दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी दिलेल्या आमंत्रणावरून मी 22-24 ऑगस्ट 2023 या कालावधीत दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकला भेट देत आहे.
विविध क्षेत्रांसाठी मजबूत सहकार्याचे विषय ब्रिक्स राबवत आहे. विकासाची अत्यावश्यकता आणि बहुपक्षीय व्यवस्थेतील सुधारणांसह संपूर्ण ग्लोबल साउथच्या चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि विचारमंथन करण्यासाठी ब्रिक्स हे व्यासपीठ बनले असल्याचे महत्त्व आम्ही जाणतो. ही शिखर परिषद भविष्यातील सहकार्याची क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि संस्थात्मक विकासाचा आढावा घेण्यासाठी ब्रिक्सला उपयुक्त संधी प्रदान करेल.
जोहान्सबर्गमधील माझ्या वास्तव्यादरम्यान मी, ब्रिक्स शिखर परिषदेच्या क्रियाकलापांचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या, ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवाद कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या अनेक अतिथी देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.
जोहान्सबर्ग येथे उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकांसाठीही मी उत्सुक आहे.
दक्षिण आफ्रिकेहून मी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी दिलेल्या आमंत्रणावरून 25 ऑगस्ट 2023 रोजी ग्रीसमधील अथेन्स येथे जाणार आहे. या प्राचीन भूमीचा हा माझा पहिलाच दौरा आहे. 40 वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मला मिळत आहे.
आपल्या दोन संस्कृतींमधील संबंध दोन सहस्र वर्षांहून अधिक काळापासूनचे आहेत. आधुनिक काळात, लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुत्ववाद या सामायिक मूल्यांमुळे आमचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सांस्कृतिक आणि लोकांमधील संपर्क अशा विविध क्षेत्रांतील सहकार्य आपल्या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करत आहे.
माझ्या ग्रीस भेटीमुळे आपल्या बहुआयामी नातेसंबंधात एक नवा अध्याय सुरू होईल, अशी आशा मी व्यक्त करतो.