आपण सर्वांनी आत्ताच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टीने परिपूर्ण अशी वाणी प्रसादाच्या रूपाने प्राप्त केली, जाणून घेतली. मला जे काही सांगायचे आहे, त्यापूर्वी मी आपल्या सर्वांकडून भारत मातेचा जयघोष करवून घेणार आहे आणि आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे, गणवेशातल्या जवानांनाही माझा आग्रह आहे आणि दूर दूरपर्यंत या डोंगरांवर बसलेल्या माझ्या आदिवासी बंधू भगिनींनाही आग्रह आहे की, एक हात उंचावून पूर्ण शक्तिनीशी सरदार साहेबांचे स्मरण करीत आपण सर्वांनी भारत मातेचा जयघोष करणार आहोत. मी तीन वेळी जयघोष करविणार आहे.
पोलिस दलाचे वीर पुत्र-कन्यांसाठी- भारत माता की जय!
कोरोना काळामध्ये सेवा करणा-या कोरोना योद्ध्यांसाठी- भारत माता की जय!
आत्मनिर्भरतेचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या कोट्यवधी लोकांसाठी – भारत माती की जय!
मी म्हणतो सरदार पटेल, तुम्ही सर्वांनी दोन वेळा ‘अमर रहे अमर रहे’ म्हणायचे आहे.
सरदार पटेल – अमर रहे अमर रहे !!
सरदार पटेल – अमर रहे अमर रहे !!
सरदार पटेल – अमर रहे अमर रहे !!
सर्व देशवासियांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीनिमित्त खूप-खूप शुभेच्छा! देशाच्या शेकडो संस्थानिकांना, राजे-रजवाड्या एकत्र आणून, देशाच्या विविधतेला स्वतंत्र भारताची शक्ती बनवून, सरदार पटेल यांनी हिंदुस्तानला वर्तमान स्वरूप प्राप्त करून दिले.
2014पासून आपण सर्वांनी त्यांचा जन्मदिवस भारताच्या एकतेचा उत्सव म्हणून साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. या सहा वर्षांमध्ये देशाने गावांपासून महानगरांपर्यंत पूर्वेपासून ते पश्चिमपर्यंत, काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत, सर्वांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आज पुन्हा एकदा इथं देश माता भारतीच्या महान सुपुत्राला, देशाच्या लोहपुरूषाला, श्रद्धासुमन, समर्पित करीत आहे.
आज पुन्हा एकदा हा देश सरदार पटेल यांच्या या गगनचुंबी प्रतिमेच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या छायेमध्ये, देशाच्या प्रगतीसाठी महायज्ञाचे आपले वचन पुन्हा एकदा घेत आहे. मित्रांनो, मी काल दुपारी केवडियाला पोहोचलो होतो. आणि केवडियाला पोहोचल्यानंतर कालपासून ते आत्तापर्यंत केवडियामध्ये जंगल सफारी उद्यान, एकता मॉल, बाल पोषण उद्यान आणि आरोग्य वन यासारख्या अनेक नवीन स्थानांचे लोकार्पण झाले आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये, सरदार सरोवर धरणाशी संबंधित जोडला गेलेला ही भव्य निर्मिती ‘ एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे नवीन भारताच्या प्रगतीचे तीर्थस्थान बनले आहे. आगामी काळामध्ये माता नमर्देच्या तटावर, भारतच नाही तर संपूर्ण दुनियेच्या पर्यटनाच्या नकाशावर हे स्थळ आपली स्वतःचे स्थान निर्माण करणार आहे. सर्वांच्या आवडीचे स्थान होणार आहे.
आज सरदार सरोवर ते साबरमती रिव्हरफ्रंटपर्यंत सी-प्लेन म्हणजे सागरी विमानसेवेचा शुभारंभ होत आहे. ही देशातली पहिली आणि अनोखी विमानसेवा आहे. सरदारसाहेबांच्या दर्शनासाठी, स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी देशवासियांना आता सागरी विमान सेवेचा पर्यायही उपलब्ध असणार आहे.
हे सर्व प्रयत्न या क्षेत्रामध्ये पर्यटनालाही खूप चांगले प्रोत्साहन देणार आहेत.
यामुळे इथल्या लोकांना, माझ्या आदिवासी बंधू-भगिनींना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत.
या कामगिरीसाठी मी गुजरात सरकारचे, गुजरातच्या सर्व नागरिकांचे आणि सर्व 130 कोटी देशवासियांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, काल ज्यावेळी मी या संपूर्ण क्षेत्रामध्ये दिवसभर फिरत होतो आणि तिथं गाईडच्या रूपामध्ये इथल्याच आजूबाजूच्या गावातल्या आमच्या कन्या ज्या आत्मविश्वासाने, अगदी सखोल माहितीसह सर्व प्रश्नांना उत्तरे देत मला ‘गाईड’ करीत होत्या ते पाहून मी अगदी खरं सांगतो, माझी मान अगदी अभिमानानं उंचावली! माझ्या देशातल्या गावातल्या आदिवासी कन्यांमध्ये असलेले सामर्थ्य त्यांच्याकडे असलेली क्षमता मनाला प्रसन्न करणारी, आनंदी करणारी होती. या सर्व मुलांनी इतक्या कमी कालावधीमध्ये जे कौशल्य प्राप्त केले आहे, ते पाहून मला खूप समाधान वाटते. त्यांच्या तफेॆ आता यामध्येच एक नवीन प्रकारचे कौशल्य जोडण्यात आले आहे. त्यांनी या कामाला ‘व्यावसायिकतेची’ जोड दिली आहे. आज या सर्व आदिवासी कन्यांचे मी अगदी मनापासून, हद्यापासून खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो, आज आणखी एक अद्भूत योगायोग म्हणावा लागेल. आजच महर्षि वाल्मिकी यांची जयंतीही आहे. आज आपण भारताच्या ज्या सांस्कृतिक एकतेचे दर्शन करीत आहोत, ज्या भारताचा अनुभव घेतो, त्या देशाला अधिक जीवंत आणि ऊर्जावान बनविण्याचे काम अनेक शताब्दींपूर्वी पहिले आद्यकवी महर्षि वाल्मिकी यांनीच केले होते. भगवान रामाचे आदर्श, रामाचे संस्कार जर आज भारताच्या कानाकोप-यात आपल्याला एकमेकांना जोडता आले आहेत. त्याचे सर्वात मोठे श्रेयही महर्षि वाल्मिकी यांनाच जाते. राष्ट्राला, मातृभूमीला सर्वात मोठे मानण्याचा महर्षि वाल्मिकींनी जो जयघोष केला होता तो म्हणजे , ‘‘ जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी’ हा त्यांनी दिलेला जो मंत्र होता, तोच आज ‘राष्ट्र प्रथम- इंडिया फॆस्ट’चा संकल्पाचा मजबूत आधार आहे.
मी सर्व देशवासियांना महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीच्याही हृदयापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, तमिळ भाषेतले महाकवी आणि स्वातंत्र सेनानी सुब्रह्मण्यम भारती यांनी लिहिले होते –
मन्नुम इमयमलै एंगल मलैयेएमानिल मीधु इधु पोल पिरिधु इल्लैये,
इन्नरु नीर गंगै आरेंगल आरे इ॑गिथन मान्बिर एधिरेधु वेरे,
पन्नरुम उपनिट नूलेन्गल नूले पार मिसै एधोरु नूल इधु पोले,
पोननोलिर भारत नाडेंगल नाडे पोट रुवोम इग्तै एमक्किल्लै ईडे।
सुब्रह्मण्यम भारती यांची ही कविता आहे. त्याचा भावार्थ हिंदीमध्ये मिळाला आहे. दूर-सुदूर क्षेत्रांविषयी त्यांनी जे वर्णन केेले आहे, तेही अतिशय प्रेरक आहे.
सुब्रह्मण्यम भारती यांनी जे भाव प्रकट केले आहेत, ते दुनियेतल्या सर्वात पुरातन भाषेमध्ये म्हणजे तमिळीमध्ये व्यक्त केले आहेत. आणि माता भारतीचे किती अद्भूत वर्णन त्यांनी केले आहे. सुब्रह्मण्यम भारती यांनी त्या कवितेमध्ये देशाचे भाव असे व्यक्त केले आहेत-
उत्तुंग हिमालय चमकतो, हा नगराज आमचाच आहे.
या धरतीला कोठेही जोड नाही, हा नगराजही आमचाच आहे.
आमची नदी गंगा, आहे मधुरस धारा बरसत वाहतेय..
अशा पावन झुळूझुळू धारा कुठंतरी वाहतात का?
संपूर्ण विश्वामध्ये सन्मान असणा-या वेदांचा महिमा किती महान आहे,
जे कोणते अमर ग्रंथ आहे, त्या आमच्या उपनिषदांचा देश हाच आहे.
आम्ही सर्वजण या देशाचे गीत गाणार आहोत, हा स्वर्णिम देश आमचा आहे.
आमच्या देशापेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीच नाही.
विचार करा, गुलामीच्या कालखंडामध्ये सुब्रह्मण्यम भारती यांनी व्यक्त केलेला विश्वास पहा, त्यांचे भाव प्रकट कसे होते ते पहा.
ते म्हणतात – या जगामध्ये आमच्या पुढे कोण असणार? सर्वात पुढे असणारा हा भारत देश आमचा आहे!!
भारताविषयी या अद्भूत, अनोख्या भावना, आज आपण इथं माता नर्मदेच्या किनारी, सरदार साहेबांच्या या भव्य प्रतिमेच्या छायेमध्ये असताना अधिक जवळच्या वाटतात.
भारताची हीच तर ताकद आपल्या प्रत्येक आपत्तीविरोधात, प्रत्येक संकटाच्या विरोधात लढायला शिकवते आणि इतरही खूप काही शिकवते.
आपण लक्षात घ्या, गेल्या वर्षी ज्यावेळी आपण आजच्याच दिवशी एकता दौडमध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी कोणीही कल्पनाही केली नसणार की, संपूर्ण दुनियेतल्या मानव जातीला कोरोनासारख्या वैश्विक महामारीबरोबर सामना करावा लागेल. हे संकट अगदीच अचानक आले. त्या संकटाने संपूर्ण विश्वामध्ये मानवी जीवनावर प्रभाव टाकला आहे. आपल्या कामाच्या वेगावरही महामारीच्या संकटाचा परिणाम झाला आहे. परंतु या महामारी समोर देशाने, 130 कोटी देशवासियांनी ज्या पद्धतीने सामूहिक प्रयत्नांनी, आपल्या सामूहिक इच्छा शक्तीने कार्य केले आहे, ते अभूतपूर्व आहे. इतिहासामध्ये असे कोणतेच उदाहरण नाही.
कोरोना योद्ध्यांच्या सन्मानासाठी काश्मिर ते कन्याकुमारी, लेह ते लक्षव्दीप, अटक ते कटक, कच्छ ते कोहिमा, त्रिपुरा ते सोमनाथ पर्यंत 130 कोटी देशवासियांनी एक होवून ज्या भावनेने लढा दिला, तो विशेष म्हणावा लागेल. आपण सर्वांनी एकतेचा जो संदेश दिला आहे. या एकतेमुळेच आठ महिन्यांपासून आपण या संकटाशी लढत आहोत आणि आता विजय पथावर पुढे जाण्याची ताकद आपल्याला मिळाली आहे. देशाने त्यांच्या सन्मानासाठी दिवे लावले. त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. आमच्या कोरोना योद्ध्यांमध्ये पोलिस बंधूही आहेत. अनेक कुशल मित्रांनी इतरांचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. स्वातंत्र्यानंतर मानव सेवेसाठी, सुरक्षेसाठी जीवनाचा त्याग करणे हे या देशाच्या पोलिस पथकाची विशेषता आहे. पोलिस दलामधल्या माझ्या जवळपास 35 हजार जवानांनी स्वातंत्र्यानंतर बलिदान दिले आहे. परंतु या कोरोना कालखंडामध्ये सेवेसाठी, दुस-याचे प्राण वाचविण्यासाठी माझ्या पोलिस बांधवांनी, अनेकांनी सेवा करता-करता स्वतःला समर्पित केले आहे. या स्वर्णिम क्षणांना इतिहास कधीच विसणार नाही आणि पोलिस दलातल्या जवानांनाही विसरणार नाही. 130 कोटी देशवासियांना पोलिस पथकातल्या या वीरांपुढे, त्यांच्या समर्पण भावापुढे नेहमीच नतमस्तक होण्यासाठी प्रेरणा देईल.
मित्रांनो, अशी देशाची एकता हीच खरी ताकद होती. ज्या महामारीने दुनियेतल्या मोठ-मोठ्या देशांना त्रासून टाकले, भारताने त्याच महामारीचा मोठ्या मजबूतीने सामना केला. आज देश कोरोना संकटातून बाहेर येवू लागला आहे. आणि आता एकजूट होवून पुढेही वाटचाल करायला लागला आहे. अशा एकजुटीची कल्पना लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. या कोरोना संकट काळामध्ये आपल्या सर्वांची एकजूटता म्हणजे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना खरी श्रद्धांजली आहे.
मित्रांनो, आपत्ती आणि आव्हाने यांच्यामध्ये देशाने अनेक मोठमोठाली कामे केली आहेत. ही कामे करणे आधी केवळ अशक्य असे वाटत होते. या कठीण काळामध्ये कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर, काश्मिरच्या समावेशाला एक वर्ष पूर्ण झाले. 31 ऑक्टोबरलाच एक वर्षापूर्वी ही दुरूस्ती लागू झाली. सरदार साहेब जीवंत असताना त्यांनी इतर राजे-संस्थानिकांच्या विलिनीकरणाबरोबरच हे कामही अतिशय उत्तमपणे पूर्ण केले असते. मात्र या कामाची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. मग आज स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इतक्या वर्षांनी हे काम करण्याची वेळ माझ्यावर आलीच नसती. परंतु सरदार साहेबांचे ते अर्धे राहिलेले काम त्यांच्याच प्रेरणेने आणि 130 देशवासियांच्या इच्छेमुळे पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, असे मी मानतो. काश्मिरच्या विकासामध्ये जे अडथळे येत होते, त्यांना मागे सारून आता काश्मिर विकासाच्या नवीन मार्गावरून पुढे वाटचाल करीत आहे. मग ईशान्येकडे शांतता प्रस्थापित करण्याचे काम असो अथवा ईशान्येकडील भागाच्या विकासासाठी उचललेली पावले असोत, आज देश एकतेचे नवीन आयाम स्थापित करीत आहे. सोमनाथाचे पुनर्निर्माण करून सरदार पटेल यांनी भारताला सांस्कृतिक गौरव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याचा जो यज्ञ सुरू केला होता, त्याचा विस्तार देशाने अयोध्येमध्येही पाहिला आहे. आज देश राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा साक्षीदार बनला आहे आणि आता तिथे भव्य राम मंदिर बनतानाही पहात आहे.
मित्रांनो, आज आपण 130 कोटी देशवासी मिळून एक असे राष्ट्र निर्माण करीत आहोत, ते सशक्तही आहे आणि सक्षमही असावे. ज्यामध्ये समानताही असली पाहिजे आणि अनंत शक्यताही असल्या पाहिजेत. सरदार साहेब म्हणत होते, आणि सरदार साहेबांचे शब्द हे आहेत, लक्षात घ्या- संपूर्ण दुनियेचा आधार शेतकरी आणि श्रमिक आहे. शेतकरी बांधव गरीब आणि कमकुमत राहणार नाहीत, यासाठी काय करता येईल, याचा मी विचार करीत असतो. शेतक-यांना कसे मजबूत करता येईल, त्यांनी मान उंचावून चालता येईल, असे त्यांना मला बनवायचे आहे, हे काम कसे करता येईल, याचा मी विचार करत असतो.
मित्रांनो, शेतकरी, श्रमिक, गरीब सशक्त कधी बनतील तर ज्या-ज्यावेळी ते आत्मनिर्भर बनतील. सरदार साहेबांचे हे स्वप्न होते. ते म्हणत होते, मित्रांनो, शेतकरी, श्रमिक, गरीब सशक्त होतील, ज्या-ज्यावेळी ते आत्मनिर्भर बनतील. आणि ज्यावेळी देशातला शेतकरी, श्रमिक आत्मनिर्भर बनतील, त्याचवेळी देशही आत्मनिर्भर बनेल. मित्रांनो, आत्मनिर्भर देशच आपल्या प्रगतीच्या बरोबर आपल्या सुरक्षेविषयीही आश्वस्त होवू शकतो. आणि म्हणूनच, आज देश संरक्षण क्षेत्रामध्येही आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढे वाटचाल करीत आहे. इतकेच नाही तर, सीमेवरही भारताची दृष्टी आणि दृष्टिकोण यांच्यामध्ये आता बदल झाला आहे. आज भारताच्या भूमी डोळा ठेवणा-यांना तितक्याच कठोरतेने, सडेतोड उत्तर देण्याची ताकद आमच्या वीर जवानांच्या हातामध्ये आहे. आजचा भारत सीमेवर शेकडो किलोमीटर लांबीचे रस्ते बनवतो आहे. डझनावारी पूल आणि अनेक बोगदे बनविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. आपल्या अखंडतेसाठी आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आजचा भारत पूर्णपणे सज्ज आहे. कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे आणि पूर्ण तयारीनिशी सिद्ध आहे.
परंतु मित्रांनो, प्रगतीच्या या प्रयत्नांमध्ये, अनेक आव्हानेही येत आहेत. त्यांचा सामना आज भारत आणि संपूर्ण विश्व करीत आहे. गेल्या काही काळामध्ये दुनियेतल्या अनेक देशांमध्ये जी हालाकीची परिस्थिती निर्माण झाली, ज्या पद्धतीने काही लोक दहशतवादाचे समर्थन उघडपणे करीत असल्याचे सामोरे आले आहे, ते आज मानवतेसाठी, विश्वासाठी, शांततेच्या उपासकांसाठी एक वैश्विक चिंतेचा विषय बनले आहेत. आजच्या वातावरणामध्ये दुनियेतले सर्व देशांना, सगळ्या सरकारांना, सर्व पंथांना दहशतवादाच्या विरोधात एकजूट होण्याची सर्वात जास्त गरज आहे. शांतता- बंधुभाव आणि परस्परांविषयी आदराचा भाव ही मानवेतेची खरी ओळख आहे. शांतता, एकता आणि सद्भाव ही त्याचा मार्ग आहे. दहशतवाद- हिंसक कारवाया यांच्यामुळे कधीच, कोणाचेही कल्याण होवू शकणार नाही. भारताला गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादांचे दुःख, यातना, पीडा भोगाव्या लागत आहेत. भारताने आपले हजारो वीर सैनिकांना गमावले आहे. आपल्या हजारो निर्दोष नागरिकांना गमवावे लागले आहे. अनेक मातांचे सुपुत्र, अनेक भगिनींचे बंधू या दहशतवादामुळे काळाचे घास बनले. दहशतवादाची पीडा भारताने खूप अनुभवली आहे. आज संपूर्ण विश्वालाही एकजूट होवून अशा दहशतवादी शक्तींना हरवायचे आहे. जे कोणी अशा दहशतवादाला सहकार्य करीत आहेत, जे दहशतवाला प्रोत्साहन देत आहेत, त्यांना हरवायचे आहे.
मित्रांनो, भारतासाठी एकतेच्या संकल्पनेचा विस्तार नेहमीच खूप मोठा, व्यापक आहे. आम्हा लोकांना तर प्रेरणा मिळते – ‘‘सर्वे भवन्तु सुखिनः’’ या विचारातून!! आम्ही वसुधैव कुटुम्बकम’ हे तत्व म्हणून जीवनात आत्मसात करणारे लोक आहोत. ही आमची जीवनधारा आहे. भगवान बुद्धांपासून ते महात्मा गांधी यांच्यापर्यंत भारताने संपूर्ण विश्वाला शांतता आणि एकतेचा संदेश दिला आहे.
मित्रांनो, राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर जी यांनी लिहिले आहे –
‘‘भारत एक विचार, स्वर्ग को भू पर लाने वाला। भारत एक भाव, जिसको पाकर मनुष्य जगता है ।’’
आमचे हे राष्ट्र आमच्या विचारातून, आमच्या भावनांतून, आमच्या चैतन्यातून, आमच्या प्रयत्नांतून, आम्ही सर्वजण मिळून बनते. आणि याची खूप मोठी ताकद, भारताची विविधता आहे. इतक्या भाषा, इतक्या बोली पद्धती, वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा, भोजनाच्या पद्धती, चालीरिती, अनेक प्रकारच्या मान्यता असे इतर कोणत्याही देशात मिळणे अवघड आहे. आमच्या वेदांमध्ये सांगितले आहे की – जनं बिभ्रति बहुधा विवाचसं नानाधर्माणं पृथ्वीवी यथौकसम्। सहस्त्रं धारा द्रविणस्य में दुहां ध्रुवेव धेनुरन पस्फुरन्ति।
याचा अर्थ असा आहे की, आमची ही मातृभूमी वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे आचार, विचार, व्यवहार करणारे लोकांना एकाच घराप्रमाणे धारण करीत आहे. म्हणूनच आमची ही विविधताच आमचे अस्तित्व आहे. या विविधतेमध्ये असलेल्या एकतेला जीवंत ठेवणे, हे राष्ट्राविषयी आमचे कर्तव्य आहे. आपल्याला स्मरणात ठेवले पाहिजे की, आम्ही एक असू, तरच आम्ही अपराजेय आहे. आम्ही एक असू,तरच आम्ही असाधारण, असामान्य असणार आहे. आम्ही एक असू, तरच आम्ही अव्दितीय आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला हेही स्मरणात ठेवायचे आहे की, भारताची ही एकता, ही ताकद इतरांना खटकतेसुद्धा! आपल्या या विविधतेलाच ते आपला कमकुवतपणा बनवू इच्छित आहेत. आपल्या या विविधतेचा आधार घेवून ते एकमेकांमध्ये दरी निर्माण करू इच्छित आहेत. अशा तोडणा-या शक्तींना ओळखणे आवश्यक आहे. अशा ताकदींपासून प्रत्येक भारतीयाने अधिक जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.
मित्रांनो, आज इथे ज्यावेळी मी अर्धसैनिक दलाचे संचलन पहात होतो, आपण सर्वांनीही त्यांचे अद्भूत कौशल्य पाहिले होते. त्याचवेळी माझ्या मनामध्ये आणखी एक चित्र आले. ही चित्र होते पुलवामा हल्ल्याचे! या हल्ल्यात आमच्या पोलिस दलातले आमचे वीर सहकारी हुतात्मा झाले. ते अर्धसैनिक दलाचे जवान होते. देश ही घटना कधीच विसरू शकणार नाही. ज्यावेळी आपल्या वीर पु़त्रांच्या जाण्यामुळे संपूर्ण देश दुःखी होता, त्यावेळी काही लोक त्या दुःखामध्ये सहभागी झाले नाहीत. ते पुलवामा हल्ल्यामध्ये आपला राजकीय स्वार्थ शोधत होते. त्यांना आपला राजकीय स्वार्थ दिसत होता. त्याकाळामध्ये कोण कोण, काय काय बोलत होते, कशा प्रकारे विधाने केली जात होती, हे देश कधीच विसरू शकणार नाही. देशावर इतका मोठा आघात झाला होता, त्यावेळी स्वार्थ आणि अहंकार यांनी भरलेले, किळसवाणे राजकारण अगदी बहरले होते, हे कोणीही विसरणार नाही. आणि त्या काळात त्या वीरांच्या समर्पणाला पाहून मी सर्व विवादांपासून दूर राहून सगळे आरोप झेलत राहिलो. लोकांची बोचणारी विधाने ऐकत राहिलो. माझ्या मनावर वीर हुतात्म्यांचा घाव खूप खोलवर झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून शेजारी देशाकडून ज्या बातम्या येत आहेत, ज्या प्रकारे तिथल्या संसदेमध्ये सत्य स्वीकारले आहे, त्यांच्याकडूनच या लोकांचा खरा चेहरा देशासमोर आणला आहे. आपल्या स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जावू शकतात, हे पुलवामा हल्ल्यानंतर झालेले राजकारण म्हणजे एक मोठे उदाहरण आहे. मी अशा राजकीय पक्षांना, अशा लोकांना आग्रह करतो आणि आज यावेळी मी जरा विशेष आग्रह करू इच्छितो. आणि सरदार साहेबांच्या विषयी जर आपली श्रद्धा असेल तर या महापुरूषाच्या या विराट प्रतिमेसमोर मी आपल्याला आग्रह करतो की, देशहितामध्ये, देशाच्या सुरक्षेच्या हितामध्ये, आमच्या सुरक्षा दलांच्या मनोबल कायम ठेवण्यासाठी, कृपा करून असे राजकारण करू नये. अशा गोष्टींपासून दूर रहावे. आपल्या स्वार्थासाठी, जाणते-अजाणतेपणी तुम्ही देशविरोधी ताकदींना, त्यांच्या हातामधले खेळणे बनून, त्यांचे प्यादे बनून तुम्ही देशाचे हित करू शकणार नाही आणि आपल्या पक्षाचे हित साधणार नाही.
मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची आहे. की, आपण सर्वांसाठी जर सर्वोच्च कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे देशहित! ज्यावेळी आपण सर्वांच्या हिताचा विचार करतो, त्यावेळी आपलीही प्रगती होईल. त्याचवेळी आपलीही उन्नती होईल. बंधु आणि भगिनींनो, सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे स्वप्न पाहिले होते, त्याच भारत निर्माणाच्या संकल्पाचा पुनरोच्चार या विराट, भव्य व्यक्तित्वाच्या चरणाशी करण्याची आज आपल्याला संधी मिळाली आहे. एक अशा भारत जो सशक्त असेल, समृद्ध असेल आणि आत्मनिर्भर असेल. चला तर या मग, या पावन संधीला आपण पुन्हा एकदा राष्ट्राविषयी आपल्या समर्पण भावनेचा पुनरूच्चार करूया. चला, सरदार पटेल यांच्या चरणांपाशी नतमस्तक होवून आज आपण अशी प्रतिज्ञा घेवू की, देशाचा गौरव आणि सन्मान वृद्धी करू, या देशाला नवीन उंचीवर घेवून जावू या.
या संकल्पाबरोबरच, सर्व देशवासियांना, एकता पर्वानिमित्त पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा देतो. आदरपूर्वक सरदार साहेबांना नमन करून श्रद्धापूर्वक सरदार साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि देशवासियांना मी वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा देतो. सरदार साहेबांच्या जयंती दिनी सर्वांना सदिच्छा देवून मी आपल्या वाणीला विराम देतो.
खूप -खूप धन्यवाद !