मित्रांनो,
आव्हानात्मक समस्यांचे समाधान शोधण्यासाठी गेल्या 36 तासांपासून तुम्ही अविरत काम करत आहात.
तुमच्या उर्जेला सलाम ! मला कुठेच थकवा दिसत नाही, दिसतोय तो फक्त उत्साह.
काम उत्तमपणे पार पडल्याचं समाधान मला दिसत आहे. मला असे वाटते की, चेन्नईचा विशेष ब्रेकफास्ट – इडली, डोसा, वडा – सांभार यातून देखील हे समाधान मिळाले आहे. चेन्नई शहराने केलेलं आदरातिथ्य असामान्य आहे. मला विश्वास आहे की, इथे आलेली प्रत्येक व्यक्ती आणि सिंगापूरहून आलेले पाहुणे इथल्या वास्तव्याचा नक्कीच आनंद घेतील.
मित्रांनो, मी हॅकाथॉन विजेत्यांचे अभिनंदन करतो. आणि, इथे जमलेल्या प्रत्येक तरुण मित्राचे, विशेषतः माझ्या विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन करतो. विविध आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यांचे समाधान शोधण्याची तुमची इच्छाशक्ती, तुमची ऊर्जा आणि तुमचा उत्साह हा स्पर्धा जिंकण्याच्या भावनेपेक्षा खूप अधिक आहे.
माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण येथे अनेक समस्यांचे निराकरण केले. मला विशेषतः कॅमेरा संदर्भातला उपाय आवडला, ज्यामुळे कोणाचे लक्ष आहे याची माहिती आपल्याला मिळेल. आणि आता काय होईल तुम्हाला माहित आहे, मी संसदेच्या अध्यक्षांशी या संदर्भात बोलेन; आणि मला खात्री आहे की संसदेत याचा खूपच उपयोग होईल.
माझ्यासाठी तुम्ही सगळेच विजेते आहात. तुम्ही विजेते आहात कारण तुम्ही जोखीम उचलायला घाबरत नाही. तुम्ही परिणामांचा विचार न करता तुमच्या प्रयत्नांशी बांधील असता.
भारत – सिंगापूर हॅकाथॉनला मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी केलेली मदत आणि पाठबळासाठी सिंगापुरचे शिक्षण मंत्री ओंग ये कुंग तसेच नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाचे या प्रसंगी मी विशेष आभार मानतो.
भारत – सिंगापूर हॅकाथॉनला मोठ्या प्रमाणत यशस्वी करण्यासाठी भारतातर्फे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा नाविन्य कक्ष, आय आय टी मद्रास आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अतुलनीय कामगिरी बजावली आहे.
मित्रांनो,
असे खूप कमीवेळा होते जेव्हा एखादा उपक्रम अगदी सुरवातीपासून खूपच उत्साही आणि यशस्वी असतो.
माझ्या सिंगापूरच्या आधीच्या दौऱ्या दरम्यान मला संयुक्त हॅकाथॉनची कल्पना सुचवली होती. गेल्यावर्षी सिंगापूरमध्ये नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठात याचे आयोजन केले होते. यावर्षी याचे आयोजन, आय आय टी मद्रासच्या ऐतिहासिक, परंतु आधुनिक परिसरात झाले आहे.
मित्रांनो,
मला सांगितले होते की, गेल्यावर्षी हॅकाथॉनचा जोर स्पर्धेवर होता. यावर्षी, प्रत्येक गटात दोन्ही देशांचे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी त्यांनी एकत्र प्रयत्न केले. आपण हे म्हणू शकतो की, आपण आता स्पर्धेपासून सहकार्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत.
हीच ती ताकद आहे जी उभय देश सामना करत असलेल्या समस्यांचे एकत्रित निराकरण करण्यासाठी काम करत आहेत.
मित्रांनो,
या तऱ्हेचे हॅकाथॉन तरुणांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. जागतिक समस्यांचे समाधान शोधण्यासाठी सहभागी प्रतीस्पर्धी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. आणि त्यांना हे विशिष्ट कालावधीत करायचे असते.
सहभागी प्रतिस्पर्धी त्याच्या कल्पना, त्याचे नाविन्य कौशल्याची पारख करू शकतात. आणि मला असा ठाम विश्वास आहे की आजच्या हॅकाथॉन मधून जे उपाय समोर येतील ते उद्यासाठी स्टार्ट अप कल्पना असतील.
आपण भारतामध्ये मागील पाच वर्षांपासून स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आयोजित करत आहोत.
हा उपक्रम सरकारी विभाग, उद्योग जगतातील व्यक्ती आणि सर्व मुख्य संस्थांना एकत्रित आणतो.
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन पासून आम्हाला नवीन कल्पनांची अंमलबजावणी करणे, निधी गोळा करणे आणि उपाययोजना शोधण्याची संधी मिळते आणि त्याचवेळी आम्ही त्यांना स्टार्ट अप मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करतो.
मी अशी आशा करतो की, याच प्रकारे, एन टी यु, एम एच आर डी आणि ए आय सी टी ई एकत्रिपणे या संयुक्त हॅकाथॉन मधून प्राप्त झालेल्या कल्पनांवर आधारित उद्योग निर्माण करण्याची शक्यता शोधून काढतील.
मित्रांनो,
आज भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
त्यासाठी नवोन्मेश आणि स्टार्ट अप मोलाची भूमिका बजावतील.
याआधीच भारत स्टार्ट अप अनुकूल आघाडीच्या तीन देशांमध्ये सामील आहे. मागील पाच वर्षात, आम्ही नवोन्मेश आणि इनक्युबेशनला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देत आहोत.
अटल नवोन्मेश मिशन, पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती, स्टार्ट अप भारत अभियान हे 21व्या शतकातील भारताचा पाया आहे, एक असा भारत जो नवोन्मेश संस्कृतीला प्रोत्साहन देत आहे.
आम्ही आता आमच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वी मध्येच लवकरात लवकर मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ब्लॉकचेन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
शाळेपासून ते उच्च शिक्षण संस्थामधील संशोधनापर्यंत एक परिसंस्था तयार केली जात आहे जी नवोन्मेशाचे माध्यम बनेल.
मित्रांनो,
आम्ही दोन मोठ्या कारणास्तव नवोन्मेश आणि इनक्युबेशनला प्रोत्साहन देत आहोत, एक म्हणजे – आम्हाला भारताचे प्रश्न सोडविण्यासाठी, आयुष्य सुलभ करण्यासाठी सोपे उपाय हवे आहेत. आणि दुसरे म्हणजे, आम्हाला, संपूर्ण जगासाठी उपाय शोधायचे आहेत.
संपूर्ण जगासाठी भारतीय उपाययोजना – हे आमचे उद्दिष्ट आणि आमची वचनबद्धता आहे.
सर्वात गरीब देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारे प्रभावी कमी खर्चिक उपाय शोधण्याची आमची इच्छा आहे – भारताचे नावोन्मेष सर्वात गरीब आणि वंचित लोकांच्या देखील उपयोगी पडले पाहिजेत, मग ते कुठल्याही देशाचे नागरिक असुदे.
मित्रांनो,
तंत्रज्ञान केवळ एका देशापर्यंत मर्यादित न राहता सर्व देशांमधील, सर्व बेटांवरील लोकांना एकत्र आणते यावर माझा ठाम विश्वास आहे. ओंग यांच्या सूचनांचे मी स्वागत करतो.
या निमित्ताने मी एन टी यु, सिंगापूर सरकार आणि भारत सरकारच्या सहकार्याने अशाच एका हॅकाथॉनच्या आयोजनाचा प्रस्ताव मांडतो ज्यामध्ये आशियाई देशातील इच्छुक सहभागी होऊ शकतील.
आशियाई देशांतील सर्वात बुद्धिमान लोकांमध्ये आपापसात ‘ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदला’चे परिणाम कमी करण्यासाठी नवीन उपाय शोधण्यासाठी स्पर्धा आयोजित केली पाहिजे.
माझ्या भाषणाचा शेवट करताना, हा उपक्रम भव्य पद्धतीने यशस्वी केल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व सहभागी आणि संयोजकांचे अभिनंदन करतो.
तुम्ही संस्कृती, समृद्ध वारसा आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या चेन्नई मध्ये आहात. सर्व सहभागींना, विशेषत: सिंगापूरमधील आमच्या मित्रांना, त्यांनी त्यांच्या चेन्नईतील वास्तव्याचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो. या संधीचा लाभ घेत तुम्ही दगडांचे कोरीवकाम आणि दगडांचे मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबलीपुरम मंदिराला भेट द्या. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या मंदिराचा समावेश आहे.
धन्यवाद ! खूप खूप धन्यवाद !