श्री पटना साहिब, गुरू दी नगरी विखे दशमेश पिता साहिब श्री गुरू गोविंद सिंह जी महाराज दे जन्म, दिहाड़े ते गुरू साहिबान दी बख्शीतश लेन आई साध-संगत, तुहाणु मैं जी आईयां आखदां हां। इस पवित्र दिहाड़े ते मैं तुहाणु सारियां नू नवे साल दी लख-लख बधाईयां भी दिंदा हां।
आज आम्ही पटनासाहिबच्या या पवित्र धरतीवर हे प्रकाशपर्व साजरे करण्यासाठी जमलो आहोत ही भाग्याची गोष्ट आहे. परंतु आज संपूर्ण जगात जिथे जिथे भारतीय राहतात, शीख समुदाय राहतो, जगातल्या सर्व देशांमध्ये भारत सरकारने आपल्या दूतावासांच्या माध्यमातून हा प्रकाशपर्व साजरा करण्याची योजना बनवली आहे, जेणेकरून फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाला याची जाणीव होईल की, ३५० वर्षांपूर्वी गुरु गोविंद सिंह महाराज या दिव्यात्माचा जन्म झाला ज्याने मानवतेला खूप मोठी प्रेरणा दिली. याचा परिचय संपूर्ण जगाला व्हावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.
मी श्री. नितीशजी, सरकार, त्यांचे सर्व सहकारी आणि बिहारच्या जनतेला विशेष शुभेच्छा देतो कारण पटनासाहिब मध्ये या पर्वाचे एक विशेष महत्व आहे. भारतात एकता, अखंडता, सामाजिक सद्भावना, सर्वधर्म समभाव याचा प्रखर संदेश देण्याची ताकद या पटनासाहिब प्रकाशपर्व साजरा करण्यामध्ये आहे आणि म्हणूनच नितीशजींनी वैयक्तिक स्तरावर लक्ष देऊन स्वतः गांधी मैदानावर येवून, प्रत्येक गोष्टीची लक्षपूर्वक पाहणी करुन या भव्य समारोहाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ जरी पटनासाहिब मध्ये असले तरी त्याची प्रेरणा संपूर्ण भारताला, संपूर्ण जगाला मिळणार आहे आणि म्हणूनच हे प्रकाशपर्व आपल्याला देखील मानवतेच्या कुठच्या मार्गावर चालले पाहिजे, आपले संस्कार काय आहेत, आपली मुल्ये काय आहेत, आपण मानवजातीला काय देवू शकतो यासर्व बाबींचे पुनःस्मरण करून नवी उमेद, उत्साह आणि उर्जेसोबत पुढे मार्गक्रमण करण्याची ही एक चांगली संधी आहे.
गुरु गोविंद सिंह महाराज हे त्यागाची मूर्ती होते. आपण कल्पना करू शकतो ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांचे बलिदान पहिले आहे, आदर्श, मूल्य आणि मानवतेसाठी स्वतःच्या उपस्थितीत आपल्या मुलांचा बळी जतन पहिला आहे आणि त्यानंतरही त्यागाची पराकाष्टा बघा, गुरु गोविंद सिंह महाराज देखील या गुरु परंपरेला पुढे सुरु ठेवू शकत होते परंतू त्याची दूरदृष्टी बघा की त्यांनी ज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून गुरु ग्रंथ साहिबच्या प्रत्येक शब्दाला जीवन मंत्र मानून आपल्या सर्वांसाठी अखेरीला हेच सांगितले की, आता गुरु ग्रंथ साहिबच, त्यातला प्रत्येक शब्द, त्यातील प्रत्येक पान येणाऱ्या अनेक युगांपर्यंत आपल्याला प्रेरणा देत राहतील. हे देखील त्यांच्या त्यागाच्या उदाहरणाचा एक अंश होता; त्याहून ही पुढे जेव्हा पंच प्यारे आणि खालसा पंथाची रचना झाली त्यामध्ये देखील संपूर्ण भारताला जोडण्याचा प्रयत्न होता.
जेंव्हा लोकं आदि शंकराचार्यांबद्दल चर्चा करतात तेव्हा सांगतात की, आदि शंकराचार्यांनी भारताच्या चारी कोपऱ्यांना मठाची स्थापना करून भारताच्या एकतेला बळकटी प्रदान करण्याचा प्रयत्न केला होता. गुरु गोविंद साहब यांनी देखील त्याकाळी, भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये पंच प्यारे निवडून संपूर्ण भारताला खालसा परंपरेच्या माध्यमातून एकतेच्या सूत्रामध्ये बांधण्याचा एक अद्भूत प्रयत्न केला होता जो आज ही आपला वारसा आहे. मला नेहमीच मनापासून वाटते की, माझे यांच्यासोबत काहीतरी रक्ताचे नाते आहे कारण जे पहिले पंच प्यारे होते त्यांना हे सांगितले नव्हते की. तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला हे पद मिळेल, तुम्ही पुढे या. नाही, गुरु गोविंद सिंह यांचे कसोटीचे मानदंड देखील खूप उच्च असायचे. त्यांनी तर शीर कापण्याचे आमंत्रण दिले होते. या, तुमचे शीर तुमच्या धडापासून वेगळे केले जाईल त्या आधारे ठरविले जाईल की पुढे काय करायचे आहे. आपले शीर द्यायला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं पुढे आली, त्यामध्ये एक गुजरातच्या द्वारकेमधील शिंपी समजातील मुलगा देखील आला आणि त्याने पंच प्यारे मध्ये स्थान प्राप्त केले. गुरु गोविंद सिंह महाराजांनी त्याला आलिंगन दिले. गुरु गोविंद सिंह महाराजांनी पंच प्यारे खालसा परंपरा निर्माण तर केली त्यांच्या इच्छेप्रमाणे ती परंपरा चालू शकत होती, परंतु हा त्यांचा त्याग, त्यांचा मोठेपणा होता की, गुरु गोविंद सिंह महाराजांनी स्वतः ला देखील त्या बंधनांमध्ये बांधून घेतले, आणि त्यांनी सांगितले, हे जे पंच प्यारे आहेत, ही जी खालसा परंपरा आहे ती माझ्यासाठी देखील काय करायचे आहे, काय नाही करायचे, केव्हा करायचे, कसे करायचे याचा निर्णय घेईल.
मला वाटते गुरु गोविंद सिंह महाराजांची याहून मोठ्या त्यागाची कल्पना कोणी करूच शकत नाही, जी व्यवस्था त्यांनी स्वतः उभारली, स्वतःच्या प्रेरणेतून जी व्यवस्था उभी केली, ती व्यवस्था त्यांनी स्वतः देखील शिरसावंद्य ठेवली आणि स्वतःला त्या व्यवस्थेला समर्पित केले आणि त्याच महानतेचा हा परिणाम आहे की, आज जेव्हा आपण साडे तीनशे वर्षापासून हे प्रकाशपर्व साजरा करत आहोत तेव्हा जगातील कोणत्याही कोपऱ्यात गेलो, शीख परंपरेशी जोडलेला कोणताही व्यक्ति असो तो तिथे नतमस्तक होतो, स्वतःला तिथे समर्पित करतो. गुरु गोविंद सिंह महाराजांनी जी परंपरा सुरु केली होती त्याचे तो पालन करतो.
गुरु गोविंद सिंह महाराज एक स्वत: महान प्रेरणा आहेत जेव्हा आपण त्यांचे स्मरण करतो तेव्हा काही इतिहासकार त्यांचे शौर्य आणि वीरतेच्या पैलूचे दर्शन घडवतात. परंतू त्यांच्या विरतेसोबत जे त्यांचे धैर्य होते ते अद्भूत होते. ते संघर्ष करायचे पण त्याची त्यागाची पराकाष्टा अभूतपूर्व होती. ते समाजातील वाईट प्रवृतीविरुध लढायचे. गरीब, श्रीमंत, जातीवादाचे विष, या सर्वांविरुद्ध संघर्ष करून समजाला एकतेच्या सूत्रात बांधणे, सगळ्यांना समान वागणूक मिळावी यासाठी त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आग्रह धरला.
समाज सुधारक, वीरतेची प्रेरणा, त्याग आणि तपस्येची तपोभूमी मध्ये स्वतःला समर्पित करणारे व्यक्तिमत्व, सर्वगुणसंपन्न असे गुरु गोविंद सिंह महाराजांचे जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. आम्ही देखील सर्व धर्म समभावासह समाजातील सर्व वर्ग समान आहे, कोणी श्रीमंत कोणी गरीब नाही, कोणी आपले कोणी परके नाही; या महान मंत्राचे पालन करत आम्ही देखील देशात सर्वदूर हे आदर्श प्रस्थापित करु.
देशाची एकता मजबूत होईल, देशाची ताकद वाढेल, देश प्रगतीच्या नवीन उंची गाठेल. आम्हाला वीरता देखील हवी आहे, आम्हाला धैर्य देखील हवे आहे, आम्हाला पराक्रम देखील हवा आहे, आम्हाला त्याग आणि तपस्या देखील हवी आहे. ही संतुलित समाज व्यवस्था, गुरु गोविंद सिंह महाराजांचा प्रत्येक शब्द, जीवनातील प्रत्येक कार्यात आपल्याला प्रेरणा देतात आणि म्हणूनच या महान पवित्र आत्म्याला वंदन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.
आज गुरु गोविंद सिंह महाराजांच्या त्याचं स्थानावर येऊन गुरु ग्रंथ साहिबना नमन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले, मला विश्वास आहे की, हे नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहील. नितीशजींनी येथे एका खूप महत्वपूर्ण गोष्टीला स्पर्श केला आहे. महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी, मी नितीशजींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. समाज परिवर्तनाचे कार्य खूप कठीण असते. ते करायला सुरवात करण्याची हिम्मत दाखवणे हे देखील कठीण काम आहे. असे असले तरी नाश मुक्ती साठी त्यांनी जे अभियान सुरु केले आहे, येणाऱ्या भावी पिढ्यांचे यापासून रक्षण व्हावे यासाठी त्यांनी जो विडा उचलला आहे त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.
आणि मी देखील सर्व बिहार वासियांना, सर्व राजकीय पक्षांना, सामाजिक कार्य करणाऱ्या सर्व लोकांना ही विनंती करतो की, हे केवळ सरकारचे काम नाही, हे केवळ नितीश कुमारांचे काम नाही, हे फक्त कोणत्या राजकीय पक्षाचे काम नाही; हे सर्व लोकांचे काम आहे. हे कार्य यशस्वी झाले तर बिहार देशासाठी प्रेरणा स्थान होईल. आणि मला विश्वास आहे की जो विडा नितीशजींनी उचलला आहे त्याच्यात नक्कीच यश मिळेल. येणाऱ्या पिढ्यांचे रक्षण करण्याचे कार्य केले म्हणून गुरु गोविंद सिंह महाराजांचे हे प्रकाशपर्व त्यांना आशिर्वाद देईल, त्यांना नवीन शक्ती प्रदान करेल. आणि मला विश्वास आहे की, बिहार देशाची एक महत्वपूर्ण शक्ती बनेल, देशाला पुढे न्यायला बिहारचे खूप मोठे योगदान असेल. कारण ही बिहारची भूमी आहे जिने गुरु गोविंद सिंह महाराजांपासून आता पर्यंत आणेल मोठे महापुरुष आपल्याला दिले आहेत. राजेंद्र बाबू आहेत. चंपारण्य सत्याग्रहाच्या कल्पनेची ही भूमी आहे. जयप्रकाश नारायण, कर्पूरी ठाकुर यांसारखे अगणित नररत्न या भूमीने भारतमातेच्या सेवेसाठी दिले आहेत. या अशा भूमीवर गुरु गोविंद सिंह महाराज आपल्या सर्वांसाठी अशी प्रेरणा आहेत जे एक नवीन आदर्श, नवीन प्रेरणा, नवीन शक्ती देतात. या संधीला, प्रकाशपर्वाला, ज्ञानाच्या प्रकाशाला जीवनभर आत्मसाद करण्याच्या संकल्पासह आपण हे प्रकाशपर्व साजरे करु या.
जगभरात सर्वत्र भारत सरकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत दूतावासांच्या माध्यमातून हे प्रकाशपर्व साजरे केले जात आहे. संपूर्ण जगभरात गुरु गोविंद सिंह महाराजांचे स्मरण करणाऱ्या सर्व लोकांना अंतकरणापासून शुभेच्छा देतो. या प्रकाशपर्वाला भारतात तसेच भारताबाहेर खूप व्यापक स्वरुपात साजरे करण्याची योजना भारत सरकारने आखली आहे त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
१०० कोटी रुपये यासाठी खर्च केले आहेत. रेल्वेने आधी ४० कोटी रुपये खर्च करून या प्रकाशपर्व स्थायी व्यवस्था उभारल्या आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने देखील अंदाजे ४० कोटी रुपये खर्च करून अनेक योजना साकार करण्याच्या दिशेने कार्य केले आहे जेणेकरुन हे कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यात देखील हे कार्य असेच सुरु राहील. मी पुन्हा एकदा याप्रसंगी, या पवित्र क्षणी येथे उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला मिळाले ही खर्च माझ्यासाठी भाग्याची बाब आहे.
तुम्हा सर्वांना नमन करुन बोलतो जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल।