पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान, जोनास गहर स्टोर यांच्याशी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.
विकसनशील देशांमध्ये नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना हवामानविषयक अर्थपुरवठा करण्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्यासह परस्पर हिताच्या अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. विकसनशील देशांना योग्य वेळी आणि वेळोवेळी, पुरेसा न्याय्य हवामान विषयक अर्थ पुरवठा कसा करता येईल याचं महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने अधोरेखित केलं आणि स्टोर यांनी याबद्दल दाखवलेल्या वचनबद्धतेचं कौतुक केलं.
नील अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या कृती दलासह, दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या विविध द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. हरित हायड्रोजन, नौवहन,विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये, भारत आणि नॉर्वे या दोन देशांदरम्यान वाढत असलेल्या सहयोगाबद्दल दोन्ही नेत्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं.