पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
अफगाणिस्तानात उद्भवलेली परिस्थिती आणि त्याचे क्षेत्र आणि जगावर होणारे परिणाम यावर उभय नेत्यांनी चर्चा केली.
दोन धोरणात्मक भागीदारांसाठी एकत्र काम करणे महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या.
कोविड महामारीचे आव्हान असतानादेखील दोन्ही देशांमधील 'विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी'मधील प्रगतीवर उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड महामारी विरूद्धच्या लढ्यात सुरू असलेल्या विशेषतः 'स्पुतनिक व्ही' लसीचा पुरवठा आणि उत्पादन यासंदर्भातील द्विपक्षीय सहकार्याची त्यांनी प्रशंसा केली.
ब्रिक्स शिखर परिषद, शांघाय सहकार्य संघटनेतील राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची बैठक आणि पूर्व आर्थिक मंचामध्ये भारताच्या सहभागासह आगामी बहुपक्षीय बैठकांच्या मुद्द्यांना उभय नेत्यांनी स्पर्श केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आगामी द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी त्यांना राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटीसाठी आपण उत्सुक आहोत. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विशेषत: अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली आहे.