तुम्हा सर्वाना अनिवासी भारतीय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अनिवासी दिवसाच्या या परंपरेत आज पहिल्यांदाच ‘अनिवासी खासदार संमेलनाचा’ एक नवा अध्याय सुरु होतो आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया पैसिफिक क्षेत्र अशा सगळ्या भागातून आज या संम्मेलनासाठी आलेल्या अनिवासी मित्रांचे मी हार्दिक स्वागत करतो.
भारतात तुमचे स्वागत आहे! तुमच्या या घरात तुमचे खूप खूप स्वागत !
तुमची जुनी पिढी, पूर्वजांच्या जुन्या आठवणी, भारताच्या विविध भागांशी जोडलेल्या आहेत. तुमच्या पूर्वजांपैकी काही लोक व्यापारासाठी तर काही लोक शिक्षणासाठी परदेशात गेले होते. काही जणांना बळजबरीने तर काही जणांना भूलथापा मारून इथून परदेशात नेले गेले. ते शरीराने भलेही भारतापासून दूर गेले असले तरी, आपले मन, आपल्या आत्म्याचा एक अंश ते याच मातीत ठेवून गेले होते. म्हणूनच आज जेव्हा तुम्हा भारतातल्या कोणत्याही विमानतळावर पाउल ठेवता, तेव्हा तुम्हाला या भूमीवर बघून आत्म्याचा तो अंश आजही प्रफुल्लीत होतो.
अशा क्षणी तुमचा कंठ दाटून येतो. काही भावना डोळ्यांवाटे वाहू लागतात. तुम्ही त्या भावनांना आवर घालण्याचा खूप प्रयत्न करता, पण त्या आवरू शकत नाही. तुमच्या डोळ्यात पाणी असतं, आणि त्याचं वेळी भारतात आल्यामुळे एक वेगळी चमकही असते. तुमच्या मनातली ही भावना मी समजू शकतो. ते प्रेम, तो स्नेह, इथली माती, इथल्या हवेतला गंध, या सगळ्याचे अस्तित्व ज्या अंशामुळे जाणवते. त्या अंशाला मी वंदन करतो. आज तुम्हाला इथे बघून तुमच्या पूर्वजांना किती आनंद होत असेल, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. ते जिथे कुठे असतील, तुम्हा सर्वांना भारतात बघून आनंदी झाले असतील.
मित्रांनो,
शेकडो वर्षांच्या या कालखंडात भारतातून जे लोक परदेशात गेले, त्यांच्या मनातून भारत कधीच बाहेर निघू शकला नाही. जगाच्या ज्या भूभागात ते गेले, त्यांनी भारताची सभ्यता आणि मूल्यांना जिवंत ठेवले. पण त्यासोबत, भारतीय वंशाचे नागरिक जिथे गेले, त्या भूमीचा भाग बनून राहिले, त्या भागाला आपले घर बनवून राहिले, याचे काही नवल वाटायला नको. त्यांनी एकीकडे स्वतःमधले भारतीयत्व जागे ठेवले तर दुसऱ्या बाजूला, तिथली भाषा तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी, संस्कृती, वेशभूषा या सगळ्यात सहज मिसळून गेले.
क्रीडा, कला, चित्रपट अशा क्षेत्रात भारतीय वंशाच्या लोकांनी जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहेच. राजकारणाविषयी बोलायचे तर, आपण बघतोच आहे, आज भारतीय वंशाच्या लोकांची एक जागतिक लघु संसद इथे भरली आहे. भारतीय वंशाचे लोक आज मौरीशस,आयर्लंड आणि पोर्तुगाल इथले पंतप्रधान झाले आहेत. याआधीही भारतीय वंशाचे लोक अनेक देशांचे राज्यांचे प्रमुख बनले होते. आपल्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे गयानाचे माजी राष्ट्रपती श्री भरत जगदेव आज आपल्या या संमेलनात उपस्थित आहेत. आपण सर्वजण आपापल्या देशात महत्वाची राजकीय जबाबदारी आणि भूमिका पार पाडता आहात.
मित्रांनो,
तुमच्या पूर्वजांची मातृभूमी भारताविषयी तुम्हाला अभिमान वाटतो. तुमची परदेशातील कामगिरी आणि तुमचे यश, याचा आम्हाला अभिमान आहे, आमच्यासाठी ती सन्मानाची गोष्ट आहे. तुम्ही कुठलं पद सांभाळणार आहात याची बातमी प्रसारमाध्यमात येते. किंवा तुम्ही जेव्हा कधी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता, तेव्हा त्या वृत्ताची भारतीय लोक जास्त प्रमाणात दखल घेतात. वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांवरून अशा बातम्या जास्त बघितल्या जातात. तुम्ही जिथे आहात तिथल्या भू- राजकीय परिस्थितीवर तुमचा कसा प्रभाव पडतो आहे, त्या देशांची धोरणे तयार करत आहात, अशा बातम्या भारतातले लोक मोठ्या आवडीने वाचतात. ही चर्चा पण करतात की बघा आपला माणूस तिथे एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला. आम्हाला हा आनंद मिळवून देण्यासाठी, देशाचा आणि आमचाही गौरव वाढवण्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन !!
बंधू-भगिनींनो,
तुम्ही सगळे गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या देशात राहता आहात.तुम्ही अनुभव घेतला असेल, की गेल्या तीन चार वर्षात विविध देशांचा भारताविषयीचा दृष्टीकोन बदलला आहे.भारताकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, त्याचे मुख्य कारण हे आहे, की भारत स्वतःच बदलतो आहे. भारतात आमूलाग्र बदल होत आहेत. हा बदल केवळ आर्थिक सामाजिक स्तरावर नाही तर वैचारिक स्तरावरही होतो आहे. आधी जसे होते, तसेच चालू राहील, काही बदल होणार नाही, या देशाचे काहीच होऊ शकत नाही’ हा विचार मागे ठेवून भारत आता खूप पुढे निघाला आहे. भारताच्या लोकांच्या आशा- आकांक्षा सध्या अत्युच्च शिखरावर पोचल्या आहेत. व्यवस्थेत होणाऱ्या या आमूलाग्र परिवर्तनाचे, कायमस्वरूपी बदलाचे पडसाद आपल्याला प्रत्येक क्षेत्रात जाणवतील.
- याचाच परिणाम म्हणून वर्ष २०१६-२०१७ मध्ये भारतात ६० अब्ज डॉलर्सची अभूतपूर्व अशी थेट परदेशी गुंतवणूक झाली.
- देशातील उद्योगस्नेही वातावरणाच्या जागतिक क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली. गेल्या तीन वर्षात या क्रमवारीत भारत ४२ अंकांनी वर गेला आहे.
- गेल्या दोन वर्षात जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारत ३२ अंकांनी वर गेला आहे.
- जागतिक स्तरावर नवनवीन संशोधन करण्याच्या निर्देशाकातही भारत २१ अंकांनी वर गेला आहे.
- लॉजिस्टीक परफॉरमन्स म्हणजेच प्रत्यक्ष कार्याविषयीच्या निर्देशांकातही १९ अंकांनी सुधारणा झाली आहे.
- आज जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. मुडीज या जागतिक दर्जाच्या वित्तीय संस्था भारताकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघत आहेत.
- बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक, खनिज उद्योग, सोफ्टवेअर इलेक्ट्रीकल उपकरणे अशा सर्व क्षेत्रात आतापर्यत निश्चित झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी अर्ध्यापेक्षा जास्त गुंतवणूक केवळ गेल्या तीन वर्षातच झाल्या आहे.
हे सगळे यासाठी शक्य झाले कारण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही दूरगामी परिणाम घडवणाऱ्या धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. “रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म” म्हणजेच सुधारणेकडून आमूलाग्र परिवर्तनाकडे हे आमचे मार्गदर्शक तत्व आहे. देशातली सर्व व्यवस्था जबाबदार, पारदर्शक बनवणे आणि भ्रष्टाचार मुळापासून संपवणे हा आमचा उद्देश आहे.
मित्रांनो,
वस्तू आणि सेवा कर, जी एस टीच्या माध्यमातून आम्ही देशातल्या शेकडो अप्रत्यक्ष करांचा गुंता संपवला आहे. एका अर्थाने देशाचे आर्थिक एकीकरण केले आहे. खनिज उद्योग, खते, वस्त्रोद्योग, नागरी हवाई सेवा, आरोग्य, संरक्षण, बांधकाम व्यवसाय, रियल इस्टेट, अन्नप्रक्रिया… असे एकही क्षेत्र नाही ज्यात आम्ही सुधारणा आणल्या नाहीत.
मित्रांनो,
भारत आज जगातला सर्वात युवा देश आहे. या युवकांची स्वत:ची अपरिमित स्वप्ने आहेत, आशा- आकांक्षा आहेत. त्यांनी आपली ही युवा शक्ती, उर्जा योग्य क्षेत्रात खर्च करावी, स्वतःच्या भरवशावर रोजगार निर्माण करावा, या दृष्टीने सरकार सातत्याने काम करत आहे. स्कील इंडीया अभियान, स्टार्ट अप योजना, स्टैंड अप योजना, मुद्रा योजना याच दृष्टीने सुरु करण्यात आल्या आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी सुमारे १० लाख रुपयांपर्यतचे कर्ज दिले जाते. अनेक लोकांना ४ कोटी रुपयांपर्यतचे कर्ज तारण हमीशिवाय दिले गेले आहे. केवळ या एका योजनेमुळे देशाला ३ कोटी नवे स्वयंउद्योजक दिले आहेत. २१ व्या शतकाच्या गरजा ध्यानात घेऊन, सरकार पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था यात सुधारणा करण्यावर भर देत आहे. आमच्या धोरणातही भविष्यात भारताला काय पायाभूत सुविधा आवश्यक ठरतील यावर भर दिलेला आहे. जसे रेल्वे, महामार्ग, जलमार्ग, बंदरे विकसित केली जत आहेत. या सगळ्या वाहतूक साधनांच्या एकमेकांच्या समन्वयातून उद्योजकांना मालवाहतूक करणे सोपे जाईल, यावर सरकारचा भर आहे.
मित्रांनो,
आज भारतात दुप्पट वेगाने रेल्वेमार्गाचे काम सुरु आहे. दुप्पट वेगाने रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणहि होते आहे. तसेच दुप्पट वेगाने राष्ट्रीय महामार्ग बांधले जात आहेत. अक्षय उर्जेची दुपटीपेक्षा अधिक क्षमता असलेले विद्युतग्रीड एकमेकांशी जोडले जात आहेत.
जहाजबांधणी उद्योगात पूर्वी मालवाहतूकीचा विकास नकारात्मक होता, आता आमच्या सरकारने त्यात ११ टक्क्यांपर्यत वाढ केली आहे. या सगळ्या प्रयत्नांमुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिक स्तरावर लघु उद्योजकांना नवनवी कामे मिळताहेत. जसे उज्ज्वला योजनेविषयी सांगायचे तर ही योजना केवळ गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी पुरवठा करण्यापर्यंतच मर्यादित नाही. या योजनेमुळे आतापर्यत ३ कोटींपेक्षा अधिक महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. राज्यांना केरोसिनमुक्त होण्यात मदत मिळाली आहे. पण त्या पलीकडे या योजनेचा आणखी एक फायदा आहे. उज्ज्वला योजना लागू झाल्यानंतर देशात स्वयंपाकाच्या गॅसचे अनेक वितरक तयार झाले आहेत. घराघरात सिलेंडर पोचवणाऱ्याची संख्या वाढली आहे. म्हणजेच सामाजिक सुधारणेसह आर्थिक सशक्तीकरण पण होते आहे.
बंधू भगिनीनो,
वसुधैव कुटुंबकम या परंपरेवर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या संस्कृतीने जगाला खूप काही दिले आहे. मी जेव्हा पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघात गेलो होतो, तेव्हा मी जगासमोर आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला होता. तुम्हा सर्वाना माहीतच असेल की ७५ पेक्षाही कमी दिवसांच्या काळात हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर झाला. एवढच नाही तर, १७७ अशा विक्रमी संख्येच्या देशांनी ह्या योगदिनाला सहप्रायोजकत्वही दिलं. आजही संपूर्ण जगातले कोट्यवधी लोक २१ जूनला ज्या उत्साहाने योग दिवस साजरा करतात, ती आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सर्वसमावेशक जीवनपद्धती ही भारताच्या समृद्ध परंपरेने जगाला दिलेली देणगी आहे.
मित्रांनो,
हवामान बदलाविषयी पॅरीस करारासंदर्भात चर्चेसाठी मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटलो, त्यावेळी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता हे प्रत्यक्षात अवतरले आहे. या माध्यमातून आम्ही विपुल सौर उर्जा असलेल्या देशांसोबत सौर तंत्रज्ञान विकसित करणे आणि आर्थिक पाठबळासाठी एक जागतिक मंच बनवतो आहोत.
निसर्गाचा समतोल राखून मार्गक्रमण करण्याची प्राचीन जीवनशैली ही देखील भारताचीच देणगी आहे.
बंधू भगिनीनो ,
नेपाळमध्ये जेव्हा भूकंप आला होता, किंवा श्रीलंकेत पूर आला होता, अथवा मालदीव मध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले, अशा सर्व संकटात भारताने या राष्ट्रांना सर्वात आधी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
जेव्हा यमन देशात यादवीचे संकट आले तेव्हा आम्ही आमच्या चार हजार नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणले, पण त्यासोबतच आम्ही इतर ४८ देशांच्या नागरीकांचीही सुटका केली होती.
कठीण परिस्थितीतही मानवी मूल्यांचे संरक्षण करणे हा विचार आणि पध्दत आपल्या “वसुधैव कुटुंबकम्” परंपरेचा भाग आहे.
मित्रांनो,
२०१८ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्षे पूर्ण होतील. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दीड लाखांहून अधिक भारतीय सैनिकांचा बळी गेला होता. आणि खरं तर त्या युद्धांशी भारताचा काहीही थेट संबंध नव्हता. दोन्ही महायुद्धात भारताला एक इंचही भूमी मिळवण्यात रस नव्हता. तरीही भारतीय सैनिक लढले, जगाला मान्य करावेच लागेल, की भारताने हे किती मोठे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा कायम राहिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सैन्यदलात भारताचे मोठे योगदान आहे. मानवी मूल्यांसाठी तसेच शांततेसाठी बलिदान देण्याचा विचार ही देखील भारताची जगाला दिलेली देणगी आहे.
ही नि:स्वार्थ भावना, त्याग आणि सेवाभाव हीच भारतीयांची ओळख आहे.
या मानवी मूल्यांमुळेच भारताला जगभरात मान्यता मिळालेली आहे. आणि भारतासोबतच भारतीय वंशाच्या लोकांना, समाजालाही जगाने विशेष स्थान दिले आहे.
मित्रांनो,
मी जेव्हाही कोणत्या देशाचा दौरा करतो, तेव्हा त्या देशातल्या भारतीय वंशाच्या लोकांना भेटण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो. याचा दौऱ्यादरम्यान तुमच्यापैकी अनेक लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली. माझ्या या प्रयत्नामुळेच मी आज ठामपणे सांगू शकतो की जगाशी भारताचे उत्तम संबंध कायम ठेवण्यात जर कोणी स्थायी राजदूत असतील तर ते भारतीय वंशाचे लोक आहेत. अनिवासी भारतीयांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय शोधणे याचा आम्ही निरंतर प्रयत्न करत असतो.
पूर्वी अनिवासी भारतीयांसाठी एक वेगळे मंत्रालय असायचे, मात्र अनिवासी भारतीयांकडून आम्हाला कळले की परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्यात काही त्रुटी राहून जातात. या सूचनेवर विचार करून आम्ही दोन्ही मंत्रालयांना एक केले. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी पीआयओ आणि ओसीआय या दोन वेगवेगळ्या योजना होत्या. अनेक लोकांना या दोन योजनांमधला फरकही कळत नसे. आम्ही या कार्डांची प्रक्रिया सुलभ केली आणि दोन्ही कार्ड योजना विलीन केल्या.
आमच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमाजी, फक्त भारतीय नागरिकच नाही तर अनिवासी भारतीयांना येणाऱ्या समस्यांवरही सतत नजर ठेवून असतात. दिवसाचे २४ तास त्या या समस्या निवारणासाठी सक्रीय असल्याचे तुम्हाला आढळेल. त्यांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र मंत्रालयाने वाणिज्यदूत तक्रारींचा त्याचं वेळी निपटारा करण्यासाठी ‘मदद’ पोर्टल सुरु केले आहे. आता दर दोन वर्षानी अनिवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जाते. त्याशिवाय प्रादेशिक स्तरावरही अनिवासी भारतीय दिवस साजरे केले जातात. अलीकडेच सिंगापूर इथे झालेल्या अशाच एका संमेलनात सुषमा स्वराज सहभागी झाल्या होत्या.
बंधू भगिनीनो,
आज आपण सगळे जण ज्या इमारतीत जमलो आहोत ती इमारत २ आक्टोबर २०१६ रोजी सगळ्या अनिवासी भारतीयांना समर्पित करण्यात आली होती. अगदी कमी काळात हे केंद्र अनिवासी भारतीयांसाठी एक महत्वाचे केंद्र ठरले आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. इथे, या भवनात महात्मा गांधींच्या जीवनकार्याशी निगडीत प्रदर्शन सुरु करण्यात आले आहे, तुम्ही सर्वानी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी माझी आग्रही विनंती आहे. अनिवासी भारतीयांना भारताविषयी वाटणारी आत्मियता आम्हाला ‘भारत को जानीये’ या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादातून जाणवली. या स्पर्धेला खूप भव्य प्रतिसाद मिळाला, सुमारे शंभर देशातील ५७०० पेक्षा अधिका अनिवासी भारतीयांनी यात भाग घेतला. भारताविषयी त्यांचा उत्साह त्यांच्या इच्छा आकांक्षा आमच्यासाठी फार उत्साहवर्धक ठरली. या प्रतिसादापासून प्रेरणा घेत यावर्षी आम्ही यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा आयोजित करतो आहोत.
मित्रांनो,
आपापल्या कर्मभूमीत तुम्ही करत असलेल्या प्रगतीमुळे , त्या देशाला तुम्ही दिलेल्या योगदानामुळे, भारताचेही नाव उंचावते. आणि भारताच्या प्रगतीमुळे अनिवासी भारतीय समाजाची परदेशात प्रतिष्ठा वाढते. भारताच्या विकासासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नात अनिवासी भारतीयही भागीदार आहेत असे आम्ही मानतो. नीती आयोगाने भारताच्या विकासासाठी २०२० चे उद्दिष्ट निश्चित करत जो अजेंडा ठरवला आहे त्यात अनिवासी भारतीय नागरीकाना विशेष स्थान दिले आहे.
बंधू- भगिनीनो,
भारताच्या विकास यात्रेत आपला सहभाग देणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर अनेक मार्ग आहेत. अनिवासी नागरिकांकडून आज सर्वाधिक पैसा भारतात येतो.
भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणाऱ्या अनिवासी भारतीयांचे मी विशेष आभार मानतो. भारतात गुंतवणूक करणे हा अर्थव्यवस्थेशी संबंधित एक महत्वाचा मार्ग आहे. आज जगभरात थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारतात सर्वाधिक सोपी आणि आकर्षक व्यवस्था आहे. मात्र या व्यवस्थेविषयी परदेशात जागरूकता निर्माण करण्याचे आणि पर्यायाने गुंतवणूक वाढवण्याचे महत्वाचे काम अनिवासी भारतीय करत आहेत. तुमच्या समाजात तुमचे आज महत्वाचे स्थान आहे, याचा उपयोग करून आपण भारतासाठी परिवर्तनाचे साधन म्हणून भूमिका बजावू शकता. तसेच, याच संदर्भात, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वंशाचे नागरिक काम करू शकतात.
मित्रांनो,
आज जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नेते आपले अनिवासी भारतीय आहेत.भारतीय अर्थव्यवस्थेची त्यांना उत्तम जाण आहे. म्हणूनच, भारताच्या विकास यात्रेत त्यांनी दाखवलेल्या विश्वासासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. आज परदेशात असलेला भारतीय नागरिक स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणारा घटक समजतो. देशात आज सुरु असलेल्या सुधारणांचा भाग होण्याची त्याची इच्छा आहे.
जागतिक पटलावर भारताचे स्थान अधिकाधिक उंच व्हावे असे त्याला वाटते. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनात तुमचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तुमच्या या अनुभवाचा देशाला लाभ मिळावा, यासाठी आम्ही ‘वज्र’ म्हणजेच ‘जवळपास सुरु असलेल्या संयुक्त संशोधन सुविधेला भेट द्या’ (VAJRA) ही योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत आपण भारतातल्या कोणत्याही संस्थेत एक ते तीन महिने काम करू शकता. आज या व्यासपीठावरून मी तुम्हा सर्वाना आवाहन करतो, की या योजनेशी संलग्न व्हा, तुमच्या ज्ञानाचा भारतीयाना लाभ होऊ द्या. देशातल्या युवकांना त्याचा लाभ मिळाला तर तुम्हालाही विशेष आनंद मिळेल. भारताच्या गरजा, त्याची बलस्थानं आणि वैशिष्ट्ये जगापर्यत पोचवण्याची क्षमता जितकी तुमची आहे, तितकी कदाचितच इतर कोणाची असेल.
जगाच्या आजच्या अस्थिर वातावरणात भारतीय सभ्यता आणि संस्कृतीची मूल्ये संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरू शकतात. जगात आज आरोग्याच्या काळजीविषयी एक चिंतेचे वातावरण आहे. अशावेळी तुम्ही जगाला प्राचीन भारतीय संस्कृतीमधील सर्वसमावेषक जीवनशैलीविषयी सांगू शकता. आज सगळे जग वेगवगेळ्या स्तरात आणि विचारसरणीमध्ये विभागून जात आहे, अशा स्थितीत सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या, ‘सबका साथ सबका विकास’ या भारतीय परंपरेविषयी तुम्ही सांगू शकता. आणि जगभरात कट्टरतावाद आणि धार्मिक तेढ वाढत असतांना, तुम्ही भारताच्या ‘सर्वपंथसमभाव’ या तत्वज्ञानाची ओळख जगाला करून देऊ शकता.
मित्रांनो,
तुम्हा सगळ्यांना कल्पना असेलच की २०१९ मध्ये प्रयाग- अलाहाबाद येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. आपल्या कुंभमेळ्याला युनेस्कोच्या “मानवी संस्कृतीतील अनाकलनीय गूढ परंपरा” या यादीत स्थान मिळाले आहे, हे आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे. उत्तरप्रदेश सरकारने या कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जेव्हा पुढच्या वर्षी तुम्ही भारतात याल तेव्हा प्रयाग दर्शनाच्या तयारीनेच या. एवढेच नाही तर तुमच्या देशातील नागरिकांनाही तुम्ही या मेळ्याच्या भव्य आयोजनाविषयी माहिती द्या. त्यांनाही भारतीय संकृतीची ओळख होईल.
बंधू-भगिनीनो,
जगापुढे आज अनेक गंभीर समस्या आहेत, ज्यांचा सामना करण्यासाठी गांधीजींचे विचार आजही उपयुक्त ठरतात. अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने वाटचाल केली तर कोणताही प्रश्न सुटू शकतो. कट्टरतावाद आणि अतिवादापासून जगाला बाहेर काढायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे महात्मा गांधी यांची विचारसरणी! भारतीय मूल्यांची विचारसरणी !
मित्रांनो,
एक विकसित भारत निर्माण करण्यासाठी, नव्या भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत, एकत्रित प्रगती करू इच्छितो. या संमेलनादरम्यान तुमच्या विचारांचा लाभ, मार्गदर्शन आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. न्यू इंडीयाच्या विकासाविषयी आम्हाला तुम्हाला काही सांगायचे आहे. तुमच्यासोबत काम करायचे आहे. तुम्ही जिथे असाल, ज्या देशात राहत असाल, तिथेच नव्या भारताच्या निर्मितीसाठी तुमचे सहकार्य घेण्याचा आमचा मानस आहे.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकाला आशियाचे शतक म्हटले जाते. या शतकाच्या उभारणीत भारताची निश्चितच महत्वाची भूमिका आहे. या भूमिकेचा, भारताच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला जाणवेल. भारताची वाढणारी ताकद, विकसित अर्थव्यवस्था बघून जेव्हा परदेशात तुमची मान उंचावेल, तेव्हा ते बघून आमची, आणखी काम करण्याची उमेद वाढेल.
बंधू भगिनीनो ,
जागतिक व्यासपीठावर भारताने कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही कोणत्याही देशांशी नफ्या-तोट्याचे हिशेब मनात ठेवून वागलो नाहीत, तर त्याला नेहमीच मानवी दृष्टीकोनातून बघितले आहे.
इतर देशांना विकासासाठी निधी देण्याची आमची पध्दत देखील ‘व्यवहार’ स्वरूपाची नाही. तर आम्ही नेहमीच त्या देशांचे प्राधान्यक्रम आणि त्यांच्या गरजा याला महत्व दिले. आम्ही कधीही कोणाचेही नैसर्गिक स्त्रोत किंवा भूभाग बळकावण्याची इच्छा केली नाही. आमचा पूर्ण भर कायम क्षमता बांधणी आणि मनुष्यबळ विकासासावर होता आणि असेल. द्विपक्षीय, बहुपक्षीय चर्चा, संमेलने, बहरत-आफ्रिका शिक्र परिषद असो किंवा मग इतर काही, प्रत्येक जागतिक मंचावर आम्ही सर्वाना एकत्रित घेऊन वाटचाल करण्याचीच भूमिका मांडली आहे, तसा प्रयत्न केला आहे.
आशियाना देशांशी असलेले संबंध अधिक मजबूत करत आम्ही ती संघटनाही अधिक मजबूत बनवली आहे. भारत आणि आशियान देशांचे संबंध आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याविषयीचे चित्र आपल्याला येणाऱ्या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमातच बघायला मिळेल.
मित्रांनो,
सगळ्या जगात सुख शांतता, समृद्धी नांदावी, लोकशाही मूल्ये, सर्वसमावेशकता, सहकार्य आणि बंधुभाव याचे भारताने नेहमीच समर्थन केले आहे. हे तेच सूत्र आहे, जी आपल्याला आपल्या मतदारांशी जोडते. जगात शांतता, समृद्धी नांदावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, आम्ही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
मित्रांनो,
आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून, तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपण सगळे इथे आलात, यासाठी मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मला विश्वास आहे, की तुमच्या सक्रीय सहभागामुळे हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल. पुढच्या वर्षीच्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनात तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्याचा योग येईल अशी मी आशा करतो,
खूप खूप धन्यवाद ! जय हिंद !