भारत माता की– जय
भारत माता की– जय
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, या ठिकाणचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप-मुख्यमंत्री ब्रिजेश पाठक जी, केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह जी, उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी, इतर प्रतिनिधी मंडळी आणि बुलंदशहरातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
तुमचे हे प्रेम आणि तुमचा विश्वास, आयुष्यात यापेक्षा दुसरे मोठे भाग्य काय असू शकते. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. आणि मी इथे पाहत होतो, इतक्या मोठ्या संख्येने माता आणि भगिनी दिसत आहेत, आणि ही वेळ आपल्याकडे कुटुंबातील माता आणि भगिनींसाठी सर्वात जास्त व्यग्र असण्याची असते. स्वयंपाक करण्याची वेळ असते. पण हे सर्व बाजूला ठेवून इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, सर्व माता आणि भगिनींना माझा विशेष प्रणाम.
22 तारखेला अयोध्या धाममध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले होते आणि आता येथे जनता जनार्दनाच्या दर्शनाचे भाग्य लाभले आहे. आज पश्चिम उत्तर प्रदेशला देखील विकासासाठी 19 हजार कोटी रुपयांहून अधिकचे प्रकल्प मिळाले आहेत. हे प्रकल्प रेल्वे मार्ग, महामार्ग, पेट्रोलियम पाईपलाईन, पाणी, सांडपाणी, वैद्यकीय महाविद्यालये आणि औद्योगिक वसाहतींशी संबंधित आहेत. आज यमुना आणि राम गंगेच्या स्वच्छतेशी संबंधित प्रकल्पांचेही लोकार्पण झाले आहे. यासाठी मी बुलंदशहरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील माझ्या सर्व कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन करतो
बंधू आणि भगिनींनो,
या प्रदेशाने देशाला कल्याण सिंह यांच्यासारखा सुपुत्र दिला आहे, ज्यांनी आपले जीवन रामकार्य आणि राष्ट्रकार्य या दोहोंसाठी समर्पित केले. ते आज जिथे असतील तिथून अयोध्या धाम पाहून त्यांना खूप आनंद होत असेल. कल्याण सिंह जी आणि त्यांच्यासारख्या अनेक लोकांचे स्वप्न देशाने पूर्ण केले हे आपले भाग्य आहे. परंतु एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्याचे, खऱ्या सामाजिक न्यायाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अजूनही आपला वेग वाढवायचा आहे आणि ज्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल.
मित्रांनो,
अयोध्येत मी रामलला यांच्या सान्निध्यात म्हटले होते की, प्राण प्रतिष्ठापनेचे काम पूर्ण झाले आहे , आता देशाच्या प्रतिष्ठेला नवी उंची देण्याची वेळ आली आहे . देव ते देश आणि राम ते राष्ट्र असा मार्ग आपल्याला आणखी प्रशस्त करायचा आहे . 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि जर ध्येय मोठे असेल , तर त्यासाठी प्रत्येक साधन जमा करावे लागेल, सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील . विकसित भारताची निर्मिती देखील उत्तर प्रदेशच्या वेगवान विकासाशिवाय शक्य नाही . यासाठी आपल्याला शेतांपासून ते ज्ञान आणि विज्ञान, उद्योग आणि उद्यमापर्यंत प्रत्येक शक्तीला जागे करायचे आहे.आजचे आयोजन याच दिशेने एक मोठे पाऊल आहे, महत्त्वाचे पाऊल आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतरच्या कित्येक दशकांमध्ये बऱ्याच काळापर्यंत भारताचा विकास केवळ काही क्षेत्रांपुरता मर्यादित होता . देशाचा खूप मोठा भाग विकासापासून वंचित राहिला होता. यामध्येही देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशकडे फारसे लक्ष दिले गेले नाही . हे घडले कारण ज्यांनी येथे बराच काळ सरकार चालवले ते शासकांसारखे वागले . जनतेला वंचित ठेवण्याचा , समाजातील विभाजनाचा मार्ग त्यांना सत्ता मिळवण्याचे सर्वात सोपे साधन वाटले . त्याची किंमत उत्तर प्रदेशातील अनेक पिढ्यांनी मोजली आहे. परंतु त्याच वेळी देशाचीही यामुळे मोठी हानी झाली आहे. ज्यावेळी देशातील सर्वात मोठे राज्यच कमकुवत असेल तर देश कसा काय ताकदवान होऊ शकला असता? तुम्हीच मला सांगा देश ताकदवान होऊ शकेल का? उत्तर प्रदेशला सर्वात आधी ताकदवान बनवायला हवे की नको? आणि मी तर यूपीचा खासदार आहे आणि ही माझी विशेष जबाबदारी आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
2017 मध्ये दुहेरी इंजिनचे सरकार स्थापन झाल्यापासून उत्तर प्रदेशने जुन्या आव्हानांचा सामना करताना आर्थिक विकासाला नवी चालना दिली आहे. आजचा कार्यक्रम हा या वचनबद्धतेचा पुरावा आहे. आज भारतात दोन मोठ्या संरक्षण मार्गिकांवर काम सुरू आहे , त्यापैकी एक उत्तर प्रदेशात, पश्चिम उत्तर प्रदेशात बांधली जात आहे . आज भारतात राष्ट्रीय महामार्ग वेगाने विकसित केले जात आहेत. त्यापैकी बरेचसे पश्चिम उत्तर प्रदेशात आहेत.
आज आम्ही उत्तर प्रदेशचा प्रत्येक भाग आधुनिक द्रुतगती मार्गांनी जोडत आहोत . भारताचा पहिला नमो भारत रेल्वे प्रकल्प पश्चिम उत्तर प्रदेशातच सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरे मेट्रो सुविधेने जोडली जात आहेत . मित्रांनो , उत्तर प्रदेश पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे केंद्रही बनत आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, जी येणाऱ्या शतकांपर्यंत महत्त्वाची राहणार आहे . जेव्हा जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होईल , तेव्हा या प्रदेशाला एक नवीन ताकद, एक नवे उड्डाण मिळणार आहे.
मित्रांनो,
सरकारच्या प्रयत्नांनी आज पश्चिम उत्तर प्रदेश रोजगार देणाऱ्या प्रमुख केंद्रांपैकी एक बनत आहे. केंद्र सरकार, देशात चार नवीन औद्योगिक स्मार्ट शहरे बनवण्याच्या तयारीत आहे. अशी नवी शहरे जी जगातील सर्वोत्तम उत्पादन आणि गुंतवणुकीच्या स्थानांना आव्हान देऊ शकेल. यापैकी एक औद्योगिक स्मार्ट शहर, पश्चिम उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये तयार होत आहे. आणि आज मला या महत्त्वाच्या टाऊनशिपचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले आहे. या ठिकाणी अशा प्रत्येक पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत, ज्या रोजच्या जीवनासाठी, व्यापार-व्यवसाय- उद्योगासाठी आवश्यक आहेत.
आता हे शहर जगभरातील गुंतवणूकदारांसाठी तयार आहे . याचा फायदा उत्तर प्रदेशातील , विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रत्येक छोट्या, लघु आणि कुटीर उद्योगालाही होईल. आमची शेतकरी कुटुंबे, आमचे शेतमजूरदेखील याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील . कृषी आधारित उद्योगांसाठी नव्या शक्यता निर्माण होतील.
मित्रांनो,
तुम्हाला हे देखील माहीत आहे की , पूर्वी खराब दळणवळणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वेळेवर बाजारात पोहोचू शकत नव्हते . शेतकऱ्यांनाही जास्त भाडे द्यावे लागते . ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागत असे हे तुमच्यापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे ? आता यूपीमध्ये बनलेले सामान, यूपी च्या शेतकऱ्यांची फळे- भाजीपाला आणखी जास्त सहजतेने पोहोचेल.
माझ्या कुटुंबियांनो
शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे यासाठी डबल इंजिन सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मी योगी सरकारचे अभिनंदन करेन, कारण त्यांनी नव्या पेरणी क्षेत्रासाठी ऊसाचा भाव आणखी वाढवून दिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी असोत, तांदूळ उत्पादक असोत, सर्व शेतकऱ्यांना पूर्वी आपल्या पिकांचे पैसे मिळवण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती.मात्र, आमचे सरकार शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढत आहे.आमच्या सरकारने हे सुनिश्चित केले आहे की बाजारात धान्य विकल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये गेले पाहिजेत. डबल इंजिन सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात जास्तीत जास्त पैसे जावेत यासाठी आमचे सरकार इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये अतिरिक्त मिळाले आहेत.
मित्रांनो,
शेतकऱ्यांच्या कल्याणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आज सरकार प्रत्येक शेतकरी कुटुंबाभोवती एक संपूर्ण सुरक्षा कवच तयार करत आहे. शेतकर्यांना स्वस्त दरात खते मिळावीत यासाठी आमच्या सरकारने गेल्या काही वर्षांत लाखो कोटी रुपये खर्च केले आहेत. आज जगात युरियाची एक पिशवी 3,000 रुपयांपर्यंत मिळत आहे , ती भारतीय शेतकऱ्यांना 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहे. तुम्ही बरोबर ऐकले आहे का, ही युरियाची पिशवी जगात तीन हजार रुपयांपर्यंत विकली जाते, तर भारत सरकार तुम्हाला ती पिशवी 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत देते.
आता देशाने आणखी एक महत्त्वाचे काम केले आहे, नॅनो युरिया तयार केले आहे. यामुळे खताच्या एका पिशवीची शक्ती एका बाटलीत सामावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही कमी होईल आणि बचतही होईल. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पावणे तीन लाख कोटी रुपयेही सरकारने कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत.
माझ्या कुटुंबियांनो,
कृषी आणि कृषी आधारित अर्थव्यवस्थेच्या निर्मितीत आपल्या शेतकऱ्यांचे योगदान नेहमीच अभूतपूर्व राहिले आहे. आमचे सरकार सहकाराची व्याप्ती सातत्याने वाढवत आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था असो, सहकारी संस्था असो, शेतकरी उत्पादन संघटना असो, ते गावा -गावात पोहचवले जात आहे. ते छोट्या शेतकऱ्यांना बाजाराची मोठी ताकद बनवत आहेत. खरेदी-विक्री असो, कर्ज असो, अन्न प्रक्रिया उद्योग असो , निर्यात असो, अशा प्रत्येक कामासाठी शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. अगदी छोट्यातील छोट्या शेतकर्यांनाही सक्षम करण्याचे हे एक उत्तम माध्यम बनत आहेत. साठवणुकीच्या सुविधांचा अभाव ही शेतकऱ्यांची मोठी समस्या बनली आहे. आमच्या सरकारने साठवणूक सुविधा निर्माण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशभरात शीतगृहांचे जाळे तयार केले जात आहे.
मित्रांनो,
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातही आपल्या गावातील नारीशक्तीचे माध्यम खूप मोठी ताकद बनू शकते आणि त्या दिशेने आम्ही काम करत आहोत. केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. याद्वारे महिलांच्या बचत गटांना ड्रोन चालक म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे, त्यांना ड्रोन दिले जात आहेत. भविष्यात या नमो ड्रोन दीदी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी आणि शेतीसाठी मोठी शक्ती बनणार आहेत.
मित्रांनो,
शेतकऱ्यांसाठी जेवढे काम आमच्या सरकारने केले आहे तेवढे यापूर्वी कोणत्याही सरकारने केले नाही. गेल्या 10 वर्षात लोककल्याणकारी प्रत्येक योजनांचा थेट लाभ आपल्या छोट्या शेतकऱ्यांना मिळाला आहे. कोट्यवधी पक्की घरे बांधली गेली आहेत, ज्याचे सर्वात मोठे लाभार्थी छोटे शेतकरी आणि शेतमजूर आहेत. गावांमधील कोट्यवधी घरांमध्ये पहिल्यांदाच शौचालये बांधण्यात आली आहेत. पहिल्यांदाच गावातील कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. शेतकरी कुटुंबातील माझ्या माता भगिनींना याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. पहिल्यांदाच शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्तिवेतनाची सुविधाही मिळाली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना कठीण काळात मदत मिळाली आहे. पीक वाया गेल्यामुळे दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. मोफत अन्नधान्य असो, मोफत उपचार असो, त्याचे सर्वाधिक लाभार्थी गावातील माझी शेतकरी कुटुंबे आणि शेतमजूर आहेत. कोणताही लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोदी की गॅरंटी वाली गाडी गावागावात जात आहे. उत्तर प्रदेशातही लाखो लोक या गॅरंटीवाल्या गाडीशी जोडलेले आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्यासाठी तयार केलेल्या सरकारी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळेल, ही मोदींची हमी आहे. आज देश मोदींच्या गॅरंटीला गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी मानत आहे . कारण आपले सरकार जे सांगते ते करून दाखवते. आज आम्ही सरकारी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. म्हणूनच मोदी संपृक्ततेची हमी देत आहे , 100 टक्के अंमलबजावणीची हमी देत आहे. जेव्हा सरकार 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते तेव्हा कोणत्याही भेदभावाला वाव राहत नाही. जेव्हा सरकार 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहचते , तेव्हा कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा राहणार नाही. आणि हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे, हाच खरा सामाजिक न्याय आहे. गरीब कोणत्याही समाजातील असो, त्यांच्या गरजा, त्यांची स्वप्ने सारखीच असतात. शेतकरी कोणत्याही समाजाचा असो, त्याच्या गरजा आणि स्वप्ने सारखीच असतात. महिला कोणत्याही समाजाच्या असल्या तरी त्यांच्या गरजा आणि स्वप्ने सारखीच असतात. युवक कोणत्याही समाजाचे असले तरी त्यांची स्वप्ने आणि आव्हाने सारखीच असतात. म्हणूनच मोदींना कोणताही भेदभाव न करता प्रत्येक गरजूंपर्यंत लवकर पोहोचायचे आहे.
स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ काहीजण गरीबी हटाओचा नारा देत राहिले. कोणी सामाजिक न्यायाच्या नावाखाली खोटे बोलत राहिले. मात्र देशातील गरीबांनी पाहिले की, काही कुटुंबेच श्रीमंत झाली आणि काही कुटुंबांचे राजकारण फळले . सामान्य गरीब, दलित आणि मागासलेले लोक गुन्हेगार आणि दंगलींना घाबरले होते. पण आता देशात परिस्थिती बदलत आहे. मोदी, प्रामाणिकपणे तुमच्या सेवेत कार्यरत आहे. याचाच परिणाम आहे की आमच्या सरकारच्या 10 वर्षात 25 कोटी लोक... हा आकडा खूप मोठा आहे. 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. जे उरले आहेत त्यांनाही आशा वाटत आहे की तेही लवकरच गरीबीवर मात करतील.
मित्रांनो.
माझ्यासाठी तर तुम्हीच माझे कुटुंब आहात. तुमची स्वप्न माझे संकल्प आहेत. त्यामुळे तुमच्यासारखी देशातील सर्वसामान्य कुटुंबे जेव्हा सशक्त होतील तेव्हा तेच मोदींचे भांडवल असेल. गावातील गरीब असो, तरुण असो, महिला असो, शेतकरी असो, सर्वांना सक्षम बनवण्याची ही मोहीम सुरूच राहणार आहे.
आज मी पाहत होतो, काही माध्यमांमधील लोक म्हणत होते , बुलंदशहरमध्ये मोदी निवडणुकीचे रणशिंग फुंकतील. मोदी तर विकासाचे रणशिंग फुंकतात. मोदी समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी रणशिंग फुंकत राहतात. निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची मोदींना ना पूर्वी गरज होती , ना आज गरज आहे , ना भविष्यातही गरज भासणार नाही. मोदींसाठी जनता-जनार्दन रणशिंग फुंकत राहतात. आणि जेव्हा जनता-जनार्दन रणशिंग फुंकते तेव्हा मोदींना तो वेळ रणशिंग फुंकण्यात घालवावा लागत नाही. जनतेच्या पायाशी बसून सेवा भावनेने काम करण्यात ते आपला वेळ घालवतात.
तुम्हा सर्वांचे विकास कामांसाठी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. माझ्याबरोबर सर्व शक्तीनिशी बोला -
भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
खूप खूप धन्यवाद !