पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली.
अलिकडेच रशियाने, रशियन परंपरेनुसार नाताळ साजरा केल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि रशियाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही पंतप्रधान मोदी आणि भारताच्या नागरिकांना समृद्धी, प्रगती, आनंद आणि शांतीसाठी शुभेच्छा दिल्या.
अलिकडच्या काळात विशेषत: वर्ष 2019 मध्ये विशेष धोरणात्मक भागीदारीतील महत्वपूर्ण टप्प्याबाबत दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. वर्ष 2020 मध्ये सर्व क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी अधिक निकटपणे काम करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.
वर्ष 2020 रशियासाठी विशेष महत्वाचे असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि मॉस्कोमध्ये मे महिन्यात होणाऱ्या 75 व्या विजय दिवस समारंभात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिलेल्या आमंत्रणाबाबत पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले. रशियामध्ये यावर्षी ब्रिक्स देशांच्या परिषदेत तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि 21 व्या द्विपक्षीय वार्षिक परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सूक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षा, शांती आणि स्थैर्य कायम ठेवण्यासंदर्भात दोन्ही देशांच्या दृष्टीकोनातील समानता दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केली तसेच क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर चर्चा केली.