तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आज रात्री कदाचित झोप येणार नाही. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, पंतप्रधान असे का बोलत आहेत? याचे कारण आहे की, सूरजकुंडमध्ये जिथे या शिबिराचे आयोजन केले आहे तिथे जवळ रेल्वे लाईन नाही आणि त्यामुळे येथे रेल्वे रुळाचा आवाज येणार नाही आणि तुमच्यापैकी अधिकांश लोकं असे असतील ज्यांना जोपर्यंत रेल्वेचा आणि रेल्वे रुळाचा आवाज येत नाही तोपर्यंत झोप येत नसेल आणि म्हणूच तुमच्या सारख्या लोकांना आराम देखील गैरसोईचा होतो.
एक वेगळा प्रयत्न आहे, माझा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे की, जर आपल्याला काहीही बदल घडवून आणायचा असेल त्यासाठी बाहेरून कितीही सूचना मिळू देत, कल्पना मिळू देत त्याचा इतका परिणाम होत नाही, जितका आपल्या आतून एक आवाज आल्यानंतर होतो. तुम्ही तुमच पूर्ण आयुष्य यामध्ये घालवलं आहे. कोणी १५ वर्ष, कोणी २० वर्ष, कोणी ३० वर्ष तुम्ही प्रत्येक वळण बघितलं आहे. वेग कधी वाढला कधी कमी झाला हे तुम्हाला माहित आहे. कोणत्या संधी आहेत हे तुम्हाला माहित आहे, आव्हानं कोणती आहेत हे तुम्हाला माहित आहेत, अडचणी काय आहेत हे ही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि म्हणूनच माझ्या मनात विचार आला की, इतकी मोठी रेल्वे त्याची इतकी मोठी ताकद, आपण कधी एकत्र येवून हा विचार केला आहे का की, सर्व जग बदलले, जगातील सर्व रेल्वे व्यवस्था बदलली आहे. मग असे काय कारण आहे की, आपण मात्र एका सीमेमध्ये बंदिस्त झालो आहोत. आपण जास्तीतजास्त गाडीचे थांबे किती वाढवावेत, डब्बे किती वाढवावेत याच्या आसपासच आपले जग फिरत आहे.
ठीक आहे, मागील शतकात या सर्व गोष्टी आवश्यक होत्या, हे शतक पूर्णतः तंत्रज्ञानाचे शतक आहे. जगात खूप प्रयोग झाले आहेत, प्रयत्न झाले आहेत, नवीन शोध लागले आहेत. भारताला ही गोष्ट आता समजायला हवी की, रेल्वे ही भारतासाठी गती आणि प्रगतीची एक खूप मोठी व्यवस्था आहे. देशाल जर गती पाहिजे तर ती पण रेल्वेपासून मिळणार आणि जर प्रगती हवी तर ती देखील रेल्वे पासूनच मिळणार. परंतु, ही जी बाब रेल्वेमध्ये आहे, ते जोवर ह्यासोबत स्वतःला ओळखत नाहीत तोपर्यंत इतके मोठे परिवर्तन शक्य नाही. जो गॅगमन आहे तो आपले काम चांगल्या प्रकारे करत असेल, जो स्टेशन मास्तर आहे तो आपले काम चांगल्या प्रकारे करत असेल, जो क्षेत्रीय व्यवस्थापक असेल तो चांगल्या प्रकारे काम करत असेल, परंतु हे तिघे विभागून चांगल्या प्रकारे काम करत असतील तर त्याचा चांगला परिणाम कधी दिसून येणार नाही आणि म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येवून हा विचार केला पाहिजे की, आपल्याला देशाला काय द्यायचे आहे. आपल्याला अशी रेल्वे चालवायची आहे का? जिथे आपल्या गॅगमनचा मुलगा देखील मोठा होऊन गॅगमनच बनेल. मला ह्यामध्ये बदल हवा आहे. आपण असे वातावरण निर्माण करूया की, आपल्या गॅगमनचा मुलगा देखील अभियंता बनून रेल्वेमध्ये त्याने योगदान का देवू नये? रेल्वेशी संबंधित गरीबातील गरीब आमचा मित्र, छोट्यात छोट्या विभागात काम करणारा आमचा माणूस, त्याचे आयुष्य कसे बदलेल? आणि हे बदल घडवून आणण्यासाठी रेल्वेची प्रगती, रेल्वेचा विकास, रेल्वेचे आर्थिक सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. तेव्हाच या सर्वाचा फायदा देशाला तेव्हा मिळेल, आपल्या देशात कमीत कमी १०, १२, १३ लाख परिवार रेल्वेशी निगडीत आहेत, यातील जी गरीब कुटुंब आहेत त्यांना याचा जेव्हा लाभ मिळेल. आज ज्या प्रकारे आपण रेल्वे चालवत आहोत, मला कधीतरी खूप काळजी वाटते की, माझ्या लाखो गरीब कुटुंबांचे काय होणार? छोटे-छोटे लोकं जे आपल्या येथे काम करतात, त्यांचे काय होणार? रेल्वेच्या प्रगतीमुळे होणारा लाभ हा सर्वात आधी रेल्वेशी निगडीत लाखो गरीब कुटुंबांना झाला पाहिजे. आपल्या समोर रोजची काम करणारी, रोजचे आयुष्य आपल्या सोबत घालवणारे, या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा रेल्वेमध्ये बदल घडवण्याचा विचार आपसूकच आपल्या मनात येईल. देशाच्या प्रगतीचा लाभ सगळ्यांना मिळेल.
तुमच्यापैकी बरेचजण मोठ्यामोठ्या चर्चासत्रांमध्ये सहभागी झाले असतील, जागितक स्तरावरील परिषदांमध्ये सहभागी झाले असतील, अनेक नवीन नवीन गोष्टी त्यांनी ऐकल्या असतील. परंतु या परिषदांवरून परत आल्यानंतर हे नवीन विचार फक्त विचारच राहून जातात. एक स्वप्न बघितल्यासारखे वाटते. पुन्हा येवून आपल्या रोजच्या कामामध्ये आपण गर्क होऊन जातो.या सामुहिक चिंतनातून, जिथे प्रत्येक स्तरातील लोकं आहेत, सगळे एकत्र राहणार आहेत, तीन दिवस एकत्र राहणार आहेत. असे क्वचितच होते कदाचित पहिल्यांदाच होत आहे. समूह चिंतनाची स्वतःची एक ताकत आहे. आणि कधी कधी एखादा छोटासा पण अनुभवी व्यक्ती एखाद्या समस्यचे असे काही तोड सांगतो की, कधी कधी मोठ्या अधिकाऱ्यांना देखील ते लक्षात येत नाही. इथे अनुभव संपन्न आणि जागतिक व्यासपीठ मिळालेले अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्ती उपस्थित आहेत. ह्या दोन्ही प्रकारातील व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा किती मोठा बदल घडवून आणू शकतात.
आम्ही कल्पना करू शकतो, तुमच्या व्यवस्थे अंतर्गत अंदाजे सव्वा दोन कोटींहून अधिक लोकांशी तुमचा संबंध येतो. लाखो टन माल एकाजागेवरून दुसऱ्या ठिकाणी जातो. परंतु, जोपर्यंत आपली गती, आपली वेळ, आपली व्यवस्था आपण बदलत नाही तोपर्यंत संपूर्ण जगात जे बदल घडून येत आहेत त्याचा लाभ आपण घेऊ शकत नाही किंवा त्यामध्ये काही योगदान देवू शकत नाही. या चिंतन शिबाराची कोणतीही निश्चित विषयसूची नाही. विषयसूची देखील तुम्हालाच तयार करायची आहे, उपाय देखील तुम्हालाच शोधायचे आहेत. जे विचार सर्वांसमोर येतील त्यानुसार पथदर्शन देखील तुम्हालाच करायचे आहे. या प्रणाली बाहेरील कोणी व्यक्ती हे काम करेल त्यापेक्षा उत्तम पद्धतीने ते तुम्ही करू शकता यावर मला विश्वास आहे.
आणि म्हणूनच ह्या सामुहिक चिंतनात खूप मोठे सामर्थ्य आहे. सहजीवनात देखील एक शक्ती आहे, तुमच्यापैकी बरेचजण असे असतील ज्यांना आपल्या साथीदाराच्या शक्तींचा परिचयच नसेल. यामध्ये तुमचा दोष नाही.आपल्या कार्याची रचनाच अशी आहे की आपण आपल्या माणसांना खूप कमी ओळखतो परंतु आपल्याला आपल्या कामाची पूर्ण माहिती असते. येथे तुम्ही एकत्र राहणार आहात त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे १२, १५, २५ लोकं काम करतात, त्यांच्यामध्ये जे अनन्यसाधारण कौशल्य आहे, या हलक्याफुलक्या वातावरणात तुम्हाला त्या सर्व बाबींची जाणीव होईल. तुम्हाला हे लक्षात येईल की, तुमच्याजवळ किती कुशल मनुष्यबळ आहे, ज्याला आपण कधी ओळखत नव्हतो एकत्र राहिल्याने त्यांच्यातल्या चांगल्या बाबी तुम्हाला कळतील.
जेव्हा तुम्ही मोकळेपणाने चर्चा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, अरे ही व्यक्ती तर तिकीट खिडकीवर बसते कधी विचारच केला नव्हता की ही इतका विचार करू शकते यांच्या जवळ इतक्या कल्पना असतील. कधी कोणी आपल्या एखाद्या अधिकाऱ्याबद्दल असा विचार करत असेल की, अरे हे तर खूप गंभीर आहेत, त्यांच्यासोबत बोलायला देखील भीती वाटते परंतु ह्या शिबिरामध्ये कळेल की अरे हे तर खूपच मिश्कील आहेत यांच्यासोबत तर आपण कधीही बोलू शकतो. ह्या भिंती कोसळतील. जेव्हा श्रेणीय भिंती कोसळून आपलेपणा आणि कौटुंबिक वातावरण तयार होईल हीच खरी कोणत्याही संघटनेची शक्ती आहे. आणि बघता बघता परिवर्तन सुरु होईल.
त्यामुळे हे एकत्र घालवलेले क्षण एका खूप मोठ्या शक्तीच्या रुपात समोर येतील. येथे ज्या विषयांची रचना केली आहे ती देखील खूप विचारांती करण्यात आली आहे. या संपूर्ण विचार प्रक्रियेमध्ये अंदाजे एक लाखांहून अधिक लोकांनी आपले योगदान दिले आहे असे मला सांगण्यात आले आहे. कोणी पेपर लिहिला आहे, कोणी छोट्या गटांमध्ये समूह चर्चा केली आहे, त्यामधून समोर आलेले निष्कर्ष पुढील टप्प्यावर पाठवले आहेत, कोणी ऑनलाईन आपली मते नोंदवली आहेत, कोणी एस एम एस च्या माध्यमाचा वापर केला आहे. परंतु जेव्हा खालच्या स्तरावरील एक लाख लोकं रेल्वेची स्तिथी काय आहे, शक्यता काय आहेत, शक्तिस्थळ काय आहेत, आव्हाने काय आहेत, स्वप्न काय आहेत, या सर्व गोष्टींचे जर सादरीकरण करतो तर ह्या सर्व विचारमंथनातून मोती शोधून काढणे हे आता तुमचे काम आहे.
एक लाख मित्रांचे योगदान आहे ही काही छोटी गोष्ट नाही, खूप मोठी बाब आहे. मी ऐकले आहे की, खूप मोठ्या प्रमाणत तुम्ही या शिबिरात उपस्थित आहात. तुम्ही अतोनात मेहनत कराल तर त्यातून उत्तमातून उत्तम मोती काढू शकाल. आणि या अमृत मंथनातून जे मोती निघतील ते रेल्वेला नवीन उंचीवर घेऊन जातील.
पहिला मी असा विचार केला होता की, आज संध्याकाळी मी तुमच्यामध्ये राहीन, तुम्हा सर्वांसोबत जेवण करेन, असही मी जास्त वेळ देणारा व्यक्ती आहे, मझ्याकडे काही जास्त काम नसते, त्यामुळे लोकांमध्ये बसतो त्यांचे ऐकून घेतो. परंतु, संसदेचे कामकाज सुरु होत असल्यामुळे मला ते शक्य नाही. पण परवा मी येणार आहे, मी ही धमकी नाही देत, मी तुम्हा सगळ्यांना भेटायला येणार आहे. जे मंथन तुम्ही करत आहात, त्या अमृताचे आचमन करायला मी येत आहे. कारण, तुम्ही आहात तर रेल्वे आहे, तुम्ही आहत तर भविष्य आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच मी तुम्हाला भेटायला येणार आहे. तुम्हाला भेटायला येत आहे, मोकळ्या वातावरणात तुम्हला भेटेन. या मंथनातून जे उपाय समोर येतील ते समजून घ्यायचा मी प्रयत्न करेन. जी आव्हाने आहेत ती समजून घ्यायचा प्रयत्न करेन. धोरणं तयार करताना या सर्व बाबींचा नक्कीच लाभ होईल.
तुम्ही पाहिले आहे, आणि तुमच्या हे लक्षात देखील आले असेल की, माझा कोणताही राजकीय हेतू नाही. तुम्ही या आधीच्या सरकारचा रेल्वे अर्थसंकल्प पहिला असेल, सामान्यपणे रेल्वे अर्थसंकल्पामध्ये काय असायचे तर, कोणत्या खासदाराला कुठे ट्रेन मिळाली, कोणत्या खासदाराला कुठे थांबा मिळाला, कोणत्या खासदारासाठी नवीन डब्बा जोडला गेला आणि संपूर्ण रेल्वे अर्थसंकल्पात या सर्वासाठी टाळ्यांचा गडगडाट व्हायचा. जेव्हा मी येवून पहिले की, इतक्या घोषणा झाल्या आहेत, त्यांचे काय झाले आहे? तेव्हा माझ्या लक्षात आले की, १५०० अशा घोषणा आहेत ज्यावर फक्त टाळ्या वाजवल्या गेल्या त्याची अंमलबजावणी झालीच नाही. हे काम तर मी ही करू शकत होतो. मी पण टाळ्या वाजवून आनंद देवू शकत होतो. वाहवा मोदींनी इतका चांगला रेल्वे अर्थसंकल्प तयार केला. मी या राजकीय लोभापासून स्वतःला दूर ठेवले आहे आणि खूप हिम्मत करून अशा लोकांना आवडणाऱ्या गोष्टी करण्या ऐवजी व्यवस्थेला प्रवाही करण्याचे धाडस केले आहे.
माझ्यामध्ये राजकीय हानी सहन करण्याची हिंमत आहे. माझं पाहिलं स्वप्न आहे की, रेल्वेमधील सर्वात खालच्या पातळीवरील जो माझा मित्र आहे, जो क्रोसिंगवर उभा राहत असेल, त्याची मुलं शिकून, मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसारखी तिथपर्यंत पोहोचू शकतात का? आणि माझे हे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा मी रेल्वेला ताकदवर बनवेन, रेल्वेला सामर्थ्यवान बनवेन. रेल्वे सामर्थ्यवान झाल्यानंतर देशाला त्याचा लाभ होईलच. आणि म्हणूनच मित्रांनो मला तात्कालिक लाभाचा, राजकीय लाभाचा बिल्कुल मोह नाही. केवळ शतक बदलले आहे, रेल्वे देखील बदलायला पाहिजे.
२१ व्या शतकानुसार आपल्याला नवीन रेल्वे, नवीन व्यवस्था, नवीन गती, नवे सामर्थ्य हे सर्व द्यायचे आहे आणि हे सर्व आपण एकत्र येवून देवू शकतो. आपल्यातील एखादी व्यक्ति आधी एखाद्या छोट्या घरात रहात असेल नंतर त्याची परिस्थिती सुधारल्यानंतर तो फ्लैट मध्ये राहायला गेला, त्यानंतर नवीन पद्धतीने कसे राहायचे आहे, कोण कुठल्या खोलीत राहणार, पाहुणे आल्यावर ते कुठे बसणार, या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि त्या सर्व गोष्टी त्यानुसार होतातही. मनुष्य बदल घडवून आणतो. पहिले एका खोलीच्या घरात राहून देखील जीवन जगत होता थोडी तडजोड करत होता. जर तुम्ही असा विचार करायला सुरुवात केलीत की, २१ वं शतक, बदललेल्या शतकानुसार स्वतःला बदलायचे आहे तर आम्ही देखील परिवर्तन घडवून आणू आणि हे शक्य आहे.
मित्रांनो तुमचं रेल्वेशी जितकं जुनं नात आहे तितकंच माझं देखील रेल्वेशी जुनं नातं आहे. माझं बालपण रेल्वेच्या रुळावर गेले आहे आणि ह्याप्रकारे मी तुमच्यातीलच एक आहे, मी पण रेल्वेवालाच आहे. लहानपणी मी रेल्वेला बारकाईने पहिले आहे. आयुष्यात काही पहिलेच नव्हते जे काही पहिले ते रेल्वेलाच पहिले. या सगळ्यासोबत माझे बालपण असे जोडले गेले आहे की, ह्या सर्व बाबी मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि ज्या गोष्टीशी लहानपणापासून संबंध आला आहे त्यामध्ये जेव्हा बदल करण्याची वेळ येते तेव्हा आनंद वाटतो, याची तुम्ही कल्पना करू शकता. रेल्वेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे जेवढा आनंद तुम्हाला होईल मला देखील तेव्हाच होईल. कारण मी देखील त्याच वातावरणात मोठा झालो आहे. आजही जेव्हा मी माझ्या लोकसभा मतदारसंघात, काशी येथे जातो तेव्हा मी रात्री रेल्वेच्या व्यवस्थेमध्ये राहायला जातो. मला तिथे आपलेपणा वाटतो. नाहीतर पंतप्रधानांसाठी दुसरीकडे कुठेही व्यवस्था होऊ शकते. परंतु मी रेल्वेच्या गेस्ट हाउस मध्येच जाऊन राहतो. मला तिथे खूप आपलेपणा वाटतो.
म्हणजे माझे इतके जवळचे नाते आहे तुमच्यासोबत. आणि म्हणूनच काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशाने या तीन दिवसांचा आपण सर्वाधिक लाभ करून घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे.
देशाचा विकास करण्यासाठी, देशाला गती देण्यासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी तुमच्यापेक्षा मोठी संघटना नाही, व्यवस्था नाही. एकीकडे भारतातील सर्व व्यवस्था आणि दुसरीकडे तुमची व्यवस्था. तुम्ही काय नाही करू शकत? आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की, वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, काही करण्याचे लक्ष्य निर्धारित केले पाहिजे, आणि भविष्याचा विचा करा. खूप त्रास सहन करावा लागला असेल, समस्यांना सामोरे जावे लागले असेल, अन्याय झाला असेल, जिथे बदली हवी होती तिथे झाली नसेल, पदोन्नती मिळाली नसेल. अशा खूप गोष्टी असतील. तक्रारींची कमतरता नसेल. परंतु या तीन दिवसांमध्ये, सव्वाशे कोटी देशवासीयांसाठी, बदललेल्या जगात भारताचा झेंडा रोवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, उत्तम परिणामांच्या अपेक्षेसह खूप खूप धन्यवाद.