आयआयटी रूडकीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रथम जय कृष्ण स्मृती व्याख्यानामध्ये पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांचे व्याख्यान झाले. ‘कोविड-19 महामारी उद्रेकानंतर भारतामधील आपत्ती जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर मिश्रा यांचे भाषण झाले.
या व्याख्यानामध्ये पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणाले, आपत्ती जोखीम व्यवस्थापनाची व्याप्ती आता वाढली आहे. यामध्ये आता अनेक विषय मिसळले आहेत. याकडे एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित म्हणून पाहून चालणार नाही.
साथीच्या आजारांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी कोणती पावले उचलण्याची आवश्यकता आहे, यावर मिश्रा यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भर दिला. ते म्हणाले, कोविड-19 या महामारीने देशाला, संपूर्ण जगाला एक धडा दिला आहे, त्यामुळे यापुढे आता देशाला चांगले भविष्य बनवता येवू शकेल. भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देशाला सिद्धता करता येईल.