मोठ्या संख्येनं इथे आलेल्या माझ्या बंधू-भगिनीनो ! खम्मा घणी, नमस्कार !
दोन दिवसांपूर्वी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मकरसंक्रातीनंतर सण साजरा करण्यात आला. मकरसंक्रातीच्या नंतर संक्रमणाची, एका अर्थाने उत्क्रांतीची सुरुवात होते, त्याचे संकेत देणारा हा सण असतो. संक्रांतीनंतर उन्नती होणे अध्यारुतच आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वानंतर राजस्थानच्या भूमीवर संपूर्ण देशाला ऊर्जावान बनवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल, एक महत्वाची सुरुवात आज होते आहे. एक महत्वाचा प्रकल्प आज कार्यान्वित होतो आहे.
हे काम सुरु करण्याचा निर्णय घेतला यासाठी मी धर्मेंद्र प्रधान आणि वसुंधरा राजे यांचे अभिनंदन करतो. त्यांनी हे काम सुरु केले त्यामुळे आता भविष्यात कोणतेही सरकार असो, कोणीही नेता असो, जेव्हा कामाची कोनशिला रचली जाईल, तेव्हां लोक विचारतीलच, काम केव्हा सुरु होणार आहे? प्रकल्प केव्हा पूर्ण होणार आहे? त्यामुळेच, या कार्यक्रमानंतर संपूर्ण देशात एक जागृती येईल की केवळ कोनशिला रचून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही. जेव्हा प्रत्यक्ष कामाची सुरुवात होते, तेव्हाच नागरिकांचा विश्वास बसतो.
या राज्याच्या विकासयात्रेत सहभागी होत या कामाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच समजतो. येथील अधिकारी मला या पूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती देत होते. त्यांनी मला अगदी सगळे बारीक सारीक तपशील सांगितले. मग त्यांना वाटले की आपण पंतप्रधानांना संपूर्ण माहिती दिली. मात्र मग मी त्याना विचारले, प्रकल्प प्रत्यक्ष पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन कधी होणार? ती तारीख सांगा मला.. तर मला सांगितलं गेले,की देश जेव्हा स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करत असेल, त्यावर्षी म्हणजेच २०२२ साली! भारताच्या वीरांनी, स्वातंत्रसेनानीनी, कोणी आपले अवघे तारुण्य देशासाठी खर्च केले, कोणी हसत हसत फाशीवर चढून वंदे मातरम् च्या मंत्राला धार मिळवून दिली. स्वतंत्र भारत, भव्य भारत, दिव्य भारत याचे स्वप्न बघत- आपला देश स्वतंत्र झाला. २०२२ साली देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यानी जी स्वप्न बघितली होती, ती स्वप्ने साकार करून त्यांना अभिप्रेत असलेला भारत २०२२ मध्ये त्यांना समर्पित करणे ही आपल्या सगळ्यांची, सव्वाशे कोटी भारतीयांची जबाबदारी आहे
ही वेळ संकल्पातून सिद्धी प्राप्त करण्याची वेळ आहे. आज येथे आपण संकल्प केला आहे की २०२२ पर्यत आपण हा तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करु. मला विश्वास आहे की तुमचा हा संकल्प नक्कीच सिध्दीस जाईल. आणि जेव्हा देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असेल, तेव्हा इथून देशाला नवी उर्जा मिळायला सुरुवात होईल आणि म्हणूनच, मी राजस्थान सरकार, श्री धर्मेंद्र प्रधान यांचे मंत्रालय आणि भारत सरकारच्या प्रयत्नांचे आभार मानतो. राजस्थानमधल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना, या प्रकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
बारमेरची ही भूमी अनेक साधू संताच्या पावन स्पर्शाने पुलकित झलेली भूमी आहे. रावल मल्लिनाथ, संत तुलसा राम, माता रानी फटीयानी, नागलेकी माता, संत ईश्वरदास, संत धारुजी मेग, अशा अनेक साधू संताच्या आशीर्वादाने समृद्ध झालेली ही भूमी आहे. या भूमीला आज मी वंदन करतो. स्वातंत्र्यसैनिक गुलाबचंदजी सालेचा यांची ही कर्मभूमी आहे. महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या आधी त्यांनी या भूमीत मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. या भागात पिण्याचे पाणी आणणे, ट्रेन आणणे, पहिले महाविद्यालय सुरु करणे, अशा अनेक कामात गुलाबचंदजींचे मोठे योगदान आहे, त्यांच्या या कार्यासाठी पंचप्रदाची भूमी कायम त्यांची ऋणी राहिल, या भूमीच्या या सुपुत्राला माझे प्रणाम !
बंधू भगिनीनो, आज या भूमीवर मी भैरोसिंह शेखावत यांचेही स्मरण करतो. आधुनिक राजस्थान साकारण्यात, संकटमुक्त राजस्थान साकारण्यात आणि बारमेरच्या या भूमीत पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प आणण्याची कल्पना करणाऱ्या भैरोसिंह शेखावत यांचेही मी आज स्मरण करतो.
आज मी जेव्हा या बारमेरच्या भूमीत आलो आहे, तेव्हा इथे उपस्थित सगळ्यांना मी आग्रह करतो की आपण सगळे आपापल्या इष्ट देवतेकडे या भूमीचे सुपुत्र श्री जसवंत सिंह यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करुया. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि आपल्या सर्वाना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळो, अशी प्रार्थना आपण सगळे करू या, आपल्या सगळ्यांची ही हाक ईश्वरापर्यत नक्कीच पोहोचेल.
बंधू भगिनीनो, दुर्दैवाने आपल्या देशात इतिहास विसरून जाण्याची परंपरा निर्माण झाली आहे. वीर पुरुष, त्यांचे त्याग आणि बलिदान याचे येणाऱ्या प्रत्येक पिढीने उचित सन्मानासह स्मरण करायला हवेच त्यातूनच आपल्याला नवा इतिहास घडवण्याची प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा आपण घेत राहायला हवी.
तुम्ही पाहिले असेल की इस्त्रायलचे पंतप्रधान सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. १४ वर्षांनी ते येथे आले आहेत. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर इस्त्रायलला जाणारा मी पहिलाच पंतप्रधान होतो. माझ्या देशवासियानो, राजस्थान मधल्या माझ्या वीरांनो, तुम्हाला अभिमान वाटेल की मी जेव्हा इस्त्रायल येथे गेलो तेव्हा वेळ खूप कमी असूनही मी हैफला गेलो आणि तिथे जाऊन पहिल्या महायुद्धादरम्यान १०० वर्षांपूर्वी हैफाला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना मी श्रध्दांजली अर्पण केली. त्या सैनिकांचे नेतृत्व याच भूमीचे वीरपुत्र मेजर दलपत सिंह यांनी केले होते. मेजर दलपत सिंह शेखावत यांनी १०० वर्षांपूर्वी इस्त्रायलच्या भूमीवर पहिल्या महायुद्धाचे नेतृत्व करत हैफाला स्वतंत्र केले होते.
दिल्लीत एक तीन मूर्ती चौक आहे. तिथे तीन महापुरुषांच्या, वीरांच्या मूर्ती आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान भारतात आल्याबरोबर, आम्ही दोघे सर्वात आधी या तीन मूर्ती चौकात गेलो. हा तीन मूर्ती चौक याच मेजर दलपत सिंह यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ बनवण्यात आला आहे. आणि यावेळी इस्त्रायलचे पंतप्रधानही तिथे वंदन करण्यासाठी आले होते. त्या चौकाचे नाव आता तीन मूर्ती हैफा चौक असे करण्यात आले आहे, कारण आपल्याला तो इतिहास आणि मेजर दलपत सिंह यांच्या बलिदानाचे सदैव स्मरण राहावे. माझ्या राजस्थानच्या वीरांची उज्ज्वल परंपरा लोकांच्या लक्षात राहावी अगदी दोन दिवसांपूर्वी हे काम करण्याचे भाग्य मला मिळाले.
बंधू-भगिनीनो, ही वीरांची भूमी आहे. बलिदानाची भूमी आहे. इतिहासात बलिदानाची अशी कदाचितच कोणती घटना असेल, ज्यात या भूमीतल्या महापुरुषांचे रक्त सांडले नाही. आणि मी अशा सर्व वीरांना शतशः वंदन करतो.
बंधू भगिनीनो, राजस्थानात मी पूर्वी खूपदा येत असे, संघटनेचे काम करण्यासाठी, मग शेजारच्या राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने, मी या भागात अनेकदा आलो आहे. आणि त्यावेळी सर्वसामान्य लोकांच्या तोंडून, त्यांच्याशी गप्पा मारतांना मी एक गोष्ट नेहमी ऐकायचो. इथले लोक म्हणत, राजस्थानमध्ये काग्रेस आणि दुष्काळ, हे जुळे भाऊ आहेत. जिथे काँग्रेस सत्तेवर येईल तिथे दुष्काळ सोबत घेऊन येते. आणि वसुंधराजीच्या नशिबी असं लिहिले आहे की जेव्हा जेव्हा त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा या कोरड्या भूमीला पाणी मिळालं आहे.
मात्र बंधू- भगिनीनो, आपल्याला त्याच्याही पुढे जायचे आहे. राजस्थानला पुढे घेऊन जायचे आहे, देशाच्या विकास यात्रेत राजस्थानच्या विकासाचे विशेष महत्व आहे आणि आपल्याला ते राजस्थानच्या भूमीवर साध्य करायचे आहे.
बंधू-भगिनीनो, आज आमचे धर्मेंद्रजी, वसुंधराजी एक तक्रार करत होते, आणि त्यांची तक्रार रास्त आहे. पण हे फक्त बाडमेरच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात झाले आहे का ? फक्त एक कोनशिला ठेवून त्याच्यासमोर फोटो काढणे, हे प्रकार केवळ बाडमेरलाच झाले का ? केवळ एक दगड रचून धूळफेक करण्याचा प्रकार काय फक्त इथेच झाला का? ज्यांना संशोधन करायला आवडतं, जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून आपापले निष्कर्ष काढण्यात वाकबगार आहेत, अशा सर्व लोकांना माझं आमंत्रण आहे की जरा इकडे या आणि बघा, कांग्रेसच्या सरकारची कार्यशैली कशी होती. केवळ मोठमोठ्या गप्पा मारणे, जनतेची दिशाभूल करणे हे काय फक्त बाडमेरच्या या तेलशुद्धीकरणाशी संबंधित नाही, हा त्यांच्या कार्यशैलीचाच भाग आहे, त्यांच्या स्वभावाचा भाग आहे.
मी जेव्हा पंतप्रधान झालो, त्यानंतर मी एकदा अर्थसंकल्प बघत होतो, रेल्वे अर्थसंकल्प बघत होतो… मी तेव्हा अधिकाऱ्यांना विचारले की आपण या आधीच्या अर्थसंकल्पात इतक्या घोषणा केल्या आहेत, त्याचं काय झाले, ते सगळं मला जरा सांगा तरी… मला जे उत्तर मिळाले त्यावर ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो! भारताची संसद आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे, तिथे जनतेची दिशाभूल करण्याचा हक्क कोणालाही नाही. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, इतकी सरकारे आलीत आणि गेलीत, त्यांच्या प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात, १५०० हून अधिक घोषणा केल्या गेल्या, मात्र त्या घोषणांचे, त्या योजनांचे काही नामोनिशाणही आज आपल्याला दिसत नाही. त्या सगळ्या योजना केवळ कागदावर आहेत.
आम्ही सत्तेत आलो, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की केवळ काही मिनिटांच्या टाळ्या मिळवण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पात अशा घोषणांचा पाउस पडणार नाही. एखाद्या भागातला खासदार असेल आणि त्याच्या भागासाठी काही प्रकल्प किंवा नवी गाडी आणण्याची घोषणा केली कि तो खुश होऊन टाळ्या वाजवणार आणि मग रेल्वेमंत्रीही खुश. नंतर कोणीच त्या प्रकल्पाबद्दल काही विचारणार नाही. हाच प्रकार सुरु असायचा. आम्ही जेव्हा सत्तेत आलो, तेव्हा आम्ही ठरवले की हे खोट्या घोषणा आणि टाळ्या वाजवण्याचे प्रकार बंद करायचे.
जितके प्रकल्प पूर्ण होणे शक्य आहे, तेवढेच सांगायचे.. एक दिवस टीका होईल. मग मात्र देशाला हळूहळू खरं बोलण्याची आणि खरं ऐकण्याची सवय होईल. योग्य तेच सांगण्याची आणि करण्याची सवय होईल, आणि आम्ही तेच करत आहोत.
एवढेच नाही, तर समान श्रेणी समान निवृत्तीवेतन, मला सांगा, येथे सैन्यदलातले काही लोक बसले आहेत,त्यांचे कुटुंबीयही इथे बसले आहेत. मला सांगा, गेली ४० वर्षे तुम्ही समान श्रेणी-समान निवृत्तीवेतन ही मागणी केली नव्हती का? सैन्यदलातल्या लोकांना त्याविषयी वारंवार केवळ आश्वासनं दिली गेली नाहीत का? प्रत्येक निवडणुकीच्या आधी या मुद्द्यावर आश्वासन देत, सेनेच्या जवानांना भुलवण्याचा प्रयत्न झाला नाही का? हीच त्यांची सवय आहे. २०१४ मधेही तुम्ही पहिले असेल , ५-५० सैनिकांसोबात फोटो काढायचे आणि पुन्हा एक श्रेणी- समान निवृत्तीवेतन लागू करण्याचे आश्वासन द्यायचे.. हेच काम केलंय यांनी.
आणि मग जेव्हा चहूबाजूंनी दबाव वाढायला लागला, जेव्हा मी १५ सप्टेंबर २०१३ रोजी रेवाडी येथील भाषणात माजी सैनिकांसमोर घोषणा केली की आमचे सरकार सत्तेत आले तर समान श्रेणी समान निवृत्तीवेतन लागू करेल, तेव्हा या लोकांनी घाईघाईत, आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपये समान श्रेणी-समान निवृत्तीवेतन साठीचा निधी म्हणून राखीव ठेवला.
बंधू भगिनींनो, बघा यांनी देशाचीच दिशाभूल केली, आणि आम्ही जेव्हा समान श्रेणी समान निवृत्तीवेतन लागू केले तेव्हा बोलायला लागले की या योजनेसाठी आम्हीच अर्थसंकल्पात निधी राखून ठेवला होता. आम्ही जेव्हा सत्तेत आलो, तेव्हा मी सांगितले की आपण वाचन दिले आहे सैनिकांना, चला आपल्याला समान श्रेणी-समान निवृत्तीवेतन लागू करा. मात्र संबंधित अधिकरी केवळ वेळकाढूपणा करत होते. मी त्यांना विचारले, की काय अडचण आहे? तुम्ही हे लागू का करत नाही. तर मला जे उत्तर मिळाले ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल मित्रानो, अर्थसंकल्पात यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद होती, मात्र सरकार दप्तरी, हे समान श्रेणी समान वेतन काय आहे? त्यासाठीची पात्रता काय? त्याचा आर्थिक भर कोणावर पडणार आहे- तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा तेल शुध्दीकरण प्रकल्प निदान कागदावर तरी होता, समान श्रेणी समान वेतन यावर तर कागदोपत्री देखील काहीही लिहिलेले नव्हते. ना काही यादी होती, न त्याची योजना – केवळ निवडणुकीतली एक घोषणा!
बंधू भगिनींनो, आम्ही मात्र ते काम करण्यासाठी कटिबद्ध होतो. मात्र कागदावर सगळ्या गोष्टी मांडता मांडता, मला दीड वर्ष लागले. कारण कुठेच काही धड कागदपत्रे उपलब्ध नव्हती. माजी सैनिकांची नावे नव्हती, त्यांची नीट आकडेवारीही सापडत नव्हती. देशासाठी आपले सरकारही देणाऱ्या या सैनिकांच्यासाठी सरकारकडे काहीही माहिती उपलब्ध नव्हती, आम्ही एक एक माहिती गोळा केली, त्यानंतर नीट हिशेब केला की यासाठी किती पैसे लागतील.
बंधू भगिनींनो, काँग्रेस सरकारने त्यासाठी ५०० कोटी रुपये निधी ठेवला होता. मला वाटले त्यापेक्षा जास्त म्हणजे फार तर हजार- पंधराशे अगदी २००० कोटी रुपये लागतील. मात्र जेव्हा सगळा हिशेब पूर्ण झाला तेव्हा बंधू भगिनीनो, हा आकडा १२ हजार कोटी पेक्षाही अधिक रुपये निघाला !
१२ हजार कोटी रुपये ! आता काँग्रेस जर समान श्रेणी-समान निवृत्तीवेतन केवळ ५०० कोटी रुपयात लागू करायचा विचार करा होती, तर त्यांचा हेतू प्रामाणिक होता का ? खर्च त्यांना या वीरसैनिकांना काही द्यायचे होते का ? त्यावेळचे अर्थमंत्री हिशेबात कच्चे तर नव्हते, मात्र 500 कोटी रुपयांचा टिळा लावून यांनी एक कोनशीला रचली आणि अर्थसंकल्पात केवळ घोषणा करुन हात वर केले.
बंधू भगिनींनो, जेव्हा सरकारवर 12 हजार कोटींपेक्षा जास्त भार येणार असे जेव्हा आमच्या लक्षात आले, तेव्हा आम्ही सैन्यातल्या काही जणांना बोलावले. मी त्यांना सांगितले, की आम्हाला आमचं वाचन तर पूर्ण करायचे आहे . आमची इच्छा प्रामाणिक आहे, मात्र सरकारच्या तिजोरीत इतकी ताकद नाही, की एकाचवेळी 12 हजार कोटी रुपये देऊ शकेल. आधीच्या सरकारने तर केवळ 500 कोटी रुपयांची चर्चा केली होती. मात्र ही योजना लागू करण्यासाठी 12 हजार कोटी रुपयांची गरज आहे, आम्हाला ते द्यायचे आहेत, पण मला तुमची मदत हवी आहे .
सैन्यातल्या लोकांनी मला म्हटले- पंतप्रधान महोदय, तुम्ही आम्हाला फक्त सांगा की तुम्हाला आमच्याकडून काय हवे आहे ? मी सांगितलं की आम्हाला बाकी काही नको, तुम्ही आजवर देशासाठी खूप मोठं योगदान दिले आहे. पण आता मला पुन्हा एकदा मदत करा. मी एकदम 12 हजार कोटी रुपये नाही देऊ शकणार. जर मला हा निधी द्यावा लागला तर देशातल्या गरीब जनतेसाठी असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावावी लागेल. आणि गरीब जनतेवर तो अन्याय होईल.
त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे. मी तुमचे हे निवृत्तीवेतन चार टप्प्यांत दिले तर तुम्हाला चालेल का ? माझ्या देशातले वीर सैनिक 40 वर्षांपासून जी समान श्रेणी समान वेतन मिळवण्यासाठी लढत होते, त्याची अपेक्षा करत होते, आता देशात एक असा पंतप्रधान आला आहे, जो हे लागू करण्यासाठी कटिबद्ध तर आहे पण त्याचीही अडचण आहे. खरं तर ते सांगू शकले असते की मोदीजी, आधीच्या सर्व सरकारांनी आम्हाला आश्वासनांशिवाय काहीही दिले नाही. आता आम्ही आणखी वाट बघायला तयार नाही. तुम्हाला द्यायचं असेल तर द्या नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ आणि आमचा आम्हाला ! असं ते म्हणू शकले असते. मात्र त्यांनी असे नाही म्हटले.
माझ्या देशाचा सैनिक त्यांची वर्दी उतरल्यानंतरही तन मनाने योद्धा असतो, सैनिक असतो. आयुष्याच्या संध्याकाळीही त्याच्या धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्तात देशहितच असते. मी त्यांना विनंती केल्यावर एक क्षणही ना दवडता माझ्या सैनिक बंधूंनी मला सांगितले- पंतप्रधान महोदय, तुमच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. चार टप्प्यांत द्यायचे असो की सहा तुकडे , तुम्ही तुमच्या सोयीने करा , मात्र फक्त एकदा हा निर्णय घ्या. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल.
बंधू भगिनींनो, ही त्या सेवानिवृत्त सैनिकांचीच ताकद होती, की मी निर्णय घेतला आणि आतापर्यंत चार हप्ते पूर्ण केले आहेत. 10 हजार 700 कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि बाकी रक्कमही त्यांच्या खात्यात लवकरच जमा केली जाईल. म्हणूनच सांगतो, केवळ कोनशीला रचणेच नाही तर अशा पोकळ घोषणा करणे, हीच आधीच्या सरकारांची सवय होती.
तुम्ही मला सांगा- गरीबी हटाओ ,गरिबी हटाओ हा नारा तुम्हीच गेल्या चार दशकांपासून ऐकत आहात की नाही? गरिबांच्या नावावर निवडणुकांचे खेळ खेळले आहेत की नाही ? पण गरीबाच्या भल्यासाठी कोणती योजना आणल्याचे, राबवल्याचे जाणवले आहे का ? स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी ते हेच सांगणार, जा खड्डे खोदा आणि संध्याकाळी काहीतरी हातात देणार आणि म्हणणार हे तुमच्या दाणा गोट्यासाठी ! जर खरंच यांना देशाचा शाश्वत विकास करण्याची इच्छा असती, तर माझ्या देशातला गरीब त्यांच्या मदतीने स्वतःच गरिबीशी लढण्यास सज्ज झाला असता.
आमचा प्रयत्न आहे गरिबांचे सशक्तीकरण ! गरिबांना सक्षम बनवणे ! बँकांचे राष्ट्रीयीकरण झालं मात्र बँकांचे दरवाजे गरिबांसाठी खुले झाले नाहीत. गरिबांच्या नावाखाली या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले, मात्र आजही देशातली 30 कोटींपेक्षा अधिक जनता, बँक सेवेपासून वंचित आहे. त्यांना बँकेपर्यंत पोहोचवण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती.
स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण झालीत तेव्हा आम्ही सत्तेवर आलो तेव्हा आम्ही निर्णय घेतला- आमच्या देशाच्या आर्थिक विकास यात्रेच्या मुख्य प्रवाहात गरीबानाही स्थान मिळायला हवे. आणि त्यासाठी आम्ही प्रधानमंत्री जन धन योजना सुरु केली. आज या योजनेअंतर्गत सुमारे 32 कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली आहेत. आणि बंधू- भगिनींनो,आम्ही जेव्हा गरिबांना बँकेत खाते उघडायला सांगितले, तेव्हा 1 रुपयाही न भरता हे खात उघडण्याची सोय केली होती. काहीही पैसे न भरता,हे खाते उघडता येणार होते. पण माझ्या देशातला गरीब, भलेही म्हणायला गरीब असेल, पण मनाने तो अत्यंत श्रीमंत आहे. तो भलेही आयुष्यभर गरिबीशी संघर्ष करत असेल, पण त्याच्याइतका मनाने श्रीमंत माणूस कोणीही नाही. आम्ही तर त्यांना काहीही पैसे न भरता बँक खाते सुरु करण्याची परवानगी दिली होती,मात्र त्यांना वाटले,की असे नाही, आपण काही ना काही रक्कम तरी टाकायला हवी. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला तुम्हाला हे सांगताना अतिशय अभिमान आणि आनंद होतो आहे की ज्या गरिबांनी काहीही रक्कम न टाकता खाते उघडले होते, त्याच गरिबांनी आपल्या जन धन खात्यात 72 हजार कोटी रुपये रक्कम जमा केली आहे . श्रीमंत लोक बँकेतून पैसे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत तर गरीब लोक बॅंकेत पैसे जमा करत आहेत. अशा पद्धतीने गरिबीशी लढता येतं हेच यातून सिद्ध होतं.
बंधू-भगिनींनो, तुम्हाला माहीतच असेल की स्वयंपाकाचा गॅस हवा असेल तर पूर्वी किती नेत्यांच्या मागे लागावं लागायचं,सहा सहा महिने विनंती करावी लागत असे. एका खासदाराला गॅसचे २५ कुपन्स मिळत. वर्षभरात ते ही कुपन्स कोणालाही वाटून त्याच्यावर “उपकार” करू शकायचे. काही खासदार तर ही कुपन्स ब्लैकमध्ये विकायचे, अशा पण बातम्या येत असत.
बंधू भगिनीनो, आजही माझी गरीब माता,लाकडाची चूल पेटवून धुरात आपलं आयुष्य घालवेल, हे योग्य आहे का? गरिबांचं कल्याण अशा पध्दतीने होणार आहे का?
माझ्या या माता भगिनी, ज्या रोज लाकडाची चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करतात, त्यांच्या शरीरात रोज ४०० सिगारेटइतका धूर जातो. आणि त्या घरात जी मुलबाळे खेळत असतात त्यांच्यावरही या धुराचा विपारित परिणाम होतो, त्यांचे आरोग्य बिघडते. हे लक्षात घेऊनच आम्ही एक मोठा निर्णय घेतला.
बंधू- भगिनींनो, आम्ही विडा उचलला आहे. गरिबांचे कल्याण फक्त घोषणाबाजी करून होणार नाही. त्यांचे आयुष्य त्यासाठी बदलावे लागेल. आणि म्हणूनच आम्ही उज्जवला योजनेच्या अंतर्गत आतापर्यत ३ कोटी ३० लाख कुटुंबांमध्ये गॅस जोडण्या दिल्या. लाकूड वापरून पेटवायची चूल, धूर यापासून या कोट्यवधी मातांची सुटका केली. मला सांगा, या माता भगिनी रोज जेंव्हा गॅस पेटवत असतील त्यावर सैपाक करत असतील तेंव्हा त्या नरेंद्र मोदीला आशीर्वाद देत असतील की नाही? या माता आमच्या रक्षणासाठी प्रार्थना करत असतील की नाही? कारण त्यांना माहिती आहे की गरिबीशी लढण्याचा योग्य मार्ग त्यांना आता गवसला आहे.
बंधू भगिनींनो, स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण होऊनही देशातल्या १८००० गावांमध्ये वीज पोहचली नव्हती. मला सांगा, आपण सगळे २१व्या शतकात जगात असताना १८००० गावं मात्र १८व्या शतकात जगत होती. त्यांच्या मनात नक्कीच विचार येत असतील की हे काय स्वातंत्र्य आहे का? ही लोकशाही आहे का? मी एक बटन दाबून सरकार बनवू शकतो मग मी निवडलेलं हे सरकार स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही माझ्या गावात वीज देऊ शकत नाही का? आणि म्हणूनच बंधू भगिनींनो या १८००० गावात वीज पोचविण्याचा मी निश्चय केला. आता त्यातली २००० गावं उरली आहेत. तिथेही वेगानं काम सुरु आहे. २१व्या शतकातलं आयुष्य जगण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आजही ४ कोटी पेक्षा अधिक अशी कुटुंबं आहेत ज्याच्या घरात अजून वीज पोचलेली नाही. आम्ही निश्चय केला आहे की महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीपर्यंत या ४ कोटी कुटुंबांना मोफत वीज जोडणी देऊ. त्यांची मुलं शिकतील दारिद्र्य विरोधात लढा द्यायचा असेल तर गरिबांना सक्षम करायला हवं. आणि अशा अनेक गोष्टी आम्ही करत आहोत.
बंधू भगिनींनो, हा तेल शुद्धीकरण प्रकल्प या भागाचं भाग्य तर बदलेलच, इथलं चित्रही पूर्ण बदलेल. या वाळवंटात इतका मोठा प्रकल्प सुरु होईल तेंव्हा किती लोकांना रोजगार मिळेल याची कल्पना आपण करू शकतो. आणि हा रोजगार केवळ त्या प्रकल्पाच्या परिसरातच मिळेल असं नाही. तर प्रकल्पाच्या बाहेरही रोजगाराची एक साखळी सुरु होईल. प्रकल्पाशी संबंधित अनेक छोटे मोठे उद्योग सुरु होतील. इतक्या मोठ्या उद्योगासाठी पायाभूत सुविधा हव्या असतात. तिथे पाणी, वीज, गॅस, ऑप्टीकल फायबर नेटवर्क अशा अनेक गोष्टींची गरज लागते. म्हणजे थोडक्यात या संपूर्ण क्षेत्राचे आर्थिक मापदंडच बदलून जातात.
आणि जेव्हा प्रकल्प इथे येईल, प्रकल्पात काम करणारे अधिकारी येतील तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी चांगल्या शैक्षणिक संस्था इथे आपोआप बनतील. देशभरातून, राजस्थान मधून अनेक लोक इथे काम करायला येतील. तेंव्हा त्यांच्या आरोग्याच्या सुविधांसाठी आरोग्याच्या चांगल्या व्यवस्था निर्माण होतील. त्याचं लाभ संपूर्ण प्रदेशालाच मिळेल.
आणि म्हणूनच बंधू भगिनींनो पाच वर्षांच्या आत येथे किती मोठा बदल होणार आहे याचा तुम्हाला सहजच अंदाज येऊ शकतो. बंधू भगिनींनो, आज मी इथे अशा प्रकल्पाची सुरवात करायला आलो आहे जो माझ्यासाठी तोट्याचा आहे. भारत सरकारसाठी हा तोट्याचा व्यवहार आहे. आधीच्या सरकारच्या काळातच या प्रकल्पाचं काम सुरु झालं असतं तर भारत सरकारच्या तिजोरीतले सुमारे ४०,००० कोटी रुपये वाचले असते.
मात्र या वसुंधराजी – यांच्यावर राजघराण्याचे संस्कार तर आहेतच, पण राजस्थानचं पाणी प्यायल्याने मारवाड्यांचे संस्कारही त्यांच्यावर झाले. त्यांनी भारत सरकार कडून जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला आणि हवं ते मिळवून घेतलं. हे भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे कि एखादा मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या हितासाठी दिल्लीतल्या स्वतःच्याच सरकारशी भांडून, हट्ट करून आपली इच्छा पूर्ण करून घेतात.
वसुंधराजींनी राजस्थानचे पैसे वाचवले आणि भारत सरकारलाही योजना कशी राबवायची हे सांगून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रेरित केलं. त्याचाच परिणाम म्हणून आज वसुंधराजी आणि धर्मेंद्रजी यांनी एकत्र येऊन केवळ कागदावर असलेल्या या प्रकल्पाला प्रत्यक्षात उतरविण्याचं काम हाती घेतलं आहे यासाठी या दोघांचही अभिनंदन. मी राजस्थानचंही या प्रकल्पासाठी अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा देतो.
पूर्ण ताकदीनी माझ्या सोबत म्हणा – भारत माता की जय.
बाडमेरच्या या भूमीवरून आता देशाला उर्जा मिळणार आहे. हा तेल शुद्धीकरण प्रकल्प देशाच्या उर्जेचं प्रतिनिधित्व करणार आहे. हे उर्जा इथून देशाच्या कानाकोपऱ्यात पोचावी याचं शुभेच्छांसह खम्मा घणी.