वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह, जो बोले सो निहाल! सत् श्री अकाल! गुरपूरबच्या पावन पर्वाच्या या आयोजनात आपल्यासोबत उपस्थित असणारे सरकारमधील माझे सहकारी हरदीप सिंह पुरी जी, जॉन बरला जी, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष लालपुरा जी सिंह साहिब भाई रंजीत सिंह जी, हरमीत सिंह काल्का जी, आणि सर्व बंधु - भगिनींनो!
मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना गुरुपूरब निमित्त, प्रकाश पर्वानिमित्त अनेक शुभेच्छा देतो. आज देशभरात देव – दिवाळी साजरी केली जाते आहे. विशेषत: काशीमध्ये भव्य कार्यक्रम होत असून, लक्षावधी दिवे उजळून देवी - देवतांचे स्वागत केले जाते आहे. देव - दीपावलीनिमित्त सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो.
मित्रहो,
एक कार्यकर्ता म्हणून मी पंजाबच्या भूमीवर मोठा काळ व्यतीत केला आहे आणि त्या काळात गुरुपूरब निमित्त अमृतसरमधील हरमंदिर साहिबसमोर प्रार्थना करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आता मी सरकारमध्ये आहे. गुरूंचे हे महत्त्वाचे प्रकाश पर्व आमच्या सरकारच्या काळात आले हे माझे आणि माझ्या सरकारचेही खूप मोठे भाग्य आहे, असे मला वाटते. गुरु गोविंद सिंह जी यांचे 350 वे प्रकाश पर्व साजरे करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे. आम्हाला गुरु तेग बहादूरजी यांचे 400 वे प्रकाश पर्व साजरे करण्याचे सौभाग्यही लाभले आणि आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे, लाल किल्ल्यावर एक ऐतिहासिक आणि संपूर्ण जगाला संदेश देणारा कार्यक्रम झाला होता. तीन वर्षांपूर्वी आम्ही गुरू नानकदेव जीं यांचा 550 वा प्रकाशोत्सव सुद्धा देशात आणि परदेशातही उत्साहात साजरा केला होता.
मित्रहो,
या विशेष प्रसंगी देशाला आपल्या गुरूंचा जो आशीर्वाद मिळाला आहे, त्यांच्यापासून जी प्रेरणा मिळाली आहे, त्यातून नव भारत घडवण्याची उर्जा प्राप्त होते आहे. आज आपण गुरू नानकदेव यांचे पाचशे त्रेपन्नावे प्रकाश पर्व साजरे करत आहोत आणि या अनेक वर्षांमध्ये गुरूंच्या आशीर्वादामुळे देशाने किती ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे, हे सुद्धा आपण पाहत आहोत.
मित्रहो,
शीख परंपरेतील प्रकाश पर्वाची जी शिकवण आहे, जे महत्व आहे, आज देशही त्याच तन्मयतेने कर्तव्य आणि सेवेची परंपरा पुढे घेऊन चालला आहे. प्रत्येक प्रकाश पर्वाचा प्रकाश देशासाठी प्रेरणादायी ठरतो आहे. या अलौकिक कार्यक्रमांचा भाग होण्याची, सेवेत सहभागी होण्याची संधी मला सतत मिळत राहिली हे माझे सौभाग्य आहे. गुरु ग्रंथ साहिब समोर नतमस्तक होण्याचा हा आनंद लाभत राहो, गुरबानीचे अमृत कानावर पडत राहो, लंगरच्या प्रसादाचा आस्वाद घेता येत राहो, त्यातून आयुष्यातील समाधानाची अनुभूती लाभत राहते आणि देशासाठी, समाजासाठी समर्पण भावनेने सतत काम करण्याची ऊर्जा देखील अक्षय राहते. या कृपेबद्दल गुरू नानक देवजी आणि आपल्या सर्व गुरूंच्या चरणी मी कितीही वेळा नतमस्तक झालो, तरी ते कमीच असेल.
मित्रहो,
गुरु नानकदेवजी यांनी आपल्याला आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवला आहे. ते म्हणाले होते – “नाम जपो, किरत करो, वंड छको”, अर्थात भगवंताचे नामस्मरण करा, कर्तव्याच्या मार्गावर चालताना कष्ट करा आणि एकमेकांसोबत वाटून खा. या एका वाक्यात आध्यात्मिक चिंतन आहे, भौतिक समृद्धीचे सूत्र आहे आणि सामाजिक समरसतेची प्रेरणा सुद्धा आहे. आज स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत काळात याच गुरुमंत्रानुसार आचरण करत अवघा देश 130 कोटी भारतीयांच्या कल्याणाच्या भावनेसह पुढे चालला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत काळात देशाने आपली संस्कृती, आपला वारसा आणि आपली आध्यात्मिक ओळख याविषयी अभिमानाची भावना चेतवली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत काळ हा देशाप्रति कर्तव्याची चरमसीमा गाठण्याचा काळ आहे, असे मानून देशाची आगेकूच सुरू आहे. आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत काळात देश समता, समरसता, सामाजिक न्याय आणि एकतेसाठी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या मंत्राचे पालन करतो आहे. म्हणजेच शतकांपूर्वी गुरुवाणीमधून देशाला जे मार्गदर्शन मिळाले होते, ते मार्गदर्शन आजही आपल्यासाठी परंपरा आहे, श्रद्धा आहे आणि विकसित भारताचा दृष्टीकोनही आहे.
मित्रहो,
गुरुग्रंथ साहिबच्या स्वरूपात आपल्याकडे जी अमृतवाणी आहे, त्याची महत्ता, सार्थकता ही काल मर्यादेच्या आणि भौगोलिक मर्यादेच्या पलीकडची आहे. मोठे संकट आले की निवारणाची प्रासंगिकताही वाढते, हे सुद्धा आपण अनुभवले आहे.
आज संपूर्ण विश्वामध्ये जी अशांतता आहे, जी अस्थिरता आहे, आज जग ज्या कठीण काळातून जात आहे, त्यामध्ये गुरू साहिब यांची शिकवण आणि गुरू नानकदेव यांचे जीवन म्हणजे, एका मशालीप्रमाणे विश्वाला दिशा देत आहे. गुरूनानक यांनी दिलेला प्रेमाचा संदेश लोकांमध्ये निर्माण झालेली मोठ-मोठी दरी भरून काढू शकतो. आणि त्याचे प्रमाण आपणच भारताच्या या भूमीवरूनच देत आहोत. इतक्या भाषा, इतक्या बोली, इतक्या प्रकारच्या खाण्या-पिण्याच्या पद्धती, वेगवेगळ्या वेशभूषा असतानाही आम्ही एक हिंदुस्थानी म्हणून नांदत आहोत. देशाच्या विकासासाठी स्वतः खपत आहोत, परिश्रम करीत आहोत. म्हणूनच आपण जितके आपल्या गुरूंच्या आदर्शांनुसार वाटचाल करू, आपसातले मतभेद जितके दूर करू, तितकी जास्त, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना आपण मजबूत करू शकणार आहे. आपण जितके मानवतेच्या मूल्याला प्राधान्य देवू, आपल्या गुरूंची वाणी तितकीच जीवंत आणि प्रखर स्वराने विश्वातल्या जन-जनांपर्यंत पोहोचणार आहे.
मित्रांनो,
गेल्या 8 वर्षांमध्ये मला गुरूनानक देव यांच्या आशीर्वादाने शीख परंपरेच्या गौरवासाठी सातत्याने काम करण्याची संधी मिळाली. आणि या कामामध्ये सातत्य कायम होते. तुम्हा मंडळींना माहिती असेल, अलिकडेच काही दिवसांपूर्वीच मी उत्तराखंडमधल्या माणा गावामध्ये गेलो होतो. या दौ-यामध्ये मला गोविंदघाट ते हेमकुंड साहिब येथे जाण्यासाठी रोप -वे प्रकल्पाचा शिलान्यास करण्याचे सौभाग्य मिळाले. याचप्रमाणे, अलिकडेच दिल्ली ते ऊना वंदेभारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. यामुळे आनंदपूर साहिबला जाणा-या भक्तांसाठी एक नवीन आधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. याआधी गुरू गोबिंद सिंह जी यांच्याशी संबंधित स्थानांना जोडणा-या रेल्वे सुविधेचे आधुनिकीकरणही केले आहे. आमचे सरकार दिल्ली -कटरा- अमृतसर एक्सप्रेस वे म्हणजेच द्रुतगती मार्ग तयार करण्याचे कामही करीत आहे. यामुळे दिल्ली आणि अमृतसर यांच्यामधील अंतर 3 ते 4 तासांनी कमी होणार आहे. यासाठी आमचे सरकार 35 हजार कोटी रूपयांपेक्षाही जास्त खर्च करणार आहे. हरमंदिर साहिब यांचे दर्शन सुलभतेने व्हावे, या भावनेने आमचे सरकार हे पुण्याचे काम करीत आहे.
आणि मित्रांनो,
ही सर्व कामे केवळ सुविधा आणि पर्यटन यांच्या शक्यता वाढण्यासाठी केले जात आहे, असा हा विषय नाही. तर यामध्ये आपल्या तीर्थ क्षेत्रांच्या स्थानी असलेली ऊर्जा, शीख परंपरेचा वारसा आणि एक व्यापक बोधही जोडला गेला आहे. हा बोध सेवेचा आहे. हा बोध स्नेहाचा आहे. हा बोध आपलेपणाचा आहे. हा बोध श्रद्धेचा आहे. ज्यावेळी अनेक दशके, प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर करतारपूर साहिब कॉरिडॉर मुक्त करण्यात आला, त्यावेळी माझ्या मनाला जे समाधान मिळाले, त्याचे वर्णन शब्दात करणे मला खूप अवघड आहे. शीख परंपरा अधिक सशक्त कराव्यात, असा आमचा प्रयत्न सतत सुरू आहे. शीख वारसा सशक्त करीत राहिले पाहिजे. तुम्ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने जाणून आहात की, काही काळापूर्वी अफगाणिस्तानमध्ये कशा प्रकारे स्थिती बिघडली होती. तिथल्या हिंदू-शीख परिवारांना मायदेशी परत आणण्यासाठी आम्ही मोहीम चालवली. गुरूग्रंथ साहिब यांच्या श्रद्धा स्वरूपांनाही आम्ही सुरक्षित आणले. 26 डिसेंबरला गुरूगोविंद सिंह जी यांच्या साहिबजादांच्या महान बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यास प्रारंभही देशात केला आहे. देशाच्या काना-कोप-यामध्ये, भारतातील आजची पिढीने, भारताच्या येणा-या पिढ्यांनी, या महान भूमीची परंपरा नेमकी काय आहे, ते जाणून तरी घेतले पाहिजे. ज्या भूमीवर आपण जन्म घेतला आहे, जी आमची मातृभूमी आहे, त्यासाठी साहिबजादांसारखे बलिदान देणे, म्हणजे कर्तव्याचा परमोच्च बिंदू गाठणे आहे. अशा गोष्टी संपूर्ण विश्वामाध्ये फारच कमी दिसतील.
मित्रांनो,
फाळणीमध्ये आपल्या पंजाबातील लोकांनी, देशातल्या लोकांनी जे बलिदान दिले, त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ देशाने ‘विभाजन विभीषिका स्मृती’ दिवस पाळण्यास प्रारंभ केला आहे. फाळणीचे शिकार बनलेल्या हिंदू- शीख परिवारांसाठी आम्ही सीएए कायदा आणून त्यांना नागरिकत्व देण्याचाही एक मार्ग बनविण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ताच आपण पाहिले असेल की, विदेशात ज्यांना प्रतारणा सहन करावी लागली, जे विदेशात पीडित होते, त्या शीख परिवारांना गुजरात राज्याने नागरिकत्व देवून हे स्पष्ट केले की, जगामध्ये, संपूर्ण दुनियेत शीख कुठेही असले तरी, भारत हे त्यांचे आपले घर आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मला गुरूव्दारा कोट लखपत साहिबचा जीर्णोद्धार आणि कायाकल्प करण्याचे सौभाग्यही मिळाले होते. मित्रांनो, या सर्व कार्यांच्या सातत्यामागे मूळ कारण म्हणजे गुरूनानक देव यांनी दाखवलेल्या मार्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आहे. या सातत्यपूर्ण कामाच्या मूळाशी गुरू अर्जनदेव आणि गुरू गोविंद सिंह यांच्या अमूल्य बलिदानाचे ऋण आहे. हे ऋण पावलो-पावली चुकते करणे देशाचे कर्तव्य आहे. मला विश्वास आहे की, गुरूंच्या कृपेमुळे भारत आपल्या शीख परंपरेचा गौरव वृद्धिंगत करेल आणि प्रगती करीत पुढील मार्गक्रमणा करीत राहील. याच भावनेने मी पुन्हा एकदा, गुरू चरणी नमन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, सर्व देशवासियांना ‘गुरू पूरब’ निमित्त शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद !