पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश जिग्मे खेसर नामजीएल वांगचुक यांनी आज दूरध्वनीव्दारे संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भूतान नरेशांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी कृतज्ञतेने या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि भूतान नरेश तसेच त्यांच्या शाही परिवारातले माजी राजे आणि सर्व सदस्यांना धन्यवाद दिले.
भारत आणि भूतान या शेजारी मित्र राष्ट्रांमध्ये विश्वास आणि आपुलकी-जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, याविषयी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. भूतान नरेश हे मैत्रीपूर्ण संबंध अधिकाधिक बहरत जावेत, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शकाची भूमिका घेतात, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान नरेशांचे आभार व्यक्त केले.
कोविड-19 महामारी उद्रेकाच्या काळात भूतान सरकारने ज्याप्रकारे प्रभावी व्यवस्थापन केले, त्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले तसेच यासंदर्भात भूतानला सर्वतोपरी सहकार्य करण्यास भारताची तयारी असल्याचे सांगितले.
उभय नेत्यांच्या सोईनुसार भूतान नरेश आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.