मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, भारताच्या औद्योगिक जीवनाला गती देणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक, आणि आय टी क्षेत्रात कार्यरत आमची युवा पिढी. गावात सामुदायिक सेवा केंद्रात बसलेले, अनेकानेक आशा-आकांक्षा मनात ठेवून स्वप्ने बघणारे आमचे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, आयआयटी सह अनेक संस्थांचे विद्यार्थी, माझ्यासाठी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे, की माझे जे सर्वात प्रिय काम आहे, ते करण्याची, तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे.
आमचे मंत्री श्री रविशंकर प्रसाद आता सरकारच्या कामांची माहिती देत होते, मात्र आज मी हे सांगण्यासाठी तुमच्यामध्ये आलेलो नाही. कुठल्याही व्यक्तीने आपल्या व्यवसायात कितीही प्रगती केली, कितीही श्रीमंती-वैभव मिळवलं, कितीही पदे आणि प्रतिष्ठा मिळवली, म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास, त्याने आपल्या आयुष्यात बघितलेली सगळी स्वप्ने साकार केली, तरीही, त्यांच्या मनात समाधानाची भावना का नसते. त्याला आतून समाधान का मिळत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतांना आम्ही अनुभव घेतला की, जेव्हा व्यक्ती सर्व मिळवल्यावर दुसऱ्यांसाठी काही करते, इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करते, तेव्हाच, त्याला खरे समाधान मिळते.
आता इथे दाखवलेल्या माहितीपटात मीअज़ीम प्रेमजी यांचे बोलणे ऐकत होतो. 2003-04 मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्या कारकिर्दीत ते मला भेटायला येत असत. त्यावेळी ते आपल्या उद्योगाविषयी, सरकारकडे असलेल्या कुठल्या कामाविषयी बोलायचे, मात्र त्यानंतर मी पाहिलं की गेल्या 10-15 वर्षात आम्ही जेव्हा कधी भेटतो, तेव्हा एकदाही ते आपल्याविषयी, आपली कंपनी किंवा कॉर्पोरेट क्षेत्र कशा विषयीही कधीच चर्चा करत नाही. ते चर्चा केवळ एकाच गोष्टीवर करतात, ती म्हणजे त्यांनी हाती घेतलेलं शिक्षणाचं अभियान.
आणि त्याविषयी ते इतके भरभरून बोलतात, इतके मन लावून काम करताहेत, जेवढं कदाचित त्यांनी आपल्या कंपनीसाठीही नसेल केलं. मी अनुभवतो आहे कि त्या अवयात त्यांनी आपल्या आयुष्यात एवढी मोठी कंपनी सुरु केली, खूप यश मिळवलं. मोठा प्रवास केला, मात्र त्यांना खरे समाधान आता मिळते आहे. आता ते जे काम करताहेत, त्यातून! याचा अर्थ हा आहे की व्यक्तीच्या जीवनात, …म्हणजे मला असे म्हणायचं नाही की, आपण ज्या व्यवसायात आहोत, म्हणजे समजा एक डॉक्टर असेल तर तो कोणाची सेवा करत नाही. तो ही करतोच. एक वैज्ञानिक प्रयोगशाळेत आपले संपूर्ण आयुष्य खपवतो आणि असे काही संशोधन करतो, ज्यातून पिढ्यानपिढ्यांचे आयुष्य बदलणार असतं. याचा अर्थ असा नाही की ते समाजासाठी काम करत नाही. याचा अर्थ असाही नाही की तो केवळ स्वतःसाठी जगतो आणि स्वतःचे नाव होण्यासाठी काम करतो, नाही नाही. तो लोकांसाठीच काम करत असतो., मात्र आपल्या समोर, आपल्या हाताने आपण जी समाजसेवा करतो, तिचे समाधान काही वेगळेच असते. आणि या समाधानाची मूळ प्रेरणा असते,की प्रत्येक व्यक्ती, अगदी तुम्ही स्वतःलाही बघा, आपल्या जीवनाला बघा. स्वांत: सुखाय. काही लोक असही म्हणतात, की याला आतून समाधान मिळते, आनंद मिळतो. मला ऊर्जा मिळते.
आपण रामायणातली एक कथा नेहमीच ऐकतो की एक खारुताई, रामसेतू बांधण्याच्या कामात सहभागी झाली होती. त्या खारूताईने तर प्रेरणा घेऊन सेतू बांधण्याच्या कार्यात आपला चिमुकला वाटा देण्याचा प्रयत्न केला. मात्र याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोनही असू शकतो. तो म्हणजे, जर रामाला यशस्वी व्हायचे असेल, भलेही मग राम देव का असेना, मात्र त्यालाही खारुताईची मदत लागतेच. जेव्हा सगळे असा खारीचा वाटा उचलतात तेव्हाच काम यशस्वी होऊ शकते. सरकार कितीही उपक्रम राबवत असतील, कितीही निधी खर्च करत असेल, मात्र जोपर्यत जनता त्यात भाग घेत नाही, तोपर्यत आपल्याला हवे ते परिणाम मिळू शकत नाही. आणि आता भारत अधिक काळ वाट बघू शकत नाही. जर देखील आता भारताला आणखी काळ वाट बघतांना बघू शकत नाही. भारताने आता नेतृत्व करावे अशी जगाचीही अपेक्षा आहे. आणि जर जगाची ही अपेक्षा असेल, तर आपल्यालाही आपला देश तसा बनवावा लागेल. आणि ते करायचे असेल, तर देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात बदल कसा घडवणार? माझ्याकडे जे कौशल्य आहे,जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, जो अनुभव आहे, त्याचा मी इतरांसाठी काही उपयोग करु शकतो का?
एक गोष्ट नक्कीच आहे की आपल्या देशात अशा अनेक जागा आहेत, जिथे कोणी गरीब व्यक्ती, कोणी भुकेली व्यक्ती गेली, तर त्याला जेवायला नक्की मिळेल. अशा गरिबांना अन्न देणारे अत्यंत समर्पित भावाने ते दान देत असतात, हे खरे. आणि जेवण मिळते म्हणून तीही व्यक्ती तिकडे जात राहते. काही दिवसांनी अशा जागांवर एक संस्थात्मक व्यवस्था बनून जाते. अशी व्यवस्था, जिथे जाणाऱ्याला वाटते, मी गेलो, की मला अन्न मिळेल, म्हणून तो जात राहतो. आपल्याला हे अन्न कोण देतय, का देतंय याकडे त्याचे लक्ष नसते. आणि देणाऱ्याच्या मनातही काही विशेष भावना नसतात. हा आलेला याचक कोण होता? कुठून आला होता, असा विचार तोही करत नाही. का? कारण त्याची त्याला एक सवय बनून गेली असते. कोणीही आले, तरी तो जेवायला देतो आणि याचक ते घेऊन निघून जातो.
मात्र जेव्हा एखादी गरीब व्यक्ती कुठल्या गरीबाच्या दारी उभी असेल, भुकेली असेल. आणि गरीब आपल्या एका पोळीतली अर्धी पोळी त्याला देतो. ही घटना दोघांनाही आयुष्यभर लक्षात राहते. त्यात त्यांना अतिशय समाधान मिळालेले असते. एक व्यवस्था म्हणून होणाऱ्या गोष्टींपेक्षा स्वयंप्रेरणेतून होणाऱ्या गोष्टी, सेवाकार्य मोठे परिवर्तन घडवत असतात, हे आपण सर्वांनी अनुभवले असेल. जेव्हा आपण कधी विमानाने प्रवास करत असू, बाजूला एखादी वयोवृद्ध व्यक्ती बसली असेल, त्यांना पाणी प्यायचं असेल मात्र, बाटली उघडत नाहीये, आपले त्यांच्याकडे लक्ष जाते, आणि आपण लगेच बाटली उघडून देतो. या छोट्याशा गोष्टीतूनही आपल्याला समाधान मिळते. म्हणजेच, कोणाला आयुष्यात आनंद अशा गोष्टींमधूनचा मिळतो.
मी एक परंपरा स्थापन करण्याचा प्रयतन केला आहे. पंतप्रधान झाल्यापासून, म्हणजे मी मुख्यमंत्री असतांनाही हे करतच होतो, की जेव्हा मी कुठल्याही विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात जातो, तेव्हा मला बोलावणाऱ्या संयोजकांना मी आवर्जून सांगतो, की तुमच्या विद्यापीठ परिसराजवळच्या झोपड्यांमध्ये राहणारी, सरकारी शाळेत शिकणारी काही गरीब मुलं असतील, आठवी, नववी, दहावीतली,मुले, असे 50 विद्यार्थी माझे विशेष पाहुणे असतील, त्यांना या कार्यक्रमात बोलवा आणि बसायला जागा द्या. त्यांना बोलावलं जातं आणि ते येतात. माझ्या मनात अशावेळी विचार येतात की या मुलांची कशीही, जुनी-तुटकी शाळा का असेना, ते तिथे शिकताहेत. आणि जेव्हा ते या दीक्षांत समारंभात येतात, तेव्हा बघतात, यशस्वी विद्यार्थी मोठा रोब घालून, मंचावर येतात, त्यांना समारंभपूर्वक पदवी प्रदान केली जाते. हे बघून या मुलांच्या मनातही एक स्वप्न जागे होते. एक बीज रुजवलं जातं, की एक दिवस मी पण तिथे जाईन आणि अशी पदवी मिळवेन.
कदाचित वर्गात शिकण्यासाठी जेवढी प्रेरणा मिळत नाही, तेवढी या एका घटनेतून त्यांना मिळत असेल. सांगण्याचे तात्पर्य हे की,आपल्याकडे अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे आपण खूप काही करू शकतो. आमचे आनंदजी इथे बसले आहेत. मी एक गोष्ट नेहमीच पहिली. तेही मी मुख्यमंत्री असल्यापासून मला भेटतात. कधी गुजरातच्या विकासासाठी, गुंतवणूकीसाठी मी उद्योजाकांसोबत बैठक घ्यायचो. मात्र हे महाशय, कधी त्याविषयी एकही प्रश्न विचारत नसत, ना चर्चा करत असत. ते नेहमी विचारायचे, साहेब,सामाजिक कामांमध्ये काय काय करता येईल? जर अशी वृत्ती असेल, तर ही वृत्ती समाजाची, देशाची खूप मोठी ताकद बनू शकते. आणि आज या कार्यक्रमात सहभागी होण्याचा, आणखी एका कारणाने मला विशेष आनंद होतो आहे.
मी सोशल मिडीयाशी संबध ठेवणारा आहे, त्यामुळे जी माहिती माझ्यापुढे ‘ठेवली’ जाते, त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. जी माहिती मला हवी असते, ती मी शोधून मिळवतो. आणि त्यामुळे मला अनेक नव्या गोष्टी कळतात. आज मला जे तंत्रज्ञान सहज उपलब्ध आहे, त्यावरूनही, मी बघितले आहे, की कित्येक मुले, युवक इतके सामाजिक काम करत असतात. तीन चार जणांचा गट,चार जणांचा, शनिवार-रविवारी निघतात, कधी गावात जातात तर कधी कुठल्या वस्तीत. लोकांमध्ये राहतात. कधी मुलांना शिकवतील,तर कधी आणखी काही करतात. म्हणजेच, भारतातली 25 ते40 य वयोगटातली जी पिढी आहे, त्यांच्या मनात अशा कामांविषयी एक स्वाभाविक प्रेरणा आपल्याला दिसते. पण जर सगळे ह्यात एकत्र आले, तर ती एक शक्ती म्हणून समोर येते. त्या शक्तीला आपण कुठे ना कुठे एका ध्येयाशी जोडायला हवे. ह्यासाठी कुठल्याही व्यवस्थेची गरज नाही. एक ध्येय असावे, एक मंच असावा, जो लवचिक असेल, प्रत्येक जण आपल्या मर्जी प्रमाणे काम करेल, पण जे काही करेल त्याची कुठे न कुठे नोंद ठेवली जाईल. त्यातून होणाऱ्या निष्पत्तीची नोंद ठेवली जाईल, तर परिवर्तन सुध्दा दिसायला लागेल. आणि एक गोष्ट निश्चित आहे – भारताचे नशीब, तंत्रज्ञानात आहे. जे तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, त्यात हिंदुस्तानचे प्राक्तन सामावलेले आहे. हे दोन्ही एकत्र करून कसं काम करू शकतो.
जर एखादा माळी आहे, त्याने मोकळ्या मैदानात बिया अश्याच फेकून दिल्या, हवामान व्यवस्थित असेल तर त्यातून रोपं उगवतील,त्यांना फुलं देखील येतील. पण कुणाला तिथे जाऊन ते बघण्याची इच्छा होणार नाही. पण हेच जर त्या माळ्याने व्यवस्थितपणे केले,एका रंगाची फुले एका ठिकाणी, एका आकाराची फुले एका ठिकाणी असतील, अमुक उंचीची रोपे अमुक ठिकाणी, अमुक इथे असेल,अमुक असे दिसेल, असं करून जर ती रोपं लावली तर त्या बगीचात जाण्याची लोकांना प्रेरणा मिळेल. कारण ? ते काम अतिशय व्यवस्थितपणे करण्यात आले आहे, एक व्यवस्था तयार करून काम केलं आहे. आपली सेवा शक्ती विखुरलेली आहे. आणि मी बघतो आहे अलीकडे सोशल स्टार्टअपचं एक युग सुरु झालं आहे. आणि जी मुलं मला भेटतात, त्यांना विचारलं की काय करता, तर म्हणतात साहेब, बस, केलं. मी बघितलं होतं, बंगळूरूला एक मुलगा, तो माहती तंत्रज्ञान क्षेत्रात होता. मी कुठेतरी समाज माध्यमात बघितलं होतं. तो गाडी चालवतो. म्हणाला, दिवसाला तीन चार तास गाडी चालवतो, का? म्हणे गरिबांना घेऊन जातो, काम करतो, मदत करतो, लोकांना दवाखान्यात नेतो, मला चांगलं वाटतं.
मी असे ऑटोरिक्षावाले बघितले आहेत, ज्यांच्या ऑटोच्या मागे लिहिले असते, जर तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे, तर मोफत नेणार. माझ्या देशातला गरीब ऑटोरिक्षावाला. समजा एखाद दिवशी त्याला सहा असे लोक भेटले ज्यांना दवाखान्यात जायचं आहे, तर त्याची मुलं उपाशी मारतील, पण त्याला चिंता नाही, तो पाटी लावतो आणि प्रामाणिकपणे ते करतो देखील. तर, हा माणसाचा मूळ स्वभाव आहे, कि कुणासाठी तरी काहीतरी करायचं आहे. आणि हे तेच आहे – ‘मै नही हम’. ह्याचा अर्थ हा नाही की ‘मै’ संपवायचं,आम्हाला ‘मै’ची व्याप्ती वाढवावी लागेल. ‘स्व’ ते समष्टी हा प्रवास करावा लागेल. शेवटी व्यक्ती आपलं कुटुंब का वाढवतो. मोठ्या कुटुंबात आनंद का मिळतो. ह्या मोठ्या कुटुंबापेक्षाही मोठं कुटुंब माझा पूर्ण समाज, माझा पूर्ण देश, हि एक शक्ती बनते. ह्याच भावनेतून, सेवाभावातून आय टी ते सोसायटी हा प्रवास आहे. एकीकडे आय टी ते सोसायटी तर आहेच, त्याचबरोबर आयआयटी ते सोसायटी देखील आहे. तर ह्या भावनेवर आम्हाला मार्गक्रमण करायचे आहे. माझी अशी इच्छा आहे, कि सात आठ ठिकाणी मला बोलायचं देखील आहे, तर संवाद सुरु करावा.
तर आपल्या देशात साधारण अशी एक पद्धत बनून गेली आहे की श्रीमंत, उद्योगपती, व्यापाऱ्यांवर टीका करायची, त्यांना विनाकारण नावं ठेवायची, ही आजकाल फॅशन झाली आहे. असं का करतात, मला कधी समजतच नाही, मला फारच आश्चर्य वाटतं याचं. आणि मी याचा पूर्ण विरोधक आहे.देश चालवण्यात, तो निर्माण करण्यात प्रत्येकाचे योगदान असते. आज इथे पाहिलं तर तुम्हाला कळेल की कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून, या उद्योजकांनी आपल्या कुशल, बुद्धिमान कर्मचाऱ्यांना सांगितलं की,चला पाच दिवस तुम्हाला सेवाकार्यासाठी द्यायचे आहेत. तुमची नोकरी सुरु राहीलच. ही छोटी गोष्ट नाही.सामान्य जीवनात एक खूप मोठे योगदान आहे. मात्र आज जेव्हा आणखी एका व्यासपीठावर आलो, तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतील.आपल्या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अनेक लोक मिळून अशी महत्वाची कामे करत आहेत. ही समूहाची ताकद खूप मोठी असते. मला वाटतं की, हा जो प्रेरणेचा आधार आहे-वुई म्हणजे 'आम्ही' आणि त्यात जो स्वयं आमी सेवा असा जो विचार आहे, तो खूप महत्त्वाची भूमिका पार पाडेल. आणि तुम्ही तर संपर्क क्षेत्रातले लोक आहात, तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक आहात. त्यामुळे तुम्ही तर अगदी सहज या गोष्टी तयार करु शकाल. त्याचा परिमाणही व्यापक असेल आणि तो अनेक लोकांपर्यत पोहोचेलही. आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी काम करता आहात, त्या कमी खर्च लागणाऱ्या आहेत. आपण त्या जितक्या जास्त करु, तितकी जास्त लोक त्यातून प्रेरणा घेतील. एकेकट्या पुलांपेक्षा जेव्हा पुष्पगुच्छ बनतो, तेव्हा त्याची मजा वेगळीच असते. आणि मला वाटतं आज इथे या सेवाव्रतींचा पुष्पगुच्छ तयार करण्याचे कामच झाले आहे. आज इथे या प्रयत्नातून, सेवभावातून कष्ट करणारे, नवनव्या क्षेत्रात काम करणारे लोक आणि तेही आमची युवा पिढी करते आहे. भारतमातेला अत्यंत अभिमान वाटेल की माझ्या देशात अशी फुलं फुलली आहेत,जी निरंतर सेवेचा आणि श्रमाचा सुगंध पसरवण्याचे काम करत असतात, अनेकांची आयुष्य बदलावण्याचे काम। करत असतात.
ज्या युवकांनी अगदी मनोभावे, जीव तोडून हे काम केलं आहे, त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. ज्या उद्योग कंपन्यांनी स्वतःचा विकास साधतांनाच सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपले स्रोत आणि व्यवस्थेचा सदुपयोग केला, आपल्या कौशल्याचा उपयोग केला, त्यांचेही मी आभार मानतो.आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी, जनसहभाग अत्यंत महत्वाचा आहे,अनिवार्य आहे.सव्वाशे कोटी देशबांधव जर पुढे जाण्याचा निश्चय करतील तर जगातली कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही. भारताला पुढे जायचे आहे, सव्वा कोटी देशबांधवांच्या एकत्र शक्तीने पुढे जायचे आहे. एकदा हा निश्चय केला, आणि योग्य दिशेने प्रवास केला तर नक्कीच लक्ष्यापर्यंत पोहचता येईल. प्रत्येकजण वेगवेगवेगळ्या दिशेने प्रवास करत राहिला, तर परिणाम मिळणार नाहीत. सर्व एकाच दिशेने गेलो तर नक्कीच यश मिळेल.
आणि याबाबतीत मी खूप आशावादी व्यक्ती आहे. चार वर्षांच्या माझ्या छोट्याशा अनुभवातून मी हे नक्कीच सांगू शकतो की देश आतापर्यत प्रगती का करु शकला नाही , हा माझ्यासाठी प्रश्न आहे. देश पुढे जाईल की नाही? हा प्रश्न मला पडलेला नाही. मला विश्वास आहे की आपला देश खूप प्रगती करेल.सर्व आव्हानांचा सामना करत आपला देश जगात आपले मोठे स्थान निर्माण करेल. याच विश्वासासह, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं इथे जमले आहात आणि आज मला तुमच्याशी सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली.
खूप खूप धन्यवाद !.