आज, आम्ही – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन - सर्वसमावेशक आणि लवचिक अशा मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी टोक्यो  येथे बैठक घेत आहोत.

वर्षभरापूर्वी  नेते प्रथमच भेटले होते.  आज टोक्योमध्ये, आम्ही आमची चौथी बैठक बोलावली आहे, आणि आमची ही  दुसरी व्यक्तिशः  बैठक आहे.  जागतिक आव्हानाच्या काळात क्वाड कल्याणकारी  शक्ती असून हिंद-प्रशांत क्षेत्राला ठोस  फायदे मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे,  हे दाखवण्यासाठी ही बैठक आहे. आमच्या सहकार्याच्या पहिल्या वर्षात, आम्ही सकारात्मक आणि व्यावहारिक कार्यक्रमासाठी  क्वाडचे समर्पण स्थापित केले;  दुसऱ्या वर्षात, आम्ही हे वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून  21 व्या शतकासाठी हा प्रदेश आम्ही अधिक लवचिक बनवणार आहोत.

कोविड-19 महामारीमुळे जगभरात अजूनही मानवी आणि आर्थिक वेदना आहेत, विविध देशांमध्ये  एकतर्फी कारवाई करण्याची प्रवृत्ती आहे आणि युक्रेनमध्ये एक दुःखद संघर्ष सुरू असताना आपण स्थिर  आहोत. आम्ही स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, लोकशाही मूल्ये, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता, धमकी किंवा बळाचा  वापर न करता विवादांचे शांततापूर्ण निराकरण, स्थिती बदलण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न,तसेच  नौपरिवहन आणि एखाद्या हवाई क्षेत्रात विमान उड्डाणाचे  स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचे आम्ही जोरदार समर्थन करतो,  जे हिंद-प्रशांत क्षेत्र  आणि जगात  शांतता, स्थैर्य  आणि समृद्धीसाठी आवश्यक आहेत. प्रदेशात आणि त्यापलीकडे ही तत्त्वे राबवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे निर्णायकपणे काम करत राहू. आंतरराष्ट्रीय नियम-आधारित व्यवस्था कायम ठेवण्याच्या आमच्या संकल्पाचे आम्ही समर्थन  करतो ज्याद्वारे  देश सर्व प्रकारच्या लष्करी, आर्थिक आणि राजकीय सक्तीपासून  मुक्त आहेत.

शांतता आणि स्थैर्य

आम्ही युक्रेनमधील संघर्ष आणि सध्या सुरू असलेल्या दुःखद मानवतावादी संकटासंदर्भात  आमच्या  प्रतिसादांबाबत चर्चा केली आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील परिणामांचे मूल्यांकन केले. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या दृढ संकल्पाचा चारही नेत्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही निःसंदिग्धपणे हे अधोरेखित केले की आंतरराष्ट्रीय कायदा हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्रचे नियम , सार्वभौमत्व आणि सर्व देशांच्या  प्रादेशिक अखंडतेप्रति  आदर आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्व देशांनी विवादांचे शांततापूर्ण निराकरण केले पाहिजे यावरही आम्ही भर दिला.

मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राचा  सामायिक दृष्टीकोन असणाऱ्या प्रदेशातील भागीदारांसोबत सहकार्यासाठी क्वाड वचनबद्ध आहे. आसियान ऐक्य आणि केंद्रस्थानासाठी आणि हिंद-प्रशांत क्षेत्राबाबत आसियान दृष्टिकोनाच्या व्यावहारिक अंमलबजावणीसाठी आमचा पाठिंबा आहे. सप्टेंबर 2021 मध्ये घोषित केलेल्या हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्यासाठी युरोपीय  संघाच्या धोरणावरील  संयुक्त निवेदनाचे आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात  वाढत्या युरोपियन सहभागाचे आम्ही  स्वागत करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करू, विशेषत: समुद्राच्या कायद्यावरील  (UNCLOS) संयुक्त राष्ट्र घोषणापत्रात  प्रतिबिंबित केल्याप्रमाणे, आणि पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रासह  सागरी नियम-आधारित व्यवस्थेसमोरील  आव्हानांना तोंड देण्यासाठी, नौपरिवहन  आणि ओव्हरफ्लाइटचे स्वातंत्र्य राखू. विवादित भागाचे  लष्करीकरण, तटरक्षक जहाजे आणि सागरी लष्करी जवानांचा  धोकादायक वापर तसेच इतर देशांच्या अपतट संसाधनांबाबतच्या गतिविधीत अडथळा आणण्याच्या प्रयत्नांसारख्या कोणत्याही सक्ती, चिथावणीखोर किंवा एकतर्फी कारवाईचा आम्ही तीव्र विरोध करतो.

सागरी सुरक्षा सुधारण्यासाठी वैयक्तिक आणि एकत्रितपणे, आम्ही प्रशांत बेट देशांसोबत आमचे सहकार्य आणखी मजबूत करू, त्यांचे आर्थिक कल्याण वाढवू, आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय लवचिकता मजबूत करू, आणि त्यांचे मत्स्यपालन टिकवून ठेवू, शैक्षणिक संधी वाढवण्यासाठी शाश्वत पायाभूत सुविधा प्रदान करू आणि ज्यामुळे प्रदेशात गंभीर आव्हाने निर्माण होतात त्या हवामान बदलाचे प्रभाव कमी करून  त्याच्याशी जुळवून घेऊ. . प्रशांत बेट भागीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. प्रशांत बेट  एकता मंच आणि प्रशांत प्रादेशिक सुरक्षा चौकटीला आमचा पाठिंबा आहे.

आमच्यामध्ये आणि आमच्या भागीदारांसोबत, आम्ही संयुक्त राष्ट्रांसह बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये आमचे सहकार्य अधिक दृढ  करू, बहुपक्षीय प्रणालीमध्ये सुधारणा आणि लवचिकता वाढवण्यासाठी आमचे सामायिक प्राधान्यक्रम बळकट करू. वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे, आम्ही आमच्या काळातील आव्हानांना प्रतिसाद देऊ, आणि हे सुनिश्चित करू  की क्षेत्र  सर्वसमावेशक, खुले राहील आणि इथे  सार्वत्रिक नियम आणि व्यवस्था  राहील.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठराव (UNSCRs) शी सुसंगत कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्ण अण्वस्त्रमुक्तीसाठी आमच्या वचनबद्धतेचा आणि जपानी अपहृतांच्या  समस्येचे त्वरित निराकरण करण्याच्या आवश्यकतेचा  पुनरुच्चार  करतो. ठरावाचे  उल्लंघन करून, उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकासाचा आणि प्रक्षेपणांचा, अनेक आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचण्यांचाही आम्ही निषेध करतो आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला या ठरावांची ठोस अंमलबजावणी करण्याचे आवाहन करतो. आम्ही उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठराव अंतर्गत त्याच्या सर्व जबाबदाऱ्यांचे पालन करण्यास, चिथावणी पासून परावृत्त होण्याचे  आणि ठोस संवादात सहभागी होण्याचे आवाहन करतो.

म्यानमारमधील संकटामुळे आम्ही चिंतित आहोत, यामुळे मानवी व्यथा निर्माण झाल्या आहेत  आणि प्रादेशिक स्थैर्याला  आव्हाने निर्माण झाली आहेत. म्यानमारमधील हिंसाचार त्वरित संपवावा , परकीयांसह सर्व राजकीय कैद्यांची सुटका करावी, रचनात्मक संवादात सहभागी होण्याचे , मानवतावादी संपर्क आणि लोकशाहीची जलद पुनर्स्थापना करण्याचे आवाहन आम्ही  करतो. म्यानमारमध्ये तोडगा काढण्यासाठी आसियानच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे आणि आसियान अध्यक्षांच्या विशेष दूताच्या भूमिकेचे स्वागत करतो.  आसियानच्या पाच मुद्यांच्या सहमतीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आम्ही आवाहन करतो.

आम्ही निर्विवादपणे दहशतवाद आणि हिंसक अतिरेकवादाचा त्याच्या सर्व प्रकारांसह  निषेध करतो आणि पुनरुच्चार करतो की कोणत्याही कारणास्तव दहशतवादी कृत्यांचे समर्थन होऊ  शकत नाही. आम्ही प्रतिपत्री दहशतवादाचा  निषेध करतो आणि सीमापार हल्ल्यांसह दहशतवादी हल्ले सुरू करण्यासाठी किंवा योजना आखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या दहशतवादी गटांना कोणतेही लॉजिस्टिक, आर्थिक किंवा लष्करी सहाय्य  नाकारण्यात यावे यावर भर देतो.  26/11   च्या मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यांसह दहशतवादी हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद  ठराव 2593 (2021) ची पुष्टी करतो, ज्यात अशी मागणी केली आहे की अफगाण भूभागाचा वापर कधीही कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी किंवा दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी किंवा प्रशिक्षण देण्यासाठी किंवा दहशतवादी हल्ल्यांची योजना किंवा वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाऊ नये. आम्ही FATF शिफारशींशी सुसंगत, मनी लाँडरिंगविरोधी आणि सर्व देशांद्वारे दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर  देतो. जागतिक दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढ्यात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद  ठराव 1267(1999) नुसार नियुक्त केलेल्या व्यक्ती आणि संस्थांसह सर्व दहशतवादी गटांविरुद्ध आम्ही ठोस कारवाई करू.

कोविड -19 आणि जागतिक आरोग्य सुरक्षा

दोन वर्षांहून अधिक काळ, जगाने -आपला समाज , नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि यंत्रणा  आणि अर्थव्यवस्थांवर कोविड -19 च्या विध्वंसक प्रभावांना तोंड दिले आहे . क्वाड देशांनी कोविड-19 प्रतिसादासाठी जागतिक प्रयत्नांचे नेतृत्व केले आहे आणि यापुढेही  उत्तम आरोग्य सुरक्षा निर्माण करणे आणि आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील. विषाणूच्या  नवीन प्रकारांना सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यावर आणि सर्वाधिक जोखीम असलेल्यांना लस, चाचण्या, उपचार आणि इतर वैद्यकीय उत्पादने मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करून विषाणूचा  सामना करण्यासाठी आम्ही आमची सामूहिक पध्दतीचा अवलंब करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आजपर्यंत, क्वाड भागीदारांनी एकत्रितपणे COVAX AMC ला अंदाजे 5.2 अब्ज अमेरिकी डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे, जे सरकारी देणगीदारांच्या एकूण योगदानाच्या अंदाजे 40 टक्के आहे. हिंद-प्रशांत क्षेत्राला किमान 265 दशलक्ष मात्रांसह  670 दशलक्ष मात्रा वितरित केल्याचा आम्हाला अभिमान आहे. कोविड-19 लसींच्या जागतिक पुरवठ्यात लक्षणीय वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन, आम्ही सुरक्षित, प्रभावी, परवडणाऱ्या  आणि दर्जेदार कोविड-19 लसी कुठे आणि केव्हा आवश्यक आहेत ते सामायिक  करत राहू.

क्वाड लस भागीदारी अंतर्गत भारतातील बायोलॉजिकल ई सुविधेत J&J लस उत्पादनाच्या विस्ताराच्या प्रगतीचे आम्ही स्वागत करतो-शाश्वत उत्पादन क्षमता कोविड 19 आणि भविष्यात उदभवणाऱ्या  साथीच्या रोगांविरुद्धच्या लढ्यात दीर्घकालीन लाभ मिळवून देईल. या संदर्भात, आम्ही भारतातील वर नमूद केलेल्या लसींबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या EUL मंजुरीची वाट पाहत आहोत. आम्ही आमच्या सहकार्याच्या मूर्त यशाचे उदाहरण म्हणून क्वाड सदस्यांच्या इतर लसीशी संबंधित समर्थनासह, जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यताप्राप्त मेड इन इंडिया लसी कंबोडिया आणि थायलंडला क्वाडने भेट दिल्याचा आनंद  साजरा करतो.

आम्ही कोविड-19 प्रतिसाद आणि भविष्यातील आरोग्य धोक्यांसाठी सज्जता या दोन्हीकडे लक्ष देत राहू.  शेवटच्या घटकापर्यंत लस पोहचवण्याचा   वेग आम्ही वाढवू ज्यामध्ये आमच्या चार देशांनी  जागतिक स्तरावर 115 पेक्षा जास्त देशांमध्ये 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक साहाय्य प्रदान केले आहेत आणि जागतिक आरोग्य सभेत  या आठवड्यात  क्वाड-आयोजित कार्यक्रमाद्वारे लस संकोच दूर करू.  आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये "कोविड -19 प्रायोरिटाइज्ड ग्लोबल अॅक्शन प्लॅन फॉर एन्हांस्ड एंगेजमेंट (GAP)" आणि कोवॅक्स  लस वितरण भागीदारीच्या  माध्यमातून समन्वय साधू. अमेरिकेने  सह-आयोजन केलेल्या दुसऱ्या जागतिक कोविड-19 शिखर परिषदेचे आम्ही स्वागत करतो आणि त्यात सामील होतो. क्वाड सदस्यांनी  3.2 अब्ज डॉलर्स आर्थिक आणि धोरणात्मक वचनबद्धता व्यक्त केली आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात आम्ही  आर्थिक आणि सामाजिक पुनरुज्जीवनासाठी सहाय्य अधिक  मजबूत करू.

दीर्घकालीन दृष्ट्या  आम्ही आर्थिक आणि आरोग्य समन्वय वाढवून आणि क्लिनिकल चाचण्या आणि जीनोमिक देखरेखद्वारे  विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्याला चालना देण्यासह, उत्तम आरोग्य सुरक्षा निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संरचना आणि महामारी प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद (पीपीआर) मजबूत करू.   आम्ही लवकर निदान व्हावे यासाठीच्या सुधारणा  आणि साथीच्या संभाव्यतेसह नवीन आणि उदयोन्मुख पॅथॉजनचे निरीक्षण करण्याची आमची क्षमता वाढवू आणि महामारी आणि साथीच्या रोगांसाठी लवचिकता वाढवण्यासाठी कार्य करू. संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन लसींच्या विकासासाठी, क्वाड  भागीदारांनी CEPI च्या पुढील टप्प्यासाठी एकत्रितपणे 524 दशलक्ष डॉलर्सची वचनबद्धता दर्शवली  आहे, जी  एकूण सार्वजनिक गुंतवणूकदारांच्या  सुमारे 50 टक्के आहे.

2023 मध्ये होणाऱ्या UHC वरील संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय बैठकीपर्यंत पीपीआर  वाढविण्यासाठी आणि युएचसीला  प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक आरोग्य संरचना अधिक बळकट करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी,युएचसीच्या मित्रांच्या गटाचे सदस्य म्हणून आम्ही जागतिक नेतृत्व स्वीकारण्यास  वचनबद्ध आहोत.

पायाभूत सोयी सुविधा 

हिंद प्रशांत क्षेत्राची समृद्धी आणि उच्च उत्पादकतेसाठी अत्यंत आवश्यक पायाभूत सोई सुविधा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या  सामायिक वचनबद्धतेचा आम्ही निग्रहपूर्वक निर्धार करतो. जगभरातल्या अनेक देशांमध्ये महामारीमुळे आलेल्या आर्थिक  संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

या क्षेत्रात पायाभूत सोई सुविधांचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने क्वाड भागीदार देशांनी अनेक दशकांचे कौशल्य आणि अनुभव एकत्र केला आहे. सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणुकीतील  तफावत भरून काढण्यासाठी आमचे भागीदार देश आणि प्रदेशासह जवळून कार्य करायला आम्ही वचनबद्ध आहोत. हे साध्य करण्यासाठी क्वाड राष्ट येत्या पाच वर्षात हिंद प्रशांत क्षेत्रात पायाभूत सोई सुविधांच्या उभारणीसह   50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक मदत आणि गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करेल.

ऋण संकटाशी सामना करणाऱ्या राष्ट्रांच्या क्षमता वृद्धीसाठी, संबंधित देशांच्या वित्त प्राधिकरणांच्या  सहकार्याने कर्ज स्थिरता आणि पारदर्शकतेचा विचार करून,G20 सामाईक रुपरेषेअंतर्गत आम्ही एकत्र कार्य करू. यासाठी क्वाड ऋण व्यवस्थापन स्त्रोत पोर्टल चा वापर करता येईल ज्यायोगे  अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय क्षमता निर्माण  करता येऊ शकतील.

क्वाड नेत्यांच्या बैठकीसोबतच आम्ही चार राष्ट्रांच्या  विकास वित्त  संस्था आणि  एजन्सींच्या बैठकीचे देखील स्वागत करतो. हिंद प्रशांत क्षेत्राला अधिक चांगल्या प्रकारे   जोडण्यासाठी आमची टूलकिट आणि कौशल्ये यांची देवाणघेवाण करण्यासाठी   आम्ही तज्ज्ञ व्यक्ती, आमचे क्षेत्र आणि एकमेकांशी समन्वय साधून कार्य करत आहोत.

प्रादेशिक आणि डिजिटल संपर्क, स्वच्छ ऊर्जा आणि हवामानातील लवचिकता यासारख्या  क्षेत्रीय आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील प्राधान्यक्रमांना  पूर्ण करण्यासाठी आम्ही सहकार्य व्यापक करू. आसियान देशांच्या दृष्टिकोनातून   विशेषतः विशिष्ट क्षेत्रांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सुविधांमधील आपत्ती लवचिकता यासारख्या क्षेत्रात पूरक कृतींचा  पाठपुरावा करण्यासाठी तसेच  या क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी आणखी सहकार्य वाढवू.

हवामान

हवामान बदल या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता लक्षात घेता हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनल IPCC च्या अहवालात ठळकपणे अधोरेखित केल्यानुसार पॅरिस कराराची जलदगतीने अंमलबजावणी करू आणि कॉप 26 परिषदेतल्या मुद्द्यांना कृतीत आणू. जागतिक महत्त्वाकांक्षा वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती देणे, ज्यामध्ये हिंद प्रशांत  प्रदेशातील महत्त्वाच्या भागधारकांपर्यंत पोहोचणे आणि या क्षेत्रातील भागीदारांद्वारे हवामानविषयक कृतींना पाठिंबा देणे, अधिक मजबूत  करणे आणि वाढवणे  यासह हवामान क्षेत्रात कार्य करणाऱ्या सार्वजनिक आणि खाजगी वित्तसंस्थांना  एकत्रित करणे आणि संशोधन सुलभ करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि उपाययोजनांचा समावेश आहे.

आज आम्ही क्वाड हवामान बदल अनुकूलन आणि शमन पॅकेज (Q-CHAMP) चे अनावरण करत आहोत, यामध्ये अनुकूलन  "adaptation" आणि शमन "mitigation” या दोन मुख्य संकल्पना आहेत. Q-CHAMP मध्ये क्वाड हवामान विषयक कार्यकारी समूहाच्या अंतर्गत सध्या सुरु असलेल्या घडामोडींचा समावेश आहे : प्रत्येक क्वाड राष्ट्रांच्या योगदानातून सामायिक ग्रीन कॉरिडॉर फ्रेमवर्कसाठी आवश्यक हरित जलवाहतुक आणि बंदरे विकास, नैसर्गिक वायू क्षेत्रात स्वच्छ हायड्रोजन आणि मिथेन उत्सर्जन याकरता स्वच्छ ऊर्जा सहकार्य, स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी सक्षम करणे,  सिडनी ऊर्जा मंचाच्या योगदानाचे स्वागत करणे, पॅसिफिक बेटातल्या देशांबरोबर अधिक  धोरण विकसित करण्यासाठी हवामान माहिती सेवा सुरु करणे, आपत्ती आणि हवामान लवचिक पायाभूत सुविधांसह आपत्ती जोखीम कमी करणे (CDRI) आपत्तीनुसार आकलन करून पायाभूत सुविधा उभारणीसाठी सहकार्य : स्वच्छ इंधन अमोनियामध्ये नव्याने सहकार्य समाविष्ट आहे, CCUS कार्बन एकत्रीकरण, वापर आणि साठा / कार्बनचे पुनर्नवीकरण, पॅरिस कराराच्या अनुच्छेद 6 अंतर्गत उच्च अखंडता कार्बन बाजारपेठेचा विकास साध्य करण्यासाठी सहकार्य आणि क्षमता निर्माण हवामानाला अनुकूल स्मार्ट कृषी हवामानाशी संबंधित उपखंडातल्या देशांमधील ज्ञानाचे आदानप्रदान आणि परिसंस्थेवर आधारित अनुकूलन Q-CHAMP ला प्रत्यक्षात आणण्यासाठी चार क्वाड राष्ट्र आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील हवामान विषयक घडामोडींचा प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आम्ही आमच्या कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी वचनबद्ध आहोत, पॅसिफिक बेटांवरील राष्ट्रांना हवामान बदलामुले  आलेल्या समस्या आम्ही जाणतो.

सरकारने हवामान बदलावर दाखवलेली प्रतिबद्धता 2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी कायदे संमत  करून आणि नवीन, महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय निर्धारीत योगदान नोंदवण्यासह, हवामान बदलावर मजबूत कृती करण्याच्या  ऑस्ट्रेलियाच्या नवीन  सरकारच्या वचनबद्धतेचे आम्ही स्वागत करतो.

सायबर सुरक्षा

झपाट्याने वाढणाऱ्या डिजिटल जगात अत्याधुनिक सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता सायबर सुरक्षितता वाढवण्यासाठी सामूहिक दृष्टिकोन विकसित करण्याची आवश्यकता आम्ही जाणतो. मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राबाबत क्वाड नेत्यांच्या दृष्टिकोनातून आमच्या राष्ट्रांचे लष्करी सामर्थ्य अधिक वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यासाठी धोक्यांबाबत माहितीची देवाणघेवाण, डिजिटली सक्षम उत्पादने आणि सेवांसाठी पुरवठा साखळीतील संभाव्य धोके ओळखणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे आणि सरकारी खरेदीसाठी बेसलाइन सॉफ्टवेअर सुरक्षा मानके प्रमाणित करणे, व्यापक सॉफ्टवेअर विकास परिसंस्था  सुधारण्यासाठी आमच्या सामूहिक क्रयशक्तीचा लाभ घेणे यांचा अंतर्भाव असून त्याचा लाभ सर्वाना होणं अपेक्षित आहे.

क्वाड सायबर सुरक्षा भागीदारी  अंतर्गत हिंद प्रशांत प्रदेशात क्षमता निर्माण कार्यक्रमांचा  समन्वय साधण्यासाठी क्वाड भागीदार देश समन्वय साधतील. आमच्या देशांमधील वैयक्तिक इंटरनेट वापरकर्त्यांना सहाय्य्य  करण्यासाठी आणि सायबर धोक्यांपासून स्वतःचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी.प्रथमच क्वाड सायबर सुरक्षा दिवस सुरू केला जाईल 

महत्वाचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

या प्रदेशात समृद्धी वाढावी तसेच सुरक्षिततेसाठी महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची जोपासना आणि विकास करण्यावर क्वाडचा भर कायम राहणार आहे. वेगवान इंटरनेटच्या 5-जी आणि 5-जीच्याही पलीकडे, दूरसंचार पुरवठादार वैविध्याविषयीच्या प्राग प्रस्तावचे स्वागत करत आम्ही 5-जी पुरवठादार वैविध्यता आणि मुक्त आरएएनविषयक सहकारी करारावर स्वाक्षऱ्या करुन आम्ही आंतर-कार्यान्वयन आणि सुरक्षेच्या नव्या क्षेत्राकडे वाटचाल करत आहोत. तसेच, उद्योगक्षेत्र, ज्यात मुक्त RAN ट्रॅक 1.5 इव्हेंटचा ही समावेश आहे, अशा क्षेत्रातही आम्ही आमचे सहकार्य अधिक दृढ करत आहोत. आणि या प्रदेशात मुक्त आणि सुरक्षित असे  दूरसंचार तंत्रज्ञान आणण्याचे मार्गही शोधत आहोत.

जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत, क्वाडच्या क्षमता आणि कमतरता दोन्हीचा अभ्यास करुन, आम्ही या क्षेत्रातील आमच्या परस्पर पूरक बलस्थानांचा अधिक लाभ करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे, आम्ही सेमीकंडक्टर्स साठी एक वैविध्यपूर्ण आणि स्पर्धात्मक बाजारपेठ प्रत्यक्षात निर्माण करु शकू. महत्वाच्या तंत्रज्ञान विषयक पुरवठा साखळीबाबतच्या तत्वाविषयीचे सामायिक निवेदन या शिखर परिषदेच्या निमित्ताने जारी करण्यात आले असून, त्यानुसार, सेमी कंडक्टर्स आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानाबाबतच्या सहकार्यात प्रगती करत, एक सहकार्यात्मक पाया यातून निर्माण झाला आहे. ज्याद्वारे, या प्रदेशात असणाऱ्या विविध धोक्यांचा सामना करण्यासाठीची आमची काटक क्षमता यामुळे वाढणार आहे.

आंतरराष्ट्रीय प्रमाणिकरण संस्थांमधील आमचे सहकार्य, जसे की आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनांचा दूरसंचार प्रमाणीकरण विभाग यांनी उत्तम  प्रगती केली आहे. आणि भविष्यात नव्या आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण सहकार्य नेटवर्क (ISCN) च्या माध्यमातून, हे सहकार्य अधिक वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे. या सहकार्यामुळे, आम्हाला हया प्रदेशात आम्हाला आमच्या सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर तंत्रज्ञान विकास करण्यास मदत होईल. आम्ही आमच्यातील सहकार्याची क्षितिजे अधिक विस्तारत मॅपिंग आणि ट्रॅक 1.5 च्या माध्यमातून जैवतंत्रज्ञान क्षेत्राविषयी अधिक सखोल चर्चा करत आहोत. आणि क्वांटम तंत्रज्ञानावर देखील भविष्यात आमचा भर असणार आहे. आम्ही उद्योग क्षेत्रातील भागीदारांसोबत, महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी भांडवल विस्तार करण्याच्या दृष्टीने, एक व्यवसायिक आणि गुंतवणूक मंच आमंत्रित करणार आहोत.

क्वाड अभ्यासवृत्ती

लोकांमधील बंध हा क्वाड संघटनेचा मूलभूत पाया आहे, याची आम्हाला जाणीव आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज क्वाड अभ्यासवृत्तीच्या शुभारंभाचे स्वागत करत आहोत. आता ही अभ्यासवृत्ती अर्ज करण्यासाठी खुली आहे. या अभ्यासवृत्ती अंतर्गत, आमच्या चार देशातले 100 विद्यार्थी दरवर्षी अमेरिकेत एकत्र येतील आणि STEM म्हणजेच, विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी-गणित या क्षेत्रांत पदवी शिक्षण घेतील. ष्ममॅट फ्यूचर्स ही संस्था या अभ्यासवृत्तीवर देखरेख ठेवेल. क्वाड देशांच्या या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र 2023 च्या तिसऱ्या तिमाहीपासून सुरु होईल.  आणि याद्वारे, जगात STEM विषयातील तज्ञ युवकांची नवी पिढी तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. हे सगळे युवा, अत्याधुनिक संशोधन आणि नवोन्मेष यात आपापल्या देशांचे नेतृत्व करतील.

अवकाश

अवकाश-संबंधित उपकरणे आणि तंत्रज्ञान देखील सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या, जसे की हवामान बदल, आपत्ती निवारणासाठीची सज्जता आणि प्रतिसाद आणि सागरी तसेच जलीय स्त्रोतांचा शाश्वत वापर, यासाठीही केला जाऊ शकतो. क्वाडचा प्रत्येक भागीदार देश पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही, पृथ्वी निरीक्षण आधारित देखरेख आणि शाश्वत विकास आराखडा तयार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करु. तसेच, अवकाश आधारित नागरी पृथ्वी निरीक्षण डेटा आम्ही परस्परांना शेयर देखील करु. त्याशिवाय, एक “क्वाड उपग्रह डेटा पोर्टल” बनवले जाईल, ज्यात आमच्या राष्ट्रीय उपग्रह डेटा स्त्रोतांकडून टिपण्यात आलेली माहिती/आकडेवारी उपलब्ध केली जाईल. अवकाशीय उपकरणे विकसित करण्यासाठी, ज्यात, पृथ्वी निरीक्षणाचाही समावेश आहे, आम्ही एकत्रित प्रयत्न करु तसेच या प्रदेशातील देशांना क्षमता बांधणीचे सहाय्य प्रदान करु. ज्यात, आमच्या अवकाशविषयक क्षमतांचे परस्पर आदानप्रदान आणि आपत्तीसारख्या स्थितीत प्रतिसाद देण्याची व्यवस्था यातील भागीदारीचा समावेश असेल.

आम्ही अवकाश क्षेत्राचा शाश्वत वापर, नियम, पद्धती, मार्गदर्शक तत्वे अशा सर्व बाबतीत चर्चा करणार आहोत. तसेच, ‘अवकाशाचा शांततामय वापर-अवकाशातील कार्यात दीर्घकालीन शाश्वततेसाठीची मार्गदर्शक तत्वे’, या विषयावरील संयुक्त राष्ट्र समितीच्या (COPUOS)  सोबत, संयुक्त कार्यशाळांच्या माध्यमातून, या प्रदेशांतील इतर देशांनाही अवकाश क्षेत्रात मदत करणार आहोत.

सागरी क्षेत्र जागृती आणि एचएडीआर

आम्ही सागरी क्षेत्र जागृतीविषयक उपक्रमांचे स्वागत करतो. सागरी क्षेत्र जागृतीसाठीच्या हिंद-प्रशांत भागीदारीचा (IPMDA), उद्देश, प्रादेशिक भागीदारांसह, मानवी आणि नैसर्गिक आपत्ती काळात, प्रतिसाद आणि मदत देणे हा आहे. तसेच अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी देखील, ही भागीदारी कार्यरत आहे. IPMDA हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांशी सल्लामसलात करुन आणि हिंद महासागरातील प्रादेशिक माहिती केंद्रांशी समन्वय साधून आपल्या उद्दिष्टप्राप्तिसाठी कार्य करणार आहे.

त्यासाठी, तंत्रज्ञानाची मदत केली जाईल, सागरी जनजागृती वाढवण्यासाठी प्रशिक्षण, आपल्या सागरी आणि महासागर क्षेत्रांत स्थैर्य आणि समृद्धी आणण्यास प्रोत्साहन दिले जाईल. क्वाड च्या स्थापनेचा उद्देश प्रत्यक्षात आणण्यासाठी IPMDA कार्य करेल हा उद्देश म्हणजे- आपले सामाईक प्रयत्न लावून, हा प्रदेश अधिक स्थिर आणि समृद्ध करण्यासाठी ठोस परिणाम मिळवण्याचे प्रयत्न करणे.

3 मार्च 2022 रोजी झालेल्या आमच्या आभासी बैठकीत व्यक्त करण्यात आलेल्या कटिबद्धतेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही अशी घोषणा करत आहोत की आम्ही, “हिंद-प्रशांत क्षेत्रात मानवी सहाय्य आणि आपत्ती मदतीसाठी क्वाड भागीदारी (HADR) आम्ही स्थापन करत आहोत. ही भागीदारी आमच्यातील सहकार्य अधिक वृद्धिंगत करुन या भागात येणाऱ्या आपत्तीचा अधिक प्रभावीपणे सामना करण्यातील सहकार्य अधिक बळकट करेल.

समापन

आज, मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राविषयीच्या सामायिक दृष्टिकोनातून आम्ही पुन्हा एकदा, मूलभूत मूल्ये आणि तत्वे यांचे महत्त्व अधोरेखित करत आहोत. तसेच या प्रदेशाच्या समृद्धीसाठी उत्तम परिणाम मिळावेत, या दृष्टीने, अथक प्रयत्न करण्याची कटिबद्धता व्यक्त करत आहोत. हे करत असताना, आम्ही क्वाडचे सर्व उपक्रम नियमित होतील याकडे लक्ष देऊ, यात, यांचे नेते आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या नियमित बैठकांचाही समावेश असेल. आमची पुढची प्रत्यक्ष बैठक, ऑस्ट्रेलियात 2023 मध्ये होईल, यावर आम्ही सहमती दर्शवली आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi