#NarmadaSevaYatra is a unique move in history: PM Modi
Maa Narmada is a life giver, says PM Modi #NarmadaSevaYatra 
Success of Swachh Bharat Mission is not due to governments but efforts of people: PM Modi

मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपण जर यात्रा करू शकत नसलो, तरी जर आपण यात्रेकरूला वंदन केलं, तर आपल्यालाही यात्रा केल्याचं पुण्य लागतं, अशी मान्यता आपल्या शास्त्रात आहे. म्हणूनच मी आज आपल्या सर्वांना नमस्कार, वंदन करून, आपण जे यात्रा करून पुण्य कमावलं आहे, त्यातला थोडा अंश मागतोय. परंतु हा पुण्याचा हिस्सा- भाग मी काही माझ्यासाठी- स्वतःसाठी मागत नाही. तर यात्रेचं पुण्य माता भारतीच्या कामी यावं, सव्वाशे कोटी देशवासियांना उपयोगी ठरावं. या देशातल्या गरिबातल्या गरीब व्यक्तीचं आयुष्य बदलण्यासाठी उपयोगी पडावं, असं मला वाटतं.

आणि माझा विश्वास आहे, नर्मदा परिक्रमेचा आणि या नर्मदा यात्रेचा खूप जवळचा संबंध आहे. मला या शास्त्राचा चांगलाच परिचय आहे. इतकंच नाही तर त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्नही मी केला होता. नर्मदा परिक्रमा करताना आपल्यातील अहंकार कणा-कणानं नष्ट कसा होतो, अहंकाराची पुटं कशी जमिनीवर गळून पडतात. अहंकार अगदी मातीत मिसळून जातो, हे मला चांगलंच माहीत आहे आणि परिक्रमा करणा-या व्यक्तीला माता नर्मदा जमिनीवर आणून उभं करते. सगळ्या बंधनातून मुक्त करते. कितीही- कोणत्याही पदांनी, उपाधींनी तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानत असाल तर परिक्रमेच्या काळात तुम्हाला मुक्ती मिळते. माता नर्मदा आणि नर्मदेचे सेवक यांच्यामध्ये कोणतंही व्दैत राहत नाही. एक वेगळीच अव्दैताची अनुभूती येते. आपण सगळ्यांनीच आज माता नर्मदेची सेवा करण्याचा महान संकल्प केला आहे.

ज्यावेळी काळ बदलतो, त्यावेळी कुणाला कुठे पोहोचवतो हे समजत नाही. आणि ज्यावेळी अतिहव्यासाची भावना प्रबळ होत जाते, त्यावेळी कर्तव्य भावना क्षीण होत जाते. आणि मग अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी आपल्याला नर्मदा सेवेसाठी बाहेर पडावं लागतं. या नर्मदा मातेनंच आपल्याला हजारो वर्षे वाचवलं आहे. आपल्याला जीवन दिलं. आपल्या पूर्वजांचं रक्षण केले आणि आपण कर्तव्यापासून तोंड फिरवू लागलो. आणि नर्मदा मातेला जितकं लुटता येईल तितकं लूटत राहिलो. आपण स्वार्थी विचार करून गरजा, आवश्यकता वाढवल्या आणि माता नर्मदेची कोणतीही पर्वा कधीच केली नाही. आपण फक्त आपल्या लाभाचा विचार केला. माता नर्मदेवर आपलाच अधिकार आहे, मला पाहिजे तसा, हवा तसा, हवा तितका तिचा उपभोग घेऊ शकतो; असे मनात भाव निर्माण झाले. आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्या माता नर्मदेने आपल्याला वाचवलं होतं, त्याच माता नर्मदेला वाचविण्यासाठी घाम गाळण्याची आपल्यावर वेळ आली. जर आपल्याला कर्तव्य भावनेचं विस्मरण झालं नसतं, माता नर्मदेसाठी असलेली कर्तव्ये आपण योग्य त-हेने पार पाडली असती, तर तिला वाचविण्याची जबाबदारी माणसांवर येऊन पडली नसती. आणि इतकी धडपड करावी लागली नसती. तरी एक बरं आहे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, मध्य प्रदेशची जनता सजग बनली आहे.

हिंदुस्तानच्या नकाशावर अनेक नद्या आहेत. या नद्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही. अनेक नद्या इतिहासाच्या गर्तेमध्ये गडप झाल्या आहेत. आपल्या देशात केरळमध्ये एक नदी आहे. कदाचित ‘भारत’ या शब्दाचा नदीच्या नावामध्ये समावेश असलेली ही एकमेव नदी आहे. या नदीचं नाव आहे ‘भारत पूजा’. आज ही केरळची नदी वाचेल की नाही, हा चिंतेचा विषय बनला आहे. पाण्याचा अतिवापर केल्यामुळे नदी लोप पावली असं अजिबात नाही. तर नदीच्या रक्षणासाठी ज्या तत्वांची आवश्यकता असते, त्यांचे पालन जबाबदारीनं केलं नाही तर मनुष्य जातीचं खूप मोठं नुकसान होणार आहे.

नर्मदेचा उगम बर्फाळ पर्वतांमधून झालेला नाही. बर्फाचे डोंगर विरघळून नर्मदा नदी बनली नाही, हे आपण चांगलेच जाणतो. माता नर्मदा एका एका रोपांच्या प्रसादामधून प्रकट होते आणि आपलं जीवन पुलकित करते. आणि म्हणूनच मध्य प्रदेश सरकारने माता नर्मदेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे वृक्षारोपणाचे ! आपण ज्यावेळी एखादे रोप लावतो, त्यावेळी येणा-या पिढ्यांसाठी आपण कितीतरी मोठी सेवा करत असतो. याची जाणीवही आपल्याला नसते. आपल्या पूर्वजांनी जे तप केले, जी साधना केली, सेवा केली, त्याचा परिणाम म्हणजे आज आपण नर्मदा मातेचा लाभ घेऊ शकतो. आज आपण जो पुरुषार्थ करणार आहे, त्यामुळे येणा-या अनेक पिढ्या आपले स्मरण करतील. कोणे एकेकाळी नर्मदेला वाचवण्यासाठी रोपा-वृक्षांची लागवड करून माता नर्मदेचं पुनज्जीवन करण्यात आलं होतं, अशी कथा पुढची पिढी सांगेल.
जवळ- जवळ दीडशे दिवस यात्रा करणं फार अवघड कार्य आहे. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य म्हणजे, ज्या ज्या ठिकाणी सरकार मधे येते, राजकीय नेते ज्या कार्यात पडतात, ते कार्य कितीही महान असले तरी बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. नर्मदा यात्रेशी जोडल्या गेलेल्या, या महान कार्यात सहभागी झालेल्या मध्य प्रदेशच्या नागरिकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. एखाद्या नदीच्या रक्षणासाठी दीडशे दिवस तपस्या करण्यासारखी घटना संपूर्ण जगामध्ये ही एकमेव असेल. अशी घटना दुसरीकडे कुठे घडली असती तर जगभर त्याची चर्चा झाली असती, संपूर्ण विश्वामध्ये जयजयकार झाला असता. मोठ-मोठ्या दूरचित्रवाणी वाहिन्या ही घटना चित्रित करण्यासाठी येथे धाव घेतली असती. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे, की आपल्या या प्रयत्नांचे वैश्विक सामर्थ्य, महत्व किती आहे, हे समजत नाही. कोणी हे समजू शकत नाही की, माहीत करून घेत नाहीत आणि मग अशा संधी आपल्याकडून हुकतात. आज एखाद्या ठिकाणी सौर प्रकल्प सुरू केला तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा होते. अमुक देशाच्या तमूक प्रांतामध्ये मानवाच्या रक्षणासाठी सौर प्रकल्प लावला आहे, अशा बातम्या येतात. ही नदी वाचवण्याचे इतके मोठे काम झाले आहे, पर्यावरण रक्षणाचे इतके मोठे काम झाले आहे, 25 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी नर्मदा रक्षणाचा संकल्प केला आहे. कोटी -कोटी जन या प्रकल्पामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी शरीराला कष्ट दिले, अनेक संकटांचा सामना केला. स्वतः परिश्रम केले. माता पृथ्वीच्या रक्षणासाठी, नदीच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, इतकं महत्वाचं पाऊल उचललं आहे. आणि या सगळ्यांचे नेतृत्व केल्याबद्दल शिवराज सिंहजी आणि त्यांच्या संपूर्ण समुहाचे तसेच मध्य प्रदेशच्या जनतेचे मी अभिनंदन करतो.

माझा जन्म गुजरातमध्ये झाला. नर्मदेच्या पाण्याच्या एक-एक थेंबाचे महत्व किती आहे, हे गुजरातचे लोक खूप चांगल जाणून आहेत. आज आपण ज्यावेळी नर्मदेच्या भविष्यासाठी इतकं मोठं अभियान निर्माण केलं, त्याबद्दल मी गुजरातच्या गावांतर्फे, शेतकरी वर्गातर्फे, तिथल्या नागरिकांच्या वतीने, राजस्थान च्या गावांतर्फे, शेतकरी वर्गातर्फे, तिथल्या नागरिकांच्या वतीने, महाराष्ट्राच्या गावांतर्फे, शेतकरी वर्गातर्फे, तिथल्या नागरिकांच्या वतीने, मध्यप्रदेश सरकारचे, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो.

गेल्या काही दिवसात देशात स्वच्छता अभियानाची एक विशिष्ट व्यवस्था तयार झाली आहे. हिंदुस्तानात सातत्याने बाहेरच्या, त्रयस्थ पक्षाव्दारे स्वच्छतेचे मूल्यमापन होत आहे. कोणत्या राज्यात स्वच्छतेसाठी काय केले जाते, कोणते शहर स्वच्छ आहे हे समजते. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग ही सगळ्यात मोठी शक्ती असते. आणि जर आम्ही लोकसामर्थ्य, लोकांचा सहभाग, लोकशक्ती यांची उपेक्षा केली तर सरकार काहीही करण्यास असमर्थ ठरते. विचार कितीही चांगला असला , नेतृत्व कितीही चांगले असले, व्यवस्था कितीही उत्तम असली, तरीही लोकांचे समर्थन त्याला नाही मिळाले तर कोणतीही गोष्ट यशस्वी होऊ शकत नाही. आणि लोकांचे समर्थन मिळाले तर यश कसे मिळते, याचे उत्तम उदाहरण मध्य प्रदेशने आपल्या समोर ठेवले आहे.   
मागच्या वेळेस ज्यावेळी स्वच्छतेसंबंधी सर्वेक्षण केले होते, त्यावेळी मध्य प्रदेशाचे नाव बदनाम व्हावे, अशा स्थानावर होते. परंतु मध्य प्रदेशने मनोमन निश्चय केला, आणि हा कलंक मिटवण्याचा संकल्प केला. यासाठी जनजागरण केले. लोकांची भागीदारी वाढवली, प्रत्येक माणसाला या अभियानाशी जोडले. आणि आज मी मध्य प्रदेशाचे खूप खूप अभिनंदन करतो. देशामधल्या स्वच्छ शंभर शहरांमध्ये 22 शहरे मध्य प्रदेशातली आहेत. हे खूप मोठे यश मिळाले आहे. लोकांच्या सहभागातून स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये किती उत्तम कार्य करता येते, हे मध्यप्रदेशने दाखवून दिले आहे. या राज्यापासून इतरांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. इंदौर, भोपाळ या शहरांनी हिंदुस्तानमध्ये अव्वल येवून प्रथम, व्दितीय पुरस्कार मिळवला आहे.

शंभरपैकी 22 शहरे स्वच्छता सर्वेक्षणात चांगल्या क्रमांकावर आहेत, याचाच अर्थ संपूर्ण राज्यात प्रशासनाने, शासनाने, जनता-जनार्दनाने या कामाला आपलं मानलं आहे. आणि याचाच परिणाम झाला तो म्हणजे नर्मदा योजना सेवा यात्रा यशस्वी झाली. हे यश काही सरकारच्या ताकदीमुळे मिळालेले नाही, तर जनता -जनार्दनाच्या ताकदीमुळे मिळाले आहे. आणि जनतेची ताकद ज्यावेळी एकत्र येते, त्यावेळी कितीतरी मोठं काम होतं, हे आता लक्षात आलं आहे. शिवराजजी यांनी 2 जुलैपर्यंत 6 कोटी रोपांची लागवड करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. 6 कोटी रोपांची व्यवस्था करण्यासाठी दीड वर्षांपासून ते सातत्याने काम करत आहेत. कोणतेही मोठे काम असं अचानक, एकदम होऊ शकत नाही. 6 कोटी रोपांसाठी रोपवाटिकांमध्ये सगळी व्यवस्था, तयारी करावी लागते, त्यावेळी कुठे इतक्या मोठ्या संख्येने रोपांची उपलब्धता होऊ शकणार आहे. फक्त रोप लावून आपले काम संपणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. कुटुंबामध्ये एखाद्या बालकाचे संगोपन लक्षपूर्वक केले जाते, अगदी त्याचप्रमाणे या रोपांचेही सगळ्यांनी संगोपन केले पाहिजे. तरच भविष्यात या रोपाचा वटवृक्ष होणार आहे.

आपल्याकडे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की, जी व्यक्ती एक वर्षाचा विचार करते, ती धान्य पेरते. परंतु जो माणूस खूप पुढचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, तो फळांच्या वृक्षाचे रोप लावतो. असे फळांचे वृक्ष लावण्याचे काम आगामी दिवसांमध्ये अनेक कुटुंबांना आर्थिक उत्पन्नाची हमी देण्याचे कारणही बनणार आहे. मध्य प्रदेश सरकारने जो संकल्प केला आहे, आणि त्यांनी जी योजना तयार केली आहे त्याची माहिती देणारे पुस्तक माझ्याकडे याआधीच आले होते. ते पुस्तक मी वाचले आहे. यामध्ये प्रत्येकासाठी काम आहे. प्रत्येक जागेसाठी, कोणी कुठेही असले तरी त्याला काम मिळू शकणार आहे. आता ही कामे कधी करायची, कुणी करायची, कशी करायची याचा संपूर्ण तपशील दिलेला आहे. कोणत्या कामाकडे कोणी, कसे लक्ष द्यायचे याचा सगळा आराखडा तयार आहे. एक प्रकारे भविष्यातील दृष्टिकोनाचा एक महत्वपूर्ण आणि अचूक दस्तऐवज म्हणजे ही पुस्तिका आहे. देशातल्या इतर सर्व राज्यांनाही हे पुस्तक आवर्जुन पाठवावे , असा माझा शिवराजजींकडे आग्रह आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी योग्य पध्दत कशी आहे, याचा उत्तम वस्तूपाठ मध्य प्रदेश सरकारने घालून दिला आहे. एक उदाहरण म्हणून ही योजना समोर ठेवावी, आणि सर्व राज्यांनी आपली योजना तयार करावी , असं मला वाटतं.

पाणी जीवन आहे, असं आपण म्हणत असतो. नदी माता आहे, असंही म्हणतो. आमची संपूर्ण अर्थव्यवस्था पाण्यावर अवलंबून आहे. पाण्यशिवाय अर्थव्यवस्था खिळखिळी बनणार आहे. जर आज मध्य प्रदेशचा कृषी विकास दर 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर त्याचे सर्वात जास्त श्रेय माता नर्मदेचे आहे. शेतकरी वर्गाचे आयुष्य बदलवून टाकण्याची ताकद माता नर्मदेमध्ये आहे. सन 2022पर्यंत भारताच्या बळीराजाचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सरकारनं केला आहे. त्याच्या पूर्तीसाठी संपूर्ण देशभरामध्ये काम सुरू झाले आहे. मध्य प्रदेशने तर याची सर्व योजनाही तयार केली आहे. आणि त्याचा लाभ शेतकरी सहकार्य करून हिंदुस्तानातल्या प्रत्येक गावाला मिळवून देतील, असा माझा विश्वास आहे.

बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. हिंदुस्तानचे सव्वाशे कोटी नागरिक प्रत्येक क्षणी 2022 चे स्मरण नाही करू शकत? प्रत्येक घटकेला स्वातंत्र्याची 75 वर्षे आठवू शकत नाहीत? ज्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले, आपले जीवन अर्पण केले, तारुण्य तुरुंगामध्ये घालवलं, काहीजण तर फासावर लटकले, ज्यांनी आपलं जीवनच नाही तर संपूर्ण कुटूंबच्या कुटुंबाचे बलिदान दिले, माता भारतीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जी स्वप्ने पाहिली त्यांचे स्मरण करून आपण काही संकल्प करू शकत नाही का? सन 2022 पर्यंत एक व्यक्ती म्हणून या देशासाठी मी काहीतरी करणार, एक कुटूंब म्हणून मी काहीतरी करणार, समाजासाठी मी काही करणार. आपण गावातील सगळे लोक मिळून काही तरी काम करणार, आपण नगरातील लोक मिळून एकत्रित काही करणार, आम्ही संस्था म्हणून मिळून काहीतरी करणार, समाजाचा आपण हिस्सा आहोत, या नात्याने काही काम करणार, आपण राज्य या नात्याने, देश या नात्याने काही करण्याचा संकल्प करणार.

2022, ‘नव भारत’ बनवण्याचे स्वप्न घेवून पुढे वाटचाल करायची आहे. प्रत्येक हिंदुस्तानीला यासाठी जोडायचे आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण देश एकत्र आला होता, जोडला गेला होता त्याप्रमाणेच आता देशाला एका नव्या, वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी ‘नव भारत’ बनवण्यासाठी प्रत्येक देशवासियाला जोडायचे आहे. आणि यासाठी मी प्रत्येक देशवासियाला आग्रह करतो. मध्य प्रदेशातल्या सर्व संस्था, संघटना यांनाही आग्रह करतो. आपण सगळ्यांनी एकत्र यावे आणि 2022 पर्यंत देशासाठी आपण, आपली संस्था, आपले कुटूंब, आपला समाज, आपली संघटना, आपले दल काय करू शकतो, हे आपणच मिळून निश्चित करावे. आपल्याकडे यासाठी आणखी पाच वर्षे आहेत. एकदा का देशात अशी वातावरण निर्मिती झाली की, या पाच वर्षात आपण देशाला कुठल्या कुठे नेवू शकणार आहे, याचा मला विश्वास आहे. जर सव्वाशे कोटी देशवासीयांनी एक पावूल पुढे टाकलं तर देश पाच वर्षांमध्ये सव्वाशे कोटी पावले पुढे जाणार आहे. आणि म्हणूनच आपण एक दृढ संकल्प करून वाटचाल करायची आहे. मी आज पूजनीय अवधेशानंदजी यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी माझ्यासाठी जे आशीर्वचन दिले, जे भाव त्यांनी प्रकट केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपल्या सगळ्यांमध्ये त्या क्षमता याव्यात, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सर्व चांगुलपणा, समर्पणाचा भाव आपल्यामध्ये आला तर देशाची खूप मोठी सेवा आपल्याला करता येणार आहे. अशी सेवा करण्यासाठी आवश्यक असणारी योग्यता येणार आहे. स्वतःला योग्य बनवता येणार आहे. त्यांनी मला दिलेल्या आशीर्वादाबद्दल अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना वंदन करतो.

मी आपल्या सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि शिवराजजी यांनी सांगितलं की यात्रा इथं विराम घेत आहे. त्यापुढे जावून मी म्हणतो, यात्रेमध्ये जो विचार केला गेला, जे काही पाहिलं, जे काही केलं, त्याचा प्रत्यक्ष जीवनात आता यज्ञ सुरू होणार आहे. यात्रा जरी आता संपली असली तरी आजपासून एका यज्ञाला प्रारंभ झाला आहे. यज्ञामध्ये आहुती द्यावी लागते. वेळ द्यावा लागतो. आपल्या संपूर्ण इच्छा- आकांक्षांची आहुती द्यावी लागते. माता नर्मदेच्या उज्ज्वल भविष्याचा यज्ञ आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे यशस्वी होणार आहे, आणि समाजाला एका नव्या उंचीवर नेणारा ठरणार आहे, असा मला विश्वास आहे. याच भावनेतून आपण सर्वजण माझ्याबरोबरीने उच्चरवाने, दोन्ही मुठी घट्ट बंद करून, हात वर करून म्हणणार आहात ...मी ‘नर्मदे‘ बोलेन, तुम्ही ‘सर्वदे’ म्हणणार आहात.

नर्मदे- सर्वदे !!

हा आवाज माता नर्मदेचा तो पलिकडचा किनारा पार करून गेला पाहिजे. अगदी खम्बातीच्या खाडीपर्यंत आवाज गेला पाहिजे.

नर्मदे- सर्वदे !!

नर्मदे- सर्वदे !!

खूप- खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister meets with Crown Prince of Kuwait
December 22, 2024

​Prime Minister Shri Narendra Modi met today with His Highness Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah, Crown Prince of the State of Kuwait. Prime Minister fondly recalled his recent meeting with His Highness the Crown Prince on the margins of the UNGA session in September 2024.

Prime Minister conveyed that India attaches utmost importance to its bilateral relations with Kuwait. The leaders acknowledged that bilateral relations were progressing well and welcomed their elevation to a Strategic Partnership. They emphasized on close coordination between both sides in the UN and other multilateral fora. Prime Minister expressed confidence that India-GCC relations will be further strengthened under the Presidency of Kuwait.

⁠Prime Minister invited His Highness the Crown Prince of Kuwait to visit India at a mutually convenient date.

His Highness the Crown Prince of Kuwait hosted a banquet in honour of Prime Minister.