पंतप्रधान मॉरिसन,
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचे व्यापार प्रतिनिधी,
आणि आमच्यात सहभागी झालेले दोन्ही देशांतील सर्व मित्र,
आपणांस नमस्कार!
आज, माझे मित्र स्कॉट यांच्यासोबत एका महिन्यापेक्षाही कमी काळात झालेला हा माझा तिसरा समोरासमोर केलेला संवाद आहे. गेल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या परिषदेत आमची अतिशय फलदायी अशी चर्चा झाली. त्यावेळी, आम्ही आमच्या समूहातील सदस्यांना लवकरात लवकर आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आणि आज या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मी दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
मी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान आणि विद्यमान पंतप्रधान मॉरिसन यांचे सध्याचे व्यापार प्रतिनिधी श्री टोनी ॲबॉट यांचे विशेष अभिनंदन करू इच्छितो. त्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
मित्रांनो,
एवढ्या अल्प कालावधीत एवढा महत्त्वाचा करार होणे, हे दोन्ही देशांना एकमेकांबद्दल किती विश्वास वाटत आहे ते दर्शवत आहे. आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी हा खरोखरच निर्णायक क्षण आहे. आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये परस्परांच्या गरजा पूर्ण करण्याची प्रचंड क्षमता आहे. मला खात्री आहे की या कराराद्वारे आम्हाला या संधींचा यथोचित लाभ मिळू शकेल.
या करारामुळे आम्हाला विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांची देवाणघेवाण करणे सोपे होईल आणि हे संबंध अधिक दृढ होतील. भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार - इन्ड-ऑस ("IndAus ECTA") च्या प्रभावी आणि यशस्वी वाटाघाटीबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या समूहाचे अभिनंदन करतो.
आजच्या कार्यक्रमात सामील झाल्याबद्दल मी पंतप्रधान मॉरिसन यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि ऑस्ट्रेलियातील आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे उद्या खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाला देखील शुभेच्छा देतो.
नमस्कार!