महामहिम,

नमस्कार!

सर्वप्रथम मी राष्ट्रपती रहमोन यांना एससीओ परिषदेच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा देतो. ताजिक प्रेसिडेंसीने आव्हानपूर्ण जागतिक आणि क्षेत्रीय वातावरणात या संघटनेचं कौशल्याने  संचालन केलं आहे.  ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 30 व्या वर्षानिमित्ताने, मी संपूर्ण भारतातर्फे सर्व ताजिक बंधू भगीनी आणि राष्ट्रपती रहमोन यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

महामहिम

यावर्षी आपण एससीओचेही 20 वे वर्ष साजरे करत आहोत. या शुभ प्रसंगी आपल्या सोबत नवीन मित्र सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे.  एससीओच्या नव्या सदस्याच्या रुपात मी ईराणचे स्वागत करतो. मी तीनही नवे संवाद भागिदार - सौदी अरब,  इजिप्त  आणि कतार - यांचेही स्वागत करतो. एससीओचा विस्तार आपल्या संस्थेचा वाढता प्रभाव दर्शवतोय. नवीन सदस्य आणि संवाद भागीदार यांच्यामुळे एससीओ आणखी मजबूत आणि विश्वासार्ह होईल.

महामहिम,

एससीओच्या 20 व्या वर्धापनवर्षानिमित्त या संस्थेच्या भविष्याबाबत विचार करण्यासाठीही योग्य वेळ आहे. माझे मानणे आहे की या क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि विश्वास तूट ही सर्वात मोठी आव्हानं आहेत. वाढता कट्टरतावाद या समस्यांचं मूळ कारण आहे. अफगाणिस्तानातला नुकताच झालेला  घटनाक्रम या आव्हानांना आणखी अधिक स्पष्ट करतो. या मुद्यावर एससीओने पुढाकार घेऊन कार्य करायला हवे.

इतिहासाचा मागोवा घेतला तर मध्य आशियाचे क्षेत्र मध्यममार्गी आणि प्रगतीशील संस्कृती तसेच मूल्यांचा गड राहिलं आहे. सुफीवादासारख्या परंपरा इथे शतकांपासून रुजल्या, वाढल्या आणि संपूर्ण जगात पसरल्या. याचं प्रतिबिंब आपण आजही या क्षेत्राच्या सांस्कृतिक वारशात पाहू शकतो. मध्य आशियाच्या या  ऐतिहासिक वारशाच्या आधारावर एससीओने कट्टरतावाद आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एक संयुक्त आराखडा तयार करायला हवा. भारतात, आणि एससीओच्या बहुतांश सर्व देशात इस्लाम संबंधित मध्यममार्गी, सहिष्णू आणि सर्वसमावेशक संस्था आणि परंपरा आहेत. अशात एससीओने एक मजबूत जाळं उभारण्यासाठी काम करायला हवं.

या संदर्भात मी एससीओच्या  RATS mechanism द्वारे केल्या जात असलेल्या उपयोगी कार्याची प्रशंसा करतो.  भारतात SCO-RATS ने आपल्या अध्यक्षतेच्या काळात कामकाजाच्या प्रस्तावित केलेल्या वेळापत्रकावर एससीओच्या आपल्या सगळ्या भागीदारांकडून सक्रिय सहकार्याची अपेक्षा आहे.

महामहिम,

कट्टरतावादाशी लढाई, क्षेत्रीय सुरक्षा आणि परस्पर विश्वासासाठी आवश्यक आहेच, सोबतच आपल्या तरुण पिढिच्या उज्जवल भविष्यासाठीही आवश्यक आहे. विकसित जगासोबत स्पर्धेसाठी आपल्या क्षेत्राला नव्या तंत्रज्ञानात भागधारक व्हावं लागेल.  यासाठी आपल्या प्रतिभावंत तरुणांना विज्ञान आणि  तर्कशुध्द विचारप्रणालीकडे प्रोत्साहित करावं लागेल. आपण आपल्या उद्योजक आणि स्टार्ट-अप्स यांना परस्परांशी जोडून  याप्रकारचा विचार, या प्रकारच्या नवोन्मेषी वृत्तीला प्रोत्साहन देऊ शकतो. याच विचाराने भारताने गेल्या वर्षी पहिल्या एससीओ स्टार्ट-अप व्यासपीठ आणि  युवा वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन केलं होतं. गेल्या काही वर्षात भारताने आपल्या विकास यात्रेत तंत्रज्ञानाचा यशस्वी आधार घेतला आहे. आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी युपीआय आणि रुपे कार्ड सारखं तंत्रज्ञान असो किंवा  कोविड विरुद्धच्या लढाईत आपल्या आरोग्य सेतु आणि कोवीन सारख्या डिजिटल व्यासपीठांचं मोलाचं काम, हे सर्व आम्ही स्वेच्छेने इतर देशांनाही दिलं आहे. एससीओ भागीदारांबरोबरही या खुल्या स्रोत तंत्रज्ञानाला सामायिक करण्यात आणि यासाठी क्षमताबांधणी आयोजित करण्यात आम्हाला आनंद होईल.

 

महामहीम,

कट्टरतावाद आणि असुरक्षेमुळे या क्षेत्रातील  विशाल आर्थिक क्षमताही दुर्लक्षितच राहिली आहे. खनिज संपत्ती असो किंवा आंतर एससीओ व्यापार, याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपल्याला परस्पर संपर्कावर भर द्यावा लागेल. इतिहासात मध्य आशियाची भूमिका प्रमुख क्षेत्रीय बाजारांमधे एका संपर्क पूलाची राहिली आहे. हाच या क्षेत्राच्या समृद्धीचाही आधार होता. भारत मध्य आशियासोबत आपला संपर्क वाढवण्यासाठी प्रतिबद्ध आहे.

आमचं मानणं आहे की  चहूबाजूने जमीनच असलेल्या मध्य आशियाई देशांना भारताच्या विशाल बाजारांशी जोडलं जाण्यानं अपार लाभ होऊ शकतो.  दुर्देवाने, आज संपर्काचे अनेक पर्याय त्यांच्यासाठी खुले नाहीत. ईराणच्या  चाबहार बंदरातील आमची गुंतवणूक, आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरीडॉर   प्रति आमचे प्रयत्न, याच वास्तवतेने प्रेरित आहे.

 

महामहिम,

संपर्क जोडणीचा कोणताही पुढाकार एकतर्फी असू शकत नाही. परस्पर विश्वास सुनिश्चित करण्यासाठी संपर्क जोडणी प्रकल्प  विचारविनिमयाने, पारदर्शीपणे आणि सर्वसहभागाने व्हायला हवेत. यात सर्व देशांच्या क्षेत्रीय अखंडतेचा, सार्वभौमत्वाचा सन्मान अंतर्भूत असायला हवा. या सिद्धांतांच्या आधारावर एससीओने क्षेत्रात संपर्क जोडणी प्रकल्पांसाठी उपयुक्त निकष विकसित करायला हवे. याद्वारेच आपण या क्षेत्राच्या पारंपरिक संपर्क जोडणीला पुनर्स्थापित करु शकू. तेव्हाच संपर्क जोडणी प्रकल्प आपल्यातील अंतर वाढवण्याचं नाही तर आपल्याला जोडण्याचं काम करतील. या प्रयत्नासाठी भारत अपल्याकडून सर्वोतोपरी योगदान देण्यासाठी तयार आहे.

 

महामहीम,

एससीओच्या सफलतेचं एक मुख्य कारण हे आहे की याचं मूळ उद्दीष्ट क्षेत्राची प्राथमिकता राहिलं आहे. कट्टरतावाद, संपर्क आणि माणसांशी थेट संपर्क यासंबंधीची माझी मते, सूचना एससीओच्या या भूमिकेला अधिक सक्षम बनवतील. माझं म्हणणं समाप्त करण्याआधी, मी आपले यजमान राष्ट्रपती रहमोन यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. त्यांनी या संमिश्र पद्धतीच्या आव्हानातही संमेलनाचं उत्कृष्ट आयोजन आणि संचालन केलं. मी आगामी अध्यक्ष उझबेकिस्तानलाही  शुभेच्छा देतो आणि भारताच्या सहकार्याचं आश्वासन देतो.

खूप खूप धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage