जगभरातून आलेल्या आणि प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो,
इतिहास विसरण्याची किती मोठी किंमत चुकवावी लागते, किती गोष्टी गमवाव्या लागतात? काय काय सोडावे लागते? जर ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर मला वाटते श्रीमद राजचंद्रजी यांच्या व्यक्तीमत्वापासून आपण अतिशय चांगल्या प्रकारे समजू शकतो की, त्यांना विसरून आपण काय गमावले आहे, काय काय हरवून गेले आहे आणि आज त्यांना आठवण्याचा हा अतिशय सुंदर योग आला आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांना पूज्य बापुजी कविश्री म्हणून संबोधित करत असत. त्यांना १५० वर्ष आणि ज्या तपोभूमीत शतकांच्या गुलामीनंतर भारताची अंतर्गत जाणीव चेतवण्याचे पवित्र कार्य झाले, त्या साबरमती आश्रमाचे हे शताब्दी पर्व आहे.
२०१७ वे वर्ष अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे, हेच वर्ष होते की जेव्हा देशात सत्याग्रहाचे पहिले रणशिंग फुंकले गेले. चंपारण्य भूमीवर आणि त्याचेही हे शताब्दी वर्ष आहे. १९१५ मध्ये पूज्य बापूजी आफ्रिकेहून भारतात परत आले होते आणि २०१५ मध्ये त्या घटनेचे शताब्दी वर्ष होते तेव्हा भारत सरकारने पूज्य बापूजींच्या भारतात येण्याच्या घटनेची शताब्दी याच गुजरातेत, महात्मा मंदिरात, जगभरातून अनिवासी भारतीयांना बोलवून साजरी करण्याचा प्रयत्न केला.
गांधीजींशी जोडले गेलेले अनेक लोक, जे गांधींचे अभ्यासक आहेत, त्यांच्यासाठी श्रीमद् राजचंद्र यांचे नाव परिचित आहे. पण एक संपूर्ण पिढी आहे की जिला श्रीमद् राजचंद्र यांचे नाव नवीन आहे. दोष आम्हा लोकांचा आहे. या महापुरुषांचे स्मरण पिढ्यानपिढ्या ठेवले पाहिजे परंतु आम्ही अशा काही तरी चुकीच्या रस्त्याने गेलो की आम्हाला त्यांचा विसर पडला. या सरकारचा असा प्रयत्न आहे की, या महान राष्ट्राच्या सुपुत्रांचे, महान परंपरांचे, महान इतिहासाचे सतत स्मरण रहावे, इतिहासाच्या मुळांशी आमची नाळ जोडलेली रहावी आणि नवा इतिहास रचण्यासाठी पराक्रम करण्यास सिद्ध रहावे, या उद्देश्याने आम्हाला पुढे जायचे आहे.
मला असे कधी कधी वाटते की जगाला या पद्धतीने गांधीजींची ओळख करून द्यायची गरज आहे, ज्यामुळे आगीच्या समुद्रातून जात असलेल्या मानवतेला गांधीजींपासून दिशा मिळू शकते, मार्ग मिळू शकतो. पण आम्ही ते करू शकलो नाही. अजूनही वेळ आहे, मला माहित नाही, सर्व इच्छा पूर्ण कुठे होतात? परंतु इच्छा बाळगणे तर वाईट नाही. संयुक्त राष्ट्रसंघ जो शांततेसाठी निर्माण झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या गर्भातून हा विचार निर्माण झाला ज्याने संस्थेचे रूप घेतले. जर आम्ही गांधीजींना जागतिक शांततेचे देवदूत म्हणून जनमानसात रुजवण्यात यश प्राप्त केले असते तर संयुक्त राष्ट्रसंघाचा जो कुणी सरचिटणीस होईल तो नियुक्ती झाल्यावर सर्वप्रथम साबरमती आश्रम आला असता, काही क्षण हृदयकुंजमध्ये घालवले असते आणि संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक शांततेसाठी जे काम करत आहे त्यासाठी साबरमती किनाऱ्यावरील बापूंच्या तपोभूमीहून प्रेरणा घेऊन गेला असता. परंतु माझा आत्मा सांगतो आज नाही तर उद्या, कधी ना कधी हे घडणारच आहे. आमच्या देशाला आम्ही त्या स्वरुपात पाहिले पाहिजे. त्या ताकदीचा अनुभव घेतला पाहिजे आणि जगाला या विशालतेशी जोडण्याचा अखंड प्रयत्न केला पाहिजे.
श्रीमद् राजचंद्रजी, गुरुदेव राकेश जी सांगत होते तसे महात्मा गांधी यांना जगातील मोठमोठ्या व्यक्ती भेटायला येत असत. स्वातंत्र्यासाठी ते जगातील मोठमोठ्या व्यक्तींशी चर्चा करत होते. उंचपुरे, सहा साडे सहा फुट उंची असलेले, गोरेगोमटे, परंतु जगातील कुणीही व्यक्ती गांधीजींना प्रभावित करू शकली नाही आणि एक श्रीमद् राजचंद्रजी, किडकिडीत अंगाचे, ते ही एक व्यापारी, दुकानावर बसून खरेदी-विक्री करण्याचे सामान्य जीवन जगणारे, गांधी व त्यांच्या वयात फार फरक नव्हता, अडीच वर्षांचा तर फरक होता, असे असूनही श्रीमद् राजचंद्रजी यांच्या व्यक्तीमत्वाची कोणती विशालता असेल, कोणती खोली असेल, कोणती ताकद असेल की ज्यांनी संपूर्ण गांधीना आपल्यात पूर्ण सामावून घेतले होते.
माझे हे सौभाग्य होते की मी बवानियाला गेलो होतो जिथे श्रीमद् राजचंद्र यांचा जन्म झाला. ही त्यांच्या पूर्वजांची जागा असून ज्या प्रकारे त्यांच्या कुटुंबीयांनी ती सांभाळली आहे त्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबियांचा आभारी आहे. तिथून परतल्यावर मी शिक्षकांना सांगितले होते की, सौराष्ट्रात आपण कधी कुठल्या प्रवासाला गेलात तर काही वेळ बवानियाला जरूर जा. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा विचित्र प्रकारची कंपने येतात, एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येते. ज्याचा अनुभव मला आला, आपल्यालाही असाच अनुभव येईल, असे मी मानतो.
श्रीमद् राजचंद्रजी यांच्यासाठी बवानियात जे स्थळ निर्माण केले आहे ते मंदिर नाही. एक स्थळ आहे परंतु आत जाताच आपल्याला अध्यात्मिक जाणिवेची कंपने जाणवू लागतील.
आमच्या देशात अनेक विषयांवर पीएचडी होत असते, अनेक महापुरुषांच्या कवितांच्या गद्य-पद्य रचनांवर पीएचडी होत असते. परंतु मला वाटते की श्रीमद् राजचंद्रजी यांच्या १५०वी जयंती साजरी करत आहोत, विशेषतः गुजरात विद्यापीठ आणि देशातील विद्यापीठांनी श्रीमद् राजचंद्रजी यांचे जे लिखाण आहे, कथन आहे त्यावर का पीएचडी केली जाऊ नये? गांधीजींच्या जीवनावर, त्यांच्या सर्व उपक्रमांवर श्रीमद् राजचंद्रजी यांची जी पत्रे आहेत त्यांचा कशा रीतीने प्रभाव आहे. आणि गांधीजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वयात फरक नव्हता, जैन परंपरेत वाढलेले श्रीमद् राजचंद्रजी, तरीही गांधीजींचा सरळ स्वभाव पहा. गांधीजी बॅरिस्टर होते, आफ्रिकेत आंदोलन करून आले होते. भारतातील अनेक मोठे नेते त्यांना भेटण्यास येत असत. त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. या कशाची पर्वा न करता आणि वयात फरक नसूनही सामान्य जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तींना आपल्या मनातील प्रश्न लिहून त्यांच्याकडून उत्तर मागत होते आणि श्रीमद् राजचंद्रजी नि:संकोचपणे अध्यात्मिक जीवन चेतना आणि अधिष्टानासह संपूर्ण ज्ञान भांडार बापुना पत्राद्वारे पोहोचवत होते. पूज्य बापू आणि श्रीमद् राजचंद्रजी यांच्यातील ती पत्रे पाहिली तर आपल्याला त्या कालखंडाची माहिती मिळते. गांधीजींच्या मन:स्थितीची कल्पना येते आणि इतक्या मोठ्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करणारी व्यक्तीही आपल्या अंतर्मनाची किती चिंता करत होती, त्याला सांभाळण्यासाठी काय करायला हवे हे श्रीमद् राजचंद्रजी यांना विचारत होते.
आमच्या नव्या पिढीला काही माहित नाही आणि म्हणून आम्ही यांचा साबरमती आश्रमाची शताब्दी साजरी करत आहोत. देशाभरातून जे विद्यार्थी पर्यटक गुजरातला येतात, मी त्यांच्या शिक्षकांना आवाहन करतो की तुम्ही सर्व काही पहा परंतु काही क्षण विद्यार्थ्यांना साबरमती आश्रमात घालवण्यासाठी प्रेरित करा. बवानिया जाऊन दाखवा की कसा महापुरुष त्याच दिवसात आमच्या देशात निर्माण झाले. ही काही ऋषी मुनी युगाची गोष्ट नव्हे. गुरुदेव राकेश जी यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे, जे ज्ञानमार्गी आणि कर्ममागी आहेत. त्यांच्या विचारांचा पिंड श्रीमद् राजचंद्र यांच्या प्रेरणेने भरलेला आहे आणि त्यांचे जीवन त्या आदर्शांची पूर्तता करण्यासाठी कर्मयोग अंतर्गत खूप दूरवर जंगलात वसलेल्या लोकांच्या सेवेत गेलेले आहे. मी हे पाहिले आहे की जगभरात एक मोठा समूह आहे जो टीव्ही वर त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी जमलेला असतो, त्यांना सातत्याने ऐकणारा एक मोठा वर्ग आहे.
आताच मी नेदरलँडहून आलो, परवा मी नेदरलँडमध्ये होतो. दोन गोष्टी माझ्या माहितीसाठी खूप नव्या होत्या. भारतात जितके रस्ते महात्मा गांधी यांच्या नावे आहेत, त्यानंतर जगात जर सर्वाधिक रस्ते गांधींच्या नावे कुठे असतील तर ते नेदरलँड्समध्ये. माझ्यासाठी हा नवीन अनुभव, नवी माहिती आहे. दुसरे म्हणजे तिथे मोठ्या संख्येने डच नागरिक असलेले सुरीनामचे लोक येऊन स्थायिक झाले आहेत. भारतातील आयटी क्षेत्राशी जोडलेली खूप मोठ्या संख्येने युवा पिढी तिथे गेली आहे. परंतु किमान एक डझन तरी लोक मला भेटून सांगत होते की तुम्ही परवा राकेशजीना भेटणार आहात ना? आणि एक गोष्ट ते सांगत होते. राकेशजी बरोबरची आपली छायाचित्रे पाठवून द्या. या गोष्टी सहजसाध्य नाहीत, त्यांचे स्वतःचे एक सामर्थ्य आहे. जेव्हा आम्ही पूज्य बापूंचे स्मरण करतो, साबरमती आश्रमाचे स्मरण करतो, १२ वर्षांची तपश्चर्या आहे आणि पूज्य बापूंची निर्धार शक्ती पहा, मेलो तरी चालेल परंतु स्वातंत्र्याशिवाय परत येणार नाही. जेव्हा ते साबरमती आश्रम सोडून निघाले तेव्हा केवढी मोठी निर्धार शक्ती असेल. १२ वर्षांची जी तपश्चर्या साबरमती आश्रमात झाली त्या तपस्येचे सामर्थ्य किती असेल की महात्मा गांधी निर्धार करून निघाले, आत्मविश्वास किती असेल की हे शरीर असेपर्यंत इंग्रजांना इथून हुसकावून लावीनच, कोणत्याही परिस्थितीत भारताला स्वतंत्र करणारच.
२०१९ मध्ये आपण पूज्य बापूंची १५० वी जयंती साजरी करू. ती किरकोळ पद्धतीने साजरी करणार का? नाही, पूज्य बापूंची १५० वी जयंती अशीतशी साजरी करण्याचा कोणत्याही भारतीयाला हक्क नाही. पूज्य बापूंची १५० वी जयंती साजरी करणे म्हणजे गांधीजी प्रमाणेच एखादा संकल्प घेऊन तो १५० व्या जयंतीपर्यंत पूर्ण करून दाखवणे आहे आणि ते प्रत्येक भारतीय करेल. अप्रतिम निश्चय शक्तीचे धनी होते गांधीजी. आमच्या मनात ती निश्चय शक्ती असावी, जी निश्चय शक्ती घेऊन निघू आणि जेव्हा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करू तेव्हा तो परिपूर्ण झालेला असला पाहिजे. साबरमती आश्रमात जेथे स्वातंत्र्य आंदोलनाचा मृत सांगाडा तयार झाला, पिंड तयार झाले तिथून पूज्य बापूंच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आम्हीही काही जबाबदारी पार पाडू शकतो. साबरमती आश्रमात त्यांच्याशी संबंधित जितके प्रसंग आहेत, त्यात कुठे ना कुठे स्वच्छतेची चर्चा संपूर्ण वर्षभर, दररोज सुरु राहत आली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ते तडजोड करत नसत. हे स्वच्छता अभियान २०१९ पर्यंत प्रत्येक भारतीयाचा स्वभाव बनला पाहिजे. आमच्या रक्तात, आमच्या मेंदूत, आमच्या विचारात, आमच्या आचारात स्वच्छतेला सर्वोच्च स्थान असले पाहिजे आणि यापेक्षा मोठी श्रद्धांजली पूज्य बापूना असू शकत नाही. स्वतः बापू म्हणत असत की स्वातंत्र्य आणि स्वच्छता यांत माझे पहिले प्राधान्य स्वच्छतेला असेल. स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्व गलिच्छपणातून मुक्त झालेला भारत हे बापूंचे स्वप्न होते. स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली आहेत, २०१९ मध्ये १५० वी जयंती साजरी करत आहोत, आम्ही त्यासाठी का प्रयत्न करू नयेत?
पूज्य बापूंना “वैष्णव जन तो तेणे कहिये” खूप आवडत असे, आताही आपण ते ऐकले. या देशाच्या प्रत्येक कोपर्यात प्रत्येक विद्यार्थ्यांला वैष्णव जन तो तेणे कहिये माहित आहे, प्रत्येक नागरिकाला माहित आहे, सर्वाना माहित आहे की हे भजन बापूना आवडत असे. त्याची शक्ती एवढी, सहजता एवढी की १०० पैकी ९० लोक वैष्णव जन तो तेणे कहिये म्हणू शकतील. भारताच्या कोणत्याही कोपर्यात जाऊन पहा, १०० पैकी ९० लोक वैष्णव जन तो तेणे कहिये म्हणतील. मग त्यांना विचार हे कोणत्या भाषेतील आहे? मी ठामपणे सांगतो की १० लोकही ते कोणत्या भाषेत आहे ते सांगू शकणार नाहीत. कारण ते इतक्या उंचीवरून आमच्या आत रुजले आहे की भाषेचा फरक नष्ट झाला आहे. वैष्णव जन आम्हाला आपला वाटतो. हीच सिद्धी असते की बाकी कोणताही फरक समोर येतच नाही, एकमेकात मिसळून जातात.
मी राजकारणात खूप उशिराने आलो आहे. हल्ली राकेश भाई जिथे काम करतात त्या धरमपूर भागात कधी मला काम करण्याचे सद्भाग्य मिळाले आहे. तरुणपणातील मोठा काळ समाजसेवा करतांनाच आदिवासींच्या मध्ये घालवण्याची मला संधी मिळाली. राजकारणात खूप उशिराने आलो आणि आलो तेव्हाही माझी गाडी या रुळावर जाईल असा कधी विचार केला नव्हता. मी संघटनेप्रती समर्पित होतो, संघटनेसाठी काम करत होतो आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करताना एक गोष्ट सांगत होतो. मी हे सांगत होतो की वैष्णव जन तो तेणे कहिये हे भजन नरसी मेहता यांनी ४०० वर्षांपूर्वी लिहिले आहे. आज जितके राजकीय नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी एक काम करावे. वैष्णव जन तो तेणे रे कहिये, पीड परांई जाने रे यातील वैष्णव जन शब्द काढून लोक प्रतिनिधी तो तेणे रे कहिय पीण परांई जाणे रे टाकावा. आपण पहा, भारताचा लोकप्रतिनिधी कसा असावा, जनसेवक, लोकनायक कसा असावा, वैष्णव जन च्या प्रत्येक ओळीत आपण स्वतःला बसवून पहा, आपण पहा की आपल्याला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज पडणार नाही. कुठे जायचे आहे तो मार्ग स्पष्ट मिळेल, कोणताही गोंधळ असणार नाही. एक एका शब्दाशी जोडून पहा, वेळेअभावी मी जास्त विस्तार करू शकत नाही, परंतु हे सामर्थ्य त्यात आहे.
बंधु-भगिनीनो, गरज पडल्यावर बापूंचे नाव घ्यायचे हे तर आम्ही कित्येक वर्षांपासून पाहत आलो आहोत आणि केव्हा बापूना विसरायचे हे चातुर्यही आम्ही ठायी ठायी पाहिले आहे. आज मी साबरमती आश्रमात आलो आहे, श्रीमद राजचंद्रजी यांची तपस्या, त्यांचे स्मरण, त्यांच्या समानुभावातून निघालेली एकेक गोष्ट त्याचे आम्ही स्मरण करत आहोत, साबरमती आश्रमाची शताब्दी साजरी करत आहोत, तेव्हा मी देशवासियांना एक गोष्ट गांभीर्याने बोलू इच्छितो. हे सांगण्यासाठी यापेक्षा पवित्र स्थान दुसरे असू शकत नाही. श्रीमद राजचंद्रजी यांची १५० वी जयंती असो, साबरमती आश्रमाची शताब्दी असो, २०१९ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्याची तयारी असो, यापेक्षा उत्तम संधी मला हा विचार व्यक्त करण्यासाठी दुसरा नाही. मी देशातील सध्याच्या वातावरणाविषयी आपले दु:ख आणि नाराजी व्यक्त करू इच्छितो. ज्या देशात मुंगीलाही खाऊ घालण्यावर विश्वास ठेवला जातो, गल्लीत हिंडणाऱ्या भटक्या कुत्र्यांनाही काही ना काही खाऊ घालण्याचा विचार होतो, ज्या देशात सकाळी उठल्यावर नदी वा तलावाच्या किनारी जाऊन माशांना खाऊ घालण्याची परंपरा आहे, ज्या देशात हे संस्कार आहेत, चरित्र आहे, ज्या देशात महात्मा गांधीसारख्या महापुरुषांनी अहिंसेचे धडे दिले त्या देशात आम्हाला काय झाले आहे की रुग्णालयातील एखादा रोगी आपण वाचवू शकत नाही? शस्त्रक्रिया अयशस्वी झाली, औषधाने काम केले नाही आणि रुग्णाचा मृत्यू झाला तर अचानक त्याचे नातेवाईक रुग्णालयाला आग लावून देतात, डॉक्टरना मारहाण करतात. हा काय माझा देश आहे? हा काय पूज्य बापूंचा देश आहे? आम्ही काय करत आहोत आणि या गोष्टींना चालना मिळत आहे? अघटीत अघटीत असते. कुठे दोन वाहनांची टक्कर झाली, दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला, कुणी जखमी झाला, ना ओळख ना पाळख, लोक एकत्र जमतात, गाड्या जाळतात. हा काय माझा देश आहे?
गायीचे रक्षण आणि गायीची भक्ती महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यापेक्षा कुणी श्रेष्ठ गोभक्त होऊ शकत नाही. गायीची भक्ती आणि तिचे रक्षण करायचे असेल तर गांधीजी आणि विनोबा भावेजी यांनी आम्हाला उत्तम मार्ग दाखवला आहे. त्याच रस्त्यावर देशाला जावे लागेल. त्यातच देशाचे कल्याण आहे. विनोबाजींनी जीवनभर गायीच्या रक्षणासाठी स्वतःला समर्पित केले. माझे सौभाग्य होते की मी एकदा वर्ध्याला विनोबाजींच्या दर्शनाला गेलो. मी त्यांना भेटलो, प्रणाम केला, बसलो. विनोबाजीकडे शब्दांचे सामर्थ्य मोठे होते. मी बसलो, ओळख झाली , मी समोर पाहत होतो. ते मला म्हणत होते, मरून जा, मरून जा. मी हैराण झालो की विनोबाजी मला मरून जा असे सांगत होते. मी तसाच गुपचूप बसून राहिलो. मग ते हळू आवाजात म्हणाले, गायीसाठी, गोमातेसाठी. आपण कल्पना करू शकतो की विनोबाजी त्या वेळच्या सरकारच्या विरोधात जीवनाच्या अंतापर्यंत लढत राहिले. गोरक्षेसाठी, गोभक्तीसाठी त्यांनी अनेकवेळा उपोषण केले. भारताची घटना आम्हाला त्याचे महात्म्य समजावून सांगते, परंतु काय कुणा माणसाला ठार मारण्याचा परवाना आम्हाला मिळतो काय? ही काय गोभक्ती आहे, गोरक्षा आहे? पूज्य बापूंचा हा मार्ग असू शकत नाही. विनोबा भावे यांचे जीवन आम्हाला हा संदेश देत नाही. आणि म्हणून साबरमती आश्रम शताब्दीला आणि पूज्य श्रीमद राजचंद्रजी यांची १५० वी जयंती साजरी करत असताना प्रत्येक भारतीयाच्या मनात ही गोष्ट ठसली पाहिजे की आमचा मुलभूत संस्कार, मुलभूत परंपरा अहिंसा आहे. आम्ही आमचा संयम कसा ढासळू देत आहोत? डॉक्टरना मारत आहोत, अपघात झाला तर चालकाला मारत आहोत. गायीच्या नावावर माणसाला मारत आहोत.
मला बालपणातील एक प्रसंग लक्षात आहे. माझ्या जीवनातील सत्य घटना आहे. प्रथमच मी आज ही सांगत आहे. एक काळ होता की मला लिहायची सवय होती, मी लिहित होतो, तेव्हा माझ्या मनात होते की त्या विषयावर लिहीन, पण मी लिहू शकलो नाही. परंतु आज मला वाटते, ही अशी पवित्र जागा आहे, ज्या पवित्र जागेत मनातील खरेपणा प्रकट होणे अत्यंत स्वाभाविक आहे. मी बालक होतो. माझ्या गावात माझे घर एका छोट्याशा गल्लीत आहे. तिथे जसे अगदी जुन्या काळातील गावे असतात, एकमेकाला लागून घरे आहेत. आमच्या घराच्या जवळच एक कुटुंब होते, ते इमारत बांधताना गवंड्याचे काम करत असे. एक प्रकारे मजुरीचे काम होते ते. त्या कुटुंबात कुणी मुलबाळ नव्हते. त्या जोडप्याच्या लग्नाला अनेक वर्षे झाली परंतु त्यांना कुणी अपत्य नव्हते. कुटुंबात अपत्य नसल्याने खूप तणाव असायचा. ते खूप धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ होते. खूप वयस्कर झाल्यावर त्यांच्या घरी एका अपत्याचा जन्म झाला. ते अपत्य मोठे होत होते. आमची गल्ली खूप अरुंद होती. सकाळी सकाळी गायीची एक शिस्त असते. ती जेव्हा घरांजवळून जाते तेव्हा घरातील लोक तिला भाकरी खाऊ घालतात. एक अशीच गाय होती जी आमच्या गल्लीत येत असे व प्रत्येक कुटुंबातील लोक बाहेर येऊन तिला भाकरी खाऊ घालायचे. ज्यांच्या घरी अपत्य झाले होते ते ही गायीला भाकरी खाऊ घालत. एकदा काही तरी अचानक गोंधळ माजला, कदाचित काही मुलांनी फटाके वाजवले असावेत, मला घटना आता पूर्ण लक्षात नाही. पण त्या वेळी गाय घाबरली आणि जोरजोरात पळू लागली, त्या कुटुंबातील मुलगा जो मुश्किलीने ३, ४ किंवा ५ वर्षांचा असेल, तो ही पळू लागला. इकडे पळू की तिकडे पळू हे त्याला समजले नाही आणि तो गायीच्या पायाखाली आला. इतक्या वर्षांनंतर त्या कुटुंबात एक मुलगा जन्माला आला होता आणि गायीच्या पायाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. आपण कल्पना करू शकता की त्या कुटुंबातील वातावरण काय असेल? अत्यंत दु:खद दिवस होते परंतु दुसर्या दिवशी सकाळचे दृश्य मी विसरू शकत नाही. दुसर्या दिवशी सकाळी ती गाय त्या घरासमोर येऊन थांबली. इतर कोणत्याही घरासमोर जाऊन तिने भाकरी खाल्ली नाही. ते कुटुंबही तिला भाकरी खाऊ घालत होते, परंतु तिने भाकरी खाल्ली नाही. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. एक दिवस, दोन दिवस नाही, पाच दिवस गाय खात नव्हती की पाणी पीत नव्हती. एकीकडे कुटुंबातील एकुलता एक मुलगा मृत्यू पावल्याने दु:ख होते. संपूर्ण गल्लीत दु:खाचे वातावरण होते. परंतु गाय पश्चात्तापात बुडालेली होती. अनेक दिवस तिने काही खाल्ले नाही, काही प्यायली नाही. तिच्या डोळ्यातील अश्रू सुकले. सार्या गल्लीतील लोक, त्या कुटुंबातील लोकांनी प्रयत्न केला परंतु गायीने आपला निश्चय सोडला नाही आणि त्या बालकाचा मृत्यू आपल्या पायाखाली झाला आहे या दु:खात तिने प्राण सोडले. एका बालकाच्या पश्चात गायीने बलीदान दिल्याचे मी बालपणी पाहिले आहे. ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. आज जेव्हा मी ऐकतो की गायीच्या नावाखाली कुणाची हत्या केली जाते, तो निर्दोष आहे की गुन्हेगार आहे, याचा निर्णय कायदा करेल, माणसाला कायदा हातात घ्यायचा हक्क नाही.
साबरमती आश्रमाची शताब्दी साजरी करत असताना गांधीजी आणि विनोबाजी यांच्या गायीप्रती समर्पित जीवनाचे उदाहरण आम्ही समोर ठेवले पाहिजे. मी देशवासियांना आग्रहाने सांगेन की हिंसा हा कोणत्याही समस्येवर तोडगा नाही. त्या डॉक्टरचा कोणताही दोष नाही जो आपल्या कुटुंबाची सेवा करत होता, परंतु आपल्या कुटुंबातील सदस्याला वाचवू शकला नाही. तरीही तुम्हाला तक्रार असेल तर कायदा आहे. अघटीत घडून जाते, एखाद्या निर्दोष व्यक्तीचा जीव जातो ते अकस्मात घडलेले असते. आणि त्यामुळे गांधीच्या या भूमीत संतुलित जीवन जगण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाची जबाबदारी आपल्या जबाबदारीशी जोडून घ्या आणि तेव्हाच आमच्या पूज्य बापूंच्या स्वप्नातील देश आपण बनवू शकतो. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, तारुण्य तुरुंगात घालवले, काहींनी काळ्या पाण्यात आयुष्य घालवले, काही फाशीच्या तख्तावर चढले, काही जीवनभर लढत राहिले त्या सर्वांचे स्वप्न हेच होते की देशाला स्वतंत्र, समृद्ध आणि गरीबातील गरिबाला सुखी पाहण्याचे. २०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, पाच वर्षे आमच्याकडे आहेत, सव्वाशे कोटी देशवासीयांनी जर निश्चय केला की २०२२ मध्ये भारताला स्वातंत्र्यवेड्यांनी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी तिथे घेऊन जायचे आहे. ज्या साबरमती आश्रमाच्या भूमीत स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले गेले, देशात पेरले गेले, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहुती स्वीकारण्यात आली, न्याय मिळवण्यासाठी लढतांना प्रत्येक प्रकारच्या अहिंसक शस्त्रांचा वापर केला गेला, सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्यात आला. २०२२ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. निश्चयाचा, कर्म करण्याचा, पाच वर्ष जीवनातील मौल्यवान वेळ प्रत्येक भारतीयाने, १२५ कोटी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकले तर भारत १२५ कोटी पावले पुढे जाईल. या स्वप्नांना घेऊन चालले पाहिजे.
श्रीमद राजचंद्रजी ज्यांनी इतकी मोठी अध्यात्मिक जाणीव, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, शेवटी जाणीव जागृत करण्याचा मार्ग दाखवला. पूज्य बापूजी ज्यांनी श्रीमद राजचंद्रजी यांचे म्हणणे जगण्यात आणून प्रयोग यशस्वी करून दाखवला, अशा दोन्ही महापुरुषांचे स्मरण करण्याच्या या प्रसंगी मला आपणा सर्वांमध्ये येण्याची संधी मिळाली, इतक्या मोठ्या संख्येने देश आणि जगातून आलेल्या लोकांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. राकेश जी यांना भेटण्याची संधी मिळाली. मी हे माझे अत्यंत सद्भाग्य मानतो, खूप खूप धन्यवाद..