श्री मायकल ब्लूमबर्ग, विचारवंत, उद्योग जगतातील धुरीण आणि ब्लूमबर्ग नव अर्थव्यवस्था मंचाचे मान्यवर सहभागी प्रतिनिधी

मायकल आणि ब्लूमबर्ग सेवाप्रतिष्ठानाचा चमू करत असलेल्या महत्वाच्या सामाजिक कार्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करतो. भारताच्या स्मार्ट सिटी अभियानाची रूपरेखा तयार करण्यात त्यांच्या चमूने केलेली मदत अत्यंत उपयुक्त ठरली.

मित्रांनो,

आज आपण आपल्या इतिहासाच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर आहोत. जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या आज शहरी भागात राहते.येत्या दोन दशकांमध्ये भारत आणि काही आफ्रिकी देशांमध्ये नागरीकरणाची आजवरची सर्वात मोठी लाट अनुभवायला येणार आहे. मात्र, कोविड-19 महामारीमुळे जगासमोर अनेक मोठमोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. या आजाराने आपल्याला दाखवून दिले आहे की, आपली शहरे, जी अर्थव्यवस्थांच्या विकासाची इंजिने होती, ती देखील अशा संकटांना बळी पडू शकतात. जागतिक महामंदीनंतर पहिल्यांदाच आज जगातील अनेक शहरांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीच्या स्थितीत असल्याचे जाहीर केले आहे.आजपर्यंत शहरात राहण्याचे जे फायदे समजले जात असत, त्यांच्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. सामुदायिक समारंभ, क्रीडा स्पर्धा, शिक्षण आणि मनोरंजनाची साधने या सर्व गोष्टी आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. आज जगापुढे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे-पुन्हा सुरुवात कशी करायची?  नव्याने पुनर्मांडणी केल्याशिवाय, नव्याने सुरुवात करणे शक्य होणार नाही. पुनर्मांडणी मानसिकतेची, पुनर्मांडणी प्रक्रियांची आणि पुनर्मांडणी पद्धतींची.

मित्रांनो,

दोन जागतिक महायुद्धांनंतर झालेले ऐतिहासिक पुनर्रचनेचे प्रयत्न कदाचित आपल्याला अनेक धडे देऊ शकतील, असे मला वाटते. या महायुद्धांनंतर संपूर्ण जग नव्या मांडणीनुसार कार्यरत झाले. नवे प्रोटोकॉल तयार करण्यात आले आणि जगाने स्वतःमध्ये अनेक बदल केले. कोविड-19 ने देखील आपल्याला आता प्रत्येक क्षेत्रात नवे प्रोटोकॉल विकसित करण्याची तशीच संधी पुन्हा दिली आहे. आपल्याला जर भविष्यासाठी एक लवचिक व्यवस्था विकसित करायची असेल, तर जगाने परिवर्तनाची ही गरज,  संधी म्हणून स्वीकारायला हवी. कोविड नंतरच्या गरजांचा आपल्याला विचार करायला हवा. आणि त्यासाठी सुरुवात करण्याचे सर्वात उत्तम क्षेत्र म्हणजे आपल्या नागरी केंद्रांचा कायापालट करणे.

मित्रांनो,

आज इथे, मला आपल्यासमोर, भारतीय शहरांची एक सकारात्मक बाजू मांडायाची आहे.भारतीय शहरांनी या कठीण काळात अनेक असामान्य उदाहरणे दाखवली आहेत.कोरोनाच्या काळात लावाव्या लागलेल्या लॉकडाऊनला अनेक शहरांमध्ये मोठा विरोध झाला. मात्र, भारतातील शहरांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक सर्व प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केले. कारण, आमच्यासाठी, आमच्या या मोठमोठ्या शहरांना बांधणारी गोष्ट सिमेंट-कॉंक्रीट नाही, तर ती आहे, समाज! एकत्रित राहण्याची ताकद! या महामारीने हे पुन्हा एकदा सिध्द केले, की समाज असो किंवा मग उद्योगव्यवसाय, आमचे सर्वात मोठे संसाधन आहे, आमची माणसे. आणि कोविडनंतरचे जग उभारायचे असेल, तर त्यासाठी या महत्वाच्या आणि मूलभूत संसाधनाची जपणूक करायला हवी. शहरे विकासाची गतिमान इंजिन्स आहेत. जगाला आज हवा असलेला बदल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.  अनेकदा लोक शहरात यासाठी स्थलांतर करतात कारण शहरे त्यांच्या हाताला काम देतात. मात्र आता अशी वेळ आली आहे की आपण शहरांना माणसांसाठी काम करायला लावले पाहिजे. कोविड-19 ने आपल्याला तशी संधी दिली आहे, ज्यामुळे आपण आपली शहरे लोकांच्या जगण्यासाठी अधिक सक्षम-सुखकर बनवू शकू. यात निवासाची उत्तम सुविधा, कामाचे उत्तम वातावरण, छोटे आणि प्रभावी प्रवास करण्याच्या यंत्रणा यांचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात, अनेक शहरांमध्ये आपल्याला स्वच्छ तलाव आणि नदीपात्रे बघायला मिळाली, स्वच्छ हवेचा अनुभव घेतला. आपल्यापैकी अनेकांनी पक्ष्यांची किलबिल ऐकली, ज्याकडे आपलं याआधी कधीही लक्ष गेलं नव्हतं. मग आपण अशी शाश्वत दृष्ये विकसित करु शकत नाही का, जिथे हि सगळी वैशिष्ट्ये अपवाद न राहता नेहमीच्या गोष्टी असतील? भारतातली शहरे अशी केंद्रे बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जिथे सुविधा शहरांच्या असतील मात्र, त्याचा गाभा गावांसारखा असेल.   

मित्रांनो,

या महामारीच्या काळात आपले काम अव्याहतपणे सुरु राहावे यासाठी तंत्रज्ञानानेही आपल्याला मोठी मदत केली आहे. अगदी साध्या अशा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या सुविधेमुळे, मी अनेक बैठकांमध्ये सहभागी होऊ शकलो. या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच आपल्यातले प्रत्यक्ष अंतर कमी करुन मी तुम्हा सर्वांशी संवाद साधू शकलो. मात्र, यासोबत कोविडनंतरच्या जगासाठी एक विलक्षण प्रश्न देखील आहे. आपण यानंतरही कोविड काळाप्रमाणेच आपल्या या परिषदा/बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारेच सुरु ठेवणार आहोत का? की आपण संपूर्ण खंडप्राय अंतर पार करणारा दीर्घ प्रवास करुन एखाद्या परिषदेत सहभागी होणार आहोत?शहरी यंत्रणांवरचा ताण कमी करणे आपल्या आवडीनिवडींवर अवलंबून आहे.

या आवडीनिवडींमुळेच आपल्याला काम आणि आयुष्य यांच्यातला समतोल अधिक चांगल्या प्रकारे साधता येणार आहे. आजच्या युगात, लोकांना कुठूनही काम करण्यास आणि कुठेही राहण्यासाठी सक्षम करणे, आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनण्याच्या सुविधा देणे ही अत्यंत महत्वाची गरज बनली आहे.म्हणूनच, आम्ही तंत्रज्ञान आणि ज्ञान-सक्षम सेवा क्षेत्रासाठी अत्यंत साध्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यातून त्यांना ‘घरून काम’ किंवा ‘कुठूनही काम’करणे शक्य होईल. 

मित्रांनो,

परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेशिवाय आपली शहरे प्रगती करु शकणार नाहीत. हे लक्षात घेऊन, आम्ही 2015 साली ‘सर्वांसाठी घरे’ हे अभियान जाहीर केले. आणि मला हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही या अभियानाची उद्दिष्टे निश्चित वेळेत पूर्ण करतो आहोत. आतापर्यंत आम्ही शहरी भागातील इच्छुक अशा एक कोटी कुटुंबांना 2022 पर्यंत घरे उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण करणार आहोत.

या महामारीने निर्माण केलेली परिस्थिती बघता, आम्ही परवडणाऱ्या दरातील भाड्याच्या घरांची योजनाही सुरु केली आहे. आम्ही बांधकाम नियमन कायदा (रेरा) लागू केला आहे. यामुळे, बांधकाम उद्योगातील सर्व समीकरणे बदलली आहेत. तसेच यामुळे, हे क्षेत्र अधिक ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक झाले आहे.

मित्रांनो,

शाश्वत गतिमानता ही लवचिक शहरे निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे. सध्या देशातील 27 शहरांमध्ये मेट्रो रेल्वेची कामे सुरु आहेत. देशात 2022 पर्यंत 1000 किमी मार्गाचे मेट्रो वाहतूक जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या योग्य मार्गाने आम्ही जात आहोत. आमच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे वाहतूक क्षेत्रात अनेक स्वदेशी बनावटीची उपकरणे निर्माण होऊ लागली आहेत. परिणामी, आम्हाला आमच्या शाश्वत वाहतूक व्यवस्थेचे उद्दिष्ट अधिक लवकर साध्य करता येणार आहे.

मित्रांनो,

स्मार्ट समृद्ध आणि लवचिक शहरांची निर्मिती करण्यासाठीच्या प्रवासात, तंत्रज्ञानाचेही महत्वाचे योगदान असते.शहरांचे योग्य आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि एकमेकांशी जोडलेले शहरी समाज  निर्माण करण्यासाठीही-तंत्रज्ञानाचा योग्य वापर होऊ शकतो. आज आम्ही अशा भविष्याकडे बघतो आहोत, जिथे शिक्षण, आरोग्य, बाजारहाट, हॉटेलिंग-खरेदी अशा सर्व कामांना अधिकाधिक ऑनलाईन स्वरूपात करता येईल. आपल्या शहरांना आता प्रत्यक्ष जगापासून डिजिटल जगाकडे जाण्याची तयारी करावी लागणार आहे. आमचे उपक्रम- डिजिटल इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया हे अशाप्रकारची क्षमताविकसित करण्यासाठी मदत करत आहेत. आम्ही दोन स्तरीय प्रक्रियांमधून, 100 स्मार्ट सिटीजची निवड केली आहे. देशाच्या सहकार्यात्मक आणि स्पर्धात्मक संघराज्य पद्धतीच्या तत्वानुसार ही देशव्यापी स्पर्धा घेण्यात आली होती.

या शहरांनी सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरु केले.त्यापैकी सुमारे एक लाख 40 हजार रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प एकतर पूर्ण झाले आहेत किमावा पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

तंत्रज्ञानाच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्यासाठी, अनेक शहरांमध्ये एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सध्या विविध शहरांमध्ये कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी ही केंद्रे वॉर रूम म्हणूनही कार्यरत आहेत.

शेवटी, मला तुम्हा सर्वांना एका गोष्टीचे स्मरण करुन द्यायचे आहे. जर आपल्याला शहरीकरणात गुंतवणूक करायची असेल, तर भारतात आपल्यासाठी अनेक आकर्षक संधी आहेत. जर आपल्याला वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर, भारतात संधी आहेत, जर नवोन्मेष, शाश्वत सुविधा, उपाययोजना यात गुंतवणूक करायची असेल, तरीही भारतात आपल्याला अनेक आकर्षक संधी उपलब्ध आहेत. आणि या संधी अत्यंत आधुनिक, गतिमान अशा लोकशाही शासन व्यवस्थेसोबत आहेत. उद्योगसुलभ वातावरण, मोठी बाजारपेठ आणि एक असे सरकार, जे भारताला जागतिक गुंतवणुकीचे पसंतीचे केंद्र बनवण्यासाठीच्या प्रयत्नात कुठेही कमी पडणार नाही.

मित्रांनो,

भारत, शहरी परिवर्तनाच्या आपल्या मार्गाने योग्य दिशेने वाटचाल करतो आहे. या प्रवासातील सर्व हितसंबंधी, नागरी समुदाय, शिक्षणसंस्था, उद्योगक्षेत्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशातील जनता, सर्व एकत्रितपणे काम करुन लवचिक आणि समृद्ध अशा जागतिक दर्जाची शहरे विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण करु याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही.

खूप खूप धन्यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi