पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दोन दिवसात गुजरात आणि तामिळनाडू या दोन राज्यांना आणि दमण आणि दीव, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांना भेट देणार आहेत.
शनिवारी पंतप्रधानांचे दमण येथे आगमन होईल. विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. एका जाहीरसभेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान तामिळनाडूचा दौरा करतील. चेन्नई येथे राज्याची कल्याणकारी योजना “अम्मा टू व्हिलर स्कीम” चे पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.
रविवारी पंतप्रधान पुद्दुचेरीला भेट देतील. अरविंद आश्रमात ते श्री अरविंद यांना पुष्पांजली अर्पण करतील आणि श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. ॲरोव्हिलेलाही पंतप्रधान भेट देतील. ॲरोव्हिलेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ते एका टपाल तिकिटाचे प्रकाशन करतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील.
पुद्दुचेरी येथे एका जाहीर सभेतही पंतप्रधान जनतेला संबोधित करतील.
रविवारी संध्याकाळी गुजरातमधल्या सुरत येथे पंतप्रधान “रन फॉर न्यू इंडिया मॅरेथॉन” ला हिरवा झेंडा दाखवतील.