पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या खेलो इंडिया शालेय स्पर्धांचे उद्घाटन करणार आहेत. देशात सर्वच स्तरावर क्रीडा संस्कृती बहरावी, सर्व प्रकारच्या खेळांसाठी मजबूत ढाचा निर्माण व्हावा आणि क्रीडा जगतातले अग्रगण्य राष्ट्र म्हणून भारताची ओळख व्हावी या उद्देशाने खेलो इंडिया कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.
शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमधले क्रीडा नैपुण्य ओळखून भविष्यातले खेळाडू म्हणून त्यांची जोपासना व्हावी हे उद्दिष्ट यामागे ठेवण्यात आले आहे. उच्चाधिकार समितीकडून विविध स्तरावर निवडण्यात आलेल्या गुणवान खेळाडूंना वार्षिक पाच लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ पुरवण्यात येणार असून आठ वर्षांसाठी हे सहाय्य केले जाणार आहे.
नवी दिल्लीत 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा चालू राहणार आहे. धर्नुविद्या, बॅडमिंटन, बास्केट बॉल, फुटबॉल, मुष्टियुद्ध, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल, भारत्तोलन, कुस्ती आणि जिमॅस्टिक अशा 16 क्रीडा प्रकारांमध्ये 17 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. देशातल्या युवा पिढीच्या क्रीडा नैपुण्याची आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेची झलक या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळणार आहे.
खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत 199 सुवर्ण पदकं तितकीच रौप्य पदकं आणि 275 कांस्य पदकांसाठी खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.