पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल,
मान्यवर पाहुणे
आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
पुद्दुचेरीच्या दिव्यत्वाने मला पुन्हा एकदा या पवित्र भूमीवर येण्याची प्रेरणा दिली आहे. बरोबर तीन वर्षांपूर्वी, मी इथे पुद्दुचेरीला आलो होतो. ही भूमी संत, विद्वान आणि कवींची भूमी आहे. तसेच भारतमातेच्या क्रांतिकारक सुपुत्रांचीही ही भूमी आहे. महाकवी सुब्रम्ह्ण्यम भारती इथेच वास्तव्यास होते. श्री अरविंदो यांचेही चरण या किनाऱ्याला लागले होते. पुद्दूचेरीमध्ये भारताच्या पूर्व आणि पश्चिम, दोन्ही किनाऱ्यांवरील संस्कृतींचे अस्तित्व आपल्याला जाणवते. ही भूमी विविधतेचे प्रतीक आहे. इथले लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात, विविध धर्म आणि पंथांवर श्रद्धा ठेवतात, मात्र तरीही एक होऊन राहतात.
मित्रांनो,
आज आपण विविध विकासकामांच्या शुभारंभाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलो आहोत, ही विकासकामे पुद्दुचेरीच्या जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवणार आहेत. अनेक क्षेत्रांशी संबधित ही कामे आहेत. ऐतिहासिक महत्वाच्या मेरी बिल्डींगच्या पुनर्विकासानंतर नव्या स्वरूपातील इमारतीचे लोकार्पण करतांना मला विशेष आनंद होत आहे. या इमारतीच्या प्राचीन वारशाच्या बांधकामात काहीही बदल न करता तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीमुळे प्रोमेनेड समुद्रकिनाऱ्याला आणखी शोभा येईल आणि पर्यटकही इकडे आकर्षित होतील.
मित्रांनो,
आपल्या विकासाच्या गरजा पूर्व करण्यासाठी भारताला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज आहे. आज, 45-ए या चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचा कोनशिला समारंभ होत असल्याचे सांगतांना मला आनंद होत आहे. कराईकल जिल्ह्यात बांधला जाणारा सत्तनाथापूरम ते नागापट्टणम दरम्यानचा हा 56 किमीचा महामार्ग असेल. या मार्गामुळे वाहतूक व्यवस्था निश्चितच सुधारेल, आर्थिक व्यवहारांना गती मिळेल आणि त्यासोबतच, शनीश्वरन मंदिराकडे जाण्याच्या मार्गातही सुधारणा होईल. ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ’ आणि नागोर दर्ग्याकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील आंतरराज्यीय वाहतूकही या महामार्गामुळे सुलभ होईल.
मित्रांनो,
केंद्र सरकारने ग्रामीण आणि किनारी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. कृषीक्षेत्रालाही याचा लाभ होणार आहे. देशभरातले आपले शेतकरी सध्या नवनवे प्रयोग करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. चांगल्या रस्त्यांमुळे हेच साध्य होईल. या चारपदरी रस्त्यामुळे या भागात उद्योग येतील, आणि त्यातून स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
मित्रांनो,
समृद्धीचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे. गेल्या सात वर्षात, भारतीयांचे आरोग्य आणि फिटनेस वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून आज इथल्या क्रीडा संकुलात 400 मीटर्सचा सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅकचे उद्घाटन करतांन मला विशेष आनंद होत आहे. हा खेलो इंडिया उपक्रमाचा भाग आहे. यामुळे भारताच्या युवकांमधील क्रीडा गुणांची जोपासना होऊ शकेल. खेळामुळे आपल्यात संघभावना, नीतिमूल्ये वृद्धिंगत होतात आणि त्याहीपलीकडे आपल्यात खिलाडूवृत्ती विकसित होते. पुद्दुचेरीमध्ये आता उत्तम क्रीडा सुविधा विकसित होत असून त्यामुळे इथले युवकही आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. लॉस्पेट येथे बांधण्यात आलेल्या 100 खाटांची व्यवस्था असलेल्या खेळाडू मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटनही आज झाले असून हाही क्रीडा प्राविण्याला मदत करणाराच एक उपक्रम आहे. या वसतिगृहात हॉकी, व्हॉलीबॉल, भारोत्तोलन, कबड्डी आणि हँडबॉल खेळाडूंना प्रवेश दिला जाईल. साई संस्थेचे प्रशिक्षक या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देतील.
मित्रांनो,
आगामी काळात एक क्षेत्र देशात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे, ते म्हणजे आरोग्यक्षेत्र. जे देश आरोग्यक्षेत्रात गुंतवणूक करत आहेत, त्यांचीच पुढे प्रगती होणार आहे. याच उद्दिष्टपूर्तीसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, मी JIPMER येथे रक्त संकलन केंद्राचे उद्घाटन करणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 28 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या सुविधेमुळे रक्त, रक्तातील घटक यानाची दीर्घकाळ साठवणूक करणे शक्य होणार आहे तसेच स्टेम सेलची बँकही इथे असेल. हे केंद्र, संशोधन प्रयोगशाळा आणि सर्व प्रकारच्या रक्तसंक्रमणाशी संबंधित सर्व पैलूंविषयी कर्मचारी प्रशिक्षण केंद्र म्हणूनही विकसित होईल. आपल्याला माहितीच आहे, की यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मित्रांनो,
तिरुवल्लुवर या महान कवींनी म्हटले आहे --
கேடில் விழுச்செல்வம் கல்வி ஒருவற்கு
மாடல்ல மற்றை யவை
याचा अर्थ :- ज्ञान आणि शिक्षण हीच माणसाची खरी संपत्ती असून इतर कोणत्याही गोष्टी शाश्वत नसतात. उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आपल्याला उत्तम दर्जाचे आरोग्य तज्ञ आणि कर्मचारी हवे आहेत.
कराईकल न्यू कॅम्पसमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा, याच दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. या नव्या पर्यावरणपूरक संकुलात एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांसाठी सर्व आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध असतील.
मित्रांनो,
समुद्रकिनारा हा पुद्दुचेरीचा आत्मा आहे. मत्स्योत्पादन, बंदरे, जहाजबांधणी आणि नीलक्रांतीसाठी भारतात खूप क्षमता आहे. सागरामाला योजनेअंतर्गत, पुद्दुचेरी बंदरे विकास प्रकल्प उभारण्याची संधी मला मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्या मच्छीमारांना या बंदरावरून समुद्रावर मासेमारीसाठी जाता येईल. या बंदरामुळे चेन्नई शहराशी सागरी संपर्क व्यवस्था सुरु होईल. पुद्दुचेरीच्या उद्योगांसाठी येथून मालवाहतूक होऊ शकेल आणि त्यामुळे चेन्नईच्या बंदरावरचा ताण कमी होईल. तसेच सागरकिनाऱ्यावरील शहरांमधील नागरिकांची वाहतूक देखील या मार्गाने होऊ शकेल.
मित्रांनो,
विविध विकास योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना राबवण्यात पुद्दुचेरीने उत्तम काम केले आहे. यामुळे लोकांना त्यांची निवड स्वतः करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्थांमुळे, पुद्दुचेरीमध्ये कुशाल आणि सक्षम मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे. या केंद्रशासित प्रदेशात औद्योगिक आणि पर्यटन विकासाच्या विपुल संधी उपलब्ध असून त्यातून अनेक रोजगार आणि संधी उपलब्ध होतील. पुद्दुचेरीचे लोक बुद्धिमान आणि कुशल आहेत. ही अत्यंत रमणीय भूमी आहे. मी आज इथे तुम्हाला प्रत्यक्ष आश्वासन देण्यासाठी आलो आहे की माझ्या सरकारकडून पुद्दुचेरीच्या विकासासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहाय्य केले जाईल. आज सुरु झालेल्या विकासकामांबद्दल पुद्दुचेरीच्या जनतेचे पुन्हा एकदा अभिनंदन !!
धन्यवाद ! खूप खूप धन्यवाद !
वणक्कम !