वाहे गुरू जी का खालसा,

वाहे गुरू जी की फतेह।

मित्रांनो,

आज या पवित्र भूमीवर येऊन मी धन्य झालो आहे. माझं सौभाग्य आहे, की आज मी देशाला कर्तारपूर कॉरिडॉर समर्पित करतो आहे.तुम्हाला कारसेवेच्या वेळी जशी अनुभूती येते तशीच अनुभूती मलाआज इथे येत आहे. आज मी तुम्हाला सर्वांना, संपूर्ण देशाला, जगभरात राहणाऱ्या शिख बंधू-भगिनींना मी आज खूप खूप शुभेच्छा देतो.

आज शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापक समितीने मला ‘कौमी सेवा पुरस्कार’ देखील दिला. हा पुरस्कार, सन्मान आणि गौरव म्हणजे आपल्या महान संत परंपरेच्या तेज, त्याग आणि तपस्येचा प्रसाद आहे. हा पुरस्कार आणि सन्मान मी गुरू नानक देव जी यांच्या चरणांशी समर्पित करतो आहे.

आज या पवित्र भूमीवरुन गुरु नानक साहेबांच्या चरणांशी आणि गुरू ग्रंथ साहेब यांच्यासमोर मी नम्रतापूर्वक हीच प्रार्थना करतो की माझ्यातला सेवाभाव असाच दिवसेंदिवस वाढत राहो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहो.

मित्रांनो, गुरू नानक देवजी 550 व्या प्रकाश उत्सवाच्या आधी एकात्मिक तपासणी नाका-कर्तारपूर साहिब कोरिडॉरचे उद्‌घाटन समारंभ आपल्या सगळ्यांसाठी दुहेरी आनंद घेऊन आला आहे. या कार्तिक पौर्णिमेला येणारी देव-दिवाळी अधिकच उजळून निघत आपल्या सर्वांना आशीर्वाद देणार आहे.

बंधू-भगिनींनो, हा कॉरिडॉर तयार झाल्यानंतर आता गुरुद्वारा साहेबचे दर्शन घेणं सोपं होणार आहे. मी पंजाब सरकार, शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती चे आणि हा कॉरिडॉर निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे मी खूप खूप आभार मानतो.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नियाझीचेही मी आभार मानतो. त्यांनी कर्तारपूर कॉरिडॉरच्या संदर्भात भारताची भावना समजून घेत, त्यांचा सन्मान करत त्या भावनेच्या अनुकूल काम केलं आहे. मी पाकिस्तानच्या श्रमिक सहकाऱ्यांचेही आभार मानतो.त्यांनी अत्यंत वेगाने आपल्याकडच्या भागातील कॉरिडॉर पूर्ण केला.

मित्रांनो,

गुरू नानक देवजी केवळ शिख धर्माचा किंवा भारताचा वारसा नाही तर संपूर्ण मानवतेसाठी तो प्रेरणेचा स्रोत आहे. गुरू नानक देव केवळ एक गुरू नाही तर एक विचार आहेत, जीवनाचा आधार आहेत. आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमची मूल्ये, आपले संगोपन, आपले विचार, आपली तर्कबुद्धी, आपली वाणी हे सगळे गुरू नानक देवजी यांच्यासारख्या पुण्यात्मानी घडवलेले आहे. जेव्हा गुरू नानक देव इथल्या सुलतानपूर लोधी येथून यात्रेसाठी निघाले होते, तेव्हा कोणाला माहिती होतं की आता युग बदलणार आहे. त्यांच्या त्या ‘उदासीयां’ त्यांच्या यात्रा, संपर्क-संवाद आणि समन्वय यातून झालेला सामाजिक परिवर्तन एक आदर्श उदाहरण आहे.

खुद्द गुरू नानक देवजी यांनी आपल्या यात्रांच्या उद्देशाविषयी सांगितलं आहे-

बाबे आखिआ, नाथ जी, सचु चंद्रमा कूडु अंधारा !!

कूडु अमावसि बरतिआ, हउं भालण चढिया संसारा

मित्रांनो जेव्हा आपल्या देशावर, आपल्या समाजावर अन्याय, अधर्म आणि अत्याचारांचे काळे ढग जमा झाले होते, अमावस्येचा काळ होता तो, त्यातून बाहेर पडण्यासाठी गुरू नानक देव निघाले होते. गुलामीच्या त्या कठीण काळात भारताची चेतना वाचवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते.

मित्रांनो,

एकीकडे गुरू नानक देवजी यांनी सामाजिक दर्शनाच्या माध्यमातून समाजाला एकोपा, बंधुभाव आणि सौहार्दाचा मार्ग दाखवला. तर दुसरीकडे, त्यांनी समाजाला एक अशी आर्थिक व्यवस्था दिली जी सत्य, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान यावर आधारलेली आहे. त्यांनी शिकवण दिली होती की सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने केलेल्या विकासातून कायमच प्रगती आणि समृद्धीचे मार्ग मोकळे होतात. पैसा-संपत्ती तर जात येत राहील, मात्र आपल्या मूल्यांप्रती एकनिष्ठ राहून काम केले तर जी समृद्धी येते ते शाश्वत वैभव असते.

बंधू आणि भगिनींनो, कर्तारपूर फक्त गुरु नानक देव यांची कर्मभूमी नाही. कर्तारपूरच्या कणाकणात गुरु नानक देव जी यांचाच घाम मिसळला आहे. तिथल्या हवेत त्यांची वाणी मिसळून गेली आहे. कर्तारपूरच्या भूमीवरच नांगर चालवून त्यांनी आपला पहिला नियम “किरत करो” चे उदाहरण स्वतः सिद्ध केले. याच भूमीवर त्यांनी “नाम जपो” चा विधी समजावून सांगितला. आणि इथेच त्यांनी आपल्या मेहनतीने पीक घेऊन काढलेल धान्य मिळून-मिसळून खाण्याची “पद्धत” देखील सुरु केली.- “वंड छ्को” चा मंत्रही दिला.

मित्रांनो,

या पवित्र स्थळासाठी आपण जे काही करू शकू, ते कमीच असेल. हा कॉरिडॉर आणि एकात्मिक तपासणी नाका दररोज हजारो भाविकांना सेवा देत राहणार आहे. त्यांना गुरुद्वारा दरबार साहिबच्या जवळ घेऊन जाणार आहे. असं म्हणतात, कि शब्द नेहमी उर्जेच्या स्वरूपात वातावरणात अस्तित्वात असतात. कर्तारपूर येथे मिळणारी गुरुवाणी ची उर्जा फक्त आमच्या शीख बंधू-भगिनींनाच नाही तर प्रत्येक भारतीयाला आपला आशीर्वाद देणार आहे.

मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच की गुरु नानक देव जी यांचे दोन अत्यंत जवळचे शिष्य होते. –भाई लालो आणि माही मर्दाना. या दोन गुणवंत शिष्यांची निवड करुन नानक देव जी यांनी आपल्याला संदेश दिला होता की लहान-मोठा असं काही अंतर नसते. हा भेदभाव चुकीचा असून सगळे एकसमान असतात. त्यांनी आपल्याला शिकवण दिली की भेदभाव न करता आपण सगळ्यांनी मिळून काम केले तर आपली प्रगती निश्चित आहे.

बंधू आणि भगिनींनो, गुरु नानक जी यांची दूरदृष्टी केवळ मानवतेपर्यत मर्यादित नव्हती. कर्तारपूर येथे त्यांनी निसर्गाच्या गुणांचे गायनही केले होते. ते म्हणत-

पवणु गुरू, पाणी पिता, माता धरति महतु।

म्हणजे हवेला गुरु माना, पाण्याला पिता आणि भूमीला मातेसमान महत्व द्या. आज जेव्हा निसर्ग संवर्धनाची चर्चा होते, पर्यावरणाविषयी चर्चा होते, प्रदूषणावर बोलले जाते तेव्हा गुरुची ही वाणीच आपल्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग सांगत असते.

मित्रांनो, तुम्ही विचार करा, आपले गुरु किती दूरदृष्टीचे होते. ज्या पंजाबमध्ये तेव्हा पंच-आब म्हणजे –पाच नद्या वाहत होत्या, त्यात भरपूर पाणी वाहत होते, त्यावेळी गुरुदेव यांनी म्हंटले होते आणि पाण्याविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हंटले होते-

पहलां पानी जिओ है, जित हरिया सभ कोय।

म्हणजे पाण्याला नेहमी प्राधान्य द्यायला हवे कारण पाण्यानेच सगळ्या सृष्टीला जीवन मिळते. विचार करा- अनेक वर्षांपूर्वी त्यांची या सृष्टीवर, भविष्यावर नजर होती. आज आपण पाण्याला प्राधान्य देण्यास विसरून गेलो आहोत, निसर्ग-पर्यावरणाबाबत बेफिकीर झालो आहोत मात्र गुरुची वाणी वारंवार हेच सांगत असते, की परत या, त्या संस्कारांना कायम लक्षात ठेवा जे या भूमीने आपल्याला दिले आहेत, जे आपल्या गुरुंनी आपल्याला दिले आहेत.

मित्रांनो, गेल्या पाच वर्षापासून आमचा हा प्रयत्न आहे की भारताला त्याच्या समृद्ध भूतकाळाने जे दिले आहे, त्याचे संरक्षण केले जावे आणि हा समुद्ध वारसा जगासमोर पोहचवला जावो. गेल्या एका वर्षापासून गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाशोत्सवाचा समारोह सुरु आहे. तो याच विचारांचा भाग आहे. या अंतर्गत, संपूर्ण जगभरात असलेल्या भारतीय दूतावासांमध्ये विशेष कार्यक्रम होत आहेत, चर्चासत्रे सुरु आहेत. गुरु नानक देव जी यांच्या स्मृतीस्मारकानिमित्त विशेष नाणी आणि टपाल तिकिटे देखील जारी करण्यात आली आहेत.

मित्रांनो, गेल्या एका वर्षात देश-परदेशात कीर्तन, कथा, प्रभातफेरी, लंगर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गुरु नानक देव यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार केला जातो आहे. याआधी, गुरु गोविंद सिंग यांचा 350 वा प्रकाशोत्सव देखील आम्ही याच भव्यतेने संपूर्ण जगात साजरा केला होता. पटना येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात मलाही जाण्याचे सौभाग्य मिळाले होते. या विशेष प्रसंगी, 350 रुपयांचे स्मरण नाणे आणि टपाल तिकीट जारी केले होते. गुरु गोविंद सिंग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचा संदेश अमर व्हावा म्हणून गुजरातच्या जामनगर येथे 750 खाटांचे आधुनिक रुग्णालय देखील त्यांच्या नावानेच तयार केले जात आहे.

बंधू आणि भगिनीनो, गुरु नानक जी यांनी दाखवलेला मार्ग नव्या पिढीला देखील कळावा, यासाठी गुरुबानीचा अनुवाद जगातल्या विविध भाषांमध्ये केला जातो आहे. मी आज येथे युनेस्कोचे देखील आभार मानतो आहे. त्यांनी केंद्र सरकारची विनंती ऐकून गुरु नानक देव जी यांच्या रचनांचा विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी मदत केली आहे.

मित्रांनो, गुरु नानक देव आणि खालसा पंथाशी संबंधित संशोधनाला चालना मिळावी, यासाठी ब्रिटनच्या एका विद्यापीठात अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे. असाच प्रयत्न कॅनडातही होतो आहे. त्याचसोबत अमृतसर येथे आंतर-धर्मिय विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे जेणेकरून सद्‌भावना आणि विविधतेला सन्मान आणि प्रोत्साहन मिळावे.

बंधू आणि भगिनीनो, आमच्या गुरूंशी संबंधित महत्वाच्या स्थळांना भेट देताच त्यांच्या समृद्ध वारशाची कल्पना यावी, नव्या पिढीला त्यांच्याशी जोडून घेता यावे, यासाठी देखील सरकार विशेष काम करत आहे. इथेच सुलतानपूर लोधीला वारसा स्थळ बनवण्याचे काम सुरु आहे. वारसा संकुल असो, संग्रहालय असो, सभागृह असो अशी अनेक कामे पूर्ण केली जात आहेत, काही पूर्ण होत आहेत. इथे रेल्वे स्थानकापासून ते शहरातील इतर जागांवर आपल्याला गुरु नानक देव जी यांचा वारसा बघायला मिळावा, यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. गुरु नानक देव जी यांच्याशी संबंधित सर्व तीर्थस्थळांमधून जाणारी विशेष रेल्वेगाडी आठवड्यातून पाच दिवस चालवली जाणार आहे, ज्यामुळे भाविकांना जाण्यायेण्याची सुविधा मिळावी.

बंधू आणि भगिनींनो, केंद्र सरकारने देशभरात असलेल्या शीख तीर्थस्थळांमधील संपर्कव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. श्री अकाल तख्त, दमदमा साहिब, केशगढ साहिब, पटना साहिब आणि हुजूर साहिब या दरम्यान रेल्वे आणि विमान वाहतूक वाढवण्यावर भर दिला आहे. अमृतसर आणि नांदेड दरम्यान विशेष विमान सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. अशाच प्रकारे, अमृतसरहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडीयाच्या विमानात “इक ओंकार” का संदेश देखील प्रसारित केला जातो.

मित्रांनो,

केंद्र सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ जगभरात पसरलेल्या शिख कुटुंबांना होणार आहे. अनेक वर्षांपासून भारतात येण्यात अडचणी येत होत्या, त्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. या पावलामुळे आता अनेक कुटुंबे व्हिसासाठी, OCI कार्डसाठी अर्ज करू शकतील. ते इथे भारतात येऊन आपल्या नातेवाईकांना भेटू शकतील आणि आपल्या गुरूंच्या तीर्थक्षेत्री जाऊन प्रार्थना देखील करु शकतील.

बंधू आणि भगिनीनो, केंद्र सरकारच्या आणखी दोन निर्णयांचा देखील शीख समुदायाला थेट लाभ मिळाला आहे. कलम 370 हटवल्यामुळे आता जम्मू काश्मीर आणि लदाख मध्ये देखील शीख कुटुंबांना तेच अधिकार मिळतील जे उर्वरित भारतात त्यांना मिळत होते. आतापर्यत तिथे अशी हजारो कुटुंबे होती, जी ह्या अधिकारांपासून वंचित होती. त्याचप्रमाणे नागरिकत्व सुधारणा विधेयकात, त्यात केलेल्या दुरुस्त्यांचा मोठा लाभ आमच्या शीख बंधू-भगिनींनो मिळणार आहे. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळणे सुलभ होणार आहे.

मित्रांनो, भारताची एकता, भारताची सुरक्षा यासाठी गुरु नानक देवाजी यांच्यापासून ते गुरु गोविंद सिंह जी यांच्यापर्यत सगळ्यांनी, प्रत्येक धर्मगुरुंनी सातत्याने प्रयत्न केले आहेत, बलिदाने दिली आहेत. याच परंपरेला स्वातंत्र्याच्या लढ्यातही आणि स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी देखील शीख बांधवांनी संपूर्ण शक्तीनिशी पुढे नेले आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या समर्पणाला सन्मान देण्यासाठी देखील सरकारने अनेक पावले उचलली आहेत. याच वर्षी जालियानवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाली. त्याच्याशी संबंधित स्मारकाचे आधुनिकीकरण केले जात आहे. सरकार शीख युवकांच्या शाळा, कौशल्ये आणि स्वरोजगार याकडेही विशेष लक्ष देत आहे. गेल्या पाच वर्षात सुमारे 27 लाख शीख विद्यार्थ्यांना वेगवगेळ्या शिष्यवृत्ती देण्यात आल्या आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आपली गुरु परंपरा, संत परंपरा, ऋषी परंपरा यातून वेगवगेळ्या कालखंडात आलेल्या आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग आपल्याला सापडले आहेत. त्यांचे मार्ग त्यावेळी जेवढे योग्य होते ते आजही तितकेच योग्य आणि महत्वाचे आहेत. राष्‍ट्रीय एकता आणि राष्‍ट्रीय चेतनेविषयी प्रत्येक संत-गुरु आग्रही राहिले आहेत. अंधश्रद्धा असो, समाजातील कुप्रथा असो, त्यांच्याविरोधात आपल्या संतांनी, गुरूंनी सक्षमपणे आवाज बुलंद केला आहे.

मित्रांनो, गुरु नानक देव जी म्हणत असत-

“विच दुनिया सेवि कमाइये, तदरगिह बेसन पाइए”।

म्हणजे, संसारात सेवेचा मार्ग स्वीकारला तरच मोक्ष मिळतो, जीवन सफल होते. चला, आज या महत्वाच्या आणि पवित्र टप्यावर आपण संकल्प करुया, की गुरु नानक जी यांच्या वचनांना आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवूया. आपण समाजात सद्भाव निर्माण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करूया. भारताचे अहित चिंतणाऱ्या शक्तींपासून आपण सावध राहू, सतर्क राहू. समाजाला पोखरणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनांपासून आपण दूर राहू. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दूर ठेवू. पर्यावरणासोबत ताळमेळ राखत आपल्या विकासाचा मार्ग अधिक सक्षम करू. गुरु नानक जी यांच्या याच प्रेरणा मानवतेच्या हितासाठी, विश्वशांतीसाठी आजही यथोचित आणि प्रासंगिक आहेत.

नानक नाम चढ़दी कला, तेरे भाणे सरबत दा भला !!!

मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, संपूर्ण देशाला, संपूर्ण जगात पसरलेल्या शीख बांधवांना गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या प्रकाशोत्सवानिमित्त आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉरसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. गुरु ग्रंथ साहिबच्या समोर उभा राहत मला या पवित्र कार्याचा भाग होण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुम्हा सर्वाना प्रणाम करत-

सतनाम श्री वाहेगुरु !

सतनाम श्री वाहेगुरु !

सतनाम श्री वाहेगुरु !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi met with the Prime Minister of Dominica H.E. Mr. Roosevelt Skeritt on the sidelines of the 2nd India-CARICOM Summit in Georgetown, Guyana.

The leaders discussed exploring opportunities for cooperation in fields like climate resilience, digital transformation, education, healthcare, capacity building and yoga They also exchanged views on issues of the Global South and UN reform.