Quote‘डबल इंजिन’ सरकारने त्रिपुराचे परिवर्तन केलेः पंतप्रधान
Quoteत्रिपुरामध्ये एचआयआरए विकास म्हणजेच महामार्ग, आय-वे, रेल्वे आणि हवाईमार्ग पहायला मिळत आहेत: पंतप्रधान
Quoteभारत आणि बांगलादेशमधील मैत्री वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे केवळ बळकटच होत नाही तर ती व्यवसायासाठी ही एक मजबूत दुवा असल्याचे सिद्ध होत आहे: पंतप्रधान
Quoteमैत्री पूल बांगलादेशातील आर्थिक संधीलाही प्रोत्साहन देईलः पंतप्रधान

नमस्कार! खुलुमखा!!

त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस जी, लोकप्रिय मुख्यमंत्री बिप्लव देव जी, उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा जी, राज्य सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आणि त्रिपुराचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांच्या परिवर्तन यात्रेला, त्रिपुराच्या विकास यात्रेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! खूप-खूप शुभेच्छा!

बंधू आणि भगिनींनो,

तीन वर्षांपूर्वी, तुम्ही लोकांनी, त्रिपुराच्या जनतेने एक नवी इतिहास रचला होता आणि संपूर्ण देशाला एक खूप ठोस संदेश दिला होता. दशकांपासून राज्याचा विकास जणू ठप्प करणा-या, विकासकामे रोखून धरणा-या नकारात्मक शक्तींना हटवून, बाजूला सारून  त्रिपुराच्या जनतेने एक नवा प्रारंभ केला होता. ज्या बेड्यांमध्ये त्रिपुरा, त्रिपुराचे सामर्थ्‍य जखडून गेले होते, त्या बेड्या तुम्ही लोकांनी तोडून टाकल्या. आता त्या जोखडातून तुम्ही मुक्त झाले आहात. माता त्रिपूरा सुंदरीच्या आशीर्वादाने, विप्लव देव जी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सरकार आपले संकल्प अतिशय वेगाने पूर्णत्वास नेण्यासाठी काम करीत आहे, याचा मला आनंद वाटतो.

मित्रांनो,

2017 मध्ये तुम्ही त्रिपुरामध्ये विकासाचे डबल इंजिन लावण्याचा निर्णय घेतला. एक इंजिन त्रिपुरामध्ये आणि दुसरे इंजिन दिल्लीमध्ये! आणि असे डबल इंजिन लावल्यामुळे झालेला जो परिणाम दिसू येत आहे, जो प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे, तो आज तुम्हा सर्वांसमोर आहे. आज  जुन्या सरकारची 30 वर्षे आणि नवीन डबल इंजिनाच्या सरकारची तीन वर्षे यांच्या कामांमधला फरक त्रिपुराची जनता आज अनुभवत आहे. राज्यात हा फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्याठिकाणी दलाली आणि भ्रष्टाचार यांच्याशिवाय काम होणेच अवघड होते, तिथेच आज सरकारकडून मिळणारे लाभ थेट बँक खात्यांमध्ये पोहोचत आहेत. जे कर्मचारी वेळेवर वेतन मिळत नाही, यामुळे त्रासून गेले होते. त्यांना आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेळेवर वेतन मिळत आहे. जिथे शेतकरी बांधवांना आपल्या शेतात आलेले पिक, धान्य विकण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत होता, तिथेच आता पहिल्यांदा त्रिपुरामध्ये किमान समर्थन मूल्याने धान्याची खरेदी सुनिश्चित झाली आहे. मनरेगाअंतर्गत काम करणा-यां मित्रांना आधी 135 रुपये प्रतिदिन रोजगार मिळत होता. आता या कामासाठी त्यांना प्रतिदिनी 205 रूपये दिले जात आहेत. ज्या त्रिपुरामध्ये संप-बंद संस्कृतीमुळे अनेक वर्ष मागे ढकलले होते, आज तिथेच उद्योग सुलभीकरणासाठी काम होत आहे. ज्या ठिकाणी कधी काळी उद्योगांना टाळी-कुलुपे लावण्याची वेळ आली होती, तिथेच आता नवीन उद्योगांसाठी, नवीन गुंतवणुकीसाठी जागा बनत आहे. त्रिपुराचे व्यापारी मूल्य तर वाढत आहेच. त्याचबरोबर राज्यामधून होत असलेल्या निर्यातीमध्ये जवळ-जवळ पाचपट वाढ झाली आहे.

|

मित्रांनो,

त्रिपुराच्या विकासासाठी आवश्यक असणा-या प्रत्येक गोष्टींकडे केंद्र सरकारने  खूप लक्ष दिले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये त्रिपुराला केंद्र सरकारकडून मिळणा-या निधीमध्येही खूप मोठी वाढ करण्यात आली आहे. वर्ष 2009 ते 2014 या कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून त्रिपुराला केंद्रीय विकास परियोजनांसाठी 3500 कोटी रुपये मदत दिली होती. 3500  कोटी रुपये. तर सन 2014 ते 2019 या कालावधीमध्ये आम्ही आल्यानंतर 12 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त मदत देण्यात आली आहे. ज्या मोठ्या राज्यांमध्ये असे डबल इंजिनाचे सरकार नाही, त्या मोठृया राज्यांसाठीही आज त्रिपुराने एक वेगळे उदाहरण समोर ठेवले आहे. ज्या राज्यांनी डबल इंजिन तर लावले नाही तसेच ज्या सरकारांनी दिल्लीबरोबर भांडत बसण्यामध्ये आपला वेळ वाया घालवला, त्यांच्यासाठी त्रिपुरा एक उदाहरण बनले आहे, हे त्यांनाही आता माहिती झाले आहे. त्रिपुरामध्ये याआधी विजेचा तुटवडा होता, आता मात्र डबल इंजिनच्या सरकारमुळे इथे वीज गरजेपेक्षा उपलब्ध होऊ शकते. 2017 च्या आधी  त्रिपुरामध्ये फक्त 19 हजार ग्रामीण घरांमध्ये नळाव्दारे पाणी पुरवठा केला जात होता. आज दिल्ली आणि त्रिपुराच्या डबल इंजिनाच्या सरकारमुळे जवळपास दोन लाख ग्रामीण घरांना जलवाहिनीव्दारे पेयजल मिळत आहे.

2017च्या आधी त्रिपुरातल्या 5 लाख 80 हजार  घरांमध्ये गॅस जोडणी दिल्या होत्या. म्हणजे सहा लाखांपेक्षाही कमी परिवारांकडे गॅस होता. आज राज्यातल्या आठ लाख घरांमध्ये गॅस जोडणी दिलेली आहे. 8 लाख 50  हजार घरांमध्ये गॅस आहे. डबल इंजिनाचे सरकार बनण्याआधी त्रिपुरामध्ये फक्त 50 टक्के गावे खुल्या शौचापासून मुक्त होते. आज त्रिपुरातली बहुतेक सर्वच्या सर्व गावे खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत. सौभाग्य योजनेअंतर्गत त्रिपुरामध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. उज्ज्वल योजनेअंतर्गत अडीच लाखांपेक्षा जास्त परिवारांना गॅस जोडणी दिली आहे. तसेच 50 हजारांपेक्षा जास्त गर्भवतींना मातृवंदना योजनेचा लाभ असो,  दिल्ली आणि त्रिपुरा यांच्या डबल इंजिनाच्या सरकारने केलेल्या या कामांमुळे त्रिपुराच्या माता-भगिनींना सशक्त करण्यासाठी मदत मिळत आहे. त्रिपुरामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि आयुष्मान भारत योजनेचीही लाभ शेतकरी आणि गरीब परिवारांना मिळत आहेत. या सर्व गोष्टी संपूर्ण देश पहात आहे. ज्या राज्यांमध्ये असे डबल इंजिनाचे सरकार नाही, आपल्या शेजारच्याच गरीब, शेतकरी आणि कन्यांना सशक्त करणा-या योजना तर लागूही करण्यात आलेल्या नाहीत. किंवा या योजनांचे काम अतिशय संथपणाने सुरू आहे.

|

मित्रांनो,

डबल इंजिन सरकारचा सर्वात मोठा प्रभाव गरीबांना स्वतःचे पक्के घर देण्याची गती पाहिल्यानंतर जाणवतो. आज ज्यावेळी त्रिपुरा सरकारचा चौथ्या वर्षात प्रवेश होत आहे, त्यावेळी राज्यातल्या 40 हजार गरीब परिवारांनाही स्वतःचे नवीन घरकुल मिळत आहे. ज्या गरीब परिवारांचे स्वमालकीच्या घराचे स्वप्न आज पूर्ण होत आहे, त्या लोकांना आपल्या एका मतामध्ये किती प्रचंड ताकद असते, हे चांगले माहिती होणार आहे. आपल्या एका मतामध्ये आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे सामर्थ्‍य असते, हे  आज ज्यावेळी स्वमालकीचे घर तुम्हाला मिळणार आहे, त्यावेळी जाणवणार आहे. आज तुम्हाला मिळणारे नवीन घर तुमच्या स्वप्नांना आणि तुमच्या मुलांच्या आकांक्षांना नवीन भरारी देणारे सिद्ध होईल, अशी माझी कामना आहे.

बंधू आणि भगिनींनो,

ही डबल  इंजिन सरकारची ताकद आहे. प्रधानमंत्री घरकुल योजना, मग ती ग्रामीण असो अथवा शहरी, या दोन्हीमध्ये त्रिपुरा राज्यात खूप वेगाने काम होत आहे. त्रिपुराच्या लहान-मोठ्या शहरांमध्ये गरीबांना 80 हजारांपेक्षा जास्त पक्की घरे बांधण्यासाठी स्वीकृती दिली आहे. देशात सहा राज्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने घरकुलांची निर्मिती केली जात आहे. त्या सहामध्ये त्रिपुरा राज्याचाही समावेश आहे. या योजनेतून आधुनिक घरांची निर्मिती केली जात आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आम्ही आपल्याला वचन दिले होते की, त्रिपुरामध्ये ‘एचआयआरए’वाला विकास होईल, असे डबल इंजिन लावण्यात येईल. आणि आत्ताच व्हिडिओ पाहत होतो, किती उत्तम पद्धतीने सर्व माहिती दिली गेली. एचआयआरए म्हणजे, हायवेज-महामार्ग, आय-वेज , रेल्वेज आणि एअरवेज. त्रिपुराच्या संपर्क यंत्रणेमध्ये गेल्या तीन वर्षात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांमध्ये प्रचंड वेग आल्यामुळे सुधारणा झाली आहे. विमानतळांचे काम असो अथवा सागरी मार्गांचे काम असो त्रिपुराला इंटरनेटने जोडण्याचे काम असो, रेल लिंक असो, यामध्ये वेगाने काम होत आहे. आजही 3 हजार कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आले आहेत. ही कामे म्हणजे आमच्या ‘एचआयआरए’ मॉडेलचे भाग आहेत. वास्तविक आता तर जलमार्गाची कामेही पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

|

मित्रांनो,

या साखळीमध्ये आज गावांसाठी रस्ते, महामार्गांचे रूंदीकरण, पूलांची कामे, पार्किंग, निर्यात यासाठी पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटीशी संबंधित असलेल्या पायाभूत सोयी, यांचीही भेट आज त्रिपुराला मिळाली आहे. आज संपर्क यंत्रणेची जी सुविधा त्रिपुरामध्ये विकसित होत आहे, त्यामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातल्या गावांमध्ये राहणा-या लोकांचे जीवन अधिक सुकर बनण्याबरोबरच लोकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत मिळत आहे. ही संपर्क यंत्रणा, बांगलादेशाबरोबरची आपली मैत्री, आपले व्यापारी संबंध अधिक मजबूत करणारी साखळी सिद्ध होत आहे.

मित्रांनो ,

या संपूर्ण प्रांताला, एक प्रकारे पूर्व, ईशान्य भारत आणि  बांग्लादेश यांच्यातील व्यापार कॉरिडॉर म्हणून  विकसित केले जात आहे. बांग्लादेश दौऱ्यादरम्यान मी आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी एकत्रितपणे  त्रिपुराला थेट बांग्लादेशाशी जोडणाऱ्या पुलाचा शिलान्यास केला होता आणि आज त्याचे  लोकार्पण करण्यात आले. आज भारत आणि  बांग्लादेशची  मैत्री आणि संपर्क व्यवस्था किती  सशक्त होत आहे याबाबत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे विचार आपण ऐकले. सबरूम आणि रामगढ दरम्यान सेतूमुळे आपली मैत्री देखील मजबूत झाली आहे आणि भारत- बांग्लादेशच्या समृद्धीचा संबंध देखील  जोडला गेला आहे. गेल्या काही वर्षात भारत आणि बांग्लादेश दरम्यान रस्ते, रेल्वे आणि हवाई  जोडणीसाठी जे करार प्रत्यक्षात झाले , ते या सेतूमुळे आणखी मजबूत झाले आहेत. यामुळे त्रिपुरासह दक्षिण आसाम, मिझोराम, मणिपुरची बांग्लादेश आणि आग्नेय आशियाच्या अन्य देशांबरोबर संपर्क व्यवस्था  सशक्त होईल. भारतातच नाही  बांग्लादेश मध्येही या सेतुमुळे कनेक्टिविटी उत्तम होईल आणि आर्थिक संधी वाढतील. या सेतूच्या उभारणीमुळे भारत-बांग्लादेशमध्ये लोकांमधील संपर्क उत्तम होण्याबरोबरच पर्यटन आणि व्यापारासाठी, बंदर प्रणित विकासासाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. सबरूम आणि त्याचा आसपासचा परिसर बंदराशी संबंधित कनेक्टिविटीचे , आंतरराष्ट्रीय व्यापाराचे खूप मोठे केंद्र बनणार आहे.

मित्रांनो,

मैत्री सेतु व्यतिरिक्त अन्य सुविधा जेव्हा तयार होतील, तेव्हा ईशान्य प्रदेशासाठी कोणत्याही प्रकारच्या आपूर्तीसाठी आपल्याला केवळ रस्त्याच्या मार्गावर अवलंबून रहावे लागणार नाही.  आता समुद्रमार्गे, नदीमार्गे,  बांग्लादेश मुळे रस्ते बंद झाल्यामुळे  प्रभावित होणार नाही.  दक्षिण त्रिपुराचे हे  महत्व लक्षात घेऊन आता  सबरूममध्येच एकात्मिक तपासणी नाक्याचे बांधकाम आजपासून सुरु झाले आहे. हा तपासणी नाका , एक सुसज्ज वाहतूक केंद्राप्रमाणे काम करेल. इथे वाहनतळ बनतील, गोदामे बनतील, कंटेनर ट्रान्स-शिपमेंट सुविधा उभारल्या जातील.

मित्रांनो,

फेनी पूल खुला झाल्यामुळे आगरतला हे आंतरराष्ट्रीय सागरी बंदराजवळचे सर्वात जवळचे शहर बनेल. राष्ट्रीय महामार्ग -8 आणि राष्ट्रीय महामार्ग -208 च्या रुंदीकरणाशी संबंधित ज्या प्रकल्पांचे आज लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला आहे , त्यामुळे ईशान्य प्रदेशाची बंदराशी जोडणी अधिक मजबूत होईल. यामुळे आगरतला, संपूर्ण ईशान्य प्रदेशाच्या वाहतुकीचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून उदयाला येईल. या मार्गे वाहतुकीचा खर्च खूप कमी होईल आणि संपूर्ण ईशान्य प्रदेशाला सुलभपणे सामान मिळेल.  त्रिपुराच्या शेतकऱ्यांना आपली फळे-भाजीपाला, दूध, मासे आणि अन्य सामानासाठी  देश-विदेशातील नवीन बाजारपेठा मिळणार आहेत. इथे जे आधीपासून  उद्योग उभे आहेत त्यांना  लाभ होईल आणि नवीन उद्योगाना बळ मिळेल . इथे बनणारे  औद्योगिक सामान, परदेशी बाजारांमध्येही खूप स्पर्धात्मक असेल. गेल्या काही वर्षात इथल्या बांबू उत्पादनांसाठी, अगरबत्ती उद्योगासाठी, अननसाशी संबंधित व्यापारासाठी जे प्रोत्साहन दिले गेले, त्याला या नवीन  सुविधांमुळे आणखी बळ मिळेल .

बंधू आणि भगिनींनो,

आगरतला सारख्या शहरांमध्ये  आत्मनिर्भर भारताची नवी केंद्रे बनण्याचे सामर्थ्य आहे. आज आगरतलाला उत्तम  शहर बनवण्यासाठी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि  शिलान्यास अशाच प्रयत्नांचा भाग आहे. नवीन बनलेले  इंटिग्रेटेड कमांड सेंटर, शहरातील व्यवस्थांना एकाच ठिकाणाहून  स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाताळण्यात मदत करेल. वाहतुकीशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी , अशा अनेक प्रकारच्या उपयुक्ततेसाठी तांत्रिक सहकार्य मिळेल. अशाच प्रकारे बहुस्तरीय  पार्किंग, व्यावसायिक  कॉम्प्लेक्स आणि विमानतळ यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आगरतला मध्ये राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेत खूप सुधारणा होईल.

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा अशी कामे होतात तेव्हा त्यांचा सर्वात जास्त लाभ त्यांना होतो जी अनेक वर्षे विस्मृतीत गेलेली असतात, ज्यांना त्यांच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला भाग पाडले गेलेले असते. ज्यांना सोडून देण्यात आलेले असते. विशेषतः आपल्या आदिवासी भागात राहणाऱ्या आपल्या सर्व सहकारी आणि  ब्रू शरणार्थीना सरकारच्या अनेक निर्णयांमुळे  लाभ मिळत आहे.  त्रिपुराच्या  ब्रू शरणार्थींच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक दशकांनंतर सरकारच्या प्रयत्नांमुळे तोडगा निघाला आहे. हजारो ब्रू साथीदारांच्या विकासासाठी देण्यात आलेल्या  600 कोटी रुपयांच्या  विशेष पॅकेजमुळे त्यांच्या जीवनात खूप  सकारात्मक परिवर्तन येईल. 

मित्रांनो,

जेव्हा  घरोघरी पाणी पोहचते , वीज पोहचते , आरोग्य सुविधा पोहचतात, तेव्हा आपल्या आदिवासी  क्षेत्रांना त्याचा  विशेष लाभ होतो. हेच काम केंद्र आणि  त्रिपुरा सरकार आज एकत्रितपणे करत आहेत. आगिनी हाफांग, त्रिपुरा हास्तेनी, हुकूमु नो सीमी या, कुरुंग बोरोक बो, सुकुलूगई, तेनिखा। त्रिपुरानी गुनांग तेई नाईथोक, हुकूमु नो, चुंग बोरोम याफरनानी चेंखा, तेई कुरुंग बोरोक- रोकनो बो, सोई बोरोम याफारखा। आगरतला विमानतळाचे  महाराजा बीर बिक्रम किशोर मानिक्या असे नामकरण  हा  त्रिपुराच्या विकासासाठी त्यांच्या दूरदृष्टीचा सन्मान आहे. त्रिपुराची समृद्ध संस्कृती आणि साहित्याची  सेवा करणारे सुपुत्र,  थंगा डॉरलॉन्ग , सत्यराम रियांग आणि  बेनीचंद्र जमातिया यांना  पद्मश्री देऊन गौरवण्याचे सौभाग्य देखील आम्हालाच मिळाले. संस्कृती आणि  साहित्य क्षेत्राच्या या साधकांच्या योगदानाचे आपण सर्वजण ऋणी आहोत.  बेनी चंद्र जमातिया आता आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांचे काम आपणा सर्वांना कायम प्रेरणा देत राहील.

मित्रांनो

 आदिवासी कलेला , बांबू आधारित कलेला प्रधानमंत्री वन धन योजनेअंतर्गत  प्रोत्साहित केल्यामुळे आदिवासी बंधू-भगिनींना कमाईचे नवीन साधन मिळत आहेत. मला सांगण्यात आले आहे की  'मुळा Bamboo Cookies'  प्रथमच  पॅकेज्ड उत्पादन म्हणून बाजारात आणले आहे. हे प्रशंसनीय काम आहे . अशा कामांचा विस्तार लोकांची आणखी मदत करेल. यावर्षीच्या  केंद्रीय अर्थसंकल्पातही आदिवासी क्षेत्रांमध्ये  एकलव्य मॉडल स्कूल आणि  अन्य आधुनिक सुविधांसाठी  व्यापक तरतूद करण्यात आली आहे. मला  विश्वास आहे की येत्या वर्षात  त्रिपुरा सरकार अशाच प्रकारे त्रिपुरावासियांची  सेवा करत राहील. मी पुन्हा एकदा बिप्लब जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे , प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना जनतेची तीन वर्षे त्यांनी सेवा केली आहे, आगामी काळात त्याहीपेक्षा अधिक मेहनत करतील, अधिक सेवा करतील , त्रिपुराचे भाग्य बदलेल , या विश्वासासह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. खूप-खूप शुभेच्छा देतो. 

धन्यवाद!

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India’s Economic Momentum Holds Amid Global Headwinds: CareEdge

Media Coverage

India’s Economic Momentum Holds Amid Global Headwinds: CareEdge
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles loss of lives due to fire tragedy in Hyderabad, Telangana
May 18, 2025
QuoteAnnounces ex-gratia from PMNRF

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to fire tragedy in Hyderabad, Telangana. Shri Modi also wished speedy recovery for those injured in the accident.

The Prime Minister announced an ex-gratia from PMNRF of Rs. 2 lakh to the next of kin of each deceased and Rs. 50,000 for those injured.

The Prime Minister’s Office posted on X;

"Deeply anguished by the loss of lives due to a fire tragedy in Hyderabad, Telangana. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM "

@narendramodi