पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिआ ट्रम्प 24-25 फेब्रुवारी 2020 रोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिआ, नवी दिल्ली आणि गुजरातच्या अहमदाबाद येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात सहभागी होतील आणि समाजातल्या विविध घटकांशी संवाद साधतील.
भारत आणि अमेरिकेतील वैश्विक रणनैतिक भागीदारी विश्वास, समान मूल्ये, परस्पर आदर आणि समजून घेण्यावर आधारित आहे. हे संबंध पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अधिक वृद्धिंगत झाले आहेत. व्यापार, संरक्षण, दहशतवाद प्रतिबंध, ऊर्जा, क्षेत्रीय व वैश्विक मुद्यांवर समन्वय त्याचप्रमाणे नागरिकांमधले संबंध अशा सर्वच क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. या संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि रणनीतिक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी हा दौरा दोन्ही नेत्यांसाठी उत्तम संधी ठरेल.