आयुष्यात जर कधी अपयश आले तर त्यातून कसे सावरावे, हे शिकायचे असेल तर चांद्रयान हे त्यासाठीचे सर्वोत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षा पे चर्चा करताना सांगितले. “चांद्रयान जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले जाणार होते, त्यावेळी इस्रोला दिलेली भेट आणि इस्रोच्या मेहनती शास्त्रज्ञांसोबत घालवलेला वेळ मी कधीच विसरू शकत नाही”, असे ते म्हणाले.
इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांविषयी सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ नियोजनानुसार चांद्रयान उतरवता येऊ शकलं नाही, तेव्हा शास्त्रज्ञांच्या चेहेऱ्यावरची निराशा मला दिसत होती. एखादी तात्पुरती पीछेहाट झाली याचा अर्थ असा नाही की, पुढे कधीच यश मिळणार नाही. उलट त्याचा असा अर्थ होतो की, तुमची अजून चांगली वेळ यायची आहे.”