पंतप्रधान नरेंद्र मोदी, 29 डिसेंबर 2018 ला उत्तर प्रदेशातल्या वाराणसी आणि गाझीपूरला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते सहाव्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्राचे वाराणसी येथे राष्ट्रार्पण करणार असून दीनदयाळ हस्तकला संकुल येथे एक जिल्हा, एक उत्पादन क्षेत्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत. गाझीपूर येथे पंतप्रधान महाराजा सुहेलदेव यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करणार आहेत तसेच गाझीपूर येथे सभेला संबोधित करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्र, वाराणसी इथल्या राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात आहे. दक्षिण आशिया आणि सार्क क्षेत्रात तांदूळ संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून ते काम करेल. पूर्व भारतातले हे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र असून या क्षेत्रातील तांदूळ उत्पादनात ते महत्वाची भूमिका बजावेल.
आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेशी भारत 1960 पासून जोडला गेला असून संस्थेच्या मनिला इथल्या मुख्यालयाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. फिलिपाइन्समधल्या मनिला इथल्या मुख्यालयाला नोव्हेंबर 2017 मध्ये पंतप्रधानांनी भेट देऊन तांदुळासाठी कृषी क्षेत्रातील नवीनतम शोध आणि संशोधन यावर चर्चा केली होती.
वाराणसीतल्या दीनदयाळ हस्तकला संकुल येथे एक जिल्हा, एक उत्पादन क्षेत्रीय परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. स्थानिकांच्या कौशल्य वृद्धीसाठी, छोटे जिल्हे आणि शहरातल्या देशी उत्पादने तसेच हस्तोद्योगाला चालना मिळावी यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजना आहे. यामध्ये हस्तोद्योग, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी वस्तू, कपडे, चर्मोत्पादने आदी उत्पादनांचा, जी परकीय चलन मिळवून देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार पुरवतील, अशा उत्पादनांचा समावेश आहे.