Releases commemorative coin and postal stamp in honour of Sri Aurobindo
“1893 was an important year in the lives of Sri Aurobindo, Swami Vivekananda and Mahatma Gandhi”
“When motivation and action meet, even the seemingly impossible goal is inevitably accomplished”
“Life of Sri Aurobindo is a reflection of ‘Ek Bharat Shreshtha Bharat’
“Kashi Tamil Sangamam is a great example of how India binds the country together through its culture and traditions”
“We are working with the mantra of ‘India First’ and placing our heritage with pride before the entire world”
“India is the most refined idea of human civilization, the most natural voice of humanity”

नमस्कार !

श्री अरविंदो यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मी हृदयापासून अभिनंदन करतो. या पुण्य कार्यक्रमप्रसंगी मी सर्व

देशवासियांनाही अनेक-अनेक शुभेच्छा देतो. श्री अरविंदो यांची 150 वी जयंती संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्यांचे विचार आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी देशाने यावर्षी विशेष रूपाने कार्य करण्याचा संकल्प केला होता. यासाठी एक विशेष उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली होती. संस्कृती मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेमध्ये महर्षींच्या तपोभूमीमध्‍ये म्हणजेच पुडुचेरीच्या भूमीवर, आज राष्ट्र त्यांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आज श्री अरविंदो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. मला विश्वास आहे की, श्री अरविंदो यांचे जीवन आणि त्यांची शिकवण यांपासून  प्रेरणा घेवून राष्ट्राचे संकल्प पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना एक नवीन शक्ती देतील, नवीन ताकद देतील.

मित्रांनो,

इतिहासामध्ये अनेकवेळा एकाच कालखंडामध्ये विविध अद्भूत घटना एकाचवेळी घडल्या आहेत. परंतु सर्वसामान्यपणे त्यांना एक केवळ योगायोग मानला जातो. मला असे वाटते की, ज्यावेळी अशा प्रकारचे योगायोग घडतात, त्यावेळी त्यामागे कोणती ना कोणती योग शक्ती काम करीत असते. योग शक्ती याचा अर्थ एक सामूहिक शक्ती. सर्वांना जोडणारी शक्ती! आपण भारताच्या इतिहासामध्ये पाहिले आहे, अनेक महापुरूष इथे होवून गेले आहेत. त्यांनी स्वातंत्र्याची भावना सशक्त केली आणि आत्म्याला साद घालून एकप्रकारे पुनर्जीवन दिले. असे तीन महापुरूष आहेत - श्री अरविंदो, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी. यांच्या जीवनातल्या सर्वात महत्वपूर्ण घटना, एकाच वेळी घडल्या आहेत. या घटनांमुळे या महापुरूषांचे जीवनही पूर्णपणे बदलून गेले आणि राष्ट्र जीवनामध्येही खूप मोठे परिवर्तन घडून आले. 1893 मध्ये 14 वर्षांनंतर श्री अरविंदो इंग्लंडमधून भारतात परतले. 1893 मध्येच  स्वामी विवेकानंद विश्व धर्म संसदेमध्ये आपले विख्यात भाषण करण्यासाठी अमेरिकेला गेले. आणि याचवर्षी गांधीजी दक्षिण अफ्रिका गेले. तिथूनच त्यांच्या महात्मा गांधी बनण्याचा प्रवास सुरू झाला. आणि पुढे जावून देशाच्या स्वातंत्र्यासाठी महानायक मिळाला.

बंधू- भगिनींनो,

आज पुन्हा एकदा आपला भारत एकाच वेळी अशा अनेक योगायोगांचा साक्षीदार बनत आहे. आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करीत आहे, अमृतकाळाची आपली यात्रा सुरू होत आहे, त्याचवेळी आपण श्री अरविंदो यांची 150 जयंती साजरी करीत आहोत. याच कालखंडामध्ये आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे साक्षीदारही बनले आहोत. ज्यावेळी प्रेरणा आणि कर्तव्य, मोटिव्हेशन म्हणजेच प्रेरणा आणि अॅक्शन म्हणजेच कृती एकत्र येतात, त्यावेळी आसामान्य- अशक्य वाटतील अशी लक्ष्येही साध्य होतात. स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये देशाचे यश, देशाने जे काही साध्य केले आहे आणि ‘सबका प्रयास’चा जो संकल्प केला आहे, त्याचे हे प्रमाण आहे.

मित्रांनो,

 

श्री अरविंदो यांचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारता’ चे प्रतिबिंब आहे. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता, मात्र ते बंगाली, गुजराती, मराठी, हिंदी आणि संस्कृतसहीत अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांचा जन्म भलेही बंगालमध्ये झालेला होता, परंतु त्यांनी आपल्या जीवनाचा बहुतांश काळ गुजरात आणि पुडुचेरीमध्ये व्यतीत केला. ते जिथे जिथे गेले, तिथे त्यांनी आपल्या व्यक्तित्वाचा अमिट ठसा उमटवला. आज आपण देशाच्या कोणत्याही भागामध्ये गेलो तर, महर्षी अरविंदो यांचे आश्रम, त्यांचे अनुयायी, त्यांचे प्रशंसक, सर्व ठिकाणी भेटतील. त्यांनी आपल्याला दाखवून दिले की, ज्यावेळी आपण आपली संस्कृती जाणून, समजून घेतो, त्याप्रमाणे जगायला लागतो, त्यावेळी आपल्याकडे असलेली विविधता आपल्या जीवनाचा एक सहज उत्सव बनते .

मित्रांनो,

हे स्वातंत्र्याच्या अमृतकाळासाठी खूप मोठी प्रेरणा देणारे आहे. एक भारत , श्रेष्ठ भारताची, यापेक्षा उत्तम गोष्ट कोणती असू शकते? काही दिवसांपूर्वीच मी काशीला गेलो होतो. तिथे काशी-तमीळ संगमम कार्यक्रमाचा भाग बनण्याची संधी मला मिळाली. अतिशय अद्भूत आयोजन करण्यात आले होते. भारत कशा पद्धतीने आपल्या परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून कसा अतूट आहे, अटल -दृढ आहे, ही गोष्ट आपल्याला या उत्सवामध्ये पहायला मिळाली. आजचा युवावर्ग नेमका काय विचार करतो, हे काशी-तमिळ संगमममध्ये पहायला मिळाले. आज संपूर्ण देशातल्या  युवकांनी भाषा-वेशभूषा यांच्या आधारावर भेदभाव करणारे राजकारण केव्हाच मागे सोडले आहे. आजचा युवावर्ग एक भारत, श्रेष्ठ भारत या राष्ट्रनीतीने प्रेरीत आहे. आज ज्यावेळी आपण श्री अरविंदो यांचे स्मरण करीत आहोत,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत, त्यावेळी आपण काशी-तमिळ संगममच्या भावनेचा विस्तार केला पाहिजे.

मित्रांनो,

महर्षी अरबिंदो यांच्या जीवनाकडे बारकाईने पाहिले तर भारताचा आत्मा आणि भारताच्या विकास प्रवासाचे मूलभूत तत्त्वज्ञान आपल्याला आढळते. अरबिंदो हे एक असे व्यक्तिमत्व होते – ज्यांच्या जीवनात आधुनिक वैज्ञानिक स्वभाव, राजकीय बंडखोरी आणि दैवी भावनाही होती. त्यांचे शिक्षण इंग्लंडमधील सर्वोत्तम संस्थांमध्ये झाले. त्यांना त्या काळातील सर्वात आधुनिक वातावरण लाभले, जागतिक स्तरावर  संधी मिळाली. त्यांनी स्वतः आधुनिकतेचा स्वीकार तितक्याच मोकळ्या मनाने केला. पण, तेच अरबिंदो मायदेशात परतल्यावर, ब्रिटीश राजवटीला विरोध करणारे नायक ठरले.  देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. ते पहिले स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी संपूर्ण स्वराज्याबाबत  उघडपणे  मागणी केली, काँग्रेसच्या ब्रिटीश समर्थक धोरणांवर उघडपणे टीका केली. ते म्हणाले होते- "आपल्या राष्ट्राची पुनर्बांधणी करायची असेल तर आपल्याला ब्रिटिश संसदेसमोर रडणाऱ्या मुलाप्रमाणे विनवणी करणे थांबवावे लागेल".

बंगालच्या फाळणीच्या वेळी अरबिंदो यांनी तरुणांची भरती केली, आणि नारा दिला - नो कॉम्प्रोमाइज! कोणतीही तडजोड नाही! त्यांनी 'भवानी मंदिर' नावाची पत्रिका छापली, निराशेने ग्रासलेल्या लोकांना सांस्कृतिक राष्ट्राचे दर्शन घडवले. अशी वैचारिक स्पष्टता, एवढी सांस्कृतिक ताकद आणि ही देशभक्ती! म्हणूनच त्या काळातील महान स्वातंत्र्यसैनिक श्री अरबिंदो याना आपला प्रेरणास्रोत मानत असत. नेताजी सुभाष यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी त्यांना आपल्या संकल्पांचे प्रेरणास्थान मानले. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही त्यांच्या जीवनातील बौद्धिक आणि आध्यात्मिक खोली बघाल तेव्हा तुम्हाला तितकेच संयमी आणि सजग ऋषी दिसतील. ते आत्मा आणि ईश्वर यासारख्या गहन विषयांवर प्रवचन करायचे, ब्रह्म तत्व आणि उपनिषद म्हणजे काय ते उलगडून सांगायचे. जीव आणि ईश या तत्त्वज्ञानात त्यांनी समाजसेवेचे सूत्र जोडले. नर ते नारायण असा प्रवास कसा करायचा हे श्री अरबिंदो यांच्या शब्दांतून तुम्ही सहज शिकू शकता. हे संपूर्ण भारताचे चरित्र आहे, ज्यामध्ये अर्थ आणि काम याचे भौतिक सामर्थ्य आहे, ज्यामध्ये धर्माची म्हणजे कर्तव्याची अद्भुत भक्ती आहे, आणि मोक्ष  म्हणजे अध्यात्माचा ब्रह्म-साक्षात्कार आहे. म्हणूनच, आज अमृतकालमध्ये, जेव्हा देश पुन्हा एकदा पुनर्रचनेसाठी वाटचाल करत आहे, तेव्हा ही समग्रता  आपल्याला 'पंच प्रण'मध्ये दिसून येते. आज आपण विकसित भारत बनवण्यासाठी सर्व आधुनिक कल्पना, सर्वोत्तम पद्धती स्वीकारत आहोत आणि अंगीकारत आहोत. ‘भारत प्रथम’ हा मंत्र समोर ठेवून आम्ही कोणतीही तडजोड न करता, कोणत्याही अहंकाराशिवाय काम करत आहोत. आणि त्याच बरोबर आज आपण आपला वारसा आणि आपली ओळख जगासमोर अभिमानाने मांडत आहोत.

बंधू भगिनींनो,

महर्षी अरबिंदो यांचे जीवन भारताच्या आणखी एका सामर्थ्याची जाणीव करून देते. देशाची ही शक्ती, 'हा स्वातंत्र्याचा आत्मा' आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती! महर्षी अरबिंदो यांच्या वडिलांना, सुरुवातीला इंग्रजी प्रभावाखाली, त्यांना भारत आणि भारतीय संस्कृतीपासून पूर्णपणे दूर ठेवायचे होते. ते हजारो मैल दूर असलेल्या इंग्रजी वातावरणात भारतापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. मात्र , जेव्हा ते भारतात परतले, जेव्हा तुरुंगात गीतेच्या संपर्कात आले, तेव्हा ते अरबिंदो भारतीय संस्कृतीचा बुलंद आवाज म्हणून उदयास आले. त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास केला. रामायण, महाभारत आणि उपनिषदांपासून ते कालिदास, भवभूती आणि भर्तृहरी पर्यंतच्या ग्रंथांचे भाषांतर केले. ज्या अरबिंदो याना तरुणपणात भारतीयत्वापासून दूर ठेवण्यात आले होते, आता लोक त्यांच्या विचारांमध्ये भारत पाहू लागले. हेच  भारतीयत्वाचे खरे सामर्थ्य आहे. कोणी कितीही पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, आपल्या अंतःकरणातून काढण्याचा प्रयत्न केला! तरी भारत हे ते अमर बीज आहे जे प्रतिकूल परिस्थितीत थोडे दबून जाऊ शकते, थोडे कोमेजू शकते पण ते मरू शकत नाही, ते अजय आहे, अमर आहे. कारण, भारत हा मानवी सभ्यतेचा सर्वात सुसंस्कृत विचार आहे, मानवतेचा सर्वात नैसर्गिक आवाज आहे. महर्षी अरबिंदो यांच्या काळातही तो अमर होता आणि तो स्वातंत्र्याच्या अमृत काळातही आजही अमर आहे. आज भारतातील तरुण आपल्या सांस्कृतिक स्वाभिमानाने भारताची स्तुती करत आहेत. आज जगासमोर  भीषण आव्हाने आहेत. ही आव्हाने सोडवण्यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणूनच महर्षी अरबिंदो यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण स्वतःला तयार केले पाहिजे. सबका प्रयास द्वारे विकसित भारत घडवायचा आहे. महर्षी अरबिंदो याना पुन्हा एकदा वंदन करून, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi