महामहीम राष्ट्रपती आणि माझे मित्र इब्राहिम सोलिह,
आपले मालदीवचे मान्यवर मित्र
सहकारी,
नमस्कार
राष्ट्रपती सोलिह, तुमच्याशी संवाद साधणे नेहमी आनंददायी असते. तुम्ही आणि मालदीव कायम आमच्या हृदयात आणि मनात आहात.
काही दिवसांपूर्वीच तुम्ही तुमचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल मला तुमचे अभिनंदन करायचे आहे. मालदीवमधल्या लोकशाही आणि विकासासाठी हे महत्वाचे वर्ष होते. तसेच भारत-मालदीव संबंधासाठी देखील हे महत्वाचे वर्ष होते.
माझ्या सरकारचे ‘शेजारी प्रथम’ आणि तुमच्या सरकारच्या ‘भारत प्रथम’ धोरणामुळे सर्वच क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत झाले आहेत. आपल्या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे मालदीवच्या अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि क्षमता निर्मितीला चालना मिळाली आहे.
मालदीवच्या प्राधान्य आणि गरजेच्या क्षेत्रांमध्ये हा विकास साध्य झाला हे महत्वाचे आहे.
आज भारतात निर्मिती केलेली जलद इंटरसेप्टर नौका अधिकृतपणे तुमच्या तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आली. माझ्या गुजरात या जन्मगावी एल ॲण्ड टी ने या प्रगत नौकेची निर्मिती केली आहे. यामुळे मालदीवच्या सागरी सुरक्षेत वाढ होईल आणि तुमच्या नील अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. या गस्ती नौकेला ‘कामयाब’ हे नाव दिल्याबद्दल मला आनंद झाला. कामयाब म्हणजे धिवेही आणि हिंदी भाषेत यश असा अर्थ आहे.
महामहीम,
अड्डूच्या विकासाला तुमचे सरकार देत असलेले महत्व माझ्या लक्षात आहे. द्वीपसमूहांवरील समाजाच्या उपजिविका साधनांना मदतीसाठी उच्च प्रभावाच्या समुदाय विकास प्रकल्पात भागीदार बनल्याबद्दल भारताला आनंद झाला आहे.
मित्रांनो,
दोन्ही देशांच्या जनतेमधील संबंध हे आपल्या दोन्ही देशांमधील दृढ संबंधांचे प्रमुख वैशिष्ट आहे. मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. भारत पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या आठवड्यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथून तीन थेट विमानसेवा सुरू करण्यात आल्या.
रूपे कार्डमुळे मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या आणखी वाढेल. बँक ऑफ मालदीवच्या माध्यमातून हे कार्ड सुरू करण्यात आले.
महामहीम,
आज आम्ही मालेच्या जनतेला एलईडी पथदिवेही समर्पित केले. या पर्यावरणस्नेही दिव्यांचा लाभ त्यांना देताना भारताला आनंद होत आहे. यामुळे त्यांची 80 टक्के बचत होणार आहे. हुलहुलमाले येथे कर्करोग रुग्णालय आणि क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
34 बेटांवर जल आणि स्वच्छता प्रकल्प तसेच अड्डू येथे रस्ते आणि रिक्लेमशन कार्य लवकरच सुरू होईल असे मला सांगण्यात आले आहे.
आगामी काळात भारताच्या सहाय्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमुळे मालदीवच्या जनतेला आणखी लाभ मिळतील. एक मित्र आणि सागरी शेजारी देश म्हणून मालदीवच्या लोकशाही आणि विकासाप्रती भागीदारी सुरू ठेवायला भारत वचनबद्ध आहे.
हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि परस्पर सुरक्षा नांदावी यासाठी आपण सहकार्य वृद्धिंगत करू.
महामहीम,
दिल्लीत तुमची भेट घेण्यासाठी मी उत्सूक आहे. शांतता आणि समृद्धीसाठी मी मालदीवच्या जनतेला शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद!