मंचावर विराजमान दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक श्री. प्रफुल्ल भाई पटेल, येथील खासदार श्री नटू भाई, शेजारचे दमणचे खासदार श्री लालू भाई, दादरा-नगर हवेली आणि जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष श्री. रमण ककुवा जी, सिल्वासाचे नगराध्यक्ष भाई राकेश चौहानजी आणि विशाल संख्येने येथे उपस्थित दादरा, नगर हवेलीच्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, मराठीमध्ये बोलू, हिंदीमध्ये बोलू की गुजरातीमध्ये बोलू, बोला... बरं, एक काम करा. आपला मोबाईल बाहेर काढा आणि त्याची लाईट सुरू करून आजच्या या भव्य कार्यक्रमाचे आपण स्वागत करा. सर्वांच्या मोबाईलच्या लाईट्स पेटलेल्या दिसायला हव्यात. बघा, सर्व कॅमेरावाले आपले चित्रीकरण करीत आहेत. सर्वांचा हात वर असला पाहिजे, एकदम वर. हात वर करून तो हलवा. सर्वांचा हात वर दिसू द्या. बघा, सर्वांना चमकत्या चांदण्या दिसू लागल्या आहेत. बघा, दादरा नगर हवेलीची ताकत बघा. मोठ्याने बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. आज तर आपण सर्वांनी कमालच केलीत.
देशाच्या इतर भागातील लोक हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांना निश्चितच आश्चर्य वाटत असेल. लहानसा सिल्वासा, एक लहानसा भूभाग, सर्वात लहान मतदारसंघ आणि येथे जमलेला हा विशाल जनसमुदाय. मोठ्यात मोठ्या राज्यातील सभेलाही इतकी गर्दी होत नाही. बंधु आणि भगिनींनो, केंद्रशासित प्रदेश, मग तो दादरा नगर हवेली असो की दिव दमण, आपल्याकडे कोणाचे सरकार आहे, हे येथील जनतेला माहिती नव्हते. पहिल्यांदा, प्रफुल्ल भाईंना प्रशासक नेमल्यानंतर दादरा नगर हवेलीच्या प्रत्येक नागरिकाला असे वाटू लागले की आता दिल्लीमध्ये आपला कोणी तारणहार आहे. आमच्या सुख-दु:खाची काळजी करणारे दिल्लीतसुद्धा कोणीतरी आहे. दादरा नगर हवेली आणि दिव दमणच्या लोकांना पहिल्यांदाच असे वाटत आहे. आत्तापर्यंत त्यांना असेच वाटत होते की काय बरे करायचे, इथे कोणतेही सरकार नाही, दिल्ली तर फारच दूर आहे, जमेल तसे जगू या. पण आम्ही दाखवून दिले की भारतातील लहानात लहान क्षेत्र असो आणि गरीबात गरीब नागरिक असो, त्यांचा या भारतावर पूर्ण हक्क आहे, अगदी दिल्लीत राहणाऱ्या लोकांइतकाच त्यांचाही या भारतावर हक्क आहे. म्हणूनच हा सव्वाशे कोटी नागरिकांचा भारत आहे आणि या सव्वाशे कोटी नागरिकांपैकी प्रत्येक जण त्याचा मालक आहे. प्रत्येक नागरिकाचे भाग्य बदलणे ही या देशाची सामुहिक जबाबदारी आहे. मला सांगण्यात आले की येथे 1980 साली म्हणजे सुमारे 35-40 वर्षांपूर्वी कोणी पंतप्रधान आले होते. आज जे 35 वर्षांचे असतील त्यांना कदाचित माहितीही नसेल की पंतप्रधानांच्या यादीत या लहानशा ठिकाणाचा समावेश असतो की नाही. शेवटच्या वेळी सुमारे 35-40 वर्षांपूर्वी भारताचे माजी पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई येथे आले होते. त्यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून येथे येण्याचा बहुमान मला मिळाला. पण मी येथे पहिल्यांदा आलो नाही. येथील जवळजवळ प्रत्येक पंचायतीत मी गेलो आहे. मी स्कूटरवरून फिरत असे. तुम्हाला येथे शेकडो कुटुंबे भेटतील जी तुम्हाला सांगतील की मोदी जी पूर्वी येथे येत असत, आमच्याकडे जेवत असत, आमच्याकडे चहा पीत असत. येथे असे अनेक लोक बसले असतील. या संपूर्ण क्षेत्राची भ्रमंती करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्याचमुळे आपल्या सुख-दु:खाची जाणीव मला आहे. येथे विकासाच्या काय संधी आहेत, याची जाणीव मला आहे. आता खरे तर सिल्वासा, दमण हे भाग लघु भारत झाले आहेत. भारतातील असे एकही ठिकाण नसेल, जिथले लोक येथे राहत नसतील. भारताच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातील लोक येथे राहतात. मी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांकडे एकदा विचारणा केली होती. मला चांगले आठवते आहे. जेव्हा आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्याचे काम सुरू होते, तेव्हा संपूर्ण देशातून गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आदिवासींसाठी सर्वात जास्त चांगले काम झाले होते. मी तेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा नेहमी गुजरातमध्ये भारत सरकार आणि काँग्रेस नेते आदिवासींना भडकवत होते, खोट्या बातम्या पसरवत होते, ते आदिवासींना सांगत की मोदी सरकार आहे, गुजरात सरकार आहे, ते आदिवासींना जमिनीचे पट्टे देत नाहीत. जेव्हा केंद्रात सत्तेची सूत्रे मी हाती घेतली तेव्हा मी थक्क झालो. त्यात कोणत्याही राज्याचे सरकार मध्ये येण्याचा प्रश्नच नव्हता, संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचीच होती. संपूर्ण देशभरात आदिवासींना जमिनीचे पट्टे दिले जात असत. मात्र इतकी वर्षे त्यांनी दिल्लीत सरकार चालवले. त्यांनी राज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, खोटे आरोप केले. मला सांगताना अतिव दु:ख होते आहे की दादरा नगर हवेलीमध्ये माझे आदिवासी बंधु मोठ्या संख्येने राहतात, त्यांना जमिनीचा एकही पट्टा देण्यात आला नाही. जेव्हा आम्ही सत्ता हाती घेतली तेव्हा प्रफुल्ल भाईंवर येथील जबाबदारी सोपवली. या ठिकाणी भारत सरकारच्या लागू न झालेल्या योजनांची माहिती आम्ही घेतली. आधी सरकारी अधिकाऱ्यांना केंद्रशासित प्रदेशात जायला आवडत असे. सगळे काही राजे-रजवाड्यांसारखे चालत होते. तिथल्या खासदाराला सांभाळले की आपले काम संपले, असे त्या अधिकाऱ्यांना वाटत असे. हेच खरे आहे ना... पण आता काँग्रेस सरकार नाही, मोदी सरकार आहे. आता जनतेसाठी काम करावे लागेल, जनतेसाठी पळापळ करावी लागेल. जनतेच्या सुखासाठी आपल्या जिवाला त्रास करून घ्यावा लागेल, याच हेतूने मी काम करतो आहे. त्याचाच परिणाम आता दिसू लागला आहे. आजघडीला येथील हजारो कुटुंबियांना जमिनीचे पट्टे दिले जात आहेत. अशी हजारो आदिवासी कुटुंबे आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या ही जमीन कसत होत्या, मात्र मालकी हक्क दाखवणारा एकही कागद त्यांच्याकडे नव्हता, त्या जमिनीवर त्यांचा कोणताही हक्क नव्हता. मी आज दादरा- नगर हवेलीच्या प्रशासकांचे आणि त्यांच्या संघाचे मनापासून अभिनंदन करतो. माझ्या प्रिय आदिवासी बंधु-भगिनींना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. आज मला माझ्या हातून या हजारो परिवारांना त्यांचा हक्क मिळवून देणारी पत्रे प्रदान करण्याची संधी मला मिळते आहे.
बंधु आणि भगिनिंनो, आज सुमारे दोन हजार तिनशे पंचवीस आदिवासी कुटुंबांना जमिनीचा हक्क मिळणे, ही स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची फार मोठी घटना आहे. सर्वात मोठी घटना आहे. मला किती आनंद होतो आहे, याची कल्पना आपण करू शकता. आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये जो लाईट सुरू केला होता, तो प्रकाश माझ्या या आदिवासी बांधवांसाठी होता. बंधु आणि भगिनिंनो, आज आमचे स्वप्न आहे 2022 साल, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होतील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांनी आपले प्राण पणाला लावले. त्यांनी कितीतरी स्वप्ने पाहिली असतील. 2022 हे प्रत्येकाचे स्वप्न होऊ शकणार नाही का... येथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात विचार यायला हवा की 2022 साली, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होतील तेव्हा, तोपर्यंत, येणाऱ्या पाच वर्षांत मी सुद्धा देशासाठी काही करून दाखवेन. यायला हवा ना असा विचार मनात.. दोन्ही मुठी बंद करा आणि मग मला सांगा.. देशासाठी काही करणार... स्वत:साठी नाही. आपण देशासाठी एखादे लहानसे काम जरी करू शकलात तरी चांगले आहे. 2022 पर्यंत संपूर्ण देशात हे वातावरण पसरेल. सव्वाशे कोटी भारतीय आपल्या देशासाठी काही ना काही करू लागतील. मग आपल्या देशाला मागे खेचण्याची ताकत कोणातही नाही. आमच्याकडे आमचे स्वप्नं पाहिले आहे. 2022 साली आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे होतील. आपल्या देशात असा एकही गरीब राहू नये, ज्याच्याकडे घर नसेल. गरीबात गरीबालाही घर मिळाले पाहिजे. बोला, मिळायला हवे की नाही.. बंधु आणि भगिनींनो, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार गावातील सहा हजार दोनशे चौतीस कुटुंबांकडे घर नाही. सिल्वासासारख्या शहरी भागातसुद्धा तब्बल 800 कुटुंबांकडे आपले घर नाही. 2022 पर्यंत या सात हजार कुटुंबांना घर देण्याच्या कामाला आज शुभारंभ होतो आहे. आणि म्हणूनच मी या सर्व गरीब कुटुंबांचे अभिनंदन करतो आहे. आपण आपल्या मोबाईलमधून जो प्रकाश पसरवला आहे तो या गरीब कुटुंबांना घर मिळत असल्याच्या आनंदाचा प्रकाश आहे. ही घरे सुद्धा साधारण नसतील, सामान्य नसतील. त्यांत वीज असेल, पाणी असेल, शौचालय असेल, मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी शाळेची सोय असेल, वृद्धांसाठी औषधपाण्याची सोय असेल. असे घर प्रदान करण्याचा आमचा मानस आहे.
बंधू आणि भगिनींनो, आज आणखी एक महत्वाचे काम झाले आहे, ते म्हणजे गॅसच्या जोडण्या देणे. त्यासोबत त्यांना शेगडीही भेट मिळते आहे, कूकरही भेट मिळतो आहे आणि गॅस पेटवणारा लायटरही भेट मिळतो आहे. बंधू आणि भगिनींनो, आपला देश, आपले नेते, यांची विचारसरणी कशी होती, याचा विचार करा. 2014 सालची स्थिती आठवून बघा, जेव्हा देशाच्या निवडणूका सुरू होत्या. एकीकडे भारतीय जनता पार्टीने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. माझ्यासमोर काँग्रेसचे आव्हान निवडणुकीच्या मैदानात होते. निवडणुकीत राजकीय पक्ष अनेक आश्वासने देतात. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी बैठक घेतली आणि नंतर त्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. त्या पत्रकार परिषदेत काय घोषणा केली होती, जरा आठवून बघा बरे. त्यांनी म्हटले होते की 2014 ची निवडणूक आम्हीच जिंकू. आमचेच सरकार असेल. आता आम्ही वर्षाला नऊ सिलेंडर देतोय, ते वाढवून 12 करू. या आश्वासनावर त्यांनी 2014 ची निवडणूक लढवली. नऊ सिलेंडर देतोय, ते वाढवून 12 करण्याच्या आश्वासनावर मते मागीतली जात होती. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की काही वर्षांपूर्वी संसदेतील खासदारांना दरवर्षी गॅसची 25 कुपन्स मिळत असत आणि ते आपल्या परिचितांना आणि कार्यकर्त्यांना गॅसची जोडणी घेण्यासाठी कुपन देत असत. एका वर्षात 25 कुपन आणि मग वर्तमानपत्रात बातम्या येत, या कूपनच्या काळ्या बाजाराच्या. अशा बातम्या वारंवार येऊ लागल्यानंतर खासदारांना कुपन देणे बंद करण्यात आले. गॅसची जोडणी घेण्यासाठी खासदारांच्या घरातील माणसे, अगदी चांगली चांगली माणसेही रांगेत उभी राहत असत. आपल्यापैकी अनेकांनी हे पाहिले असेल. किती त्रास झाला असेल. त्यानंतर आपल्याला एक गॅस सिलेंडर मिळाला असेल. बंधु-भगिनींनो, आमचे सरकार सत्तेत आले. मला नेहमी वाटत असे की माझ्या गरीब माता-भगिनींना का बरे लाकडे जाळून जेवण करावे लागते आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनों, जेव्हा एखादी माता चुलीत लाकडे पेटवून जेवण बनवते तेव्हा 400 सिगरेटमुळे निर्माण होईल इतका धूर तिच्या शरीरात जातो. एका दिवसाचे अन्न चुलीवर शिजवले तर त्यामुळे 400 सिगरेट इतका धूर तयार होतो. अशा मातेच्या आरोग्याचे काय बरे होत असेल.. लहान मुले घरात खेळत असतात, त्या मुलांच्या शरीराचे काय होत असेल... बंधु-भगिनींनो,या वेदनेसोबत आणि या गरीबीसोबत माझा जन्म झाला आहे. मी माझ्या आईला चुलीवर अन्न शिजवताना पाहिले आहे. संपूर्ण घर धुराने भरून जात असे, हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पैहिले आहे, अनुभवले आहे. तेव्हाच मनात विचार येत असे की माझ्या मातांना या त्रासातून कसे मुक्त करू... बंधु-भगिनींनो, आम्ही संकल्प केला, प्रत्येक गरीब कुटुंबांपर्यंत गॅसच्या जोडण्या पोहोचवण्याचा, मोफत वीज जोडणी देण्याचा. ही योजना सुरू करून 11 महिने झाले आणि आतापर्यंत दोन कोटी कुटुंबांपर्यंत गॅसची जोडणी पोहोचली आहे. दादरा नगर हवेलीच्या सुमारे आठ हजार कुटुंबांना गॅसची जोडणी दिली जाईल. मात्र येथील लोकांच्या मदतीने त्यांना कुकरसुद्धा मिळतो आहे, लायटरसुद्धा मिळतो आहे. या ठिकाणी हे विशेष घडते आहे. या अधिवेशनासाठी मी अनेक शुभेच्छा देतो.
बंधु-भगिनींनो, आज या ठिकाणी माझ्या दिव्यांग बांधवांसाठी काही साधने देण्याचे कामही झाले आहे. इलेक्ट्रिक वाहने देण्याचे काम झाले आहे. ज्यांना दिसत नाही, त्यांच्या हातात आधुनिक छडी देण्यात आली. त्यामुळे सेंसरच्या साहाय्याने त्यांना समोर कोणी आले तर ते समजू शकेल. बंधु-भगिनींनो, सर्व सरकारांच्या योजना असतात, मात्र आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार शिबीरे आयोजित करण्यात आली आणि लाखो दिव्यांगांना मदत करण्यात आली. सुरूवातीच्या तीस वर्षांत जेमतेम पन्नास शिबिरे भरवली गेली असतील. पैसे तसेच्या तसे शिल्लक राहून जात. बंधु आणि भगिनिंनो, सरकार गरीबांच्या कल्याणासाठी असते आणि हे लक्षात ठेवूनच आमचे सरकार ठिकठिकाणी जाऊन, अनेक जिल्ह्यांना भेट देऊन तेथील दिव्यांगांचा शोध घेते, त्यांच्यासाठी शिबिरांचे आयोजन करते आणि त्यांना आत्मविश्वासाने जगता यावे यासाठी भारत सरकारच्या खजिन्यातून त्यांच्यासाठी उपयुक्त साधने प्रदान करते. या दिशेने काम सुरू आहे.
बंधु आणि भगिनिंनो,आज या ठिकाणी जैविक औषधांचे लोकार्पणही झाले आहे. आजारी पडणे किती महाग झाले आहे, याची आपल्याला चांगलीच कल्पना आहे. सुखी कुटुंब असो, मध्यमवर्गिय कुटुंब असो, कुटुंबातील पती-पत्नी, दोघे कमावते असो, घरात एखादे आजारपण आले की संपूर्ण घराची आर्थिक घडी विस्कटून जाते. मुलीचे लग्न करायचे असले तर ते करून देता येत नाही, घर विकत घ्यायचे असले तर ते घेता येत नाही. औषधेही महाग झाली आहेत. डॉक्टरची फी सुद्धा चांगलीच वाढली आहे. बंधु आणि भगिनिंनो, आम्ही एक निर्णय घेतला, किमान 800 औषधांची यादी तयार केली. औषधे तयार करणाऱ्यांना बोलावले. त्यांना म्हटले, इतके जास्त रूपये तुम्ही का मागत आहात, एवढा नफा कशासाठी कमावताय.. सर्व एका रांगेत उभे राहिले, 1200 रूपयांना विकले जाणारे औषध 70-80 रूपयांना मिळू लागले. 300 रूपयांना विकले जाणारे औषध 7-10 रूपयांना मिळू लागले. गरीबांनाही औषधे मिळायला हवीत. वेळेत मिळायला हवीत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. सरकारमध्ये हिंमत असली तर परिवर्तन घडवून आणता येते. आता दादरा नगर हवेलीमध्ये जैविक औषधे उपलब्ध होत आहेत. आता येथील डॉक्टर रूग्णांना महागडी औषधांऐवजी ही औषधे लिहून देऊ शकतील. आपण कोणताही किंतु मनात न आणता ही जैविक औषधे घेऊ शकता. त्यात काही फरक नाही. ती स्वस्त आहेत, म्हणजे वाईट आहेत, अशा अफवा जर कोणी पसरवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नकात. आता आम्ही गरीबांची लूट होऊ देणार नाही. मध्यमवर्गिय माणसाला आम्ही मरू देणार नाही. म्हणूनच बंधु आणि भगिनींनो, अनेक योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज मी पाहिले की वायफायचा विषय निघाला आणि युवकांमध्ये उत्साहाची लाट पसरली. वायफायचे उद्घाटन झाल्याचे दूरचित्रवाणीवर दिसले आणि सगळीकडेच आनंदाची लहर दिसून आली. हे बदललेल्या भारताचे उदाहरण आहे. त्यांना वाटते की हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. मात्र बंधु आणि भगिनींनो, मला आपल्याकडून आणखी इका गोष्टीची अपेक्षा आहे. बोला, करणार का तुम्ही... असे हळू आवाजात बोलून चालणार नाही. या इथून आवाज येत नाही. मला असे सांगायचे आहे की आपण आपल्या मोबाइलवर भीम ॲप डाऊनलोड करा. इतकेच करून थांबू नका, तर आपल्या भागातील व्यापाऱ्यांनाही भीम ॲप डाऊनलोड करायला सांगा. आता कोणालाही गॅससाठी पैसे देऊ नका. त्यांना सांगा की मला भीम ॲपद्वारे पैसै द्यायचे आहेत. तुम्हालाही मला जे द्यावेसे वाटते, ते भीम ॲपद्वारेच द्या. आता तुम्हीही याची सवय करून घ्या. वायफायचा आनंद तुम्ही नक्की घ्या. आपल्या मोबाइललाच आपली बँक बनवा. आपल्या मोबाइललाच आपले पैशांचे पाकीट बनवा. कमीत कमी रोखीचे व्यवहार करा. बंधु आणि भगिनींनो, मी भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या लढ्याला सुरूवात केली आहे. बेईमानी संपायला हवी आहे ना... देशाचा कारभार इमानदारीने चालायला हवा ना... मग तुमच्या मदतीशिवाय ते कसे शक्य होईल... करणार का मदत, करणार का मदत... त्याचा एक मार्ग आहे, कमी रोखीचे व्यवहार. भीम ॲपचा वापर करून व्यवहारांना सुरूवात करा. काळा बाजार करण्याचे, भ्रष्टाचाराचे एक एक मार्ग बंद होत जातील. त्याचसाठी मला तुमची मदत हवी आहे. वायफायचा उपयोग तुम्ही निश्चितच करा. भारत सरकारने एक योजना तयार केली आहे, त्याद्वारे आपण अर्थार्जन करू शकता. जे युवक सुट्टीच्या दिवसात कमाई करू इच्छितात, त्यांच्यासाठी मी संपूर्ण देशाला लागू असणारी एक योजना तयार केली आहे. आपण आपल्या भीम ॲपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत असाल आणि आपण एखाद्या व्यापाऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला भीम ॲप डाउनलोड करून तीन वेळा खरेदी विक्री करायला शिकवले, तर सरकारकडून आपल्या मोबाइल फोनमध्ये दहा रूपये जमा करेल. दिवसात आपण वीस लोकांना भीम ॲपचा वापर शिकवलात तर आपल्या मोबाईल फोनमध्ये 200 रूपये जमा होतील. सुट्टीच्या काळात तीन महिने तुम्ही हे काम केलेत तर आपण किमान 18 ते 20 हजार रूपये कमवू शकता. भीम ॲपचा वापर करून कमवू शकता. आता मला माझ्या खर्चासाठी आई वडीलांकडे पैसे मागायची पैसे वापरायची आवश्यकता भासणार नाही, मी मोदींच्या योजनेचा लाभ घेईन, भीम ॲपचा प्रचार करेन. प्रत्येक दिवशी 20 लोकांना भीम ॲपची माहिती देऊन दिवसाला किमान 200 रूपयांची कमाई करेन, असा निर्धार करा. हे काम आपण करू शकता. हे करणार की निव्वळ वेळ वाया घालवणार... तसे करू नका.
बंधु आणि भगिनींनो, आज या ठिकाणी अनेक योजनांचा शुभारंभ झाला आहे, लोकार्पण,झाले आहे. सर्व योजनांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. एकाच वेळी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. गरीबांसाठी आवास, आदिवासींसाठी घर. तरूणांसाठी वाय-फाय, युवकांसाठी रोजगार. माता-भगिनींसाठी गँसची जोडणी. लाभ मिळाला नाही, असे कोणीही नसेल. बहुतेक स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दादरा नगर हवेलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी इतके जास्त लाभ नागरिकांना मिळत आहेत. इतक्या मोठ्या सरकारी योजना आल्या असतील आणि त्यामुळे इतका जास्त लाभ झाला असेल. दोन्ही हातांच्या मुठी बंद करून माझ्यासोबत बोला, भारत माता की जय. असे नाही, कामे कशी होतात हे दमणवाल्यांनाही समजले पाहिजे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अनेकानेक आभार..