नमस्कार,
श्रीरामचंद्र मिशनला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. खूप-खूप शुभेच्छा. राष्ट्र उभारणीत , समाजाला मजबूतीने पुढे नेण्यात, 75 वर्षांचा टप्पा खूप महत्वपूर्ण आहे . लक्ष्याच्या प्रति तुमच्या समर्पणाचा हा परिणाम आहे की आज हे मिशन 150 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरले आहे. वसंत पंचमीच्या या पवित्र प्रसंगी आज आपण गुरु रामचंद्र जी यांचा जन्मजयंती उत्सव साजरा करत आहोत. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्याबरोबरच बाबूजीना आदरपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करतो . मी तुमच्या अद्भुत प्रवासाबरोबरच तुमचे नवे मुख्यालय कान्हा शांतिवनासाठी देखील खूप अभिनंदन करतो. मला सांगण्यात आले आहे कीं जिथे कान्हा शांतिवनम उभारले आहे ती आधी एक पडीक जमीन होती. तुमचे उद्यम आणि समर्पणाने या पडीक जमिनीला कान्हा शांतिवनममध्ये परिवर्तित केले आहे. हे शांतिवनम बाबूजी यांच्या शिकवणीचे जिवंत उदाहरण आहे.
मित्रांनो
तुम्ही सर्वांनी बाबूजींकडून मिळालेली प्रेरणा जवळून अनुभवली आहे. जीवनाची सार्थकता प्राप्त करण्यासाठी त्यांचे प्रयोग, मनःशांती प्राप्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आपणा सर्वांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. आजच्या या 20-20 च्या युगात वेगावर अधिक भर आहे लोकांकडे वेळेची कमतरता आहे. अशा स्थितीत सहज मार्गाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना स्फूर्त आणि आध्यात्मिक दृष्ट्या निरामय ठेवण्यात खूप मोठे योगदान देत आहात. तुमचे हजारो स्वयंसेवक आणि प्रशिक्षक संपूर्ण जगाला योग आणि ध्यानाच्या कौशल्याची ओळख करून देत आहेत. ही मानवतेची खूप मोठी सेवा आहे. तुमचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवकानी विद्येचा खरा अर्थ साकार केला आहे. आपले कमलेश जी तर ध्यान आणि आध्यात्मच्या जगात 'दा जी' नावाने प्रसिद्ध आहेत. कमलेशजी यांच्याबाबत एवढेच म्हणू शकतो की ते पश्चिम आणि भारताच्या सर्वोत्कृष्टतेचा संगम आहेत. तुमच्या आध्यात्मिक नेतृत्वात श्रीराम चंद्र मिशन, संपूर्ण जग आणि विशेषतः युवकांना तंदुरुस्त शरीर आणि स्वस्थ मनाच्या दिशेने प्रेरित करत आहे.
मित्रांनो
आज जग, धावपळीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या रोगांपासून महामारी आणि नैराश्यापासून दहशतवादापर्यंत अनेक आव्हानांचा सामना करत आहे. अशा स्थितीत सहजमार्ग, हार्टफुलनेस कार्यक्रम आणि योग, जगासाठी आशेच्या किरणाप्रमाणे आहे. अलिकडच्या दिवसात रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या सतर्कतेमुळे मोठी संकटे कशी पार करता येऊ शकतात याचे उदाहरण संपूर्ण जगाने पाहिले आहे. आपण सर्व या गोष्टीचे देखील साक्षीदार आहोत की कशा प्रकारे 130 कोटी भारतीयांची सतर्कता कोरोना विरुद्धच्या लढाईत जगासाठी आदर्श ठरली आहे. या लढाईत आपल्या घरांमध्ये शिकवण्यात आलेल्या गोष्टी, सवयी आणि योग-आयुर्वेद यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. या महामारीच्या सुरुवातीला भारताच्या स्थितीबाबत संपूर्ण जग चिंतित होते. मात्र आज कोरोना विरोधात भारताचा लढा जगाला प्रेरित करत आहे.
मित्रांनो
भारत जागतिक कल्याणासाठी मानवी केंद्रीत दृष्टिकोनाचा अवलंब करत आहे. हा मानव केंद्रित दृष्टीकोन निरोगी संतुलनावर आधारित आहे- कल्याण, निरामय आरोग्य संपत्ती. गेल्या सहा वर्षांत भारताने जगातील सर्वात मोठे सार्वजनिक कल्याणकारी कार्यक्रम हाती घेतले आहेत. हे प्रयत्न गरीबांना सन्मानाचे आयुष्य आणि संधी देण्याच्या उद्देशाने आहेत. सार्वत्रिक स्वच्छता कार्यक्रम ते सामाजिक कल्याणकारी योजनांपर्यंत, धूरमुक्त स्वयंपाकघर ते गरीबांना बँकेत खाती उघडून देण्यापर्यंत, तंत्रज्ञानाच्या प्रवेशापासून ते सर्वांसाठी घरे बांधण्यापर्यंत, भारताच्या लोककल्याणकारी योजनांनी जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. जागतिक महामारी येण्यापूर्वीच आपल्या देशाने निरोगीपणावर लक्ष केंद्रित केले होते.
मित्रांनो
आमची निरोगीपणाची कल्पना रोग बरे करण्यापलिकडची आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर व्यापक काम करण्यात आले आहे. भारताची महत्वाकांक्षी आरोग्य सेवा योजना, ‘आयुष्मान भारत’चे अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणाच्या किंमती कमी केल्या आहेत. योगाची लोकप्रियता आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. आपल्या तरूणांनी तंदुरुस्त रहावे हा निरामय आरोग्याचा उद्देश आहे. आणि, त्यांना जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करण्याची गरज नाही. जेव्हा कोविड -19 साठी जगाला औषधांची आवश्यकता होती, तेव्हा ती सर्वांना पाठवल्याचा भारताला अभिमान आहे. आता जागतिक लसीकरणात भारत मध्यवर्ती भूमिका पार पाडत आहे. निरोगीपणाबद्दल आमची दूरदृष्टी जितकी स्थानिक आहे तितकीच जागतिक आहे.
कोविड -19 नंतर जग आरोग्य व निरामयतेकडे अत्यंत गांभीर्याने पहात आहे. यासंदर्भात देण्यासाठी भारताकडे बरेच काही आहे. आपण भारताला आध्यात्मिक आणि निरोगी पर्यटनाचे केंद्र बनवण्याच्या दिशेने काम करूया. आपला योग आणि आयुर्वेद निरोगी वसुंधरेसाठी योगदान देऊ शकतात. जगाला समजेल अशा भाषेत ते सादर करणे हे आपले ध्येय आहे. आपण त्यांच्या फायद्यांविषयी वैज्ञानिकदृष्ट्या विश्लेषण केले पाहिजे आणि जगाला पुनरुजीवित होण्यासाठी भारतात येण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. तुमची स्वतःची मनस्वी ध्यान साधना त्या दिशेने एक पाऊल आहे.
मित्रांनो
कोरोना-नंतरच्या जगात आता योग आणि ध्यान धारणा बाबतीत संपूर्ण जगात गांभीर्य वाढत आहे. श्रीमद्भागवद् गीतेमध्ये लिहिले आहे - सिद्ध्य सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ म्हणजे , सिद्धि आणि असिद्धि यात समभाव होऊन योगात रममाण होऊन केवळ कर्म करत रहा. हा समभाव म्हणजेच योग म्हटले जाते. योगसाधनेबरोबरच ध्यान धारणेची देखील आजच्या जगाला खूप जास्त गरज आहे. जगातील अनेक मोठ्या संस्थांनी दावा केला आहे की नैराश्य -डिप्रेशन मानवी जीवनाची किती मोठी समस्या बनत चालले आहे . अशा स्थितीत मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या हार्टफुलनेस कार्यक्रमातून योग आणि ध्यान धारणेच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यात मानवतेची मदत कराल.
मित्रांनो,
आपल्या वेदांमध्ये म्हटले आहे - यथा दयोश् च, पृथिवी च, न बिभीतो, न रिष्यतः। एवा मे प्राण मा विभेः।। म्हणजे ज्या प्रकारे आकाश आणि पृथ्वी भयग्रस्त होत नाहीत आणि त्यांचा विनाश होत नाही त्याच प्रकारे माझे प्राण आहेत! तुम्ही देखील भयमुक्त रहा भयमुक्त तोच होऊ शकतो जो स्वतंत्र असेल. मला पूर्ण विश्वास आहे की सहजमार्गावर चालत तुम्ही लोकांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भयमुक्त बनवत राहाल. रोगांपासून मुक्त नागरिक, मानसिक दृष्ट्या सशक्त नागरिक, भारताला नव्या उंचीवर घेऊन जातील. यावर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देखील प्रवेश करत आहोत . तुमचे प्रयत्न , देशाला पुढे नेतील या कामनांसह पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा .
धन्यवाद!