मोठ्या संख्येने इथे उपस्थित माझ्या युवा मित्रांनो,
आताच आपले मुख्यमंत्री सांगत होते की, मी देशाचा पहिला असा पंतप्रधान आहे जो पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहे. हे मी माझे सद्भाग्य समजतो, आणि मी पाहिलं आहे की जेवढे पंतप्रधान आतापर्यंत झाले, ते माझ्यासाठी खूप काही चांगली कामे ठेवून गेले आहेत. त्यापैकी एक चांगले काम करण्याची संधी मला आज मिळाली आहे.
मी सगळ्यात आधी या पवित्र भूमीला वंदन करतो, कारण आज आमचा देश जिथे कुठे आहे, तिथे त्याला पोचवण्यासाठी ह्या विद्यापीठ परिसराचे मोठे योगदान आहे. चीनमध्ये एक म्हण आहे, ‘की जर आपण वर्षभराचा विचार करत असाल तर धान्य बियाणे पेरा, जर १०-२० वर्षांचा विचार करत असाल तर फळांचा वृक्ष लावा आणि जर तुम्ही पिढ्यांचा विचार करत असाल तर तुम्ही मनुष्याचे बीज पेरा..’ इथे पाटणा विद्यापीठात या म्हणीचा आपल्याला प्रत्यक्षात प्रत्यय येतो. १०० वर्षांपूर्वी जे बीज पेरले गेले होते, त्या १०० वर्षात अनेक पिढ्या इथे येऊन देवी सरस्वतीची साधना करून पुढे गेल्या, मात्र आपल्यासोबत देशालाही पुढे घेऊन गेल्या. इथे काही राजकारण्यांचा उल्लेख झाला, ज्यांनी याच विद्यापीठातून शिक्षण घेत वेगवेगळ्या क्षेत्रातून देशाची सेवा केली आहे. मात्र आज मी माझ्या अनुभवावरून एक सांगू शकतो की आज भारतातील कदाचितच एखादे राज्य असेल, जिथे सनदी सेवेत असलेल्या पहिल्या पाच नोकरशहापैकी एक तरी पाटणा विद्यापीठाचा विद्यार्थी नाही, हे होऊच शकत नाही.
एका दिवसात मी भारताच्या प्रत्येक राज्यातून आलेल्या अनेक छोट्या-मोठ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो. रोज ८० ते १०० लोकांशी चर्चा करायला बसतो, दीड- दोन तास त्यांच्याशी चर्चा करतो आणि माझ्या लक्षात येते की, त्यात बिहारमधल्या अधिकाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यांनी सरस्वतीच्या उपासनेत स्वतःला बुडवून घेतले आहे.मात्र आता काळ बदलला आहे आणि आपल्याला सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्ही देवीना एकत्र घेऊन चालायचे आहे. बिहारवर सरस्वतीची कृपा आहे, बिहारवर लक्ष्मीचीही कृपा होऊ शकते. त्यामुळेच भारत सरकारचा विचार आहे की बिहारमध्ये सरस्वती आणि लक्ष्मीचा संयोग घडवून आणत बिहारला नव्या उंचीवर न्यावे.
बिहारच्या विकासासाठी नितीशजींची जी कटिबद्धता आहे, आणि पूर्व भारताच्या विकासासाठी केंद्र सरकारने जो संकल्प केला आहे, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील, तेव्हा २०२२ पर्यत, म्हणजे, देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन वर्षापर्यत, माझे हे बिहार राज्य देखील भारतातील समृद्ध राज्यांच्या रांगेत बरोबरीने उभे राहील असा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करायची आहे.
आपले हे पाटणा शहर, गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि जितका प्राचीन गंगेचा प्रवाह आहे तितकाच प्राचीन बिहारचा ज्ञानप्रवाह ही आहे, बिहार एका मोठ्या वारशाने समृद्ध झाला आहे. भारतात जेव्हाही शिक्षण आणि ज्ञानाची चर्चा होते, तेव्हा नालंदा, विक्रमशिला ही विद्यापीठे कोण विसरेल? मानवी जीवनाच्या संशोधनाच्या क्षेत्रात कदाचितच अशी काही क्षेत्र असतील ज्यात या भूमीचे शतकांपासूनचे योगदान नसेल. ज्याच्याजवळ एवढा श्रीमंत वारसा असेल, त्याला तो वारसाच प्रेरणा देत असतो. जो आपल्या या समृद्ध इतिहासाची आठवण ठेवतो, त्याच्या गर्भातूनच भविष्यात इतिहास घडवणाऱ्या महान गोष्टी जन्म घेत असतात. जो इतिहास विसरतो, त्याची कूस मात्र वांझ राहते.आणि म्हणूनच, भविष्यात इतिहास घडवण्याचे सामर्थ्य, समृद्ध, शक्तीशाली, भव्य-दिव्या भारत घडवण्याच्या सामर्थ्याला जन्म देणे याच भूमीत शक्य आहे, ज्या भूमीत प्रेरणादायी इतिहास घडला आहे! या देशाजवळ, महान ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, जिवंत प्रेरणादायी उदाहरणे आहेत. मला वाटते, इतके मोठे सामर्थ्य कदाचितच इतर कोणाकडे असेल.
एक काळ असा होता, की जेव्हा आपण शाळा- महाविद्यालयात काहीतरी शिकायला जात होतो. मात्र आज ते युग संपले आहे. आज जग अतिशय वेगाने बदलत आहे. माणसाचे विचार बदलत आहेत, विचारांचा आवाका बदलतो आहे, तंत्रज्ञानाच्या शोधामुळे, जीवन जगण्याची दृष्टी,आयुष्यातील व्यवहार, जगण्याची पध्दत या सगळ्यात आमूलाग्र बदल घडताना दिसतो आहे. अशा स्थितीत आपली विद्यापीठे देखील बदलत आहेत, इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर हे एक मोठे आव्हान आहे.. आव्हान हे नाही की नवे काय शिकवावे, आव्हान हे आहे की जे जुने शिकून आले आहेत, ते कसे विसरायचे ?जुने शिकलेले सगळे बाजूला ठेवून, मन आणि बुद्धीची पाटी कोरी करून नव्याने शिक्षणाची सुरुवात करणे ही आजच्या युगाची मोठी गरज आहे.
फोर्ब्ज मासिकाचे श्री फोर्ब्ज यांनी एकदा म्हंटले होते. शिक्षणाची एक खूप मजेशीर व्याख्या सांगितली होती त्यांनी, ते म्हणाले होते की शिक्षणाचे काम आहे, मेंदू रिकामा करणे ! आणि आपण काय विचार करतो ? मेंदू भरणे ! पाठांतर करत राहायचे, नव्या नव्या गोष्टी डोक्यात भरत राहायच्या .. मात्र फोर्ब्ज यांच्या मते, शिक्षणाचा उद्देश आहे, मेंदू रिकामा करुन आणि नंतर तो मोकळा करणे ! जर खऱ्या अर्थाने आपल्याला आजच्या युगाप्रमाणे परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर आपल्या सर्व विद्यापीठांना डोके रिकामे करण्याची मोहीम चालवावी लागेल. मेंदू मोकळा करण्याची मोहीम चालवावी लागेल. जेव्हा हा मेंदू मोकळा होईल, तेव्हा चारी दिशांनी नवनवे विचारप्रवाह स्वीकारण्याची, समजून घेण्याची शक्यता वाढेल. जेव्हा रिकामा होईल, तेव्हाच तर नवे काही भरण्यासाठी जागा निर्माण होईल ना ? आज म्हणूनच, आज या विद्यापीठांनी ज्ञान द्यावे, केवळ शिक्षण देऊ नये. ज्ञानावर भर देत पुढे वाटचाल करायची आहे आणि आपण आपल्या विद्यापीठांना या दिशेने कसे घेऊन जाऊ, यावर विचार करणे ही काळाची गरज आहे.
मानवी संस्कृतीच्या विकासाची यात्रा आपण पहिली तर एक गोष्ट, ज्यात आपल्याला सातत्य जाणवेल ती म्हणजे संशोधन, नवे काही शोधून काढण्याची वृत्ती! प्रत्येक युगात मानवाने काही ना काही नवे शोध लावत आपल्या जीवनशैलीत त्याचा समावेश केला आहे. आज हे संशोधन एक खूप मोठ्या स्पर्धेच्या काळातून जाते आहे. जगात तेच देश प्रगती करताहेत जे या संशोधनाला, अभ्यासाला प्राधान्य देतात. अशी संशोधने करणाऱ्या संस्थाना प्राधान्य देतात.मात्र आपल्याकडे संस्थांमध्ये इतका बदल झालेला नाही. केवळ बाह्य बदलाला संशोधन म्हणता येणार नाही. विज्ञानाच्या, आयुष्याच्या मूलभूत सिद्धांताच्या वर कालबाह्य गोष्टीपासून मुक्ती मिळवण्याचा रस्ता शोधणे आणि भविष्याकडे नजर ठेवून नवे रस्ते मिळवणे, नवे स्त्रोत मिळवणे आणि आयुष्याला नव्या उंचीवर घेऊन जाणे ही काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या सगळ्या क्षेत्रात ज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या आधारावर संशोधन करतो आहोत, समाजशास्त्र सुद्धा वेगळ्या प्रकारे एक संशोधनाचेच शास्त्र आहे. आणि म्हणूनच आपल्या विद्यापीठांचे महत्त्व आहे की, आगामी युगातल्या गरजांच्या पूर्तीसाठी आणि जग जशाप्रकारे ग्लोबल झाले आहे, त्यानुसार या स्पर्धाही वैश्विक झाल्या आहेत. आज आपल्याला केवळ आपल्याच देशात स्पर्धा करून चालणार नाही, केवळ शेजारी देशांशी स्पर्धा करून चालणार नाही, आजच्या जागतिक स्थितीत आणि भविष्यातल्या स्थितीचा विचार करता, ही जागतिक स्पर्धा आपल्याला एक आव्हान म्हाणून स्वीकारायला हवी. देशाला जर प्रगतीपथावर न्यायचे असेल,नव्या उंचीवर न्यायचे असेल, बदलत्या जगात जर आपल्याला आपली ताकद सिद्ध करायची असेल तर आपली नवी पिढी संशोधनावर जितका भर देईल तितके चांगले. आपण जगासमोर एक शक्ती म्हणून उभे राहू.
जेव्हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवे संशोधन आले तेव्हापासून जगाचा, भारताविषयी विचार करण्याचा दृष्टीकोन बदलला. नाहीतर जग आपल्याकडे साप- गारुड्यांचा देश म्हणूनच बघत असे. जग असाच विचार करत असे की भारतीय लोक म्हणजे काळी जादू, भूत-प्रेत, अंधश्रद्धा, साप- गारुडी यांचेच जग आहे ! मात्र जेव्हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले संशोधन आले, तेव्हा भारतातल्या १८-२० वर्षे वयोगटातल्या युवकांनी आपल्या बोटांवर एक नवे जग दाखवायला सुरुवात केली. तेव्हा जग चकित झाले, ही मुले काय अद्भूत गोष्ट दाखवत आहेत. तेव्हापासून भारताकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला.
मला आठवतय, काही वर्षांपूर्वी एकदा मी तायवानाला गेलो होतो. तेव्हा मी मुख्यमंत्रीही नव्हतो आणि निवडणुकांच्या जगाशी माझा काही संबध नव्हता. तेव्हाच्या तिथल्या सरकारच्या निमंत्रणावरून मी तिकडे गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत एक दुभाषी होता. दहा दिवसांचा माझा दौरा होता. तो दुभाषी माझ्याशी गप्पा मारताना, माझ्याशी बोलताना आम्ही सोबत होतो. या दहा दिवसात आमची चांगली ओळख झाली, मैत्री झाली. मग आठ दहा दिवसानंतर त्याने मला विचारले, सर तुम्हाला राग येणार नसेल तर मला काही माहिती हवी होती. मी म्हंटले विचारा ना, तर त्याने पुन्हा म्हंटले, तुम्हाला नक्की वाईट वाटणार नाही ना? मी म्हंटले, नाही, सांगा ना काय झालं ? विचारा मला.. मात्र त्याने संकोचाने काहीच विचारले नाही. नंतर पुढच्या भेटीत मीच पुन्हा तो विषय काढला आणि त्याला विचारले, तुम्हाला काहीतरी विचारायचे होते ना ? तो कॉम्पुटर अभियंता होता, त्याने मला विचारले, सर , भारत अजूनही साप- गारुड्यांचा, जादू-टोणा करणारा देश आहे का? असं विचारुन तो माझ्याकडे बघत राहिला. मी त्याला विचारलं की माझ्याकडे बघून तुला काय वाटतं ? मग तो थोडा संकोचला. त्याला जरा लाज वाटली. म्हणाला, माफ करा सर, मी काही चुकीचं बोललो का ? मी म्हंटले असे नाही, तू योग्य तेच विचारलेस. मी सांगितलं, तुझ्या मनात ही जी माहिती आहे, भारताविषयी, तशी परिस्थिती आता नाही. आता आमचे थोडे अवमूल्यन झाले आहे. त्याने विचारले. ते कसे काय ? तर मी सांगितले, आमचे जे पूर्वज होते, ते सापांशी खेळत असत, मात्र आमची नवी पिढी आता “माऊस” शी खेळतात. त्याला कळले की मी कोणत्या माऊसविषयी बोलतो आहे. तो गणपती बाप्पांचा उंदीर नाही, तर कम्पुटरचा माऊस होता !
माझ्या बोलण्याचा मतितार्थ असं की या गोष्टी देशाला ताकद देतात, देशाची प्रगती करतात. कधी कधी आपण सिद्धांतांच्या आधारावर आपण एखादा प्रकल्प हाती घेतो, एखादे संशोधन करून आपण कधी त्यावर बक्षीसही जिंकतो. मात्र आज भारताची सर्वात मोठी गरज वेगळीच आहे आणि पाटण्याचे हे १०० वर्षे जुने विद्यापीठ, ज्याने आजपर्यत देशाला बरेच काही दिले आहे, त्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्याना मी आवाहन करतो, इथल्या प्राध्यापकांना मी आवाहन करतो ,की तुम्ही आपल्या आजूबाजूच्या ज्या समस्या आहेत, सर्वसामान्य माणसाला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्याच्यावर समाधान शोधण्यासाठी प्रयत्न करा, नवनवे संधोधन करा. त्यासाठी काही नवे तंत्रज्ञान विकसित करा. असे तंत्रज्ञान जे सोपे सहज असेल, स्वस्त असेल, सर्वसामान्यांना वापरता येईल. आपण एकदा जर अशा छोट्या छोट्या प्रकल्पांच्या संशोधनावर भर दिला तर त्याचेच पुढे रुपांतर, स्टार्ट-अप मध्ये होईल. या विद्यापीठात मिळालेल्या शिक्षणातून, केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या मदतीने आणि स्टार्ट अपच्या दिशेने पावलं, आपल्याला कल्पना नसेल, आज स्टार्ट अप मध्ये हिंदुस्तानचा जगात चौथा क्रमांक आहे, आणि बघता बघता, हिंदुस्तान स्टार्ट अपच्या जगात अग्रक्रमांकावर जाऊ शकतो. आणि जर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील युवक आर्थिक विकासाच्या ह्या नव्या जगात स्टार्ट अपच्या माध्यमातून काही तरी करून दाखविण्याच्या जिद्दीने उतरले तर किती मोठं परिवर्तन येऊ शकेल आणि त्याचे काय परिणाम असतील, ह्याचा मला पूर्ण अंदाज आहे. म्हणून मी देशातील विद्यापीठांना, आणि विशेषतः पाटणा विद्यापीठाला, संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करतो. जेणे करून जगाच्या पुढे जाण्यासाठी आपण एका क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकू.
आणि भारतात गुणवत्तेची अजिबात वानवा नाही, आणि हे आपलं नशीब आहे की आज आपल्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या म्हणजेच जवळपास ८० कोटी लोक ३५ वर्षांच्या आतले आहेत. माझा हिंदुस्तान युवा आहे आणि माझ्या हिंदुस्तानची स्वप्नं देखील युवा आहेत. ज्या देशाकडे ही ताकद आहे तो देश जगाला काय नाही देऊ शकत? असा देश आपली स्वप्न का पूर्ण करू शकत नाही, मला विश्वास आहे की आपण हे जरूर करू शकतो.
आणि म्हणूनच आत्ता नितीशजींनी एक विषय सविस्तरपणे आणि आग्रहपूर्वक मांडला. आणि आपण देखील टाळ्यांच्या कडकडाटाणे त्यांना समर्थन आणि शक्ती दिली. पण मला असं वाटतं की केंद्रीय विद्यापीठ ही कालबाह्य संकल्पना आहे. मी एक पाऊल पुढे जाणार आहे. आणि आज हेच सांगायला मी ह्या विद्यापीठाच्या कार्यक्रमात आवर्जून आलो आहे. आपल्या देशात शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा अतिशय संथ गतीने सुरु आहेत. आपल्या शिक्षण तज्ञांमध्ये अतिशय तीव्र मतभेद आहेत. आणि सुधारणांसाठी उचलेले प्रत्येक पाऊल हे सुधारणांपेक्षा समस्याच पुढे आणते. आणि ह्यामुळेच गेल्या अनेक वर्षांत शिक्षण क्षेत्रात, विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रात जगाशी बरोबरी करण्यासाठी संशोधन आणि सुधारणा घडवून आणण्यात सरकारांना अपयश आले आहे. ह्या सरकारने काही पावले उचलली आहेत, हिंमत दाखवली आहे. आता आपल्यापैकी ज्यांना शिक्षण क्षेत्रात रस आहे , त्यांनी बघितलं असेल की आपल्या देशात अनेक वर्षांपासून चर्चा सुरु होती की IIM सरकारी नियंत्रणात असायला हवी की नको. स्वायत्त असावी की नसावी, सरकारी नियंत्रणासह अर्धवट स्वायत्तता असावी का? सरकारला असं वाटायचं आम्ही या संस्थांना इतके पैसे देतो आणि त्यांवर आमचं नियंत्रण नसेल तर कसं चालेल? मी दीड दोन वर्षे हे ऐकत होतो, ऐकत होतो आणि आपल्या ऐकून आनंद होईल, आणि देशाच्या शैक्षणिक क्षेत्राला देखील ऐकून आनंद होईल, अशा विषयांची माध्यमांतून, वर्तमानपत्रांतून फारशी चर्चा होत नाही. हे विषय असे असतात, ज्यांची बातमी बनत नाही, पण काही लोकांनी लेख जरूर लिहिले आहेत. पहिल्यांदा देशात IIM सरकारी नियंत्रणातून पूर्णपणे बाहेर काढून, त्यांना व्यावसायिक दृष्ट्या मुक्त केलं आहे. हा फार मोठा निर्णय आहे. ज्याप्रमाणे पाटणा विद्यापीठासाठी IAS, IPS, IFS हा डाव्या हाताचा मळ आहे, त्याचप्रमाणे जगभरात मुख्य कार्यकारी अधिकारी पुरविणे हा IIM च्या डाव्या हाताचा मळ आहे. त्यामुळे जगातली इतकी मोठी प्रतिष्ठित संस्था सरकारी बंधनं, बाबूंचा हस्तक्षेप, लांबत जाणाऱ्या बैठका ह्यातून आम्ही मुक्त केली आहे. मला विश्वास आहे की आम्ही IIM ला इतकी मोठी संधी दिली आहे, की IIM चे लोक ह्याला एक सुवर्णसंधी मानून, देशाच्या फायद्यासाठी अत्यंत महत्वाचे निर्णय घेतील. मी त्यांना आग्रहपूर्वक सांगितलं आहे की IIM च्या सुधारणांमध्ये एक गोष्ट जोडली जावी. आता IIM च्या संचालनात IIM च्या माजी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग असायला हवा. पाटणा विद्यापीठासारख्या जुन्या विद्यापीठाला माजी विद्यार्थ्यांची एक उज्ज्वल परंपरा आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत विद्यापीठाशी पुनः जोडून घेऊन विद्यापीठाच्या विकास यात्रेत त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. आपण बघितलं असेल, जगात जितक्या उत्तम दर्जाची विद्यापीठे आहेत, त्यांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे महत्वाचे योगदान असते. हे फक्त आर्थिक नव्हे तर, त्यांच्या बौद्धिक, अनुभवाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा फार मोठा हात असतो. माजी विद्यार्थ्यांचे पद, प्रतिष्ठा ह्या गोष्टी आपोआप विद्यापीठाशी जोडल्या जातात. आपल्या देशात ही परंपरा अतिशय कमी प्रमाणात आहे, आणि आपण जरा उदासीन सुध्दा आहोत. एखाद्या कार्यक्रमात बोलावले, हार तुरे झाले, थोडी फार आर्थिक मदत झाली, एवढाच उद्देश असतो. आपले माजी विद्यार्थी ही विद्यापीठासाठी एक फार मोठी शक्ती असते आणि ह्यांच्यासाठी एक विशेष व्यवस्था विकसित करायला हवी.
तर, मी सांगत होतो, की आपल्याला केंद्रीय विद्यालयाच्या एक पाऊल पुढे जायला पाहिजे. आणि ह्यासाठी पाटणा विद्यापीठाला आमंत्रित करायला मी आलो आहे. भारत सरकारने देशभरातल्या विद्यापीठांना एक स्वप्न दिले आहे. जगातील पहिल्या ५०० विद्यापीठांत भारत कुठेच नाही. ज्या धरतीवर नालंदा, विक्रमशीला, तक्षशीला, वल्लभी सारखी विद्यापीठे होती. काही १३०० वर्षांपूर्वी, काही १५०० वर्षांपूर्वी, काही १७०० वर्षांपूर्वी. येथे जगभरातून विद्यार्थी येत असत. अशा देशातील एकाही विद्यापीठ आज पहिल्या ५०० विद्यापीठांमध्येही नसावं? हा कलंक मिटवायला हवा की मिटवायला नको? ही परिस्थिती बदलायला हवी की बदलायला नको. कुणी बाहेरून येऊन बदलेल का? आम्हालाच बदलावं लागेल, स्वप्नं देखील आपलीच असायला हवीत, संकल्प देखील आपलेच असायला हवेत. आणि हे संकल्प, हे स्वप्ने पूर्ण करण्यासठी पुरुषार्थ देखील आपल्यालाच गाजवावा लागेल.
ह्याच उद्देशाने भारत सरकारने एक योजना आणली आहे. आणि ती योजना अशी आहे की १० खाजगी आणि १० सरकारी विद्यापीठे, एकूण २० विद्यापीठांना जागतिक दर्जाची बनविण्यासाठी त्यांना सर्व सरकारी नियम आणि कायद्यांतून मुक्तता देणे. दुसरं, येत्या पाच वर्षात ह्या विद्यापीठांना १० हजार कोटी रुपये देणे. पण ह्या विद्यापीठांची निवड कुठल्या नेत्याच्या इच्छेनुसार होणार नाही. पंतप्रधानांच्या इच्छेनुसार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे पत्र/ शिफारस यामुळे होणार नाही. देशभरातील विद्यापीठांना हे आव्हान दिले आहे. आणि प्रत्येक विद्यापीठाला हे आव्हान स्वीकारावे लागेल, स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि ह्यातून पहिल्या दहा खाजगी आणि पहिल्या दहा सरकारी विद्यापीठांची निवड होईल. आणि एक निष्पक्ष व्यावसायिक संस्था आव्हान गटात ह्यांची निवड करेल. ह्या आव्हान गटात राज्य सरकारांची देखील जबाबदारी असेल, ज्या शहरात हे विद्यापीठ असेल, त्या शहराची जबाबदारी असेल. जे लोक विद्यापीठ चालवत असतील त्यांची जबाबदारी असेल. त्यांच्या इतिहासाचे, त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. जागतिक स्तरावर पुढे जाण्यासाठी त्यांनी तयार केलेला आराखडा तपासला जाईल. आणि ह्यातून पहिल्या १० – १०, एकूण २० विद्यापीठांना सरकारी नियम, कायदे आणि बंधनातून मुक्त करून स्वायत्तता दिली जाईल. त्यांना हव्या असलेल्या दिशेने प्रगती करण्याची त्यांना मुभा दिली जाईल. ह्यासाठी पाच वर्षात ह्या विद्यापीठांना दहा हजार कोटी रुपये दिले जातील. हे केंद्रीय विद्यापीठांपेक्षा कितीतरी जास्त आहे. हा फार मोठा निर्णय आहे आणि पाटणा विद्यापीठ यात मागे राहायला नको. म्हणून मी हे निमंत्रण द्यायला आलो आहे. माझी आपल्याला आग्रहपूर्वक विनंती आहे, पाटणा विद्यापीठाने यात पुढाकार घ्यावा, इथल्या शिक्षकांनी हे आव्हान स्वीकारून ह्या महत्वपूर्ण योजनेत सहभाग घ्यावा. पाटणा विद्यापीठ देशाचे भूषण आहे, शक्ती आहे. ही शक्ती जागतिक स्तरावर नेण्यासाठी आपण माझ्यासोबत चला. ह्याच सद्भावनेसह माझ्याकडून आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा.
ह्या शताब्दी समारोहात आपण केलेले संकल्प पूर्ण होवोत अशी मी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद.