पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी कोविड-19 या जागतिक साथीच्या आजाराच्या सद्यस्थितीविषयी तसेच या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्याच्या आर्थिक परिणामांवरच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
भारतीय आणि स्वीडिश संशोधकांनी यासंदर्भात विकसित केलेले संशोधन, माहिती आणि आकडेवारी परस्परांना देण्याबाबत यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली, ज्याचा कोविड विरुद्धच्या जागतिक लढ्यात लाभ होऊ शकेल.
भारत आणि स्वीडनचे जे नागरिक दोन्ही देशात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, त्या सर्व नागरिकांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत पोहचवण्याची ग्वाही, दोन्ही नेत्यांनी परस्परांना दिली.
कोविड-19 चा सामना करतांना आवश्यक त्या औषधांच्या पुरवठ्यासाठी दोन्ही देशातले अधिकारी संपर्कात राहतील, असेही, या चर्चेत ठरले.