देशातील आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी पावले उचलण्यात पंतप्रधान अग्रभागी आहेत, त्याचबरोबर देशाच्या वृद्धी आणि विकासामध्ये आदिवासींनी दिलेल्या योगदानाचा आदर पंतप्रधानांकडून केला जातो. राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, दि. 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर सकाळी 10:30 वाजता "आदी महोत्सव" या राष्ट्रीय आदिवासी महा-महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या आदि महोत्सवामध्ये आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपरिक कला यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या आदि महोत्सवाचे आयोजन आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड (टीआरआयएफईड-ट्रायफेड) च्या वार्षिक उपक्रमानुसार करण्यात आले आहे. हा महोत्सव यावर्षी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा मैदानावर 16 ते 27 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
महोत्सवामध्ये 200 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. त्यांच्या माध्यमातून देशभरातील आदिवासींच्या जमातींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा प्रदर्शित केला जाईल. या महोत्सवात सुमारे 1000 आदिवासी कारागीर - शिल्पकार सहभागी होणार आहेत. 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, त्यानिमित्त आदिवासींनी पिकवलेल्या श्रीअन्नाचे प्रदर्शन करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हस्तकला, हातमाग, मातीची भांडी, दागिने इत्यादी गोष्टींचे आकर्षण या महोत्सवात असणार आहे.