पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालच्या उत्तर भागात राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 31-डी च्या फालाकाटा-सलसलाबाडी मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी करणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा 41.7 किलोमीटर लांबीचा हा भाग राज्याच्या जलपायगुडी जिल्ह्यात येतो. याच्या बांधकामासाठी 1938 कोटी रुपये खर्च येणार आहे.
या प्रकल्पामुळे सलसलाबाडी आणि अलिपूरदूआर ते सिलीगुडी हे अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे. सिलीगुडीपर्यंत जायचा रस्ता उत्तम झाल्यामुळे रेल्वे आणि हवाई मार्गापर्यंतचा प्रवासही उत्तम होईल. या राष्ट्रीय महामार्गामुळे या प्रदेशातून बाजारपेठांमध्ये चहा आणि अन्य शेतमाल पोचवणे सुलभ होणार आहे तसेच या सुधारित जोडणीमुळे या क्षेत्रात पर्यटनाला चालना मिळेल. या सर्वांमुळे या राज्यात सामाजिक, आर्थिक घडामोडींना प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांसाठी सुरक्षा विषयक सर्व सुविधा असतील. या मार्गावर तीन रेल्वे उन्नत पूल, दोन उड्डाण पूल, वाहनांसाठी तीन भुयारी मार्ग, आठ मोठे पूल आणि 17 छोटे पूल असतील.