पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 15 एप्रिल रोजी, गुजरातमधल्या भुज इथे, के. के. पटेल सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे राष्ट्रार्पण सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. भुज इथल्या श्री कच्छी लेवा पटेल समाजाने, हे रुग्णालय बांधले आहे.
कच्छ परिसरातील हे पहिलेच धर्मादाय सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. 200 खाटांच्या या रुग्णालयात सगळ्या सुपर स्पेशालिटी सुविधा, जसे की इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी (हस्तक्षेपात्मक हृदयचिकित्सा) कॅथलॅब, कार्डिओथोरासिक शस्त्रक्रिया, रेडीएशन ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी,सर्जिकल
ऑन्कोलॉजी अशा कर्करोगविषयक सेवा, नेफरोलॉजी, युरोलॉजी, न्यूक्लियर मेडिसीन, न्यूरो सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट आणि इतर सहायक सेवा, जसे की प्रयोगशाळा, रेडियोलॉजी इत्यादी दिल्या जातील. या रुग्णालयामुळे आसपासच्या परिसरातील लोकांना परवडणाऱ्या दरात, सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होतील.