पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तराखंडमधल्या रुद्रपूरला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान राज्य एकात्मिक सहकारी विकास प्रकल्पाचा शुभारंभ करतील, तसेच दीनदयाळ शेतकरी कल्याण योजनेतील निवडक लाभार्थींना कर्ज राशीच्या धनादेशाचे वितरणही करतील.
उत्तराखंडमधील ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचे लक्ष्य असलेल्या एकात्मिक सहकारी विकास प्रकल्पामुळे सहकार, कृषी आणि संलग्न क्षेत्रांना चालना मिळेल. या प्रकल्पामुळे कृषी आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्यांना पुरेसे पाठबळ उपलब्ध होईल आणि त्यामुळे उत्तराखंडमधल्या डोंगराळ प्रदेशातून होणारे सक्तीचे स्थलांतर थांबेल. या प्रकल्पातील निधीचा पहिला टप्पा म्हणून पंतप्रधान उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने राज्य सरकारकडे हस्तांतरीत केलेल्या 100 कोटी रुपयांचा धनादेशही सुपूर्द करतील.
दीनदयाळ उपाध्याय शेतकरी योजनेतील निवडक लाभार्थ्यांना पंतप्रधान कर्जाच्या धनादेशांचे वाटपही करतील. उत्तराखंड सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 2 टक्के व्याजाने एक लाख रुपयांपर्यंतचे बहुउद्देशीय कर्ज उपलब्ध होईल. 2022 पर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या राज्य सरकारच्या लक्ष्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे.
पंतप्रधानांनी आधी 7 नोव्हेंबर 2018 रोजी भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा दलातल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी उत्तराखंडमधल्या हरसिलला भेट दिली होती. तसेच 7 ऑक्टोबर 2018 रोजी डेहराडून येथे ‘डेस्टीनेशन उत्तराखंड: गुंतवणूकदार परिषद 2018’ लाही संबोधित केले होते.