पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडी आणि त्याचे क्षेत्रीय आणि जगावरील परिणाम याविषयी चर्चा केली.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांचे सुरक्षितपणे मायदेशी परतणे सुनिश्चित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
दोन्ही नेत्यांनी, अफगाणिस्तानमधील घडामोडींमुळे निर्माण झालेले मानवतावादी संकट आणि दूरगामी सुरक्षा समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने, जी 20 स्तरासह आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या आवश्यकतेवर जोर दिला.
हवामान बदलासारख्या जी -20 विषयपत्रिकेमधील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली. या संदर्भात, त्यांनी कॉप-26 सारख्या अन्य आगामी बहुपक्षीय कार्यक्रमांबाबतही विचारविनिमय केला.
जी- 20 मध्ये फलदायी चर्चा केल्याबद्दल इटलीच्या दमदार नेतृत्वाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विशेषत: अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली.