पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी 19 नोव्हेंबर रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या जी20 शिखर परिषदेला अनुषंगून दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भेट घेतली. पहिली वार्षिक शिखर परिषद 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान अल्बनीज यांच्या भारताच्या राजकीय दौऱ्यादरम्यान झाली होती.
पंतप्रधानांनी भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक रणनीतिक भागीदारीला बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा आपला पाठिंबा दर्शवला. त्यांनी संरक्षण व सुरक्षा, व्यापार व गुंतवणूक, शिक्षण, कौशल्य आणि गतिशीलता, नवीकरणीय ऊर्जा, अवकाश, क्रिडा आणि दोन्ही देशातील जनतेमधील परस्पर संबंध या क्षेत्रांमधील सहकार्यावर चर्चा केली. या निमित्ताने एक संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले. पंतप्रधानांनी नवीकरणीय ऊर्जा भागीदारीच्या शुभारंभाबद्दल आनंद व्यक्त केला.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक व जागतिक विषयांवर विचारांचे आदानप्रदान केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित शांततामय, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी आपली वचनबद्धता देखील व्यक्त केली.