कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई-इन यांचे विशेष दूत डोंगचिया चुंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष मून यांनी भारतात विशेष दूत पाठवल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी यावेळी आपल्या मे 2015 मधील कोरिया दौऱ्याच्या आठवणींना उजाळा देत या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध विशेष रचनात्मक भागीदारीपर्यंत वृद्धींगत झाल्याचे सांगितले. तसेच कोरिया हा भारतासाठी महत्वपूर्ण भागीदार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
भारत आणि कोरिया यांच्यामध्ये व्यापार आणि आर्थिक क्षेत्राबरोबरच आता संरक्षण क्षेत्रातही द्विपक्षीय भागीदारी केली जात असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले. या द्विपक्षीय संबंधामधे वृद्धी करण्यासाठी कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांच्याबरोबर काम करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले तसेच राष्ट्राध्यक्ष मून यांना लवकरच भेटण्याची संधी मिळेल अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.