पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) 15व्या स्थापना दिन समारंभाला संबोधित केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने या प्राधिकरणाने केलेले प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
डॉ. मिश्रा यांनी आपत्ती कमी करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली. पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारांवर आधारीत हा उपक्रम असून, समाजातील दुर्बल घटकांच्या गरजा पूर्ण करणे हा या मागचा उद्देश आहे.
अग्नि सुरक्षेबाबत बोलतांना त्यांनी सर्व प्रमुख पायाभूत सुविधांचे नियमितपणे यथा परीक्षण करण्याचे आवाहन केले. अग्निशमन दलाच्या जवानांना पुरेसे प्रशिक्षण आणि योग्य प्रतिबंधात्मक सामुग्री पुरवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. महापालिकेच्या नियमांचे पालन केल्यास सुरत अग्निकांडासारख्या घटना टाळता येऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.
आग प्रतिबंधक उपकरण आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या मुंबई शहराच्या प्रयत्नांची डॉ. मिश्रा यांनी प्रशंसा केली. मुंबईत ड्रोन, लेजर इन्फ्रारेड कॅमेरे आणि रिमोट कंट्रोल द्वारे नियंत्रित करता येणारे रोबो, अग्निशमन दलाकडे उपलब्ध आहेत. या मुंबई मॉडेलचे अन्य शहरांनी अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आग दुर्घटनांमध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा असून, त्वरित सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी फिरती अग्निशमन केंद्रे हा अभिनव उपाय ठरू शकेल, असे ते म्हणाले. मुंबई, हैदराबाद आणि गुडगाव मध्ये अशा प्रकारची फिरती अग्निशमन केंद्र आहेत. स्थानिक प्रशासनानेही अग्निशामक सेवांबरोबर सहकार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अग्नि सुरक्षा हा प्रत्येकाचा प्राधान्यक्रम बनवण्यासाठी नियमितपणे जनजागृती मोहिमा आणि मॉक ड्रिलचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आगीशी संबंधित मार्गदर्शक तत्वांमधे सुधारणा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्राधिकरण, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि अग्निशमन सेवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.