नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे ड्रूक गॅल्पो (राष्ट्र प्रमुख) जिग्मे खेसार नामग्याल वांगचूक, भूतानचे पंतप्रधान लिओनचेन लोटे शेरी, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षी आणि पंतप्रधान महिंदा राजपक्ष, मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम महम्मद सोलीह, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
पंतप्रधानांनी भारतीय जनता आणि त्यांच्या स्वत:च्या वतीने या नेत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शेजारी प्रथम धोरण आणि प्रांतामधील भारताचे सर्व मित्र आणि भागिदारांची शांतता, सुरक्षा, समृद्धी आणि प्रगतीच्या स्वप्नासाठी भारताची कटिबद्धता त्यांनी अधोरेखित केली.
भूतानच्या राजांबरोबर संवाद साधतांना पंतप्रधानांनी गेल्या वर्षातली महत्वाची कामगिरी अधोरेखित केली. ज्यामुळे उभय देशांमधले विशेष संबंध अधिक दृढ झाले. यावेळी पंतप्रधानांनी भूतानला यावर्षी दिलेली भेट तसेच तिथल्या लोकांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण सांगितली. दोन्ही देशांच्या तरुणांमध्ये आदान-प्रदान वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. भूतानच्या राजांच्या आगामी भारत दौऱ्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षी यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आणि 2020 या वर्षामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला. यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या कटिबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्याशी बोलतांना पंतप्रधानांनी श्रीलंकेबरोबर सहकार्य विस्तारण्यासाठी भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान राजपक्षी यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधले संबंध वृद्धिंगत करण्याची इच्छा व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती आणि मालदीवच्या जनतेला त्यांच्या विकासाच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती सोलिह यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आणि सध्याचे द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करतांना नवीन क्षेत्रांचा शोध घेऊन संबंध दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची अवामी लिगच्या अध्यक्ष म्हणून तीन वर्षांसाठी फेरनिवड झाल्याबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. बांगलादेशचे भारतातील माजी उच्चायुक्त सय्यद मुआझेम अली यांच्या अकाली निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. 2019 मध्ये भारत-बांगलादेश संबंधातील प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. बंगबंधू यांची जन्मशताब्दी आणि बांगलादेश मुक्ती संग्रामाची 50 वर्षे तसेच दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ व्हायला मदत होईल, असे ते म्हणाले.
नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्याशी बोलतांना पंतप्रधानांनी 2019 मध्ये अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल तसेच दोन्ही देशांमधल्या संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले. मोतीहरी (भारत)-अमलेखगंज (नेपाळ) पेट्रोलियम उत्पादन पाईपलाईन विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. बिरातनगर येथील एकात्मिक तपासणी नाक्याचे उद्घाटन तसेच नेपाळमधील गृहनिर्माण पुनर्बांधकाम प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लवकरात लवकर उद्घाटन करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.