दिव्यांगाना एकाच वेळेस, एका छताखाली साधन सहायता करून एक जागतिक विक्रम रचला आहे. मी गुजरात सरकार, राजकोटचे अधिकारी आणि सर्व मदत करणाऱ्या बंधुंचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो की ते माझ्या दिव्यांगांची काळजी घेण्यासाठी इतके पुढे सरसावले.
आताच मी काही साधने लाक्षणिक स्वरुपात दिव्यांगांना देत होतो. मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास झळकत होता, जो आनंद दिसत होता त्यापेक्षा जीवनात आणखी संतोष तो कोणता असू शकेल मित्रांनो! आणि आमचे गेहलोतजी जेव्हा एखादा कार्यक्रम आखून मला आग्रह करतात तेव्हा मी माझे इतर कार्यक्रम मागेपुढे करूनही दिव्यांगांच्या कार्यक्रमाला जाणे जास्त पसंत करतो. मी त्यास प्राधान्य देतो. कारण समाजात ही जाणीव निर्माण करण्याची फार गरज आहे. आमच्याकडे रेल्वेच्या डब्यात चढायचे असेल तर सामान्य माणसाला काही अवघड वाटत नाही. बसमध्ये चढायचे असेल तर सामान्य माणसाला अवघड वाटत नाही. आम्ही सत्तेवर आल्यावर एक सुलभ योजनेचे अभियान चालवले आहे. देशभर अशा जागा शोधल्या आहेत जिथे सामान्य नागरिकांना जायचे आहे तिथे दिव्यांगानाही जायचे आहे. त्यांच्यासाठी रेल्वे फलाट वेगळ्या प्रकारचे असावेत, रेल्वेत चढण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था विकसित केली जावी, सरकारी कार्यालयात सायकल घेऊन यायचे असेल तर साधी सोपी सायकल सरळ आत जाऊ शकेल! स्वच्छतागृहाचे घ्या. दिव्यांगाना अनुकुल स्वच्छतागृह नसेल तर त्यांचे काय हाल होत असतील? किती त्रास होत असेल? आणि जोपर्यंत आम्ही या सर्व गोष्टी पाहत नाही, समजत नाही, त्यावर विचार करत नाही तोपर्यंत आम्हाला तो कसे जुळवून घेत असेल याचा अंदाज येत नाही. आपल्याला जागरूक व्हायला हवे. आपण घर बांधले, सोसायटी बनवली, तरी एखादा दिव्यांग पाहुणा म्हणून आला तर तो लिफ्टमधून सहजतेने जाऊ शकेल, स्वच्छतागृहात जायचे असेल तर त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था असेल याचा विचार केला पाहिजे. समाजाचा एक गुणविशेष विकसित झाला पाहिजे. आणि आम्ही यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे आज हजारो ठिकाणी अशा सुलभ व्यवस्था निर्माण होत आहेत, त्यावर काम सुरु आहे आणि मॉडेल पक्के होत आहेत. आता जितक्या नवीन इमारती तयार होतात त्या इमारतीत दिव्यांगांसाठी अशी व्यवस्था भारत सरकारने अनिवार्य केली आहे.
मी गुजरात सरकारचाही आभारी आहे, त्यांनी ही गोष्ट स्वीकार केली आहे. याला पुढे नेण्याच्या दिशेने त्यांनी संमती दिली आहे. माझ्या म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की मोठ्या कार्यक्रमात सरकारची जबाबदारी निश्चित असते, की या भागात कोण दिव्यांग मदतीस पात्र आहेत ते शोधा, सरकारच्या दरवाजापर्यंत जे पोहोचू शकत नाहीत, तर सरकार त्यांच्या दरवाजावर जाईल, त्यांना शोधेल आणि अशी शिबिरे भरवून त्यांना मदत करावी, ही दिशा आम्ही पकडली आहे. त्याचसाठी आज इथे १८ हजाराहून अधिक दिव्यांग उपस्थित आहेत. यामुळे ज्या समाजवादी संस्था आहेत त्यांना प्रोत्साहन मिळते, त्यांना शक्ती मिळते. भारत सरकारच्या नाविन्यपूर्ण संशोधन संस्था आहेत त्या यासंदर्भात खूप काम करत आहेत.
मी त्या बालकांचा डेमो पाहिला, संसदेत मी त्यांना माझ्या कार्यालयात बोलवले. ज्यांना हात नव्हता त्यांना कृत्रिम हात देण्यात आला, पण मी पाहत होतो की माझ्याहून सुंदर अक्षरात तो लिहू शकत होता. त्याचा हात प्लास्टिकचा होता, पण त्यात तंत्रज्ञान असे होते की माझ्या अक्षराहून सुंदर अक्षरात तो लिहित होता. तो स्वतः पाणी भरू शकत होता, पाणी पिऊ शकत होता, चहाचा कप उचलून चहा पिऊ शकत होता. आता एक गृहस्थ माझ्याकडे आले, त्यांनी सांगितले की साहेब मी पळू शकतो, माझ्या पायाला तुम्ही नवी शक्ती दिली आहे. मला ते सांगत होते की तुम्ही म्हणाल तर इथेच पळून दाखवू का? मी म्हटले नको, इथे पळण्याची गरज नाही.
सांगण्याचे तात्पर्य काय तर किती जबर विश्वास निर्माण होत आहे! आणि यासाठी नवोत्थानाचे कामही सुरु आहे. सरकारच्या संस्था काम करत आहेत. अनेक नवतरुण पुढे येत आहेत. मी देशाच्या स्टार्ट अपमध्ये काम करणाऱ्या तरुणांना आग्रह करेन की त्यांनी थोडासा अभ्यास करावा. जगात दिव्यांगांसाठी काय नवीन शोध लागले आहेत, कोणत्या नव्या गोष्टी विकसित झाल्या आहेत, कोणते नवोत्थान झाले आहेत, दिव्यांग सरलतेने आपले जीवन त्या एका जादा साधनाच्या सहाय्याने करू शकतात, ते साधन कोणते आहे? तुम्ही जर अभ्यास कराल तर तुम्हालाही वाटेल की आपणही संशोधन करावे, तुम्ही अभियंता असाल तर तुम्हीही विचार कराल, तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही विचार कराल, आणि तुम्ही स्टार्ट अप द्वारा, संशोधनाद्वारे तुम्ही त्या नवीन वस्तूंचे उत्पादन करू शकता, ज्यांना आज भारतात मोठी बाजारपेठ आहे. कोट्यवधीच्या संख्येने आज दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांच्या संशोधनाची गरज आहे. रोजगारासाठी अशा नव्या संधी आहेत.
मी स्टार्ट अपच्या जगातील नवतरुणांना निमंत्रण देतो की तुम्ही दिव्यांगांसाठी अशा प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी प्रयोग घेऊन माझ्याकडे या, सरकार जितकी मदत करू शकेल तितकी करेल, तितकी मदत देण्यासाठी भरपूर प्रयत्न करेल, ज्यामुळे दिव्यांगांच्या जीवनात बदल आणण्यात या नवीन प्रयोगांचा उपयोग होऊ शकेल.
बंधु-भगिनींनो, आम्ही विमा योजना आणली आहे, एका महिन्यात एक रुपया. आज एका रुपयात एक कप चहाही मिळत नाही. एका महिन्यात फक्त एक रुपया देऊन माझा दिव्यांग सुद्धा विमा उतरवू शकतो. आणि कुटुंबावर एखादे संकट आले, व्यक्तीच्या जीवनात एखादे संकट आले तर एक महिन्याचा एक रुपया याप्रमाणे १२ महिन्यांचे १२ रुपयांमध्ये विमा होतो, दोन लाख रुपये त्या कुटुंबाला त्वरित मिळतील. त्याचे संकटाचे दिवस काही क्षण तरी निघून जातील. त्याच प्रकारे एक दिवसाचा एक रुपया अशीही विमा योजना आणली आहे. ३० दिवसांचे ३० रुपये, वर्षभराचे ३६० रुपये आणि त्या अंतर्गत त्याला खूप मोठी रक्कम एखादे संकट आल्यास मिळू शकते. भारतात एकूण असे २५ कोटी कुटुंब असून त्यापैकी १३ कोटी कुटुंब या योजनेशी जोडले गेले आहेत. मी सर्व दिव्यांग कुटुंबाना आग्रह करतो की या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना तर आहेच, परंतु माझ्या दिव्यांग कुटुंबांनी याचा लाभ सर्वाधिक घ्यावा. ज्या कुटुंबात एक व्यक्ती दिव्यांग आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या बालकांच्या भविष्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे, आपण समोर या. वर्षभरात १२ रुपये निमित्तमात्र आहेत, स्टेशनरीचा खर्चाएवढेही नाहीत, परंतु ते फक्त एका प्रक्रियेसाठी आहे.
बंधु-भगिनीनो! अशा अनेक योजना भारत सरकारने गरिबांसाठी आणल्या आहेत. गरिबांसाठी आमचे एक स्वप्न आहे. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. ७० वर्षे निघून गेली. कोट्यवधी लोक असे आहेत ज्यांच्याकडे रहायला स्वतःचे घर नाही. बंधु-भगिनीनो, २०२२ पर्यंत भारतातील त्या प्रत्येक कुटुंबाकडे आपले घर असेल, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत. प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे छत असेल, राहण्यासाठी घर असेल, आणि घर असे की त्यात शौचालय असेल, वीज असेल, पाणी नळाचे असेल, जवळच मुलांसाठी शाळा असेल, वृद्धांसाठी जवळच दवाखाना असेल. २०२२ पर्यंत हे करणे हे प्रचंड काम आहे, हे मला माहित आहे, ७० वर्षात हे काम करण्यात अडचणी आल्या ते पाच वर्षांत करणे किती अवघड आहे याचा मला पूर्ण अंदाज आहे. परंतु बंधु-भगिनीनो, जर ३० वर्षांत ५५ शिबिरे भरतात आणि तीन वर्षांत ५,५०० शिबिरे भरू शकतात, जे ७५ वर्षांत घडले नाही ते पाच वर्षांत होऊ शकते, करण्याचा इरादा हवा, देशासाठी जगण्याची इच्छा हवी. परिणाम आपोआप दिसून येतो. आणि त्याच भावनेतून हे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गरीब कुटुंबाना कशा प्रकारे लाभ मिळेल? मध्यमवर्गीय कुटुंबे स्वतःच्या ताकदीवर खूप काही करतात. पण गरिबांना जितकी संधी मिळायला हवी तितकी मिळत नाही कारण गरिबीमुळे त्याला तडफ दाखवता येत नाही. माझा गरीब यातून बाहेर आला तर माझ्या देशाचा मध्यमवर्ग भारताला कुठल्या कुठे नेऊन ठेवण्याची शक्ती घेऊन उभा राहील, ज्याचा क्वचितच कुणाला अंदाज असेल. ज्या प्रकारे भारत आज एक शक्ती म्हणून उदयास आला आहे, त्यामुळे अवघे विश्व चकित झाले आहे. विकासाची नवी उंची गाठत आहे. आणि म्हणून माझ्या राजकोटचे बंधुभगिनीनो, तुम्ही मला खूप शिकवले आहे, खूप काही दिले आहे, माझ्या जीवनाचा रस्ता निश्चित करण्याचे काम या राजकोटच्या लोकांनी केले आहे. या भावना जीवनभर मनात ठेवून आज या भूमीला नमन करण्यासाठी येण्याची संधी मिळाली, सर्वांचा आशीर्वाद घेण्याची संधी , माझ्या दिव्यांग नागरिकांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली, यापेक्षा माझे मोठे भाग्य असू शकत नाही.
मी पुन्हा एकदा श्रीमान गेहलोतजी, त्यांचा विभाग, खरोखर भारताच्या कोणत्याही मंत्रालयात अशी सक्रियता यापूर्वी कोणत्या विभागात दिसली नव्हती, ती सक्रियता देण्याचे काम श्रीमान गेहलोत यांनी करून दाखवले आहे आणि ते आज आपल्यासमोर आहे की १८ हजाराहून अधिक जे माझे दिव्यांग बंधुभगिनी आहेत, त्यांची गरज भागवण्याचा प्रयत्न आज होत आहे.
मी पुन्हा एकदा या भूमीला नमन करतो. येथील लोकांना नमन करतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.