पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतीन यांच्यात आज दूरध्वनीवरून संवाद झाला.
पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रशियाच्या अध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील 'विशेष आणि धोरणात्मक भागीदारी' अधिक दृढ करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. तसेच कोविड – 19 महामारीच्या काळातही उभय देशातील द्विपक्षीय संवादाबद्दल दोन्ही नेत्यांनी कौतुक व्यक्त केले. या संदर्भात त्यांनी संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्या मॉस्कोला नुकत्याच झालेल्या भेटींचा संदर्भ दिला.
एससीओ आणि ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या यशस्वी भूमिकेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे आभार व्यक्त केले. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एससीओ आणि ब्रिक्स परिषदेमध्ये तसेच भारतातर्फे आयोजित एससीओ प्रमुखांच्या समितीच्या परिषदेत भाग घेण्याची आपली उत्सुकता त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी यांनी भारताशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या वैयक्तिक बांधिलकीबद्दल अध्यक्ष पुतीन यांचे आभार मानले. परस्पर सोयीच्या तारखेनुसार पुढील द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.