देशातील महान क्रांतिकारकांचा आज स्मृतीदिन आहे.
तरल बुद्धीमत्तेचे धनी असलेल्या डॉ. लोहिया यांनी आपल्या जीवनात जनहिताच्या राजकारणाला कायम केंद्रस्थानी ठेवले. भारत छोडो आंदोलनाच्या काळात देशातील मोठअया नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी तरूण लोहिया यांनी या आंदोलनाची धुरा सांभाळली आणि पुढे नेली. आंदोलनाची मशाल तेवत ठेवण्यासाठी लोहिया यांनी भूमिगत राहून अंडरग्राऊंड रेडिओ सेवा सुरू केली.
गोवा मुक्ती संग्रामाच्या इतिहासात डॉ. लोहियांचे नाव स्वर्णाक्षरात कोरले आहे. देशात जिथे कुठे शोषित, पिडीत आणि वंचितांना नेतृत्त्वाची गरज भासली तिथे डॉ. लोहिया कायम उपस्थित राहिलेत.
डॉ. लोहियांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देतात. त्यांनी शेतीचे आधुनिकीकरण आणि अन्नदात्याचे सशक्तीकरण यासंदर्भात प्रचुर लेखन केले आहे. त्यांनी माडंलेल्या या विचारांवर वाटचाल करीत एनडीए सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, कृषी सिंचन योजना, सॉईल हेल्थ कार्ड, e-Nam आणि इतर योजनांच्या माध्यमातून शेतक-यांच्या हितासाठी कार्य करीत आहे.
डॉ. लोहिया यांनी सामाजिक भेदभाव, जाती व्यवस्था आणि महिला-पुरुष असमानतेबाबत कायम विषाद वाटत राहिला. ‘सबकासाथ, सबकाविकास’या मूलमंत्राला शिरोधार्य मानून गेल्या 5 वर्षात आम्ही केलेल्या कामगिरीतून डॉ. लोहियांचे स्वप्न साकार करण्यासाठी एनडीए सरकारने केलेले प्रयत्न पाहून डॉ. लोहिया नक्कीच सुखावले असते.
डॉ. लोहिया जेव्हा संसदेत किंवा संसदेबाहेर बोलायचे तेव्हा काँग्रेसमध्ये भीती निर्माण होत असे. देशासाठी काँग्रेस किती घातक बनत चालली आहे याची डॉ. लोहियांना पूर्ण जाणिव होती. काँग्रेसच्या शासनकाळात शेती, उद्योग, सैन्य आणि इतर कुठल्याही क्षेत्रात सुधारणा झाल्या नसल्याचे त्यांनी 1962 साली सांगितले होते. त्यांचे हे शब्द काँग्रेसच्यानंतर आलेल्या सर्व सरकारांनाही लागू पडतात. त्यानंतरच्या काँग्रेस शासन काळातही शेतक-यांची पिळवणूक करण्यात आली. उद्योगांना हतोत्साहित केल्या गेले. (काँग्रेस नेत्यांचे मित्र आणि नातेवाईकांचे उद्योग वगळून) तसेच राष्ट्रीय सुरक्षेकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
डॉ. लोहिया मनापासून काँग्रेसच्या विचारांचा विरोध करीत असत. त्यांच्या प्रयत्न आणि पुढाकारातूनच 1967 साली झालेल्या निवडणुकांमध्ये साधनसंपन्न आणि शक्तीशाली असलेल्या काँग्रेसला जोरदार झटका बसला होता. त्यावेळी स्व. अटल बिहारी बाजपेयी यांनी म्हंटले होते की, “हावडा-अमृतसर मेलच्या प्रवास मार्गात एकही काँग्रेसशासित राज्य नसणे याचे श्रेय डॉ. लोहियांच्या प्रयत्नांना जाते.” वर्तमान राजकारणातील दुर्दैवी घटना पाहून डॉ. लोहिया देखील विचलीत आणि व्यथित झाले असते. लोहियांच्या तत्त्वज्ञान आणि सिद्धांतावर वाटचाल करण्याच्या गोष्टी सांगणारे पक्षांनीच त्यांच्या विचारांना तिलांजली दिल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर हे पक्ष डॉ. लोहियांच्या अपमानाची एकही संधी सोडत नाहीत.
ओडिशातील ज्येष्ठ समाजवादी विचावंत श्री. सुरेद्रनाथ द्विवेदींनी सांगितले होते की, “इंग्रजांच्या शासनकाळात डॉ. लोहियांना जेवढा कारावास झाला त्याहून अधिक वेळा काँग्रेसने त्यांना तरुंगात डांबलेहोते.” परंतु, वर्तमानात तथाकथित लोहियावादी पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करून संधीसाधू महाभेसळयुक्त युती करण्यास अधीर असल्याचे दिसून येते. हे अतिशय केविलवाणे, हास्यास्पद आणि निंदनीय आहे. वंशवादी राजकारण लोकशाहीला मारक असल्याचे डॉ. लोहिया यांचे ठाम मत होते. लोहियांचे अनुयायी म्हणवणारे लोक देशाहून अधिक कुटुंबाला महत्त्व देताना दिसतात. हे विदारक चित्र पाहून आज डॉ. लोहिया नक्कीच दुःखी झाले असते. एकता, अखंडता आणि समरसतेच्या सिद्धांतावर वाटचाल करणारे योगी असतात असे डॉ. लोहियांचे मत होते. परंतु, स्वतःला लोहियावादी म्हणवणारे पक्ष त्यांच्याच सिद्धांतांना तिलांजली देवून स्वार्थ, सत्ता आणि शोषणात विश्वास ठेवताना दिसून येतात. या पक्षांचा सत्ता हिसकावणे, जनतेच्या संपत्तीची लूट आणि शोषण करण्यात हातखंड आहे. या पक्षांनी गुन्हेगार आणि असामाजिक तत्त्वांना मोकळीक दिल्यामुळे यांच्या शासनकाळात गरीब, दलित, पिडीत, शोषित आणि वंचित लोकांसह महिला स्वतःला असुरक्षित मानतात.
प्रत्येक क्षेत्रात महिला आणि पुरुष समानतेसाठी डॉ. लोहिया प्रयत्नरत होते. परंतु, मतांच्या राजकारणात आकंठ बुडालेल्या पक्षांचे आचरण लोहियांच्या विचारांशी फारकत घेणारे आहे. त्यामुळेच लोहियावादी पक्षांनी तीन-तलाक सारख्या अमानवीय परंपरांना समाप्त करण्यासाठी एनडीए सरकारने केलेल्या प्रयत्नांना सातत्याने खोडा घालण्याचे काम केले आहे. अशा पक्षांना डॉ. लोहियांचे विचार आणि आदर्श महत्त्वाचे वाटतात की, मतांचे राजकारण ? हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले पाहिजे. ज्या लोकांनी डॉ. लोहियांचा विश्वासघात केला त्यांच्याकडून देश सेवेची अपेक्षा कशी करावी ? असा प्रश्न देशातील 130 भारतीयांना भेडसावतो आहे. ज्या लोकांनी डॉ. लोहियांच्या तत्त्वांचीच फसवणूक केली ते देशाच्या नागरिकांची देखील फसवणूक करणार हे निश्चित आहे.