पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान महामहीम स्कॉट मॉरिसन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
ऑस्ट्रेलियातील जंगलात गेले बरेच दिवस पेटलेल्या वणव्यामुळे तेथील जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सर्व भारतीयांच्या वतीने तसेच स्वतःच्या वतीने शोकभावना व्यक्त केल्या. या अभूतपूर्व नैसर्गिक संकटाचा धैर्याने सामना करणाऱ्या ऑस्ट्रेलियन जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षात द्विपक्षीय संबंधातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाबरोबर धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी परस्परांच्या सोयीनुसार ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे भारत दौऱ्यात स्वागत करायला उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले.
2020 वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या.